मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|बृहत्संहिता|
अध्याय ५४

बृहत्संहिता - अध्याय ५४

शके ८८८ फाल्गुन कृष्ण द्वितीया गुरुवारी उत्पलनामकाने ही टीका केली.


वास्तुविद्याप्रकरणानंतर धर्म्य व यशप्रद व ज्याने जलप्राप्ति होते असे दागार्गल मी वराहमिहिराचार्य सांगतो. जशा पुरुषाच्या अंगी वरखाली जाणार्‍या शिरा असतात तशाच भूमीतही जलवाहिनी शिरा आहेत ॥१॥

उदक आकाशापासून एकवर्णाने व एकरसानेच भूमीवर पडते; परंतु नानाप्रकाराची भूमी आहे यास्तव ते उदक नानारस (बहुतस्वाद) व बहुवर्ण झाले यास्तव भूमितुल्य उदकाचे रस व वर्ण जाणावे. तथाच वक्ष्यति (सशर्कराताम्रमहीकषायंक्षारंधरित्रीकपिलाकरोति ॥ आपांडुरायांलवणंप्रदिष्टंजलंनीलवसुंधरायामिति) ॥२॥

इंद्र, अग्नि, यम, निऋति, वरुण, वायु, सोम, शिव हे ८ देव पूर्वादि ८ दिशांचे स्वामी अनुक्रमाने जाणावे व मध्ये नववोशिरा महाशिरानामक जाणावी. याहून अन्यही शिरा शेकडो निघाल्या आहेत त्यांचीही नावे प्रसिद्ध आहेत. तथाच वक्ष्यति (कुमुदानामशिरासापुरुषत्रयवाहिनीभवति ॥४॥

पातालापासून म्ह० खालून वर ज्या शिरा येतात व चार दिशेस ज्या शिरा असतात त्या शुभ होत. आग्नेयादि कोणदिशेस उत्पन्न झालेल्या शिरा शुभ नव्हत. यानंतर शिरांची चिन्हे सांगतो ॥५॥

जेथे स्वभावत: उदक नाही अशा जलरहित देशी वेताचे झाड असेल तर त्याचे पश्चिमेकडे तीन हातांवर दीद पुरुषाखाली उदक असते तेथे पश्चिमेस शिरा (झरा) वाहते ॥६॥

अर्धपुरुषावर पांढरा बेडूक, नंतर पीतवर्ण मृत्तिका, त्याचेखाली पुटभेदक  पाषाण ही चिन्हे लागतील त्याचे खाली उदक सापडेल (येथे पुरुष ऋर्ध्वबाहु. त्याचे प्रमाण अंगुले १२० होत. याचा पंचमांश हस्त जाणावा) ॥७॥

जंबू (जांभूळ) वृक्षाचे उत्तरेस तीन हातापुढे दोन पुरुषांखाली पूर्वेकडे शिरा आहे. येथे पुरुषभरर खणले असता लोखंडासारख्या गंधाची गोडी पांढरी माती व तीत बेडूक हे चिन्ह दिसेल ॥८॥

जांभळीचे पूर्वेस जवळ वारूळ असेल तर त्याचे दक्षिणेस दोन पुरुषांखाली गोड उदक आहे ॥९॥

याचे चिन्ह. अर्धपुरुष खणल्यावर तेथे मत्स्य व खाली पारव्याचे वर्णाचा दगड व तेथे नीलवर्ण मृत्तिका ही चिन्हे असली म्हणजे बहुतदिवस राहणारे असे बहुत उदक लागेल ॥१०॥

जलवर्जित देशी उंबराचे झाड असेल तर त्याचे पश्चिमेस तीन हातांपुढे अडीच पुरुषांखाली उत्तम जलयुक्तशिरा आहे. याचे चिन्ह. एक पुरुष खणल्यावर तेथे श्वेतसर्प दिसेल व काजळासारखा दगड दिसेल त्याचे खाली उदक लागेल ॥११॥

अर्जुन (ताम्हन) वृक्षाचे उत्तरेस वारूळ असेल तर वृक्षापासून पश्चिमेकडे तीन हातांवर खणले असता, साडेतीन पुरुषांखाली उदक आहे ॥१२॥
चिन्हा. अर्धपुरुष उदगर्जुनस्यद्दश्योवल्मीकोयदिततोर्जुनाद्धस्तै: ।

अर्जुन (ताम्हन) वृक्षाचे उत्तरेस वारूळ असेल तर वृक्षापासून पश्चिमेकडे तीन हातांवर खणले असता, साडेतीन पुरुषांखाली उदक आहे ॥१२॥
चिन्हा. अर्धपुरुष खणल्यावर पांढरी गोधा (पाल,) एकपुरुषावर धूसरा (काळीपांढरी) माती, नंतर काळीमाती, नंतर पिवळी, नंतर रेतीने युक्त पांढरी माती, याचे बहुत जल आहे असे सांगावे ॥१३॥

वारूळयुक्त निगडीचे झाड असेल तर त्याच्या दक्षिणेकडे तीन हातांवर सव्वादोन पुरुष खणले तर तेथे शुष्क न होणारे व गोड उदक आहे ॥१४॥

याचे चिन्ह. र्ध्या पुरुषावर रोहित मासा, पिंगट माती, नंतर पांडरी मा० नंतर दगडांनी युक्त रेती, त्याचे खाली उदक आहे ॥१५॥

बोरीचे झाडाच्या पूर्वेस वारूळ दिसेल तर झाडाच्या पश्चिमेस तीन हातांपुढे तीन पुरुष खणले असता, उदक आहे असे सांगावे. तेथे चिन्हा, अर्धपुरुषावर पांढरी पाल असेल, त्याचे खाली खणले असता उदक लागेल ॥१६॥

पळस व वारूळयुक्त बोरीचे झाड असेल तर, त्याचे पश्चिमेस तीन हातानंतर सवातीन हात खणले असता, खाली उदक आहे. याचे चिन्ह, पुरुषावर दुंडुभि (निर्विष दुतोंडया सर्प) असेल ॥१७॥

वेल व उंबर यांचा योग (एकत्र असणे) जेथे असेल त्याचे दक्षिणेस तीन हात भूमि टाकून तीन पुरुष खणले तर उदक आहे. याचे चिन्ह. अर्धपुरुष खणल्यावर तेथे काळा बेडूक सापडेल ॥१८॥

काकोदुंबरिका (बोखाडयाचे झाड) या खाली वारूळ दिसेल तर तेथे सवातीन पुरुष खणले असता पश्चिमदिशेकडे जलशिरा वाहते ॥१९॥

येथे चिन्हा. थोडी पांढरी माती, पुषे पिवळी, नंतर पांढरा दगड व अर्धापुरुष खणले म्हणजे पांढरा उंदीर द्दष्टीस पडेल ॥२०॥

जलरहित देशी कंपिल्लक (रुईमांदार, थोरबकुळी) वृक्ष द्दष्टीस पडेल तर त्याचे पूर्वेस तीन हातांपुढे सव्वातीन हातांखाली दक्षिणेकडे जलशिरा वाहते ॥२१॥

याचे चिन्हा. प्रथम नीलकमलासारखी माती, नंतर कपोताच्या रंगाची माती दिसेल. हातभर खणले म्हणजे अजगंधि मत्स्य लागेल तेथे खारे अल्प उदक आहे ॥२२॥

शोणाक (तेटू किंवा दिंडा) वृक्षाचे वायव्येस दोन हात सोडून तीन पुरुष खणले असता कुमुदनामक शिरा वाहते ॥२३॥

बिभीतक (बेहडा) वृक्षाच्या दक्षिणदिशेकडे जवळ वारूळ असेल तर त्या बेहडयाच्या पूर्वेस दोन हातांपुढे दीडपुरुष खणले असता, जलशिरा आहे असे जाणावे ॥२४॥

बेहडयाचेच पश्चिमेस वारूळ असेल तर, त्या वृक्षाचे उत्तरेस एकहात सोडून पुढे साडेचार पुरुषांखाली जलशिरा आहे ॥२५॥

चिन्ह. प्रथम एकपुरुष खणले असता, पांढरा विश्वंभरक (प्राणिविशेष) दिसतो. नंतर कुंकुमवर्ण पाषाण, त्याखाली पश्चिमेकडे जलशिरा आहे; परंतु ती तीन वर्षांनी नाहीशी होईल ॥२६॥

कोविदार (कोरळ, बाहवा, कांचन) वृक्षाचे ईशानीस दर्भयुक्त पांढरे वारूळ जेथे असेल तेथे कोविदार व वल्मीक यांचे मध्ये साडेचार पुरुषांखाली बहुत उदक आहे ॥२७॥

प्रथम एकपुरुष खणले असता तेथे कमळाच्या मध्यासारखा पीतवर्ण सर्प दिसेल, नंतर तांबडी माती, नंतर कुरुविंदपाषाण, ही चिन्हे आहेत असे सांगावे ॥२८॥

सप्तपर्ण (सात्वीण) वृक्ष वारूळाने वेष्टित असेल तर त्याचे उत्तरेस एक हातापुढे पाच पुरुषांखाली उदक आहे. येथेही चिन्हे आहेत ॥२९॥

अर्धपुरुष खणले असता, हिरवा बेडूक सापडेल; नंतर हरताळासारखी पिवळी भूमि, नंतर काळा पाषाण, त्याखाली उत्तरेस चांगले उदक वाहणारी शिरा (झिरा) आहे ॥३०॥

सर्व वृक्षांत ज्याखाली (मुळात) बेडूक दिसेल त्या वृक्षाचे उत्तरेस एक हातापुढे साडेचार पुरुषाखाली उदक आहे ॥३१॥

येथे ही चिन्हे. एक पुरुष खणले असता, मुंगूस दिसेल. नंतर निळी माती, नंतर पीटवर्ण, नंतर श्वेतवर्ण माती, त्याचे खाली बेडकासारख्या वर्णाचा पाषाण दिसेल ॥३२॥

करंजवृक्षाचे दक्षिणेस सापाचे वारूळ दिसेल तर त्या वृक्षाचे दक्षिणेस दोन हातांपुढे साडेतीन पुरुषांखाली जल आहे ॥३३॥

येथे चिन्ह. अर्धापुरुष खणल्यावर कासव दिसेल. तेथे प्रथम पूर्वेकडे झरा उत्पन्न होईल. नंतर उत्तरेकडे  दुसरा झरा गोड पाण्याचा निघेल, नंतर हिरवा पाषाण त्याचे खाली उदक चांगले आहे ॥३४॥

मोहाच्या उत्तरेस सर्पगृह (वल्मीक) दिसेल तर त्या वृक्षाचे पश्चिमेस पाच हात भूमि सोडून पुढे साडेसात पुरुषांखाली उदक आहे. येथे चिन्ह, प्रथम ॥३५॥

एक पुरुष खणले असता मोठा सर्प दिसेल. नंतर धूम्रवर्ण भूमि, कुळ्यांसाररख्या वर्णाचा पाषाण, त्याचेखाली माहेंद्री (पूर्वेकडील) शिरा फेनयुक्त जलाते  निरंतर वाहते ॥३६॥

तिलक (तिळवा) वृक्षाचे दक्षिणेस कुश व दूर्वा यांनी युक्त व आर्द्र असे वारूळ असेल तर, त्या वृक्षाच्या पश्चिमेकडे पाच हात भूमि सोडून पुढे पाच पुरुषांखाली उदक आहे ॥३८॥

येथे उत्तरेकडे शिरा वाहते. ते जल लोहगंधयुक्त अक्षोभ आहे. येथे चिन्हा. सुवर्णासारख्या रंगाचा बेडूक एकपुरुषावर दिसेल, नंतर पीतवर्ण मृत्तिका. त्याखाली अक्षोभ उदक आहे ॥३९॥

वारुळाने वेष्टित ताडवृक्ष किंवा नारळीचा वृक्ष असेल तर त्या वृक्षाचे पश्चिमेस सहा हातांपुढे चार पुरुषांखाली दक्षिणेकडे जलशिरा आहे ॥४०॥

कपित्थ (कवठी) वृक्षाच्या दक्षिणेस सापाचे वारूळ असेल तर, त्या वृक्षाचे उत्तरेस सात हात भूति सोडून पाच पुरुष खणले असता उदक आहे असे सांगावे ॥४१॥

चिन्ह. एक पुरुषावर कर्बुर (चित्रवर्ण) सर्प. नंतर काळी माती. नंतर पुटभित् असा पाषाण, नंतर पश्चिमेकडे पांढरी माती तेथे उत्तरेस शिरा (उदकाचा झारा) आहे ॥४२॥

अश्मंतक (आपटा) वृक्षाचे उत्तरेस बोर किंवा सापाचे वारूळ दिसेल तर त्या वृक्षाचे उत्तरेस सहा हात भूति सोदून साडेतीन पुरुष खणले असता उदक आहे ॥४३॥

चिन्ह. प्रथम एक पुरुष खणले असता कासव दिसेल, नंतर धूसरवर्ण पाषाण, नंतर रेतीची माती, तेथे प्रथम दक्षिणेस झरा लागेल. नंतर ईशानीस दुसरा झरा लागेल ॥४४॥

हरिद्र (दारूहळद किंवा शणपर्णी, वृक्षवि०) वृक्षाच्या उत्तरेस वारूळ असेल तर, त्या वृक्षाचे पूर्वेस तीन हात भूमि सोडून पावणेसहा पुरुष खणले असता उदक आहे ॥४५॥

चिन्हा. एक पुरुषावर नीलवर्ण सर्प दिसेल. नंतर पिवळी माती, नंतर हिरवा पाषाण, नंतर काळी माती, त्यात प्रथम पश्चिमेस शिरा (झरा) लागेल, नंतर दुसरा झरा दक्षिणेस लागेल ॥४६॥

जलहीन देशात ज्य स्थळी वीरण (काळा वाळा, तृणवि०,) दूर्वा ही जलस्थानज चिन्हे मृदु दिसतात त्या स्थली एक पुरुष खणले असता, उदक आहे असे सांगावे ॥४७॥

भारंगी, त्रिवृता (निशोत्तर,) दंती (वृक्षवि०,) खरसांबळी,लक्ष्मणा (जास्वंद, मुचुकुंद,) नवमालिका (मोगरी) हया औषधि जेथे असतील त्याचे दक्षिणेस दोन हातापुढे तीन पुरुषांखाली उदक आहे ॥४८॥

स्निग्ध, लांबखांद्यांचे, र्‍हस्व, विस्तीर्ण अशा वृक्षांजवळ उदक असते. सुषिर (आत पोकळ,) जर्जरपत्र, रूक्ष अशा वृक्षांजवळ उदक नाही ॥४९॥

तिलक (तिळाचे,) आम्रातक (आंबा,) वरूण (वायवर्णा,) बिबवा, बेल, तिंदुक (टेंभुरणी,) अकोल्ल (अंकोली,) पिंडार (पंढ्री,) शिरीष (शिरस,) अंजन (काळाशेवगा,) पुरुष (भुयधामणी,) वंजुल (अशोक,) अतिबला (वाघांटी,) ॥५०॥

हे वृक्ष जर स्निग्ध व वल्मीकाने वेष्टित असतील तर त्या वृक्षांपासून उत्तरेस तीन हस्तांपुढे साडेचार पुरुषांखाली उदक आहे ॥५१॥

गवत उत्पन्न होण्याजोग्या जमिनीवर गवत न उगवेल किंवा न उगवण्याजोग्या जमिनीवर गवत उगवेल तर तेथे खाली उदकाचा झरा आहे अथवा धन (नाणे किंवा दागिने नव्ह्त. सोने, रुपे इ० धातु किंवा व्यवहारोपयोगी अन्य (खनिजपदार्थ) आहे असे सांगावे. येथे साडेचार पुरुषांखाली पापी आहे असे सांगवे असे कोणी म्हणतात ॥५२॥

पळसादि अकंटक वृक्षांमध्ये खदिरादि कंटकयुक्त वृक्ष असेल अथवा कंटकयुक्त  वृक्षांमध्ये अकंटक वृक्ष असेल तर त्या वृक्षापासून पश्चिमेस तीन हातांपुढे पावणेचार पुरुष खणले असता उदक लागेल अथवा द्रव्य सापडेल ॥५३॥

पायाने ताडण केले असता भूमीचा शब्द गंभीर (मधुर) जेथे होतो त्या स्थली साडेतीन पुरुष खणले म्हणजे उत्तरेकडे झरा आहे ॥५४॥

वृक्षाची एक खांदी विनत (लवलेली) असेल किंवा पांडुरवर्ण असेल तर त्या खांदीखाली तीन पुरुष खणले असता जल आहे असे जाणावे ॥५५॥

ज्या वृक्षाच्या फलांस किंवा पुष्पांस विकर (अन्यवृक्षफलपुष्पसद्दशत्व) असेल त्या वृक्षाच्या पूर्वेस तीन हातांपुढे चार पुरुष खणले असता उदक लागेल. येथे चिन्ह. खाली दगड व पीतवर्ण भूमि असेल ॥५६॥

कंटकारिका (रिंगिणी किंवा सांवरी) वृक्ष काटयांनी रहित व पांढर्‍या पुष्पांनी युक्त दिसेल तर त्याचे खाली साडेतीन पुरुषांवर जल आहे ॥५७॥

ज्या जलरहितदेशी दोन निरांची (फाटयांची) खर्जूरी (खजुरीचे झाड) वृक्ष जेथे असेल तिच्या पश्चिमेकडे दोन हातांपुढे तीन पुरुष खणले असता उदक आहे असे सांगावे ॥५८॥

कर्णिकार (पांगारा) अथवा पळस हे दोनही वृक्ष पांढर्‍या पुष्पांचे असतील तर दक्षिणेस दोन हात भूमी सोडून पुढे पुरुष खटले असता उदकशिरा असेल ॥५९॥

वाफ किंवा धूर ज्या भूमीवर असेल तेथे दोन पुरुषांखाली मोठया उदकप्रवाहाने युक्त शिरा आहे असे सांगावे ॥६०॥

ज्या शेतात झालेले धान्य नाश पावते. अथवा स्निग्ध धान्य बहुत होते किंवा पांढरे होते, त्या क्षेत्रात दोन पुरुषांखाली मोठा झरा आहे ॥६१॥

मरुदेश ९जलरहितदेश मारवाड) यांतील शिरा सांगतो. त्या देशांत उंटांच्या मानेप्रमाणे जमिनीत शिरा जातात (फार खोल) ॥६२॥

पीलु (अक्रोद किंवा किंकणेलाचा वृक्ष) वृक्षाचे ईशानीस वल्मीक असेल तर त्या वृक्षाचे पश्चिमेस साडेचार हातांपुढे पांच पुरुषांखाली उत्तरेकडे शिरा आहे असे जाणावे ॥६३॥

चिन्ह. प्रथम एक पुरुष खणले असता बेडूक, नंतर कपिलवर्ण ९वानराचे केसांसारिखी) मृत्तिका, नंतर हिरवी मृत्तिका, नंतर दगड, त्याखाली उदक आहे असे सांगावे ॥६४॥

पीलुवृक्षाच्याच पूर्वेस वल्मीक असेल तर त्या वृक्षाचे दक्षिणेस साडेपाचहात सोडून सात पुरुषांखाली उदक आहे असे सांगावे ॥६५॥

चिन्हा. प्रथमपुरुषाखाली काळापांढरा हस्तमात्र लांब सर्प लागेल. खाली दक्षिणेकडून शिरा लागेल त्यातून खारे बहुत उदक वाहील ॥६६॥

करीर (कारवी किंवा वेळू) वृक्षाचे उत्तरेस वल्मीक असेल तर त्या वृक्षाचे दक्षिणेस साडेचार हातांपुढे दहा पुरुषांखाली गोड उदक आहे. चिन्ह. पुरुषाखाली पीतवर्ण बेडूक दिसेल ॥६७॥

रोहीतक (रक्तरोहिडा) वृक्षाच्या पश्चिमेस वल्मीक असेल तर त्या वृक्षाचे दक्षिणेस तीन हातापुढे बारा पुरुष खणले असता पश्चिमेकडे खार्‍यापाण्याची शिरा दिसेल ॥६८॥

इंद्रतरु (अर्जुन किंवा देवदारु अथवा पांढरा कुडा) वृक्षाचे पूर्वेस वल्मीक दिसेल तर त्या वृक्षाचे पश्चिमेस एक हात भूमि सोडून १४ पुरुष खणले असता खाली शिरा वाहते. चिन्ह. प्रथम पुरुषाखाली गोधा (घोरपड) कपिलवर्ण दिसेल ॥६९॥

सुवर्ण (नागकेशर किंवा बाहवा अथवा पिवळा वाळा) नामक वृक्षाच्या उत्तरेस वल्मीक असेल तर त्या वृक्षापासून दोन हातांपुढे दक्षिणेस १५ पुरुष खणले असता खारे उदक आहे ॥७०॥

चिन्ह. अर्धपुरुष खणले असता मुंगूस व खाली तांब्यासारखा दगड, खाली तांबडी मृत्तिका, तेथे दक्षिणेकडे शिरा वाहते ॥७१॥

बोर व रोहित (रक्तरोहिडा) हे वृक्ष एकत्र वल्मीकावाचूनही दिसतील तर त्या वृक्षांचे पश्चिमेकडे तीन हातांपुढे १६ पुरुषांखाली उदक आहे ॥७२॥

चिन्ह. प्रथम गोड उदक पश्चिमेकडे लागेल नंतर उत्तरेकडे दुसरी शिरा लागेल, पिठासारखा पाषाण, नंतर श्वेत मृत्तिका व अर्धपुरुषावर विंचू दिसेल ॥७३॥

बोरवृक्ष करीरवृक्षाने युक्त असेल तर त्याचे पश्चिमेस तीन हातांपुढे १८ पुरुषांखाली ईशानीकडे बहुजलशिरा आहे ॥७४॥

पीलुवृक्षयुक्त बदरी असेल तर त्याचे पूर्वेस तीन हातांपुढे वीस पुरुषांखाली खारे बहुत उदक आहे ॥७५॥

ककुम (अर्जुनसादडा) व करीर हे वृक्ष एकत्र असतील अथवां ककुभ व बिल्व हे वृक्ष एकत्र असतील तर त्यांचे पश्चिमेस दोन हातांपुढे २५ पुरुषांखाली उदक आहे ॥७६॥

वारुळावर दूर्वा व पांढरे कुश असतील तर त्या वारुळात कूप खणावा तेथे २१ पुरुषांखाली उदक आहे ॥७७॥

कदंबवृक्षाने युक्त भूमीवरील वारुळावर दुर्वा दिसतील तर त्या कदंबापासून दक्षिणेस तीन हातांपुढे २५ पुरुषांखाली उदक आहे ॥७८॥

तीन वल्मीकांमध्ये रोहीतक वृक्ष विजातीय तीन वृक्षांनी सहित असेल तर त्या रोहितकवृक्षाच्या उत्तरेस चार हात १६ अंगुळे भूमी सोडून ४० पुरुष खणले असता दगड लागेल, त्याचे खाली जलशिरा आहे ॥७९॥८०॥

बहुतग्रंथियुक्त शमीवृक्ष जेथे असेल त्याचे उत्तरेस वल्मीक असेल तर त्या वृक्षाचे पश्चिमेकडे पाच हातांपुढे ५० पुरुषाखाली उदक आहे असे सांगावे ॥८१॥

एके ठिकाणी पाच वल्मीके असून त्याचे मध्यभागी एक श्वेतवल्मीक असेल तर तेथे ५५ पुरुषांखाली शिरा आहे ॥८२॥

पलाशयुक्त जेथे शमीवृक्ष असेल त्याचे पश्चिमेकडे ६० पुरुषांखाली उदक आहे. चिन्ह. प्रथम अर्धपुरुष खणले असता सर्प सांपडेल नंतर वालुकायुक्त पिवळी मृत्तिका असेल ॥८३॥

पांढरा रोहीतकवृक्ष वल्मीकाने वेष्टित असेल तेथे त्या वृक्षाचे पूर्वेस एक हातापुढे ७० पुरुषांखाली उदक आहे ॥८४॥

पांढरा कंटकयुक्त शमीवृक्ष जेथे असेल त्याच्या दक्षिणेकडे ७५ पुरुषांखाली उदक आहे. चिन्ह. अर्धपुरुषाखाली सर्प असेल ॥८५॥

मरुदेशामध्ये जे चिन्ह, त्याने जांगल (स्वल्पोदक, डोंगराळ) देशी उदक सांगू नये. जंबू व वेतसवृक्ष यांचे पूर्वेस जे पुरुष सांगितले ते मरुदेशात त्याच चिन्हांनी दुप्पट सांगावे ॥८६॥

जांभूळ, निशोत्तर, मूर्वा, शिशुमारी, पांढरी उपळसरी, शेरणी, पिंपळी, वाराही (श्वेत भुयकोहळी,) मालकांगोणी, गरुडवेगा, खरसांवळी, रानउडीद, व्याघ्रपदा (बेहकळी) हया औषधि सापाच्या वारुळावर असतील तर त्याचे उत्तरेस तीन हातापुधे तीन पुरुष खणले असता उदक आहे असे सांगावे ॥८७॥८८॥

ही पूर्वोक्त लक्षणे अनूप (पाणथळ, बहूदक) देशात सांगावी. स्वल्पोदकदेशी तर याच लक्षणांनी पाच पुरुष सांगावे. याच लक्षणांनी मरुदेश (निरुदकदेश) यात सात पुरुषांनी उदक सांगावे ॥८९॥

जेथे एकाच रंगाची जमीन तृण, वृक्ष, वल्मीक, गुल्म (झुडुप,) यांनीरहित; अशी असून तिच्यामध्येच दुसर्‍या रंगाचे मातीचा भाग असेल तर तेथे उदक आहे असे सांगावे ॥९०॥

जेथे आर्द्रा, निम्न (उतरती,) वालुकायुक्त, सशब्द, अशी भूमि असेल तेथे साडेपाच पुरुषांखाली अथवा पाच पुरुषांखाली उदक आहे ॥९१॥

तेलकट वृक्षांच्या दक्षिणेस चार पुरुषांखाली बहुत उदक आहे असे सांगावे. जेथे बहुत वृक्ष असतील त्यातून एक वृक्ष अन्य वृक्षासारखा असेल तर त्या वृक्षाचे दक्षिणेस चार पुरुषांखाली उदक आहे ॥९२॥

जेथे पाय मारिला असता जमीन खाली जाते अशा जंगली किंवा पाणथळ जागांत दीड पुरुषाखाली उदक आहे. गृहावाचून कीट (कृमि, मुंग्या इ०) बहुत असतील तेथेही दीड पुरुषाखाली उदक आहे ॥९३॥

सर्व उष्ण भूमि असून त्यात जेथे शीत भूमि असेल; अथवा सर्व शीत असून जेथे उष्ण भूमि असेल, तेथे साडेतीन पुरुषांखाली उदक आहे. अथवा येथे (सूर्यकिरणांच्या योगाने) इंद्रधनुष्य दिसेल; किंवा मत्स्याकार दिसेल, अथवा वारूळ दिसेल तेथे जंगली व पाणथळ जागांत ४ हातांपुढे पाणी आहे ॥९४॥

वारुळाची ओळ असून त्यात एक उंच  असेल तर त्याचे खाली चार हातांवर उदक आहे. जेथे धान्य शुष्क होते; अथवा रुजत नाही तेथे चार हातांवर उदक आहे ॥९५॥

वड, पळस व उंबर हे तीन एकत्र असतील तेथे खाली उदक आहे. वड व पिंपळ हे एकत्र असतील तेथेही उत्तरेकडे चार हातांख्काली उद्क आहे ॥९६॥

ग्रामाच्या किंवा नगराच्या आग्नेयकोणी कूप (जलाशय) असेल तर तो नित्य भय व मनुष्यांस दाह, बहुतकरून करितो ॥९७॥

नैऋतकोणी असेल तर बालक्षय करितो. वायव्यकोणी असेल तर स्त्रियांस भय करितो. हे दिक्‌त्रय (तीन दिशा) सोडून अन्यदिशांस कूप शुभसूचक होत ॥९८॥

सारस्वत मुनीने जे दगार्गल केले, ते पाहून हे मी आर्याछंदाने केले. आता मानवदर्गल, वृत्तांनी (श्लोकछंदाने) सांगतो ॥९९॥

ज्यास्थळी वृक्ष, गुल्म, वल्ली हया स्निग्ध (टवटवीत) असतील तेथे व छिद्ररहित पत्रांचे वृक्ष असतील तेथे तीन पुरुषांखाली जलशिरा आहे असे सांगावे. स्थळकमळिणी, गोखरू, वाळा, थोर डोली, नागरमोथा, कसाडा किंवा लव्हा, दर्भजाति, सुगंध्योषधि वि० किंवा गुलछबू, देवनळ, ॥१००॥

खर्जूर, जांभूळ,  अर्जून, वेत, दुधासारख्या चिकाचे वृक्ष, गुल्म (एकमूल शाखासमूह) व वल्ली, आळभे, कांसाळू, नागकेशर, कळंब, कमळ, करज, कात्रीनिगूड ॥१०१॥

बेहेडा, मोगरी, हे वृक्ष ज्यास्थळी असतील त्यास्थळी तीन पुरुषांखाली उदक आहे असे सांगावे. जेथे पर्वतावर दुसरा पर्वत असेल तेथे पर्वतमूली तीन पुरुषांखाली उदक आहे ॥१०२॥

जी भूमि, मुंज, काश, कुश या ३ प्रकारच्या तृणांपैकी कोणत्यानेही युक्त: नीलवर्ण, बारील दगडांनी युक्त, अथवा काळी, किंवा तांबडी अशा भूमीच्या ठाई बहुत व सुरस उदक असते ॥१०३॥

शर्करा (रेतीसारखी जाडयाकणांची व खडयांची माती) युक्त व ताम्रभूमि कषाय (कडु) उदक करिते. कपिल (पिंगट) वर्ण भूमि क्षार उदक करिते. थोडयाशा पांढर्‍या भूमीच्याठाई लवण (क्षार) उद्क होते. नीलवर्ण भूमीच्याठाई मिष्ट उदक होते ॥१०४॥

साया, राळेचा वृक्ष, अर्जुन, बिल्व, सायला, शिवण, निंब, खईर, शिसवा, व सच्छिद्र पाने रूक्ष असे वृक्ष, गुल्म, वल्ली हया जेथे असतील तेथून उदक दूर आहे असे सांगतात ॥१०५॥

सूर्य, अग्नि, भस्म, उंट, गर्दभ, यांच्या सारखा वर्ण ज्या भूमीचा आहे ती निर्जल सांगितली. जेथे करीर (कारवी किंवा बांबू) वृक्ष, रक्तपल्लव व क्षीर यांनी युक्त असतील व जर रक्तभूमि असेल तेथे पाषाणाखाली उदक आहे असे सांगावे ॥१०६॥

वैडूर्यमणि (लसण्या पांढरा भुरकट रंगाचा) मूग, मेघ, यांसारखी व कृष्णवर्ण किंवा पिकलेल्या उंबरफळासारखी अथवा भ्रमर, कज्जल यांसारखी अथवा कपिलवर्ण (भुरकट) जो शिला (पाषाण) तिचे जवळ उदक आहे असे समजावे ॥१०७॥

पारवापक्षी, मध, घृत यांसारखी अथवा रेशमी वस्त्रासारखी किंवा सोमवल्लीसारखी जी शिला तीही अक्षय शीघ्र उदक करिते ॥१०८॥

पारवापक्षी, मध, घृत यांसारखी अथवा रेशमी वस्त्रासारखी किंवा सोमवल्लीसारखी जी शिला तीही अक्षय शीघ्र उदक करिते ॥१०८॥

तांबडे नानाप्रकारच्या बिंदूनी युक्त, ईषत्पांडुरवर्ण, भस्म, उंट, गर्दभ, यांच्या सारखी, भ्रमरासारखी, अंगुष्ठपुष्पिका (अंगठयाएवढे पांढरे टिपके जीवर आहेत अशी) सूर्य व अग्नि यांसारख्या वर्णाची अशी जी शिला ती उदकरहित जाणावी ॥१०९॥

चांदणे, स्फटिकमणि, मौक्तिक, सुवर्ण यांसारख्या, इंद्रनीलमणि, हिंगूळ, कज्जल यांसारख्या; सूर्योदयीचे किरण, हरिताळ, यांसारख्या ज्या शिला त्या सर्व शोभन (जलयुक्त) असे जाणावे असे मुनीनी सांगितले ॥११०॥

हया पूर्वोक्त शिला अभेद्य (फोडू नयेत) कारण, कल्याणकारक व यक्ष, नाग यांनी सर्वकाळ सेवित (आश्रयित) होत. अशा शिला ज्या राजांच्या राज्यांत असतील तेथे कधीही अवर्षण होणार नाही ॥१११॥

गरज असल्यास शिला फुटत नाही तर, तत्काल टेंभुरणीची व पळसाची काष्ठे यांनीकरून अग्नि पेटवून ती शिला लाल करावी. आणि चुन्याच्या पाण्याने भिजवावी म्हणजे फुटते ॥११२॥

मोक्षक (मरुबक, मोरवा) वृक्षाच्या भस्मात तापविलेले उदक शर (सरनामक तृणवि०) तृणाच्य भस्माने युक्त करून तापविलेल्या शिलेचे सातवेळ सिंचन पुन:पुन: तापवून करावे म्हणजे ती शिला फुटते ॥११३॥

ताक, पेज, मद्य, कुळीथ हे एकत्र करून त्यामध्ये बोरे टाकावी आणि सातरात्री ठेवावी. त्याने तापिवलेली शिळा भिजवावी म्हणजे फुटते ॥११४॥

निंबाची पाने व साल, तिळांचे नाल (तिळकट,) आघाडा, टेंभुरणी, गुळवेल, यांचे भस्म गोमूत्राने युक्त करून त्याने तापिवलेला पाषाण (दगड) सहावेळ पुन:पुन: तापवून सिंचन केला म्हणजे फुटतो ॥११५॥

या दोन श्लोकांचा अर्थ (अ० ५० श्लो० २५।२६) यात सांगितला आहे. प्रथम श्लोकातील टंकस्थ या पदाचा अर्थ शस्त्र (टांकीइ०) असा आहे ॥११६॥११७॥

पूर्वपश्चिम पाली (वापी, विहीर) बहुतदिवस उदक धारण करिते. दक्षिण विहीर फार दिवस रहात नाही. कारण वाय़ूने प्रेरित जे तरंग त्यांनीकरून तिचे विदारण बहुधा होते. अशा विहिरीते जर चांगली करण्यास इच्छील तर जिकडे जलतरंग जात असतील तिकडे द्दढकाष्ठांनी किंवा दगडांनी अथवा भाजलेल्या विटांनी जलपतनस्थल बांधावे. प्रतिचयं (एकेक थरी) गज, अश्व, उंट, महिष, बैल यांनीकरुन भूमीचे मर्दन करावे म्हणजे तेणेकरून बळकट घट्ट होते ॥११८॥

ककुभ (अर्जुनसादडा, वट, आम्र, पाईर, कळंब, कडुनिंब, जांभूळ, वेत, कोर्‍हाटा, ताड, अशोक, मोहा, बकुल, या वृक्षांनी विहिरीचे तीर आच्छादित करावे (हे वृक्ष लावावे) ॥११९॥

शिलांनी केला आहे उदकाचा मार्ग ज्यास असे एकीकडे निर्वाहार्थ द्वार करावे. त्यावर मध्ये छिद्र्रहित कपाट करून नंतर ते मातीने युक्त करावे ॥१२०॥

अंजन (कटुकी किंवा काळी कापशी,) नागरमोथा, वाळा, शिरदोडकी किंवा पोठी घोसाळी, यांचे चूर्ण व कतफल  (निवळीचेबी) यांचा योगकरून विहिरीमध्ये टाकावा ॥१२१॥

तेणेकरून गढूळ, कडु, क्षार, विरस अशुभगंध असेही उदक स्वच्छ, सुरस, सुगंधि, या गुणांनी व अन्यही चांगल्या गुणांनी युक्त होते ॥१२२॥

हस्त, मघा, अनुराधा, पुष्य, धनिष्ठा, उत्तरा, उत्तराषाढा, उत्तराभाद्रपदा, रोहिणी, शततारका, हा नक्षत्रसमुदाय कूपांच्या (विहिरीच्या) आरंभास प्रशस्त होय ॥१२३॥

वरुण (अपांपति) यास बलि देऊन वट व वेत यांची मेख करून तिची पुष्पे, गंध, धूप इत्यादिकांनी पूजा करून शिरा (झरा) स्थानी प्रथम स्थापन करावी ॥१२४॥

ज्येष्ठी पौर्णिमेस ज्येष्ठानक्षत्र जाऊन मेघोद्भव उदक प्रथमच अध्याय २३ यात बलदेवादिकांचे मत पाहून मी सांगितले. या अध्यायात भूमिसंबंधी हे दुसरे दगार्गल (पाणी पाहणे) मी (वराह मिहिराने) मुनिप्रसादाने उत्तम सांगितले ॥१२५॥


॥ इतिश्रीवराहमिहिरकृतौबृहत्संहितायांदगार्गलंनामचतु:पंचाशोध्याय: ॥५४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP