मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|बृहत्संहिता|
अध्याय ३३

बृहत्संहिता - अध्याय ३३

शके ८८८ फाल्गुन कृष्ण द्वितीया गुरुवारी उत्पलनामकाने ही टीका केली.


स्वर्गामध्ये शुभफल भोगून खाली पडणारांची जी रूपे ती उल्का होत. त्या धिष्ण्या, उल्का, अशनि, विद्युत, तारा, या भेदांनी पांच प्रकारच्या आहेत ॥१॥

उल्का व धिष्ण्या हया १५ दिवसांनी फल देतात. अशनि तीन पंधरवडयांनी फल देते. विद्युत व तारा सहा दिवसांनी फल देतात ॥२॥

तारा उक्तफलाचा चतुर्थांश फल देते. धिष्ण्या उक्तफलाचे अर्धे फल देते. विद्युत. उल्का, अशनि हया तीन संपूर्ण फल देतात ॥३॥

मोठा शब्द करून मनुष्य, ह्त्ती, अश्व, अरण्यपशु, पाषाण, गृह, वृक्ष, गवादि पशु यांच्याठाई चक्रासारखी फिरून पृथ्वीने विदारण करितहोत्साती जी पडते ती अशनिनामक उल्का होय ॥४॥

प्राणिमात्रास त्रास करितहोत्साती तटतट शब्द करून वाकडी विस्तीर्ण व प्रज्वलित अशी प्राणी व काष्ठसमुदाय यांजवर पडते ती विद्युत होय ॥५॥

दुर्बल, थोडयापुच्छाची, प्रज्वलित निखार्‍यासारखी, जी प्रथम दोन हात उत्पन्न होऊन मध्ये दहा धनुष्ये (४० हात) अधिक लांब दिसते ती धिष्ण्या होय ॥६॥

एकहात लांब, शुभ्र किंवा ताम्रवर्ण, कमलतंतूसारखी (बारीक,) ओढून नेल्यासारखी तिर्कस, खाली किंवा वर होऊन आकाशामध्ये जाते ती तारा होय ॥७॥

मस्तकाचाठाई विस्तीर्ण, पडत असता वाढणारी, बारीक पुच्छाची, पुरुषप्रमाण (साडेतीनहात) लांब होणारी अशी उल्का होय. हचे बहुत भेद होतात ॥८॥

प्रेत, शस्त्र, गर्दभ, उष्ट्र, नक्र, वानर, डुकर, नागर, मृग यांसारख्या, घोरपड, सर्प, धूम, यांसारख्या उल्का अशुभ व दोहोंकडे मस्तकाची अशी जी उल्का तीही अशुभ होय ॥९॥

ध्वज, मत्स्य, गज, पर्वत, कमल, चंद्र, अश्व, तापिवलेले  रुपे, हंस, यांसारख्या व श्रीवत्स (विष्णूच्या ह्रदयावरील चिन्ह,) वज्र, शंख, स्वस्तिक यांसारख्या उल्का शुभ व सुभिक्षकारक होत ॥१०॥

आकाशमध्यापासून उल्का बहुत पडतील तर राजा व देश यांचा नाश होतो. उल्का आकाशात जर फिरेल तर लोकांस भ्रांति करिते ॥११॥

चंद्रसूर्यांस स्पर्श करणारी किंवा चंद्रसूर्यांनी सोडलेली व भूमि कांपविणारी अशी उल्का शुत्रचक्राचे आगमन, राजाचा वध, दुर्भिक्ष, अवर्षण यांचे भय उत्पन्न करते ॥१२॥

उल्का, सूर्यास अप्रदक्षिण करील तर नागरिक लोकांचा व चंद्रास अप्रदक्षिण करील तर नागरिकांहून इतर लोकांचा नाश करिते. जी उल्का सूर्यापासुन निघाली ती गमन करणार्‍या राजाच्या पुढे पडेल तर शुभ होय ॥१३॥

शुक्ल, रक्त, पीत, कृष्ण या वर्णांची उल्का अनुक्रमाने ब्राम्हाण, क्षत्रिय, वैश्यशूद्र या चार वर्णांचा नाश करिते व तशाच अनुक्रमाने मस्तक, उरस्थल,  पार्श्वभाग, पुच्छ या अंगांनी पडलेल्या उल्का ब्राम्हाणादि चार वर्णांचा नाश करितात ॥१४॥

उत्तरादि ४ दिशांस पडलेली व रूक्ष (खरखरीत) उल्का ब्राम्हाणादि चार वर्णांस अशुभ होय. (उत्तरेस पड्लेली ब्राम्हाणांस, पूर्वेस क्षत्रियांस, दक्षिणेस वैश्यांस. पश्चिमेस शूद्रांस अशुभ होय.) ती उल्का सरळ, निर्मल, अखंड, आकाशातून खाली येणारी अशी असून उत्तरादिपतित असेल तर ब्राम्हाणादिकांस शुभ होते. ॥१५॥

श्याम, आरक्त, नील, रक्तवर्ण, अग्निवर्ण, कृष्ण, भस्म या वर्णांची व रूक्ष, संध्यासमय व दिवस यात झालेली, वक्र, खंडित अशी उल्का शत्रूच्या येण्याचे भय करणारी होते ॥१६॥

नक्षत्रे किंवा ग्रह उल्केने उपहत (ताडित) असता पूर्वोक्त नक्षत्रग्रहव्यूहोक्त भक्तींचा नाश होतो. उदयकाली किंवा अस्तकाली सूर्यचंद्रांस उल्का जर ताडन करील तर अनुक्रमाने नागरिक व यायी यांस मृत्यु होतो. (सूर्य ताडित असता नागरिकांचा व चंद्र ताडित असता यायींचा नाश) ॥१७॥

पूर्वा, पुनर्वसु, धनिष्ठा, मूल हया नक्षत्रांच्या योगतारा उल्काहत असता स्त्रियांस पीडा होते. पुष्य, स्वाती, श्रवण ही नक्षत्रे ताडित अ. ब्राम्हाण व क्षत्रिय यांस पीडा होते ॥१८॥

रोहिणी, उत्तरा, उत्तराषाढा, उत्तराभाद्रपदा, मृगशीर्ष, चित्रा, अनुराधा, रेवती, ही नक्षत्रे उल्काहत अ. राजांस पीडा होते. पूर्वा, पूर्वाषाढा, पूर्वाभा., मघा, भरणी, आर्द्रा, आश्लेषा, ज्येष्ठा, मूल ही नक्षत्रे उल्काहत अ. चोरांस पीडा होते. अश्विनी, पुष्य, हस्त, अभिजित, कृत्तिका, विशाखा ही नक्षत्रे उल्काहत असता, काल जाणणार्‍यांस पीडा होते ॥१९॥

हया पूर्वोक्त उल्का देवप्रतिमांवर पडल्या तर राजास व लोकांस भय करतात. शक्र (राजा) यावर पडल्या तर राजांस भय. गृहांवर पडल्या तर गृहस्वामींस पीडा ॥२०॥

(सूर्य, शुक्र, भौम, राहु, शनि, चंद्र, बुध, गुरु हे अनुक्रमाने पूर्वादि दिशांचे स्वामी होत) या दिक्पतींस उपघात उल्का करील तर अथवा दिशा व ग्रह यांवर पडेल तर त्या दिशेस राहणार्‍या लोकांस व त्या ग्रहांच्या देशांत राहणार्‍या लोकांस पीडा होते. (धान्य कापून जेथे मळतात ते खळे) त्यावर पडेल तर शेतीलोकांस पीडा होते. चैत्यतरु (गांगांतील मोठा वृक्ष) यावर उल्का पडली तर थोरलोकांस पीडा होते. ॥२१॥

नगराच्या द्वारावर पडेल तर नगराचा नाश होतो. पुरद्वाराच्या अर्गलेवर (खिळीवर) पडेल तर लोकांचा नाश होतो. ब्रम्हादेवाच्या देवळावर पडेल तर ब्राम्हाणांचा नाश होतो. गोठयावर उल्का पडेल तर गुरे बाळगणारांचा नाश होतो ॥२२॥

वीरांचा सिंहनाद अथवा सिंहाचा शब्द, बाहूंचे अथवा वक्षस्थळाचे ताडनाचा शब्द, वाद्यांचा शब्द, गायनाचा शब्द यांसारखा विजेचा पडतेवेळी शब्द होईल तर राजास व राष्ट्रास भय होते ॥२३॥

ज्या उल्केचा संबंध आकाशामध्ये बहुतवेळ राहतो, जी दंडासारखी, आकाशामध्ये तंतु धरून ओढल्यासारखी जाते व जी इंद्रध्वज (गुडी) यासारखी, या चार प्रकारची उल्का राजास भयकारक होते ॥२४॥

उल्का जेथून आली तेथेच परत गेली तर श्रेष्ठी (मुख्य) यांचा नाश करिते. उल्का तिर्कस गेली तर राजस्त्रियांचा नाश. अधोमुख गेली तर राजांचा नाश. ऊर्ध्वमुख गेली तर ब्राम्हाणांचा नाश ॥२५॥

मयूरपुच्छासारखी उल्का लोकांचा नाश करिते. सर्पासारखी गमन करणारी उल्का स्त्रियांस अनिष्ट ॥२६॥

जी उल्का छत्रासारखी दिसते ती पुरोहिताचा नाश करते. जी वंशगुल्म (वेळूचे बेट) यासारखी दिसते ती राष्ट्राचा नाश करते ॥२७॥

सर्प व डुकर यांसारखी, अग्निकणांच्या मालेसारखी अथवा अनेक प्रकारांनी गेलेली व शब्दयुक्त अशी उल्का अशुभ होय ॥२८॥

इंद्रधनुष्यासारखी उल्का राज्यनाशा करते. जी उल्का आकाशात उत्पन्न होऊन तेथेच नाहीशी झाली ती मेघांचा नाश करते. जी वायुला प्रतिकूल, वाकडी गेली अथवा परत जाऊन पुन: फिरली ती उल्का शुभ नव्हे ॥२९॥

ज्या दिशेकडे उल्केपासून नगर किंवा सैन्य पराजय पावते त्या दिशेकडे राजास भय होते. ज्या दिशेकडे प्रदीप्त उल्का पडते त्या दिशेने गेलेला राजा शत्रूंस शीघ्र जिंकतो ॥३०॥


॥ इतिबृहत्संहितायांउल्कालक्षणंनामत्रयस्त्रिंशोध्याय: ॥३३॥

N/A

References : N/A
Last Updated : February 21, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP