मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|बृहत्संहिता|
अध्याय ३

बृहत्संहिता - अध्याय ३

शके ८८८ फाल्गुन कृष्ण द्वितीया गुरुवारी उत्पलनामकाने ही टीका केली.


॥ अथ आदित्यचार: ॥

आश्लेषांच्या अंत्य दोन चरणांनी रवीचे दक्षिणायन व धनिष्ठांच्या प्रारंभापासून उत्तरायण होते असे पूर्वशास्त्रात सांगितले आहे. ते कदाचित उत्पातवशात् झाले असेल, किंवा तसे अनुमानाने सांगितले असेल ॥१॥

सांप्रतकाळी कर्कसंक्रांतीपासून सूर्याचे दक्षिणायन व मकरसंक्रांतीपासून उत्तरायण होते. सांगितल्याप्रमाणे न होणे हा विकार होय, हे प्रत्यक्ष पाहून स्पष्ट होते ॥२॥

विस्तीर्ण वर्तुळाच्या वेधाने सूर्याच्या उदयी व अस्ती छायाप्रवेश व निर्गम यांच्या चिन्हांनी दक्षिणोत्तर मंडल (अयन) होते ॥
(सम भूमीवर वर्तुळ करून त्यावर दिशेच्या खुणा कराव्या. नंतर मध्यभागी शंकु ठेवावा. त्याची छाया मेषसंक्रांतीच्या आरंभी सूर्याच्या उदयास्तकाली जेथे असते, त्यापासून मिथुन अंतापर्यंत छाया दक्षिणेस जाते. तशीच कर्कापासून उत्तरेकडे येऊन तुला संक्रांतीच्या आरंभी मध्यभागी येते नंतर उत्तरेकडे जाते ती मकर संक्रांती पर्यंत जाऊन पुढे दक्षिणेस जावयास लागते. (याप्रमाणे न जाता मागे पुढे जाईल तर ती विकृति होय) ॥३॥

सूर्य मकरवृत्ताप्रत (श्रावणाप्रत) न जाऊन फिरला तर, पश्चिम व दक्षिण या दिशेकडे राहणार्‍या लोकांचा नाश करितो. तसाच कर्कवृत्ताप्रत (आश्लेषांप्रत) न पोचून मागे फिरला तर, ईशानी व पूर्व दिशेस राहाणार्‍या लोकांचा नाश करितो ॥४॥

सूर्य मकराप्रत पावून नंतर जर फिरेल तर कल्याण व धान्य यांची वृद्धी करील. तद्वतच कर्काविषयी जाणावे. प्रकृतिस्थ ज्या दिवशी अयननिवृत्ति गणिताने येईल त्याच दिवशी छायाप्रवेश व निर्गम होईल तर क्षेम सस्यवृद्धिकर सुर्य होय. विपरीतगति झाल्यास सूर्य भयकारक होय ॥५॥

अमावास्या व पौर्णिमा यांवाचून त्वष्टानामक ग्रह सूर्यमंडलाते अंधकारयुक्त करील तर तो शस्त्र, अग्नि व दुर्भिक्ष यांनीकरून सात राजांचा व जनांचा नाश करील ॥६॥

तामस, व कीलक अशा नावाचे राहुपुत्र तेतीस केतु आहेत त्या केतूते सूर्यमंडली श्वेतादिवर्ण, बिंबादिप्रवेश, काकादि सद्दश आकार यांनी प्रविष्ट असे पाहून शुभाशुभ फले सांगावी ॥७॥

ते तामसकीलक सूर्य बिंबाप्रत गेले तर अशुभ व चंद्रबिंबात प्रविष्ट झाले तर शुभ होत. तेच केतु काक, मस्तक रहित पुरुंष व खडग या सारखे चंद्रमंडलामध्येही अशुभ अर्थात सूर्य मंडलामध्ये फारच अशुभ होत ॥८॥

त्या तामसकीलकांच्या उदयी ही वक्ष्यमाणरूपे (लक्षणे) होतात. कारणावाचून उदेक गढूळ होतात, आकाश धूळीने व्याप्त होते, पर्वत व वृक्ष यांच्या अग्रांचा नाश करणारा आणि मृत्तिकेचे कण व बारीक दगड यांनीयुक्त असा भयंकर  वायु वाहतो, ज्या ऋतूमध्जे जे वृक्ष फलित व पुष्पित व्हावयाचे ते त्यात न होता अन्य ऋतूत होतात, अरण्यपशु व पक्षी हे तप्त होतात व दिग्दाह होतो. आणि निर्घात (वायूवर वायूचे ताडन होऊन आकाशापासून भूमीवर येतो) व भूकंप इत्यादिक उत्पात होतात ॥९॥ ॥१०॥

अंभ:कलुषादिकांची फले जर केतु, कीलक व राहु यांची दर्शने (चंद्रसूर्य यास ग्रहण) होतील तर निराळी होणार नाहीत. (केत्वादिकांचे सात दिवसांमध्ये दर्शन झाल्यास ते अंभ:कलुषादि उत्पात व्यर्थ जाणावे) कदाचित हे उत्पात होऊन केत्वादिकांचा उदय झाला नाही तर अंभ:कलुषादिकांची फले सांगावी ॥११॥

तामसकीलक केतु सूर्यमंडली ज्या ज्या देशी द्दष्टिगोचर होतील त्या त्या देशी राजास दु:ख होईल असे जाणावे ॥१२॥

ऋषीही क्षुधेने म्लनशरीर होऊन धर्म आणि उत्तम आचरणे सोडतील. व अन्नाच्या अभावाने शुष्कशरीर असे बाल हातात धरून दु:खाने अन्य देशांप्रत जातील ॥१३॥

सत्पुरुष चोरांनी लुटितद्रव्य व मोठया श्वासोच्छ्वासाने अर्धमीलितनयन असे, म्लानशरीर व अश्रूंनी व्याप्तनयन असे होतील ॥१४॥

मनुष्य कृश व आपली निंदा करणारे, स्वकीय राजाने व परचक्राने पीडित असे मनुष्य होतील व जे आज आम्ही भोगतो ते आम्ही किंवा राजाने पूर्वी केलेल्या कर्माचे फल, असेही अन्य लोक बोलतील ॥१५॥

पर्जन्याचे गर्भधारण जरी झले असले तथापि मेघवृष्टि बहुत होणार नाही, नद्याही अल्पजल होतील व धान्यही कोठे कोठे होईल ॥१६॥

सूर्यमंडली दंडाकार चिन्ह झाले असता राजास मृत्यु होतो. तसेच मस्तकरहित पुरुषासारखे चिन्ह झाले असता रागभय होते. कावळ्यासारखे चिन्ह होईल तर चोरभय होते. कीलकासारखे चिन्ह होईल तर दुर्भिक्ष होईल ॥१७॥

राजाची उपकरणे (हस्त्यश्वादिक) तदाकार चिन्हांनी व छत्र, ध्वज, चामरादिकांनी जर सूर्य विद्ध होईल तर दुसरा राजा होईल. अग्निकण व धूम, ज्वालादिकांनी सूर्य विद्ध असता लोकनाश होतो ॥१८॥

पुर्वोक्त वेधांतून एक वेढ सूर्यास असला तर दुर्भिक्षकारक व दोन तीन चार इत्यादि वेध असले तर राजनाश होतो. सूर्य श्वेत चिन्हाने विद्ध असता ब्राम्हाणांचा नाश, आरक्त वर्ण असता क्षत्रियांचा, पिवळा वर्ण असता वैश्यांचा, कृष्णवर्ण चिन्ह असता शूद्रांचा नाश करितो ॥१९॥

सूर्यमंडली उत्पन्न झालेले ध्वांक्षादि उत्पात ज्या दिशेकडे दिसतील त्या दिशेकडून (त्या प्रदेशांतून) लोकांस भय येईल ॥२०॥

ज्या काली सूर्य ऊर्ध्वकिरण (वरते किरण) दिसेल व त्याचा ताम्रवर्ण होईल तर सेनापतीचा नाश होईल. पीतवर्ण दिसेल तर राजपुत्राचा नाश होईल. श्वेतवर्ण दिसेल तर उपाध्यायाचा नाश होईल. ॥२१॥

नानाप्रकराचा चित्रवर्ण अथवा धूम्रवर्ण ऊर्ध्व सूर्यकिरण दिसतील तर चोर व शस्त्रनिपात यांनीकरून सर्वदेश व्याकूळ होईल; परंतु  जर लौकर जलवृष्टि होणार नाही तर ही फळे होतील पर्जन्यवृष्टि झाली असता शुभ होईल ॥२२॥

माघ, फाल्गुन या मासी सूर्य ताम्रवर्ण किंवा कपिल (पिंगटवर्ण) शुभफलद होय. चैत्र व वैशाखमासी हिरवा व कुंकुम वर्ण शुभ होय. ज्येष्ठव आषाढ या मासी स्वल्पश्वेतवर्ण सुवर्णवर्ण शुभ होय. श्रावण व भाद्रपद या मासी शुक्लवर्ण शुभ ॥२३॥

आश्विन, कार्तिक या मासी कमलमध्यासारखा (पिवळा) शुभ, मार्गशीर्ष, पौष या मासी रक्तासारखा वर्ण प्रशस्त होय. व श्रावण, भाद्रपद या वर्षाऋतूमध्ये स्निग्ध (विमल) व शिशिरादि सर्व ऋतूंतील वर्णाचा सूर्य, शुभफलद होय ॥२४॥

श्वेतवर्ण रखरखीत सूर्य ब्राम्हाणांचा, रक्तवर्ण रखरखीत सूर्य क्षत्रियांचा, पीतवर्ण रखरखीत वैश्यांचा, व क्रुष्णवर्ण रखरखीत सूर्य शूद्रांचा नाश करितो. पूर्वोक्त वर्णांचा सूर्य स्निग्ध असेल तर ब्राम्हाणादिकांचे कल्याण करील ॥२५॥

ग्रीष्मऋतूमध्ये आरक्त सूर्य भय करणारा. वर्षाऋतूमध्ये कृष्णवर्ण सूर्य अनावृष्टि करणारा. हेमंतऋतूमध्ये पीतवर्ण सूर्य शीघ्र रोगभय करणारा होय ॥२६॥

सूर्य इंद्रधनुष्याने (इंद्रधनुष्यासारख्या चिन्हाने) विदारितशरीर होईल तर राजांची युद्धे होतील. वर्षाकाली स्वच्छकांति सूर्य दिसेल तर त्याच दिवशी वृष्टि करील ॥२७॥

वर्षांकाली शिरसाच्या फुलासारख्या (नीलपीत) वर्णाचा सूर्य तत्काल वृष्टि करील. मयूरपिच्छाच्या वर्णासारखा सूर्य होईल तर बारा वर्षे वृष्टि होणार नाही ॥२८॥

श्यामवर्ण सूर्य असता कृमिभय (धान्यास किडिचे भय) होते. भस्मतुल्य सूर्य असता शत्रुभय होते. ज्या राजाच्या जन्मनक्षत्रावर सच्छिद्र सूर्य होतो त्या राजाचा नाश होतो ॥२९॥

सूर्य अत्यंत आरक्तवर्ण, आकाशमध्याजवळ, झाला असता, युद्धे होतील. चंद्रासारखे शीतल सूर्यकिरण होतील तर राजास मृत्यु होईल आणि लौकरच दुसरा राजा होईल ॥३०॥

घटाकार सूर्य दुर्भिक्ष व मृत्युकारक, खंडित सूर्य जननाशकारक, किरणरहित सूर्य भय देणारा, तोरणासारखा सूर्य नगराचा नाशकारक, छत्राकार सूर्य देशनाश करितो ॥३१॥

पताकारूप किंवा धनुष्यासारखा अथवा कंपित किंवा रूक्ष (रखरखीत) सूर्य दिसेल तर युद्धे होतील. सूर्यबिंबामध्ये काळी रेषा दिसेल, तर प्रधान राजास मारील ॥ नृप: सचिवं असा क्वचित पाठ आहे. त्यावरूनराजा प्रधानास मारील असाही अर्थ होतो ॥३२॥

उदयकाळी किंवा अस्तकाळी सूर्याते उल्का, अशनि व विद्युत् ही जर ताडण करतील तर राजास मरण होऊन दुसर्‍या राजाची राज्यावर स्थापना होईल ॥३३॥

सूर्य प्रतिदिवशी परिवेषयुक्त अथवा उदयास्तसंधीच्याथाई परिवेषयुक्त होईल किंवा आरक्तच उदय पावून तसाच अस्तास जाईल तर दुसरा राजा करील ॥३४॥

सूर्य खडगादि आयुधाकृति मेघांनी उदयास्तसंधीच्याठाई आच्छादित असता युद्धे होतील. हरिण, महिष, पक्षी, गर्दभ, उंट यांच्या सद्दशरूप मेघांनी उदयास्तसंधीत सूर्य जर आच्छादित होईल तर भयप्रद होईल ॥३५॥

ज्या नक्षत्री सूर्य असतो ते नक्षत्र सूर्यकिरणांच्या संतापाने महत्पीडेला प्राप्त होते. तेच नक्षत्र सूर्याने सोडिले म्हणजे जसे अग्नीत तापविलेले सुवर्ण शुद्ध होते तसे ते नक्षत्र शुद्ध होते ॥३६॥

सूर्यासारखा दुसरा सूर्य म्ह. प्रतिसूर्य, तो सूर्यापासून उत्तरेकडे दिसेल तर जलवृष्टि होईल. दक्षिणेकडे दिसेल तर वारा बहुत सुटेल. उत्त्रदक्षिण दोन्ही भागी दिसेल तर उदकभय होईल. (बहुत पाणी किंवा पर्जन न पडणे यांचे भय.) सूर्याचे वर दिसेल तर राजनाश होईल. सूर्याच्या खाली दिसेल तर जननाश  होईल ॥३७॥

सूर्य अस्तोदयावाचून आकाशामध्ये अकस्मात रक्तवर्ण दिसेल तर लवकरच राजाचा नाश होईल. अथवा रूक्षरजाने आरक्त झालेला सूर्य राजनाश करितो. कृष्ण, नानावर्ण, नीलवर्ण व रूक्ष असा सूर्य लोकनाश करणारा होय. पक्षी, मृग, (आरण्यपशु) यांच्या भयंकर शब्दांनी प्रात:काळी किंवा अस्तमानी सूर्य युक्त होईल (त्या वेलेस हे भयंकर शब्द करितील) तर लोकनाश होईल ॥३८॥ ॥३९॥

निर्मलशरीर; अवक्रबिंब; स्फुट (प्रकट,) विस्तीर्ण, निर्मल, दीर्घ (लांब,) असे आहेत किरण ज्याचे असा; विकाररहित शरीर; अविकृतवर्ण व अविकृत (विकाररहित) चिन्ह याते धारण करणारा असा सूर्य जनांचे कल्याण करतो ॥४०॥


॥ इति आदित्यचारस्तृतीय: ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : February 18, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP