मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|बृहत्संहिता|
अध्याय ११

बृहत्संहिता - अध्याय ११

शके ८८८ फाल्गुन कृष्ण द्वितीया गुरुवारी उत्पलनामकाने ही टीका केली.


॥ अथकेतुचार: ॥

(केतु म्ह० धूमकेतु, शेंडे नक्षत्र)

गार्गीं, पराशर, असित, देवल या ऋषींनी केलेले व अन्य ऋषींनीही केलेले बहुत केतुचार पाहून मी हा नि:संशय केतुचार करितो ॥१॥

या केतूंचे उदय किंव अस्त हे गणिताने समजत नाही; कारण केतु दिव्य (आकाशातील,) आंतरिक्ष (आकाशातील व पृथ्वीवरील यांचे मध्ये झालेले,) भौम (भूमीवर झालेले, पिशाचदीपिकादि) असे तीन प्रकारचे आहेत ॥२॥

ज्या देशी अग्नि नसून अग्नि (तेज) दिसतो ते केतुस्वरूप सांगितले; परंतु खद्योत (काजवा किंवा इंद्रगोप म्ह० सोनीकडा,) पिशाचालय (ज्या ठिकाणी रात्रीच्या वेळेस वारंवार ज्योति वगैरे दिसतात ते,) चंद्रकांतादिमणि, मरकतादिरत्ने, पाच इत्या० काष्ठप्रभृति म्ह० काही नियमित कुसलेल्या काष्ठांत तेज (फॉस्फरस) दिसते ते इत्यादिजी तेजे यांना सोडून अन्य जी तेजे राहिली ते केतु स्वरूप होय असे सांगितले आहे ॥३॥

ध्वज, शस्त्र, गृह, वृक्ष, अश्व, हस्ती इत्यादिकांचे ठाई जे तेज दिसते ते आंतरिक्ष केतु होत. नक्षत्रांमध्ये जे केतु दिसतात ते दिव्य होत. यांहून अन्य जे भूमीवर दिसतात ते भौम केतु होत ॥४॥

पराशरादि कोणी ऋषि, एकशे एक केतु आहेत असे म्हणतात. अन्य ऋषि, हजार केतु असे म्हणतात. नारद ऋषि केतु एकच आहे; परंतु त्याची बहुत रूपे आहेत असे म्हणतो ॥५॥

केतु एक असो किंवा बहुत असोत, येथे केतूंचा उदय, अस्त, स्थान, स्पर्श, आधूमन (शेंडी असणे) व वर्ण यांचा विचार करूनच ते फल सांगावयाचे आहे ॥६॥

जितके दिवस केतु दिसेल तितके महिन्यांनी फल होईल. जितके महिने दिसेल तितक्या वर्षांनी फल होईल. ते फल केतु द्दष्टगोचर झाल्यापासून ४५ दिवसांपुढे महिने किंवा वर्षे जाणावी ॥७॥

र्‍हस्व (आखूड,) तनु (जाड,) निर्मल, स्निग्ध (आर्द्र,) सरळ, थोडावेळ रहाणारा, श्वेतवर्ण, ज्याचा उदय झाला अ० परन्य पडतो असा केतु सुभिक्ष व सौख्य यांते करणारा होय ॥८॥

पूर्वीक्ताहून, विपरीतस्वरूप उत्पन्न जो केतु, तो शुभ नव्हे व इंद्रधनुष्यासारखा अशुभ होय. दोन शिखेंचा किंवा तीन शिखेंचा विशेषेंकरून अशुभ होय ॥९॥

हार (मोत्यांचा,) चंद्रकांतादि मणि, सुवर्ण, यांसारख्या रूपांचे शिखायुक्त जे केतु, ते किरणसंज्ञक सूर्यापासून उत्पन्न पंचवीस आहेत. त्यांतून एकच द्दष्टिगोचर होतो तो पूर्वेस किंवा पश्चिमेस दिसतो. तो दिसला असता राजांस विरोधावह (अशुभ) होतो ॥१०॥

कीर, अग्नि, दुपारीचे पुष्प (अति तांबडे,) लाख, रक्त यांसारखे आग्नेयीम दिसणारे पंचवीसच अग्निपुत्र धूमकेतु द्दष्टिगोचर झाले तर अग्नीपासून भय होते ॥११॥
त्यातून एकच द्दष्टिगोचर होतो हे सर्वत्र जाणावे ॥

वाकडया शिखांचे, रखरखीत, कृष्णवर्ण असे मृत्युपुत्र पंचवीस केतु आहेत, ते दक्षिणदिशेकडे दिसतात, तेही लोकांस मृत्युकारक होत ॥१२॥

आरशासारखे वर्तुळ, शिखारहित, किरणयुक्त असे २२ केतु भूमिपुत्र उदक व तेल यांसारख्या वर्णाचे ईशानी दिशेस दिसतात ते दुर्भिक्ष करणारे होत ॥१३॥

चंद्रकिरण, रुपे, बर्फ, कमल, कुंदपुष्प यांच्या वर्णासारखे तीन चंद्रपुत्र केतु उत्तरेस दिसतात, ते सुभिक्ष करणारे होत ॥१४॥

तीन शिखांचा व तीन वर्णांचा ब्रम्हापुत्र ब्रम्हादंडनामक  सर्वदिशेस दिसणारा असा केतु एकच आहे. तो युगांत (प्रलय) करणारा होय ॥१५॥

केतूंचे एकाधिकशत १०१ सांगितले. त्यानंतर केतूंची एकोन नऊ शते ८९९ स्पष्ट लक्षणेही सांगतो ॥१६॥

शुक्रपुत्र ८४ केतु उत्तर व ईशानी या दिशांस उदय पावतात. ते विस्तीर्ण, शुभ्रतारांचे व निर्मल असे द्दष्टिगोचर होतात त्यांपासून अशुभफल होते ॥१७॥

निर्मल व तेजयुक्त आणि दोनशिखांचे शनैश्चराचे पुत्र साठ, कनकसंज्ञक केतु आहेत ते सर्वदिशांस द्दष्टीस पडतात त्यांचे अशुभफल होय ॥१८॥

श्वेत, एकतारा, शिखारहित, निर्मल, विकचनामक पासष्ट ६५ बृहस्पतिपुत्र केतु दक्षिणेस दिसतात ते अशुभफलद होत ॥१९॥

अस्पष्ट, सूक्ष्म, लांब,  श्वेतवर्ण, सर्व दिशांस दिसणारे, तस्करसंज्ञक बुधाचे पुत्र केतु एकावन्न आहेत ते अशुभ फलद होत ॥२०॥

रक्त व अग्नि यांसारखे, तीनशिखांचे, कौंकुमसंज्ञक भौमपुत्र, साठ केतु उत्तरेस दिसतात ते अशुभ होत ॥२१॥

तेतीस, राहूचे पुत्र तामसकीलकसंज्ञक केतु चंद्रसूर्यमंडळी दिसतात याचे फल रविचारामध्ये सांगितले आहे. ॥२२॥

एकशेवीस विश्वरूपसंज्ञक अग्निपुत्र केतु ज्वालांनी व्याप्तदेह, असे आहेत ते तीव्र अग्निभय देणारे होत ॥२३॥

श्यामलोहितवर्ण, तारांरहित, चवरीसारखे व पसरलेल्या किरणांचे अरुण स० वायुपुत्र रूक्ष असे ७७ आहेत ते अशुभ होत ॥२४॥

नक्षत्रसमुदायासारखे गणकनामक आठ प्रजापतिपुत्र केतु, ते अशुभ होत. दोनशेचार चतुरस्र (चौकोनी किंवा चतुरस्रनामक) ब्रम्हापुत्र केतु आहेत ते अशुभ होत ॥२५॥

कंकनामक, वेळूच्या बेटासारखे, चंद्रासारख्या तेजाने युक्त बत्तीस वरुणपुत्र केतु सांगितले ते तीव्रफल (अशुभ) होत ॥२६॥

छिन्नमस्तक (धड) यासारखे, कबंधसंज्ञक, भयंकर, अस्पष्टतारेचे, शाण्णव कालपुत्र केतु आहेत ते भय देणारे होत ॥२७॥
(ज्यांस दिशा सांगितली नाही ते अनियतदिक जाणावे)

श्वेतवर्ण व मोठा एकच तारा आहे ज्यांचा असे. अंतरालदिशेचे पुत्र व आग्नेय्यादि विदिसेमध्ये दिसणारे नऊ केतु आहेत ते द्दष्टिगोचर झाले तर भय देणारे होत. याप्रकारे हजार केतु सांगितले. आता त्यांचाच विशेष सांगतो ॥२८॥

उत्तरदिशेस दीर्घ, अतिस्थूल, स्वच्छ, पश्चिमेस उदय पावणारा, वसासंज्ञक केतु पाहिला असता त्याच दिवशी महामारी इत्यादि रोग उद्भवतात उत्तम सुभिक्षही होते ॥२९॥

अस्थिकेतुनामक केतु, वसाकेतूच्या लक्षणांनी युक्त व रूक्ष (रखरखीत) दुर्भिक्षकारक होय. वसाकेतूसारखाच निर्मलदेह, पूर्वेस दिसणारा शस्त्रकेतुसंज्ञक केतु, युद्ध (शस्त्रकलह) व महामारी करणारा होय ॥३०॥

धूम्रवर्णशिखांचा कपालकेतु अमावास्येस पूर्वदिशेकडे आकाशाच्या अर्धामध्ये हष्टिगोचर होतो तो दुर्भिक्ष, महामारी, अवर्षण व रोग यांते करतो ॥३१॥

पूर्वेकडे अग्निवीथीत (पूर्वाषा, उत्तराषाढा यांसमीप), शूलाकृति (त्रिशिख,) धूम्रवर्ण, रूक्ष व ताम्र आहे कांति ज्याची असा आणि आकाशाच्या तीन भागात फिरणारा रौद्रनामक केतु, कपालकेतुसारखेच (क्षुन्मारकावृष्टिरोगक) फल देतो ॥३२॥

चलकेतु, पश्चिमदिशेस एक अंगुल उंच व दक्षिणेकडे अग्र अशा शिखेने युक्त दिसतो, तो जसजसा उत्तरेकडे जाईल तसतसा लांब होतो ॥३३॥

आणि तो सप्तऋषींस, ध्रुवास व अभिजित नक्षत्रास स्पर्श करून मागे फिरतो आणि आकाशाच्या अर्ध्या भागात जाऊन दक्षिणेस अदर्शन (अस्त) पावतो ॥३४॥

तो चलकेतु प्रयागाच्या तीरापासून अवंतीनामक नदीपर्यंत, पुष्करनामक अरण्य व उत्तरदिशेकडे देविकानामक नदी व मोठा मध्यदेश यांचा ॥३५॥

व अन्य देशांचाही रोग व दुर्भिक्ष यांहीकरून कोठेकोठे नाश करितो. या चलकेतूच्या फलाचा अनुभव दहा महिन्यांनी येतो. कोणी गर्गादिमुनींनी १८ महिन्यांनी येतो असे सांगितल आहे. ॥३६॥

दक्षिणदिशेसशिखा असा श्वेतकेतुनामक केतु, मध्यरात्रीच्या पूर्वी दिसतो व दुसरा कनामक केतु, युग (जोखड) यासारखा पश्चिमेस दिसतो हे दोन्ही एककाली सात दिवस द्दष्टीस पडतात ॥३७॥

ते स्निग्ध (अतिनिर्मल,) सुभिक्ष व कल्याण करणारे होत. कदाचित जो कनामक केतु तो अधिक दिवस द्दष्टीस पडेल तर दहा वर्षेपर्यंत युद्धकृत दु:ख होईल ॥३८॥

श्वेतनामक केतु जटाकार, रूक्ष (रखरखीत,) धूम्रवर्ण, आकाशाच्या तीन भागात फिरणारा होय. तो जर अपसव्य फिरेल, तर तिसरा हिंसा प्रजा राहील (प्रजांच्या दोन भागांचा नाश करील) ॥३९॥

स्वल्पधूम्रवर्णशिखेने द्दष्टीस पडणारा व कृत्तिका नक्षत्राजवळ राहणारा असा रश्मिकेतु पूर्वोक्त श्वेतासारखे फळ (तिसराहिंसा प्रजा शेष राहए) देतो ॥४०॥

ध्रुवकेतुसंज्ञक केतु, गमन, प्रमाण (स्थूल सूक्ष्मादि,) श्वेतादिवर्ण व आकृति यादीकरून अनिश्चित व आसमंतात (सर्वत्र) होणारा होय. हा दिव्य, अंतरिक्ष व भौम असा होतो. हा स्निग्ध (निर्मल) व शुभफल देणारा होय ॥४१॥

हा ध्रुवकेतु नाश पावणार्‍या राजांच्या सेनांगांत (गज, वाजी, रथ, पदाति) व नाश पावणारे देशांतील गृहे, वृक्ष, पर्वत यावर व गृहस्थांच्या दर्वी, शूर्ण, मार्जनी इत्यादिकांच्याठायी द्दष्टीस पड्तो ॥४२॥
म्हणजे ज्या स्थळी हा दिसतो तेथे नाश होतो.  

कुमुदनामक केतु, श्वेतवर्ण, पश्चिमेकडे पूर्वशिख असा एकरात्र द्दष्टीस पडतो तो दिसला तर दहा वर्षे बहुत सुभिक्ष होईल ॥४३॥

मणिकेतुनामक केतु, पश्चिमेकडे एक प्रहरपर्यंत एकदा दिसणारा, अतिसूक्ष्मतारा जशा स्तनांतून निघालेल्या दुधाच्या धारा तशा व सरळ आणि श्वेत शिखेचा होय यांचा प्रादुर्भावही (उत्पत्ति) होतो ॥४५॥

पश्चिमेकडे उंच अशा शिखेचा निर्मलदेह असा जलकेतुनामक केतु पश्चिमेकडे द्दष्टिगोचर होतो. तो द्दष्टीस पडला तर नऊ महिने सुभिक्ष करितो व लोकांचे कल्याणही करितो ॥४६॥

पूर्वदिशेस एकरात्र दिसणारा, लहानतारा, निर्मलदेह, सिंहाच्या पुच्छासारखी व प्रदक्षिण फिरलेल्य शिखेने युक्त असा भवकेतुनामक केतु जितके मुहूर्त (दोन घटिकेचा एक) द्दष्टीस पडेल तितके महिने बहुत सुभिक्ष होईल व तोच केतु रूक्ष (रखरखीत) असेल तर प्राणनाशक रोग होतील ॥४७॥४८॥

श्वेतवर्ण, पद्मकेतुनामक केतु, पश्चिमेकडे एकरात्र द्दष्टीस पडतो तो सातवर्षे सुभिक्षकरून सर्वांस हर्षित करतो ॥४९॥

निर्मलदेह, आरक्त, सव्यशिख, असा आवर्तनामक केतु, मध्यरात्रीस द्दष्टीस पडतो. तो जितके मुहूर्त द्दष्टीस पडतो तितके महिने सुभिक्ष करतो ॥५०॥

धूम्रवर्ण असून तांबडया शिखांचा, आकाशाचा तिसरा भाग व्यापून राहणारा, शूलाग्रासारखा (त्रिशिख,) भयंकर असा संवर्तनामक केतु संध्याकाळी पश्चिमेकडे जितके मुहूर्त द्दष्टीस पडतो तितकी वर्षे युद्धांत राजांचा नाश करितो व ज्या नक्षत्री उदय होतो ते नक्षत्र दूषित होते ॥५१॥५२॥

जे शुभ केतु, त्याते सोडून अशुभकेतूंनी आधूमित (त्यांजवर शिखा गेलेली) अथवा स्पृष्ट (धूमकेतुच्या शिखा नक्षत्रास लागलेल्या) अशी अश्विन्यादि नक्षत्रे असता कोणते नक्षत्र स्पृष्ट अ० कोणत्या राजांचा नाश होईल तो प्रकार पुढे सांगतो ॥५३॥

अशुभकेतूने अश्विनी न० आधूमित किंवा स्पष्ट अ० अश्मक (सूर्यवंशांतील) राजाचा नाश होतो. भरणी न० अ० किरातराजाचा ना. कृत्तिका अ० कलिंग राजाचा नाश. रोहिणीन० अ० शूरसेन राजाचा नाश होतो ॥५४॥

मृगशीर्षन० अशुभ केतूने धूमित किंवा स्पष्ट असता उशीनरदेशच्या राजाचा नाश होतो. आर्द्रान० अ० मत्सादि जलजप्राण्यांवर वाचणारे जे प्राग्देशवासी लोक त्यांच्या राजाना नाश होतो. पुनर्वसून० अ० अश्मक राजाचा नाश होतो. पुष्यन० अ० मगधदेशच्या राजाचा नाश होतो ॥५५॥

आश्लेषान० अ० असिक रजाचा नाश होतो, मघान० अ० अंगदेशच्या राजाचा नाश होतो. पूर्वान० अ० पांडयदेशच्या राजाचा नाश होतो. उत्तरान० अ० उज्जयनीच्या राजाचा नाश होतो. हस्तन० अ० दंडकारण्याच्या राजाचा नाश होतो ॥५६॥

चित्रान० अ० कुरुक्षेत्राच्या राजास मरण, केतुफळ जाणणाराने सांगावे. खातीन० अ० काश्मीर व कांबोज देशांचे राजे नाहिसे होतात ॥५७॥

विशाखानक्षत्र अ० इक्ष्वाकुराजा व अलकानगरीचा राजा यांचा नाश होतो. अनुराधानक्षत्र असता पुंड्रदेशच्या राजाचा नाश होतो. ज्येष्ठान० असता सार्वभौम राजाचा नाश होतो ॥५८॥

मूलन० केतूने आधूमित किंवा स्पष्ट अ० आंध्र व मद्र या देशांच्या राजांचा नाश होतो.  पूर्वाषाढा न० अ० काशिराजाचा नाश होतो. उत्तराषाढा न० अ० यौधेयक, आर्जुनायन, शिबि, चैद्य या राजांचा नाश होतो ॥५९॥

श्रवण न० अ० कैकयराजाचा, धनिष्ठा न० अ० पांचनदराजाचा, शततारका न० अ० सिंहलदेशच्या रजाचा, पूर्वाभाद्रपदा न० अ० अंगदेशच्या राजाचा, उत्तराभा० न० अ० नैमिषारण्याच्या राजाचा, रेवतीनक्षत्र अशुभकेतूने आधूमित किंवा स्पष्ट असता किरात देशच्या राजाचा नाश होतो ॥६०॥

उलेने (आकाशांतून तेजरूप तारा पडतो तो) ताडित आहेत शिखा ज्याच्या असा केतु शुभ होय व जो द्दष्टीस पडतात वृष्टि होते तो तर अतिशुभ होय. पूर्वोक्तच केतु चोले, अवगाण, सित, हूण (जंगलप्रदेश,) चीन या देशच्या लोकांस अशुभ होय ॥६१॥

ज्या दिशेकडे केतूच्या शिखा नम्र झाल्या किंवा ज्या दिशेस गेल्या त्या दिशेकडे गेलेला किंवा केतुशिखांनी ज्या नक्षत्रास स्पर्श केला त्या नक्षत्राच्या वक्ष्यमाण देशांकडे गेलेला राजा उत्तम पराक्रमाने शत्रू मारून देशाते उपभोगितो. जसा गरुड उत्कृष्ट सर्पांच्या देहाते खातो तसा शत्रूंस मारून राज्य भोगितो ॥६२॥


॥ इतिवराहमिहिरकृतौबृहत्संहितायांकेतुचारएकादश: ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : February 18, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP