मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|बृहत्संहिता|
अध्याय ६८

बृहत्संहिता - अध्याय ६८

शके ८८८ फाल्गुन कृष्ण द्वितीया गुरुवारी उत्पलनामकाने ही टीका केली.


उन्मान (उंची,) मान (वजन,) गति, संहति, सार, वर्ण, स्नेह, स्वर, प्रकृति, सत्त्व, अनूक (उपजनस्वभाव, प्रारब्ध,) क्षेत्र (पादादि शिरात दशविध,) मजा (छाया) ही सर्व लक्षणे कुशल पुरुष पाहून सामुद्रिक जाणणारा होत्साता भूत व भविष्य फले सांगतो ॥१॥

धर्मरहित, तळवे मृदु, कमलाच्या गाभ्यासारखे पीतवर्ण, मिळालेल्या अंगुली, तेजस्वी व तांबडी नखे, मागले भाग सुंदर, ऊन, शिरांनी रहित, अत्यंत गुप्त आहेत गुल्फ (पायांच्या खोटा) ज्यांचे असे, कासवाच्या पाठीसारखे उन्नत असे, राजाचे चरण (पाय) होत ॥२॥

सुपासारखे, रूक्ष, पांढरी नखे, वक्र (वाकडे, दीर्घ,) शिरायुक्त, मांसरहित, विरल अंगुली, असे पाय दारिद्रय व दु:ख देणारे होत. उत्कटक (मध्ये उंच, पादुकांच्या आकाराचे) पाय मार्गामध्ये रत (नित्य चालणारे) होत. कषाय (काळेतांबडे) सद्दश पाय वंशनाशकारक होत. भाजलेल्या मातीच्या वर्णाचे पाय ब्रम्हाहत्या करणारे होत. पीतवर्ण पाय अगम्यस्त्रीच्याठाई आसक्त होत ॥३॥

विरल व बारीक आहेत रोम ज्यांवर अशा व वर्तुळ जंघा, (नळे, पोटर्‍या,) हत्तीच्या शुंडेसारख्या मांडया, पुष्ट व सारखे जानु, या लक्षणांनी युक्त राजे होत. कुतरा व कोल्हा यांसारख्या जंघांचे पुरुष दरिद्री होत ॥४॥

प्रत्येक कूपकां (रोमरंध्र) मध्ये एक एक केश राजाचा व दोन दोन केश पंडित व वेदवेत्ता यांचे असतात.  तीन चार केश असले तर ते मनुष्य निर्धन व दु:खी होतात. याप्रकारेच मस्तकावरीलही केश अशुभ व शुभ जाणावे ॥५॥

ज्याचे मांसरहित जानु (गुडघे, ढोपर) तो प्रवासामध्ये मरतो. कृशजानूनी सौभाग्य, बिकट (विस्तीर्ण) जानूनी दरिद्री, निम्न (खोल) जानूनी स्त्रीजित, मांसयुक्त (पुष्ट) जानूनी राज्य, मोठया जानूनी आयुप्यवृद्धि, ही फले होतात ॥६॥

शिश्न, आखूड लहान असले तर धनवान व पुत्ररहित होतो; मोठे अ० दरिद्री वामभागी नत अ० पुत्र व धन याही रहित, वाकडे असून दक्षिणनत असले तर पुत्रवान, खाली नत अ० दरिद्र, शिश्नावर शिरा बहुत अ० थोडे पुत्र होतील, मोठया ग्रंथीने युक्त असेल तर सुखी, शिश्न मृदु असता प्रमेहादि रोगांनी मृत्यु होतो ॥७॥

ज्याचे शिश्न, कोशनिगूढ (भात्यासारख्यात त्वचेने गुप्त) ते होतात. दीर्घ व स्फुटित (अग्र बाहेर पडलेले) असता द्रव्यहीन, सरळ, वाटोळे, लहान, शिरायुक्त ज्याचे शिश्न ते धनवान होतात ॥८॥

वृषण (अंड) एकबीचा असेल तर जलामध्ये मृत्यु होतो. विषम, (१ लांब बी व १ आखूड) अ० स्त्रियांची इच्छा करणारा, सारखा अ० राजा ऊर्ध्वचंद्र अ० अल्पायु, लांब वृषण अ० शतायु होतो ॥९॥

तांबडामणि (शिश्नाचा शेवट, मोठाभाग) असता राजे होतात. पांढरा व मलिन अ० दरिद्री होतात. ज्याचे मूत्र शब्दयुक्त ते सुखी, ज्यांची नि:शब्द मूत्रधारा ते दरिद्री ॥१०॥

ज्यांच्या मूत्राच्या धारा २।३।४ व प्रदक्षिणा फिरण्याने वेष्टित मूत्रधारा, ते राजे होतात. ज्यांचे विकीर्ण (थांबून होणारे) मूत्र ते दरिद्री होतात ॥११॥

जी मूत्रधारा एकच असून वेष्टित, ती सुंदर रूप करणारी होय; पुत्र देणारी नाही. (कोणी, रूपप्रधान सुतदात्री असे म्हणतात त्यांचे मती, रूप उत्तमपुत्र देणारी) स्निग्ध, उंच, सम असा मणि ज्यांचा ते द्रव्य, स्त्री, रत्ने, यांचे भोगणारे होतात ॥१२॥

मणि, मध्ये निम्न असता कन्येचे तप व दरिद्री होतात. मध्ये उंच अ० बहुत पशूंचे बाळगणारे होतात. फार मोठा मणि  नसेल तर धनवान होतात ॥१३॥

बस्ति (नाभीखालील व शिश्नावरचा भाग) शीर्ष शुष्क अ० दरिद्री व लोकांस अप्रिय होतात. पुष्पतुल्य सुगंधि रेत (धातु) ज्यांचे ते राजे होतात ॥१४॥

मधासारखा रेताचा गंध अ० धनवान, मत्स्यतुल्य रेतगंध अ० बहुत मुले होतात, स्वल्परेत अ० कन्या होतात, मांसतुल्य रेतगंध अ० सुखादि भोगणारा होतो ॥१५॥

मद्यतुल्य रेतगंध अ० याज्ञिक होतो. क्षारतुल्य रेतगंध अ० दरिद्री होतो. शीघ्र जो मैथुनगामी तो दीर्घायु व चिरकाल मैथुन करणारा अल्पायु होतो ॥१६॥

कुले फार मोठे ज्याचे तो दरिद्री, कुले मांसल अ० सुखयुक्त होतो. अध्यर्ध (दीड) कुला ज्याचा त्याला व्याघ्रापासून मृत्यु. बेडकासारखे ज्याचे कुले तो राजा होतो ॥१७॥

सिंहासारखी ज्याची कमर तो राजा होतो. वानर व उंट यांसारखी कमर तो दरिद्री, सम (उंच सखल नाही) ज्याचे उदर ते सुखी, घागर व पिठर (तपेली) यांसारखे ज्यांचे उदर ते दरिद्री होतात ॥१८॥

परिपूर्ण मांसल पार्श्व (कमरेवर चार अंगुले) भाग अ० धनवान खोल व वक्र पार्श्व अ० दु:खी कुक्षा (उदरमध्यभाग) सम अ० भोगयुक्त, निम्न कुक्षा अ० भोगरहित होतात ॥१९॥

उंच कुक्षा अ० राजे, विषम (उंचसखल) ज्या मनुष्यांची कुक्षा ते कपटी, सर्पासारखे ज्यांचे उदर ते दरिद्री व बहुत खाणारे होतात ॥२०॥

वर्तुल, उंच व विस्तीर्ण नाभि असता सुख होते. लहान, अदृश्य व खोल नाभि अ० दु:ख होते ॥२१॥

वलीमध्ये व उंचसखल नाभि अ० शूलाने मृत्यु व दरिद्र होते. वामावर्त (डावी फिरलेली अ०) कपटस्वभाव होतो. उजवी फिरलेली असता बुद्धिमान होतो ॥२२॥

बाजूस विस्तीर्ण नाभि अ० चिरण वर विस्ती० समृद्ध, खाली विस्ती० गाई इ० कांनी युक्त होतो. कमलाच्या मध्यभागासारखी मध्योन्नत नाभि असता राजा होतो ॥२३॥

१।२।३।४। अशा पोटावर वळ्या अ० अनुक्रमाने शस्त्रमृत्यु, स्त्रीभोगी, उपदेशक, बहुतपुत्र ही फले होतात. वलि नसता राजा होतो ॥२४॥

उंचसखल वलि अ० अगम्यस्त्रीगमनकर्ते व पापी होतात. सरळ वलि अ० सुखी व परस्त्रीचे द्वेषकर्ते होतात ॥२५॥

पुष्ट व मृदु व दक्षिणावर्त केश असे पार्श्व भाग (कुक्षीवरील चार अंगुले) असता राजे होतात; याहून अन्यथा (अपुष्ट, रूक्ष, वामावर्तकेश) अ० दरिद्री, दु:की व दुसर्‍याचे सेवक होतात ॥२६॥

अनुद्वद्ध (फार उंच नव्हत) अशी चूचुके (स्तनाग्रे) अ० द्रव्यवान होतात. दोनही सारखी नव्हत व लांब चूचुके अ० दरिद्री होतात. कठीण, पुष्ट, निमग्न (खोल) चूचुके अ० राजे सुखी होतात ॥२७॥

उंच, विस्तीर्ण, अकंपन, पुष्ट असे हृदय राजांचे होय. पूर्वोक्ताहून विपरीत व रूक्षकेशांनी युक्त, शिरायुक्त असे ह्रदय दरिद्रयांचे होय ॥२८॥

उरस्थल सम (सारखे) अ० द्रव्यवान, पुष्ट (कठीण) अ० शूर, कृश, अ० दरिद्री, विषम (उंच सखल) अ० दरिद्री व शस्त्राने मरणारे असे होतात ॥२९॥

जत्रु (ऊर आणि कंठ यांचा संधि, सरी) विषम अ० क्रूर होतो. हाडांच्या संधीनी बद्ध अ० दरिद्री, उंच अ० भोगयुक्त, खोल अ० दरिद्री पुष्ट अ० द्रव्यवान असा होतो ॥३०॥

मान चपटी, शुष्क व शिरायुक्त अ० निर्धन होतो. महिषासारखी मान अ० शूर, बैलासारखी अ० शस्त्रमरण ॥३१॥

कंबु (वळित्रययुक्त) ग्रीवा अ० राजा, लांब कंठ अ० भक्षणशील होतो. पाठ अस्फुटित व केशरहित अ० धनवान होतो. याहून अन्य अशुभ होय ॥३२॥

घर्मरहित, पुष्ट, उंच, सुगंधि, सम, केशयुक्त अशी कक्षा (बाहुमूल) द्रव्यवानांची जाणावी. याहून अन्य दरिद्रयांची होय ॥३३॥

मांसरहित, केशयुक्त, स्फुटित, अविस्तीर्ण असे स्कंध दरिद्रयाचे होत. विस्तीर्ण, अस्फुटित व संलग्न असे स्कंध सुखी व बलिष्ठ यांचे होतात ॥३४॥

हत्तीच्या शुंडेसारखे, वाटोळे, जानूपर्यंत लांब, सारखे व पुष्ट असे बाहु राजांचे होत. केशयुक्त व आखूड बाहु दरिद्रयांचे होत ॥३५॥

हस्तांच्या अंगुलि, लांब असता दीर्घायु होतात. अवलित (सुस्पष्ट) अ० सौभाग्ययुक्त होतात. सूक्ष्म (बारीक) अ० ज्ञानी, चेपटलेल्या अ० दुसर्‍याचे चाकर होतात ॥३६॥

हस्तांगुलि मोठया अ० दरिद्री, बाहेर लवल्या अ० शस्त्रमृत्यु, वानरांच्या हातांसारखे हात अ० धनवान, व्याघ्राच्या हातांसारखे हात असता, पापी होतात ॥३७॥

मणिबंध (मणगट) अस्पष्ट, द्दढ, सुश्लिष्ट-प्रमाणित असे अ० राजे होतात. मणिबंध हीन अ० हस्तच्छेद होतो. शिथिल व शब्दयुक्त मणिबंध असता, दरिद्री होतात ॥३८॥

हस्ततल, उंच नसता, पितृद्रव्यरहित मनुष्य होतात. समवर्तुल, निम्न (खोल) असता धनवान, अत्यंत उंच हस्त अ० दान करणारे होतात ॥३९॥

असम करतल अ० क्रूर व दरिद्री होतात. लाखेसारखे तांबडे करतल अ० राजे होतात. पिवळे अ० अगम्यस्त्रीगामी होतात. रखरखीत अ० दरिद्री होतात ॥४०॥

कोंडयासारखी नखे अ० नपुंसक होतात. चेपटलेली किंवा फुटलेली अ० दरिद्री होतात. कुत्सित व विवर्ण नखे अ० परतर्कुक (दुसर्‍याचे सुख पाहणारे) होतात. तांबडी नखे अ० सेनापति होतात ॥४१॥

अंगुष्ठमध्यभागी यव (जवाकार) अ० द्रव्यवान, अंगुष्ठमूली यव अ० पुत्रवान, लांब अंगुलिपर्वे अ० सौभाग्ययुक्त व दीर्घायु होतात ॥४२॥

धनवंतांच्या हस्तगत रेषा स्निग्ध व खोल असतात. याहून अन्य दरिद्रयांच्या होतात. विरल अंगुलि ज्यांच्या ते दरिद्री व घट्ट ज्यांच्या अंगुलि ते द्रव्यसंचय करणारे होतात ॥४३॥

मणिबंधापासून उत्पन्न होऊन हस्ततलाप्रत गेलेल्या तीन रेषा राजाच्या होत. दोनमत्स्यांनी युक्त हस्त ज्याचा तो यज्ञामध्ये बहुत अन्न देणारा होतो (बहुत यज्ञ करतो) ॥४४॥

धनवंतांच्या हस्तांवर वज्रासारख्या रेषा होतात. विद्यावंतांच्या ह्स्तांवर मत्स्युपुच्छासारख्या रेषा होतात. शंख, छ्त्र, पालखी, हत्ती, घोडा, कमल यांसारख्या रेषा राजांच्या ह्स्तांवर होतात ॥४५॥

कलश, कमळाची देटी, पताका (निशाण,) अंकुश, यांसारख्या रेषांनी द्रव्यवान होतात. रज्जू (राजू) सारख्या रेषांनी धनवान होतात. स्वस्तिकासारख्या रेषांनी ऐश्वर्यवान होतात ॥४६॥

चक्र, तलवार, फरशी, तोमर (गुरगुज, हा घुसळण्याच्या रवीसारखा असतो,) शक्ति (शस्त्रवि० सैती,) धनुष्य, भाला यांसार्ख्या रेषा हस्तगता० सेनापति होतो. उखळासारख्या रेषा अ० अज्ञकर्ता होतो ॥४७॥

मकर (मगर, सुसर,) चिन्हा, कोठार यांसारख्या रेषांनी बहुधनाने युक्त होतात ॥४८॥

वापी (जलाशय,) देवालय, सिंहासन इत्यादिकांसारख्या रेषा हातावर अ० धार्मिक होतात. त्रिकोण रेषा अ० धार्मिकच होतात. अंगुष्ठमूली जितक्या स्थूल रेषा तितके पुत्र होतात. त्यात बारीक असतील तितक्या कन्या होतात ॥४९॥

प्रदेशिनी (अंगुष्ठाजवळची) प्रत गेलेल्या रेषांही शतायु होतात. त्याहून जशा कमी असतील तसे आयुष्य कमी कल्पावे. त्या छिन्न (तुटलेल्या) असतील तर वृक्षावरून पतन होते. बहुत असतील अथवा रेषा नसतील तर ते दरिद्री होतात ॥५०॥

चिबुक (अधरोष्ठाच्या खालचा भाग) फार कृश व दीर्घ अ० दरिद्री होतात. पुष्ट अ० द्रव्यवान होतात. ओठ पिकलेल्या तोंडल्यासारखे तांबडे व सरळ अ० राजे होतात. कृश अ० निर्धन होतात ॥५१॥

उत्तरोष्ठ फुटलेले, तुटलेले, विगतवर्ण, रूक्ष असे अ० दरिद्री होतात. दात निर्मल, दाट, अत्यंत तीक्ष्ण दाढा, सम असे शुभ होत ॥५२॥

जिव्हा तांबडी, दीर्घ, पातळ व सम अशी सुखयुक्तांची जाणावी. पांढरी, काळी, परुष (कठोर) अशी जिव्हा दरिद्रयांची जाणावी. जिव्हेसारखीच तालुही जाणावी ॥५३॥

सौम्य, संवृत (वर्तुल,) स्वच्छ, नातिपुष्ट, सम असे मुख राजांचे होते. याहून विपरीत दु:खी पुरुषांचे होते. अतिविस्तीर्ण मुख दुर्भाग्यपुरुषांचे होते ॥५४॥

अपत्यरहितांचे मुख स्त्रीमुखासारखे होय. परकार्यविमुखांचे वर्तुलमुख जाणावे. दरिद्रयांचे लांब मुख होते. भ्याल्यासारखे मुख ज्यांचे ते पापी जाणावे ॥५५॥

दुसर्‍यास ठकविणारांचे मुख चतुष्कोण जाणावे. खोलगट मुख पुत्ररहितांचे जाणावे. फार आखूड मुख कृपणाचे जाणावे. पुष्ट व तेजस्वी मुख सुखयुक्तांचे  होते ॥५६॥

पुरुषाचे मुखावरचे दाढी मिशी इ० केश शेवटास फुटलेले नव्हत, स्निग्ध, मृदु, नम्र असे शुभ होत. तांबडे व रखरखीत, अल्प असे श्मश्रु (दाढीमिशी) अ० चोर होतात ॥५७॥

मांसरहित कर्ण असता पापकर्माने मृत्यु होतो. होतो. चर्पट (विस्तीर्ण) असता सुखी होतात. कर्ण आखूड असता कृपण, तीक्ष्णाग्र कर्ण राजे होतात ॥५८॥

केशयुक्तकर्णांचे पुरुष दीर्घायु होतात. विस्तीर्णकर्ण धनवान होतात. शिरायुक्तकर्ण असता क्रूर होतात. लांब व पुष्ट कर्ण असता सुखी होतात ॥५९॥

गाल उंच असता भोगयुक्त, मांसल (पुष्ट) असता प्रधान होतो. नाक पोपटाच्या चोचीसारखे असता सुखी, शुष्क असता चिरायुष्य ॥६०॥

तुटल्यासारखे अ० अगम्यस्त्रीगमनकर्ता, लांब असता सौभाग्यवान, आकुंचित (आखूड) असता चोर, चेपटलेले असता स्त्रीपासून मृत्यु ॥६१॥

नाकाचे अग्र वाकडे अ० धनवान, उजव्या आंगी वक्र असता बहुत खाणार व क्रूर; सरळ, बारीक  भोके, सुंदर पुटे (नाक पुडया,) असे नाक भाग्ययुक्त पुरुषांचे होते ॥६२॥

धनवंतांची शिंक एक, दीर्घायु पुरुषांच्या शिंका २ किंवा ३; आनंदकारक, सानुनाद (घुमणार,) अतिदीर्घ, संहत (जोडलेला) असा शिंकेचा शब्द दीर्घायु पुरुषांचा होय ॥६३॥

नेत्र कमलपत्रासारखे अ० धनवान, शेवटास तांबडे अ० लक्ष्मीवान, मधासारखे पिंगटवर्ण अ० महाधन, मांजरासारखे अ० पापी, ॥६४॥

हरिणासारखे, वाटोळे, जिह्म (कुटिल) अशा डोळ्यांचे चोर; तिरके अ० क्रूर, हत्तीसारखे अ० राजे, असे होतात ॥६५॥

खोलनेत्र अ० ऐश्वर्य, नीलकमलासारखे अ० विद्वान, फार काळे बुबुळ अ० नेत्रांचे उत्पाटन होते ॥६६॥

नेत्रांतील बुबुळ मोठे अ० प्रधान, श्याव (उदीरंग) नेत्र अ० सौभाग्य, दीनद्दष्टि अ० निर्धन; निर्मल व विस्तीर्ण द्दष्टि अ० द्र्व्यवान व सुखी होतात ॥६७॥
भिवया अनुक्रमाने उंच अ० अल्पायु, विस्तीर्ण व उंच अ० सुखी, विषम अ० दरिद्री, बालचंद्रासारख्या नत अ० धनवान ॥६८॥

दीर्घ व असंलग्न अ० धनवान तुटलेल्या अ० दरिद्री, मध्ये नसलेल्या अ० अगम्यस्त्रीच्याठाई आसक्त, असे होतात ॥६९॥

कंठावरील शंख उंच व विस्तीर्ण अ० धनवान, निम्न (नीच) अ० पुत्र व द्रव्य यानी हीन होतात. ललाट (कपाळ) असम अ० निर्धन, अर्धचंद्रासारखे अ० धनवान होतात ॥७०॥

शिंपल्यासारखे विस्तीर्ण अ० आचार्यत्व, शिरांनी व्याप्त अ० अधर्मरत, उंच व स्वस्तिकासारख्या शिरा अ० धनवान होतात ॥७१॥

खोलगट अ० वध व बंध भोगितात व पापकर्मरतही होतात. उंच अ० राजे होतात. संकट (आंकुचित, अल्प) ललाट अ० कृपण (दानशील नव्हत) असे होतात ॥७२॥

दैन्यरहित, अश्रु (नेत्रोदक) रहित व स्निग्ध असे रोदन (रडणे) मनुष्यांस शुभ होय, रूक्ष, दीन व बहुतनेत्रोदकयुक्त असे रोदन पुरुषांस अशुभकारक होय ॥७३॥

कंपरहित हास्य शुभ होय. दुष्टाचे हास्य डोळे मिटून होते. आनंदाचे हास्य वारंवार (बहुत) होते. हसनांचे वारंवार हास्य, मद्यपानादिकाने मत्ताचे होते ॥७४॥

ललाटावर लांब तीन रेषा अ० १०० वर्षे आयुष्य, चार रेषा अ० राजा होतो व ९५ वर्षे आयुष्य, ॥७५॥

ललाटरेषा  विच्छिन्न किंवा रेषारहित ललाट अ० ९० वर्षे आयुष्य व अगम्यस्त्रीगमनकर्ता होतो. केशांपर्यंत लांब रेषा गेल्या अ० ८० वर्षे आयुष्य, ॥७६॥

पाच रेषा अ० ७० वर्षे, आयुष्य, सर्व रेषा शेवटास एकत्र मिळाल्या अ० ६० वर्षे, बहुतरेषा अ० ५० वर्षे, वाकडया रेषा अ० ४० वर्षे, ॥७७॥

भिवयांस रेषा मिळाल्या अ० ३० वर्षे, डाव्या आंगास वाकडया अ० २० वर्षे, सूक्ष्म (फार बारीक) रेषा अ० अल्पायुषी होतात. सांगितल्याहून न्यून १।२ रेषा अ० ही स्वल्पायु होतात. तीन रेषांनी १०० व चार रेषांनी ९५ यामधील आयुष्याची कल्पना कमीजास्तीवरून करावी ॥७८॥

परिमंडल (वाटोळे) मस्तक अ० गाईनी युक्त होतात, छत्राकार (वर मोठे) मस्तक असता राजे होतात. चपटे मस्तक अ० आईबापांचा नाश करतात. करोटी (टोपी, पागोटे) सारखे मस्तक अ० चिरायुष होतात ॥७९॥

घट (कुंभ) सद्दश मस्तक अ० अध्वानरूचि (मार्गगमनप्रीति) होतो. द्विमस्तक पापकर्ता व निर्धन होतो. खोलवट मस्तक अ० श्रेष्ठ होतात. फार खोलवटा मस्तक अ० दु:खी होतात ॥८०॥

एकेक रोमरंध्रात एकेक, स्निग्ध, काळे, आकुंचित, अग्रास दोन तीन फाटे फुटलेले नाहीत, मृदु. फार नाहीत असे केश असता सुखी अथवा राजा होतो ॥८१॥

एक रोमरंध्रामध्ये बहुत, काही आखूड  व काही लांब, कपिलवर्ण, जाड, फुटलेली अग्रे, रूक्ष, आखूड, फार वाकडे, फार वाकडे, फार दाट, असे केश असता दरिद्री होतात ॥८२॥

जो जो शरीराचा अवयव रूक्ष, मांसहीन, शिरायुक्त, तो तो अशुभ होय. याहून विपरीत म्हा० स्निग्ध, मांसयुक्त, शिरारहित अवयव तो शुभ सांगितला ॥८३॥

तीन जागी विस्तीर्ण, तीन जागी गंभीर (खोल,) सहाजागी उंच, चारजागी र्‍हस्व, सातजागी तांबडा, पांचजागी लांब, पांचजागी बारीक असा जो पुरुष तो राजा होतो. याचा विस्तार पुढे आहे ॥८४॥

मनुष्यांची नाभि, स्वर, धैर्य ही ३ खोल असावी. उर, ललाट, मुख ही ३ विस्तीर्ण असता पुरुषांस शुभ होत ॥८५॥

वक्षस्थळ, कांख, नखे, नाक, मुख, मानेचा पष्ठभाग, ही ६ उंच शुभ होत. शिश्न, पाठ, मान जंघा (पोटरी,) ही ४ र्‍हस्व हितकारक होत ॥८६॥

नेत्रप्रांत, पाद, कर, तालु, अधरोष्ठ जिव्हा, नखे ही ७ आरक्त सुखकारक होत.  दात, अंगुलिपर्वे, केश, त्वचा, नखे ही ५ बारील असता दु:खी होत नाहीत ॥८७॥

हनवटी, नेत्र, बाहु, नाक, दोन स्तनांच्या मधले अंतर ही ५ राजावाचून लांब ओत नाहीत ॥८८॥

॥ इतिक्षेत्रं ॥

शुभाशुभ फले सांगणारी अशी छाया, लक्षणज्ञ पुरुषांनी मनुष्य, पशु, पक्षी यांच्याठाई पहावी. स्फटिकरत्नांच्या घटामध्ये रहालेली दीपकांति जशी बाहेर प्रकाश करते तशी शरीरस्थ  छाया बाहेरही तेजाच्या गुणाते प्रकट करते ॥८९॥

भूमिसमुत्थछाया (शरीरकांति) अ० मनुष्याचे दंत, त्वचा, नखे, अंगावरील केश, मस्तकावरील केश, हे सर्व स्निग्ध होतात व शरीरकांति सुगंध होते. ती छाया तुष्टि, अर्थलाभ, अभुदय व दिवसादिवसाचेठाई धर्माची प्रवृत्ति याते करते ॥९०॥

स्निग्ध, श्वेत, स्वच्छ, हरिद्वर्ण, नेत्रसौख्य करणारी अशी छाया सौभाग्य, मृदुत्व, सुख, अभ्युदय यांते करते व सर्वकार्यांची सिद्धि करणारी आईसारखी ती छाया प्राण्यांस शुभफल देते ॥९१॥

चंड (क्रोध,) अधृष्य, (अनभिभवनीय) कमल, सुवर्ण व अग्नि यांसारख्या रंगाची, तेज, पराक्रम, शौर्य, यांनी युक्त अशी (अग्निसंबंधी) छाया प्राण्यांस जय, इच्छितार्थाची शीघ्र सिद्धि करते ॥९२॥

मलिन, परुष, (रूक्ष) कृष्णवर्ण, दुर्गंध अशी वायूत्पन्न छाया वध, बंध, व्याधि, अनर्थ, द्रव्यनाश याते करते. स्फटिकासारखी स्वच्छ, भाग्ययुक्त, फार उदार, निधिसारखी सर्व अर्थ देणारी, स्वच्छवर्ण अशी आकाशोत्पन्न छाया होय ॥९३॥

हया पुर्वोक्त छाया अनुक्रमाने पृथ्वीन, जल, अग्नि, वायु, आकाश, या पंचमहाभूतांपासून उत्पन्न झालेल्या सांगितल्या. कोणी गर्गादि ऋषि हया पाच व सूर्य, विष्णु, इंद्र, यम, चंद्र हयांच्या ५ एकूण दहा छाया असे म्हणतात;  परंतु सूर्य व अग्नि; विष्णु व आकाश; इंद्र व पृथ्वी; यम व वाय; चंद्र व जल; या दोहों दोहोंचे लक्षण व फले यांहीकरून समानत्व आहे यास्तव मी येथे त्यांचा पाचांतच संक्षेप केला आहे ॥९४॥

॥ इतिछाया ॥ मृजा ॥

हत्ती, वृषभ, रथसमूह, दुंदुभि, मृदंग, सिंह, मेघ, यांसारखा ज्यांचा शब्द ते राजे होतात. गाढव, विकारयुक्त, कठोर किंवा कर्कश ज्यांचा स्वर ते द्रव्य व सौख्य यांनी त्यक्त म्हा० दरिद्री व दु:खी होत ॥९५॥

॥ इतिस्वर: ॥

मेद (हाडंतील स्नेहभाग) कपालांतरस्थमेंदू त्वचा,  हाडे, रेत, रक्त, मांस ही ७ प्राण्यांची सार (बळकट) होतात त्यांचे संक्षेपाने फल सांगतो ॥९६॥

तालु, ओष्ठ, दंतांची मांसपंक्ति, जिव्हा, नेत्रप्रांत, गुद, ह्स्त, पाय, हे तांबडे असता तो रक्तसारपुरुष बहुत सुख, स्त्री,  द्रव्य, पुत्र यांनी युक्त होतो ॥९७॥

त्वचा (कातडी) स्निग्ध अ० धनवान, मृदु अ० भाग्यवान, तनु (पातळ) त्वचा अ० पंडित होतात. मज्जा व मेद बलिष्ठ अ० उत्तमशरीर, पुत्र,  द्रव्य यांनी युक्त होतात ॥९८॥

मोठे हाड ज्याचे तो अस्थिसर बलवान, विद्वान, सुरूप होतो. बहुत व घन रेत ज्यांचे ते सुभग, विद्वान, रूपवान असे होतात ॥९९॥

जो मांससार तो स्थूलशरीर, विद्वान, धनवान, सुरूप होतो.

॥ इतिसार: ॥

सर्वांगांच्या संधीच्याठाई सुश्चिष्टत्व म्ह० सांधे चांगले बळकट मिळालेले असता संहति होते. ती ज्या पुरुषांस  असेल  ते सुखी जाणावे ॥१००॥

॥ इतिसंहति: ॥

वाणा,  जिव्हा, दंत, नेत्र, नखे, या पाच स्थानी स्नेह पहावा. ही ५ स्निग्ध असता पुत्र, धन, सौभाग्य यांनी युक्त होतात, व ही ५ रूक्ष अ० दरिद्री होतात ॥१०१॥

॥ इतिस्नेह: ॥

राजांचा वर्ण तेजस्वी‘  व स्निग्ध होय. पुत्र व द्रव्य यांनी युक्तांचा वर्ण मध्यम (किंचित स्निग्ध व किंचित रूक्ष) होय. दरिद्रयांचा वर्ण रूक्ष होय. शुद्धवर्ण शुभ व मिश्रितवर्ण अशुभ होय ॥१०२॥

॥ इतिवर्ण: ॥

मुखावरून पूर्वजन्मशुभाशुभ याची कल्पना करावी. गाय, वृषभ, वाघ, सिंह, गरुड यांसारखे ज्यांचे मुख ते अकुंठित सामर्थ्य, जितशत्रु, राजे होतात ॥१०३॥

वानर, रेडा, डुकर, बकरा यांसारखे ज्यांचे मुख ते पुत्रवान, धनवान, सुखी होतात. गाढव, उंट यांसारखे ज्यांचे मुख व शरीर ते दरिद्री व दु:खी होतात ॥१०४॥

॥ इतिअनूकं (पूर्वजन्म)

१०८, ९६, ८४ अंगुले (त्याचे हाताची) अनुक्रमेकरून, उत्तम, मध्यम, कनिष्ठ पुरुषांच्या उंचीचे मान जाणावे ॥१०५॥

॥ इत्युन्मानं ॥

मनुष्य तोलला अ० जो १००० पले वजन येतो तो सुखी होय. याहून कमी दु:खी होय. भार म्ह० २००० पले वजन अतिधनवान होत. ३००० पले वजन सार्वभौम राजा होतो. (४तोळे म्ह० १ पल, २ हजार पले म्ह० १ भार असे जाणावे. येथे ८० गुंजांचा तोळा घ्यावा) ॥१०६॥

स्त्री विसाव्या वर्षी व पुरुष पंचविसाव्या वर्षी मान म्ह० वजन व उन्मान म्ह० उंची यास योग्य होतात. अथवा शंभर वर्षांच्या आत आयुष्याचा निश्चय झाला असता त्याचे चतुर्थभागी मानोन्मानास योग्य होतात ॥१०७॥

॥ इतिमानं ॥

भूमि, जल, अग्नि, वायु, आकाश, देव, मनुष्य, राक्षस, पिशाच, पशुपक्षी यांच्या सत्त्वाने म्ह० प्रकृतीने पुरुष होतो. त्यांचे हे वक्ष्यमाण लक्षण जाणावे ॥१०८॥

चंपकप्रभृति शुभपुष्पांसारखा आहे गंध ज्याचा असा, भोगशील, सुंदर आहे वायु ज्याचा असा पुरुष भूमिप्रकृति होय. बहुत उदकपान करणारा, अनुकूल भाषण करणारा, मधुरादिरसयुक्त भोजन करणारा असा पुरुष जलप्रकृति होय ॥१०९॥

अग्निप्रकृतीकरून, चपल, अतितीक्ष्ण, क्रूर, भुकाळु, बहुत खाणारा, असा पुरुष होतो. वायुप्रकृतीने चंचल, कृश, शीघ्रकोपी असा पुरुष होतो ॥११०॥

सर्व कलांमध्ये निपुण, प्रसृतमुख, शास्त्रगायनादिकी कुशल, सुषिर (पोकळ) शरीर असा पुरुष आकाशप्रकृति होय. दानशील, अल्पकोपी, स्नेहयुक्त असा पुरुष देवप्रकृति होय ॥१११॥

मनुष्यप्रकृतियुक्त पुरुष गायन व भूषण (अलंकार) हयांविषयी प्रीतियुक्त, सम्यक् विभाग व चरित्र यांनी युक्त, असा नित्य होतो ॥११२॥

अत्यंतक्रोधी, दुर्जनासारखा व्यापार करणारा, पापरत, असा राक्षसप्रकृति पुरुष होतो. चंचल, मलयुक्त, बहुत बडबड करणारा, स्थूलशरीर असा पिशाचप्रकृति पुरुष होतो ॥११३॥

भयार्त, भुकाळु, बहुत खाणारा, असा पशुपक्ष्यांच्या प्रकृतियुक्त पुरुष होय. याप्रकारे पुरुषांच्या प्रकृति सांगितल्या. असे प्रकृतिलक्षण जाणणारे प्रकृति सांगतात ॥११४॥

॥ इतिप्रकृति: ॥

व्याघ्र, हंस, उन्मत्तहत्ती, वृषभ, मयूर यांसारख्या गमनाचे पुरुष राजे होतात. ज्यांचे गमन शब्दरहित व मंद तेही धनवान होतात. त्वरित व अडखळत जे गमन करितात ते दरिद्री होतात ॥११५॥

॥ इतिगति: ॥

श्रांत म्ह० दमला अ० वाहन, भूक लागली असता खाण्यास, तहान लागली अ० उदकादि पिण्यास, भय प्राप्त झाले अ० रक्षणकर्ता, ही ज्या पुरुषास यथाकाली मिळतात; त्या पुरुषास, पुरुषलक्षण जाणणारे, धन्य (शुभलक्षण) असे म्हणतात (११६)

ऋषींची मते पाहून संक्षेपाने मी हे पुरुषलक्षण सांगितले. हे पढून मनुष्य, राजास मान्य व सर्व लोकांस प्रिय असा होतो ॥११७॥


॥ इतिश्रीवराहमिहिरकृतौबृहत्संहितायांपुरुषलक्षणंनामाष्टाषष्टितमोध्याय: ॥६८॥

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP