मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|बृहत्संहिता|
अध्याय २८

बृहत्संहिता - अध्याय २८

शके ८८८ फाल्गुन कृष्ण द्वितीया गुरुवारी उत्पलनामकाने ही टीका केली.


पर्जन्याविषयी प्रश्न केल्यास कर्क, मकर, मीन या जलराशींस चंद्र असून ते प्रश्नलग्न असेल अथवा लग्नापासून शुक्लपक्षी केंद्री चंद्र असेल आणि त्यावर शुभग्रहाची द्दष्टि असेल तर, वर्षाकाळी शीघ्र बहुत वृष्टि होईल व पापग्रहांची द्दष्टि असेल तर अल्पवृष्टि होईल असे सांगावे. चंद्रासारखा शुक्रही होय, म्हणजे शुक्र जलराशीस असून लग्नी असेल अथवा शुक्लपक्षी केंद्री असेल व तो शुभग्रहद्दष्ट असेल तर बहुतवृष्टि, पापद्दष्ट असेल तर अल्पवृष्टि वर्षाकाली शीघ्र होते ॥१॥

पर्जन्याप्रश्नकाली, प्रश्र करणारा रसयुक्त वस्तुविशेषास स्पर्श करील अथवा उदक किंवा जल नावाच्या पदार्थाचा (क्षीर, पय, नागरमोथा, इत्यादि शब्दवाच्यपदार्थांस) स्पर्श करील, अ० उदकाजवळ असेल, अ० जलकार्य करीत असेल तर पर्जन्य लवकर पडेल असे नि:संशय असे सांगावे. ॥२॥

सूर्य, उदयपर्वतावर असता अतितेजाने पाहवेना असा होईल व पातळ सुवर्णासारखा व निर्मळ वैडूर्यमण्याच्या कांतीसारखा होईल तर वर्षाकाली त्यादिवशी वृष्टि होईल. अथवा आकाशमध्यभागी जाऊन अत्यंत ताप करील तर त्यादिवशी वृष्टि होईल ॥३॥

उदकाची गोडी जाईल. गाईच्या नेत्रांसारखे किंवा कावळ्याच्या अंडयासारखे (श्वेतनील) आकाश होईल. दिशा स्वच्छ ओतील. मिठामध्ये काटयांसारखा विकार होईल. वायूचा निरोध होईल.  मासे भूमीवर जाण्याच्या इच्छेने उडया मारतील. बेडूक वारंवार शब्द करतील तर ही सर्व शीघ्र पर्जन्य येण्याची लक्षणे होत ॥४॥

मांजरे नखांनी भूमि खणतील. लोखंडाचा मल (तांब) यास अपक्वमांसासारखा गंध येईल. मार्गमध्ये मुले पूल बांधितील. तर शीघ्र वृष्टि होईल असे समजावे ॥५॥

पर्वत, काजळाच्या राशींसारखे काळे दिसतील अथवा त्यांच्या गुहा ऊष्म्याने युक्त होतील. अथवा कोंबडयाच्या नेत्रांसारखे (लाल) चंद्राचे परिवेष (खळीं) होतील तर वृष्टि शीग्र होईल ॥६॥

उपद्रवावांचून मुंग्या आपली अंडी दुसर्‍या जागी नेतील. सर्प मैथुन करतील व झाडांवरही चढतील. गाई उड्या मारतील. ही सर्व शीघ्रवृष्टीची कारणे होत ॥७॥

सरडे वृक्षाग्री जाऊन आकाशाकडे पाहतील, बैल वर सूर्याकडे पाहतील, तर शीघ्र वृष्टि होईल ॥८॥

गवादिपशु घरांतून बाहेर  जाण्याची इच्छा करणार नाहीत व कान, पाय कांपवितील तसेच कुत्रेही करतील तर शीघ्र वृष्टि होईल असे सांगावे ॥९॥

कुत्रे, गृहसमुदायामध्ये किंवा घरावर उभे राहून शब्द करतील अथवा आकाशाकडे पाहून तोंड पसरून शब्द करतील अथवा ईशानीकडे दिवसास वीज चमकेल तर पृथ्वी जलमय होऊन उंच सखल दिसणार नाही ॥१०॥

कीर व कवडा यांच्या नेत्रांसारखा (तांबूस) अ० मधासारखा चंद्र दिसेल किंवा आकाशामध्यें एक चंद्र असून दुसरा चंद्र दिसेल तर लवकर वृष्टि होईल ॥११॥

रात्री गर्जना होतील. दिवसास रक्तासारख्या आरक्त व दंडासारख्या वरखाली विजा चमकतील, पूर्वेकडून थंड वारा वाहील तर वृष्टि लवकर होईल ॥१२॥

वेलींचे नवपल्लव ऊर्ध्वगमन करतील, उदक व धुरळा यांमध्ये पक्षी स्नान करतील.  सर्प तृणाग्रांवर चढतील, तर जलवृष्टि जवळ आली (शीघ्र वृष्टि होईल) असे समजावे ॥१३॥

मयूर, शुक, चाष, चातक या पक्ष्यांच्या वर्णासारखे नीलवर्ण, जास्वंदीचे पुष्प व आरक्त कमल यांसारखे लोहितवर्ण, उदकातील भोंवरे, सुसर, कांसव, सूकर, मत्स्य यांच्या आकृतीसारख्या आकारांचे असे संध्यासमयी मेघ दाट असतील तर लवकरच वृष्टि होईल ॥१४॥

आसमंताद्भागी, अमृत व चंद्र यांसारखे श्वेत आणि मध्यभागी काजळ व भ्रमर यांसारखे काळे असे, निर्मल, दाट, बारीक उदकबिंदु सोडणारे, शिडीच्या पायर्‍यांसारखे एकावर एक असे राहणारे, पूर्वेस उत्पन्न होऊन पश्चिमेकडे जाणारे अथवा पश्चिमेस उत्पन्न होऊन पूर्वेस जाणारे असे जे मेघ ते भूमीवर बहुत उदकवृष्टि लवकरच करतात ॥१५॥

सूर्याच्या उदयास्तकाली इंद्रधनुष्य, परिघ (अभ्ररेषा, एककाली दोन सूर्य, रोहित (वक्ष्यमाण,) वीज, खळे, ही जर होतील तर शीघ्र जलवृष्टि होईल असे सांगावे ॥१६॥

सूर्योदयास्तकाली तित्तिरपक्ष्याच्या पक्षासारखे (विचित्रवर्ण) आकाश होईल, पक्षिसमुदाय आनंदाने शब्द करतील, तर रात्रंदिवस जलवृष्टि होईल (उदयकाली दिवावृष्टि, अस्तकाली रात्रौवृष्टि असे यथासंख्य जाणावे) ॥१७॥

सूर्याचे अमोघकिरण अस्तपर्वताच्या हस्तांसारखे दीर्घ होतील. (अस्तकाळी किरण लांब गेलेले दिसतील) मेघ भूमीबरोबर (जवळ) शब्द करील तर ते शीघ्रवृष्टीचे महान लक्षण होय ॥१८॥

वर्षाकाली चंद्र शुक्रापासून सातव्या राशीस असेल आणि त्यावर शुभग्रहाची द्दष्टि असेल अथवा चंद्र शनीपासून ९।५।७ इतक्या राशींस असेल आणि त्यावरही शुभग्रहाची द्दष्टि असेल तर पर्जन्यवृष्टि होईल ॥१९॥

ग्रहांचे उदय व अस्त यावेळी, भौमादि ग्रहांचा चंद्राशी संयोग होईल त्यावेळी, भरण्यादि सहा मंडले शुक्रचारामध्ये सांगितली त्यांच्या प्रवेशसमयी, अमावस्या व पौर्णिमा यांचे अंती, सूर्याच्या दक्षिणोत्तरायणाचे अंती, सूर्य आर्द्रानक्षत्री जातेवेळी, या सर्वकाळी बहुतकरून नियमाने वृष्टि होते ॥२०॥

बुध व शुक्र, बुध व गुरु, गुरु व शुक्र यांचा योग झाला असता बहुतकरून नियमाने वृष्टि होते. तसेच शनि व भौम यांचा योचा योग झाला असता वायु व अग्नि यांचे भय होते; परंतु शुभग्रहांनी द्दष्ट किंवा युक्त असतील तर होणार नाही ॥२१॥

सूर्याच्या पुढे किंवा मागे बहुत ग्रह येतील तर त्यावेळी सर्व पृथ्वी जलमय होईल ॥२२॥


॥ इतिबृहत्संहितायांसद्योवृष्टिलक्षणंनामाष्टाविंशोध्याय: ॥२८॥

N/A

References : N/A
Last Updated : February 21, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP