मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|बृहत्संहिता|
अध्याय ८

बृहत्संहिता - अध्याय ८

शके ८८८ फाल्गुन कृष्ण द्वितीया गुरुवारी उत्पलनामकाने ही टीका केली.


॥ अथबृहस्पतिचार: ॥

बृहस्पति ज्या नक्षत्राबरोबर सूर्यमंडळापासून उदय पावतो तत्संज्ञक अथवा ज्या नक्षत्राबरोबर सूर्यमंडळी प्रवेश करितो (अस्त पावतो) तत्संज्ञक बार्हस्पत्य वर्ष लोकांमध्ये बोलावे; परंतु ते मासानुक्रमानेच बोलावे. ज्या नक्षत्रावर उदय किंवा अस्त होईल त्यावरून वर्षास नावे द्यावी असे मूळ श्लोकात आहे, पण टीकेमध्ये उदयवर्षच मानावे असे बहुत ऋषीचे मत आहे असे लिहिले आहे ॥१॥

कृत्तिकादि दोन दोन नक्षत्रांच्या योगाने कार्तिकादिमासानुक्रमाने वर्षे होतात; परंतु ५।११।१२ या महिन्यांच्या वर्षांस मात्र तीन तीन नक्षत्रे जाणावी. म्ह० कृत्तिका, रोहिणी यावर बृहस्पतीचा उदय झाला तर कार्तिक वर्ष जाणावे. मृग, आर्द्रा, मार्गशीर्ष व०; पुनर्वसु, पुष्य, पौष व०; आश्लेषा, मघा व०; पूर्वा, उत्तरा, हस्त, फाल्गुन व०; चित्रा, स्वाती, चैत्र व०; विशाखा, अनुराधा, वैशाख व०; ज्येष्ठा, मूळ, ज्येष्ठ व०; पूर्वाषाढा, उत्तराषाढा, आषाढा, व०; श्रवण, धनिष्ठा, श्रावण व०; शततारका, पूर्वाभा०; उत्तराभा०, भाद्रपद व०; रेवती, अश्विनी, भरणी, आश्विन व०; याप्रमाणे बार्हस्पत्य वर्ष जाणावे ॥२॥

बृहस्पतीच्या कार्तिकवर्षामध्ये, शकटाने (गाडयाने) उपजीविका करणारे व सुवर्णकारादि अग्न्युपजीवी व गाई यांस पीडा होते व रोग आणि युद्धे होतात. तांबडे, पिवळे फूल ज्याचे त्यांची वृद्धी होते ॥३॥

बृ० मार्गशीर्षवर्षी अवर्षण; अरण्यपशु, उंदीर, शलभ (कीतजाति) यापासून धान्याच नाश; रोगभय; मित्रांबरोबरही राजाचे वैर ही होतात ॥४॥

पौषवर्ष लोकांस कल्याणकारक होय. राजे परस्पर द्वेषरहित होतील. धान्याची जी पूर्वी किंमत असेल त्याच किमतीला दुप्पट, तिप्पत धान्य मिळेल (समर्घ होईल.) पुष्टिदकार्ये बहुत होतील ॥५॥

माघवर्षी सर्व लोक पितृपूजा करतील व सर्वांस संतोष होईल. आरोग्य, वृष्टि व धान्यसंपत्ति ही होतील. आणि मित्रप्राप्तीही होईल ॥६॥

बृ० फाल्गुनवर्षी क्षेम, वृष्टि धान्ये ही कोठेकोठे होतील. सर्वत्र होणार नाहीत. स्त्रियांस दुर्भगत्व (पतीची अप्रीति) होईल. चोर बहुत होतील व राजे क्रूर होतील ॥७॥

चैत्रवर्षी वृष्टि अल्प होईल. अन्न दुर्लभ होईल. कल्याण होईल. राजे सदय होतील. मुद्रादि कोशधान्ये बहुत होतील. रूपवंतांस पीडा होईल ॥८॥

वैशाखवर्षी राजे व प्रजा हे धर्मपरायण, भयरहित व आनंदित होतील. यज्ञकर्मे बहुत होतील व सर्व धान्यांची उत्पत्ति बहुत होईल ॥९॥

ज्येष्ठवर्षी ज्ञाति, कुल, धन, जनसमुदाय यांमध्ये मुख्य व राजे व धर्म जाणणारे हे सर्व पीडा पावतात. व कांग, राळे, तीळ, मुद्र इत्यादि शेगेंत होणारी धान्ये खेरीजकरून इतर धान्यांस पीडा होते (महर्घ ह्होतात) ॥१०॥

आषाढवर्षी धान्ये क्वचित होतील. अन्यदेशी अवर्षण ही होईल. अप्राप्ताचा लाभ व प्राप्ताचे पालन ही मध्यम होतील. राजे व्यग्र (उद्योगयुक्त) होतील ॥११॥

श्रावणवर्षी क्षेम (प्राप्तपालन) होईल. धान्ये उत्तमप्रकारे पक्व होतील. क्रूर, वेदबाहय पाखंडी लोक व त्यांचे सेवक हे पीडा पावतील ॥१२॥

भाद्रपदवर्षी वल्लीज (मुद्रादि) धान्य होईल व प्रथम पेरलेले धान्य चांगले होईल. मागून पेरलेले धान्य होणार नाही. कोठे सुभिक्ष व कोठे भयही होईल ॥१३॥

बृहस्पतीच्या आश्विनवर्षी बहुत जलवष्टि, लोक आनंदित, कल्याण, सर्व प्राण्यांची बलवृद्धि व बहुत अन्न ही होतील ॥१४॥

बृहस्पति नक्षत्रांच्या उत्तरेकडून गमन करील तर आरोग्य, सुभिक्ष, कल्याण यांचा करणरा होतो व दक्षिणेकडून गमन करील तर रोग, दुर्भिक्ष, अकल्याण यांते करितो व नक्षत्रमध्याने गमन करील तर ही पूर्वीक्त आरोग्यादिक मध्यम होतात ॥१५॥

बृहस्पति एकवर्षामध्ये दोन नक्षत्रे भोगील तर शुभ होय. अडीच नक्षत्रे भोगील तर मध्यम होय. कदाचित अडीच नक्षत्रांहून अधिक आपल्या एक वर्षांत भोगील तर, धान्याचा नाश करील ॥१६॥

बृहस्पतीचा अग्नीसारखा वर्ण असता अग्निभय, पीतवर्ण असता रोगभय, कृष्णवर्ण असता युद्धभय, हिरवा असता चोरांपासून पीडा, तांबडा असता शस्त्रभय ही होतात ॥१७॥

बृहस्पतीचा धूम्रवर्ण असता अवर्षण होते. बृहस्पति दिवसा द्दष्टिगोचर झाला तर राजाचा वध म्ह. मृत्यु होतो. बृहस्पति विपुल (मोठा,) स्वच्छ, सुंदरतारा असा रात्रीस द्दष्टिगोचर असला तर सर्व प्रजा स्वस्थ होतील ॥१८॥

बार्हस्पत्य वर्षाचे रोहिणी व कृत्तिका ही दोन नक्षत्रे शरीर होत. पूर्वाषा० व उत्तराषा० ही २ नाभि होत. आश्लेषा हृदय होय. मघा पुष्प होय. ती शरीरादि नक्षत्रे पापग्रहरहित असता शुभफल होते. ती शरीरनक्षत्रे पापग्रहाने पीडित असता अग्नि व वायु यांचे भय, नाभिनक्षत्र पीडित असता दुर्भिक्षभय, पुष्पनक्षत्र पीडि० मूले व फले यांचा क्षय, ह्रदयनक्षत्र पापग्रहपीडित असता धान्यनाश. ही फले निश्चयेकरून होतात ॥१९॥

विक्रमसकारंभापासून वर्तमानशकापर्यंत गतवर्षे म्हणजे विक्रमशकांक घेऊन ११ नी गुणून पुन: ४ नी गुणावा आणि त्यात ८५८९ मिळवून ३७५० यानी भागावे. लब्धवर्षे त्याच बृहस्पतीच्या राशी होत. शेष ३० नी गुणून ३७५० नी भागून जे लब्ध ते अंश राशीच्या खाली मांडावे. भागशेष ६० नी गुणून ३७५० नी भागून जे लब्ध त्या कला अंशांच्या खाली मांडाव्या. कलाशेष ६० नी गुणून ३७५० नी भागून जे लब्ध त्या विकला कलांच्या खाली मांडाव्या. नंतर ते लब्धराश्यादिक वर्तमान विक्रमशकात मिळवावे म्ह० शकात राशीचा अंक मिळवावा. त्या अंकास राशी किंवा वर्षे म्हणावे. नंतर राशी ६० नी भागून जे लब्ध ते गतषष्टिसंवत्सर आणि जे शेश ती वर्तमान षष्टिसंवत्सरांची गत वर्षे होत. ती ५ नी भागून जे लब्ध ती वर्तमान षष्टिसंवत्सरांची नारायणपूर्वक युगे गत होतात. पाचांनी भागून जे शेष तीच वर्तमान युगाची वर्षे, दिवस, घटी, पळे गत होतात ॥२०॥२१॥

साठांनी भागून जे वर्षादि आले ते दोहो स्थळी मांडावे. एका अंकास ९ नी गुणावे त त्यात द्वितीय अंकास १२ नी भागून जे येईल ते मिळवावे. नंतर त्यास चोहोनी भागावे म्ह० जे लब्ध ती धनिष्ठादिनक्षत्रे होतात व जे शेषांश तत्पूर्वक वर्ष होते ॥२२॥

१ विष्णु, २ बृहस्पति, ३ इंद्र, ४ अग्नि, ५ त्वष्टा, ६ अहिर्बुध्न्य, ७ पितर, ८ विश्वे, ९ सोम, १० इंद्राग्नी, ११ अश्वि, १२ भग; हे १२ युगांचे स्वामी अनुक्रमेकरून सांगितले आहेत. ॥२३॥

त्या विष्वादि युगांच्या पहिल्या वर्षाचे नाव संवत्सर, त्याची देवता अग्नि; दुसर्‍या वर्षाचे नाव परिवत्सर, दे० सूर्य; ति० ना० इदावत्सर, देवता चंद्र, च० ना० अनुयत्सर, दे० ब्रम्हा; पा० ना० इद्वत्सर, देवता रुद्र; याप्रमाणे पाच वर्षांची नावे व देवता जाणाव्य, हे सांगण्याचे कारण जसे युगाचे स्वामी सांगितले तसेच वर्षाचेही स्वामी सांगून देवताही सांगितल्या. त्या वर्षी त्या देवतेचे प्रीत्यर्थ योग करण्यासाठी सांगितल्या. हे वेदामध्येही सांगितले आहे ॥२४॥

संवत्सराख्य प्रथमवर्षी वृष्टि मध्यम, परिवत्सराख्य द्वितीयवर्षी प्रथम दोन महिनेच वृष्टि; इदावत्सराख्य तृतीयवर्षी बहुत वृष्टि; अनुवत्सराख्य चतुर्थवर्षी पुढील (अंत्य) दोन महिने वृष्टि; इद्वत्सराख्य पंचमवर्षी अल्प वृष्टि. याप्रमाणे युगांच्या पाच वर्षांचे फल सांगितले ॥२५॥

हया बारा युगांमध्ये विष्णु, इंद्र, गुरू, अग्नि हया देवतांची प्रथम चार युगे मुख्य (श्रेष्ठ) होत. मधली त्वष्टा, अहिर्बुध्न्य, पितर, विश्वे हया देवतांची चार युगे मध्यम होत. अंत्य सोम, इंद्राग्नी, अश्वि, भग हया देवतांची चार युगे अधम (अशुभ) होत ॥२६॥

बृहस्पति धनिष्ठानक्षत्राच्या पहिल्या चरणी असून जेव्हा माघमासी उदय पावेल, त्याकाळी साठ वर्षांतील प्रभवनामक प्रथवनामक प्रथमवर्षाची प्रवृत्ति होते (त्या प्रभव वर्षाचा आरंभ होतो.) ते वर्ष सर्व प्राण्यांस हितकारक होय ॥२७॥

हे प्रभवाख्य वर्ष प्राप्त झाले असता, क्वचित अवर्षण, वायु व अग्नि यांचा कोप, अतिवृष्टयादिक उपद्रव कफोत्पन्नरोग, ही कोठेकोठे होतील; असे झाले असताही लोकांस दु:ख  होणार नाही ॥२८॥

त्या पूर्वोक्त प्रभवापासून दुसरा विभव, तिसरा शुक्ल, चवथा प्रमोद, पाचवा  प्रजापति, ही चार वर्षे उत्तरोत्तर प्रशस्त ॥२९॥

या विभवादि चारवर्षांमध्ये राजे, शालि, इक्षु, यव, गोधूम, मसूर,चणक, माष इत्यादि धान्ये बहुत होणारी, भय व द्वेष यांनी रहित, आनंदितलोकयुक्त व कलिदोषरहित अशा भूमीचे पालन करतील ॥३०॥

द्वितीय बार्हस्पत्यगुगामध्ये प्रथम अंगिरावर्ष, दुसरे श्रीमुख, तृतीय भाव, चतुर्थ युवा, पंचम धाता ही पाच होतात. यामध्ये पहिली तीन प्रशस्त व पुढील दोन मध्यम होत ॥३१॥

पहिल्या तीन वर्षांत इंद्र बहुत वृष्टि करील आणि लोक उपद्रव व भीतिरहित होतील. अंत्य दोन वर्षांमध्ये बहुत नव्हे व अल्पही नव्हे अशी समान म्ह० उत्तम वृष्टि होईल; परंतु रोग व युद्धे बहुत होतील ॥३२॥

ऐंद्रयुगामध्ये प्रथम ईश्वरवर्ष, दुसरे बहुधान्य, तिसरे प्रमाथी, चवथे विक्रम, पाचवे वृष ही वर्षे गुरुचारयोगाने जाणावी ॥३३॥

पहिले व दुसरे वर्ष शुभ यांमध्ये कृतयुगाप्रमाणे (धर्मरत, सुखी, दीर्घजीवी) प्रजा होतात. प्रमाथी तृतीय वर्ष अनिष्ट फल देणारे होय. वृष व विक्रम यावर्षी सुभिक्ष होईल; परंतु रोगांपासून भय होईल ॥३४॥

चतुर्थ हुताशयुगाचे प्रथम चित्रभानु वर्ष श्रेष्ठ (शुभ) होय. दुसरे सुभानुवर्ष मध्यम. तृतीय तारणवर्ष रोगप्रद; परंतु मृत्युप्रद नव्हे. चतुर्थ पार्थिववर्ष त्यात बहुत वृष्टि होऊन धान्यवृद्धि होते; तेणेकरून लोक आनंदित होतात. पाचवे व्ययनामक वर्ष ते शुभ होय. त्यात काम प्रबल होईल व विवाहादिउत्साह होतील ॥३५॥३६॥

पंचमत्वाष्ट्रयुगामध्ये प्रथम सर्वजित - वर्ष, दुसरे सर्वधारी, तिसरे विरोधी, चवथे विकृत, पाचवे खर होय. यातून दुसरे शुभ व बाकी चार वर्षे भयप्रद होतात ॥३७॥

सहाव्या युगामध्ये प्रथम नंदन, दुसरे विजय, तिसरे जय, चवथे मन्मथ, पाचवे दुर्मुख ही वर्षे होत. या युगामध्ये पहिल्यापासून तीन वर्षे शुभ. चवथे मन्मथवर्ष मध्यम पाचवे दुर्मुख अशुभ होय ॥३८॥

सप्तम पैत्र्ययुगामध्ये प्रथम हेमलंब, दुसरा विलंबि, तिसरा विकारि, चवथा शर्वरी, पांचवाप्लव ही पाच वर्षे गुरूचारयोगाने होतात ॥३९॥

प्रथमवर्षी अतिवृष्टयादि उपद्रवयुक्त व बहुत वायुसहित वृष्टि होईल. दुसर्‍या वर्षी अल्पधान्य व अल्पवृष्टि होईल. तृतीयवर्ष अतिदु:ख देणारे व बहुतवृष्टिकारक होय. चतुर्थवर्ष दुर्भिक्षकारक व पंचमवर्ष शुभ व अतिवृष्टिप्रद होय ॥४०॥

अष्टमवैश्वयुगामध्ये प्र. सोभकृत, दु० शुभकृत्, ति० क्रोधी, च० विश्वावसु पा० पराभव हे होतात ॥४१॥

पहिले व दुसरे वर्ष प्रजांस  संतोषकारक होय. तिसरे फार अशुभ. चवशे व पाचवे सम होय; परंतु पाचव्या पराभववर्षी अग्नि, शस्त्रा, रोग यांची पीडा व ब्राम्हाण, गाई यांस भय ही होतील ॥४२॥

नवम सौम्ययुगामध्ये प्रथम प्लवंग, दुसरे कलिक, तिसरे सौम्य, चवथे साधारण, पाचवे रोधकृत ही ५ वर्षे होतात. त्यांमध्ये कीलक व सौम्य ही २ वर्षे शुभ होत. प्लवंगवर्ष प्रजांस अतिदु:खद होय. साधारणवर्षामध्ये अल्पवृष्टि व पीडा होतील. पाचव्या रोधकृत वर्षामध्ये क्वचित वृष्टि होईल; परंतु त्यामध्ये धान्य चांगले होईल ॥४३॥४४॥

दशम इंद्राग्निदैवत युगामध्ये प्रथम परिधाविवर्ष, दु० प्रमादि, तिस० आनंद,  च० राक्षस, पा० अनल ही वर्षे होतात ॥४५॥

परिधाविवर्षामध्ये मध्यदेशांचा नाश, राजमरण, अल्पवृष्टि व अग्निभय ही तोतात.  प्रमादिवर्षामध्ये लोक आळशी होतात; व शस्त्ररहित युद्ध (कलह) होईल. तांबडया पुष्पांचे बीजाचा नाश होईल ॥४६॥

आनंदवर्षामध्ये सर्व लोकांस आनंद होईल. राक्षस व अनल हे लोकक्षय करणारे होत; परंतु राक्षसामध्ये गहू व यव इत्यादि ग्रीष्मधान्ये होतील व अनलामध्ये अग्निकोप आणि महामारी मृत्यु) ही होतात ॥४७॥

अकाराव्या अश्वियुगामध्ये प्र० पिंगल, दु० कालयुक्त, ति० सिद्धार्थ, च० रौद्र, पां० दुर्भति ही पाच वर्षे होतात. त्यात प्रथमवर्षी महान - वृष्टि, चोरभय, श्वास, हनूकंपयुक्तकास ही होतात ॥४८॥

कालयुक्तवर्षामध्ये अनेक अशुभे होतात. सिद्धार्थवर्षामध्ये बहुत गुण (धान्यसंपत्ति इत्यादि) होतात. रौद्र व अतिरौद्र ही २ वर्षे लोकांचा क्षय करणारी होत आणि दुर्मतिवर्षामध्ये मध्यम वृष्टि होते ॥४९॥

द्वादश भाग्ययुगामध्ये प्र० दुंदुभिवर्ष. यात महान धान्यवृद्धि होते. दु० अंगारवर्ष यांत राजांचा नाश होतो व वृष्टि विषम (अतुल्य, अतिभयंकर) होईल ॥५०॥

ति० रक्ताक्षवर्ष यात वराहादि दंष्ट्रीचे भय व रोग ही होतात. च० क्रोधवर्ष यात कोध बहुत उत्पन्न होईल व वैराने राज्ये शून्य होतील ॥५१॥

द्वादशयुगाचे पाचवे वर्ष क्षयसंज्ञक होय. हे बहुत क्षय करणारे व ब्राम्हाणांस भयजनक, शेतीलोकास वृद्धि करणारे, वैश्य, शूद्र आणि परद्रव्यहरण करणारे यास वृद्धि करणारे होय. याप्रमाणे साठ बार्हस्पत्य वर्षांचे जे सर्व फल ते येथे (बृहस्पतिचारामध्ये) संक्षेपाने सांगीतले ॥५२॥

निर्मलकिरण, आसमंतभाग किरणांनी व्याप्त, विशालदेह (तारा) श्वेतकमल, कुंदपुष्प व स्फटिकमणि यांसारखी आहे कांति ज्याची असा, ग्रहाने युद्धामध्ये जिंकलेला नाही असा, ग्रहांच्या व नक्षत्रांचा उत्तरमार्गने जाणारा व वक्रगति नव्हे असा बृहस्पति मनुष्यांस हितकारक होय ॥५३॥


॥ इतिबृहस्पतिचारोष्टमोध्याय: ॥


Last Updated : February 18, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP