मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|बृहत्संहिता|
अध्याय २१

बृहत्संहिता - अध्याय २१

शके ८८८ फाल्गुन कृष्ण द्वितीया गुरुवारी उत्पलनामकाने ही टीका केली.


जगताचे प्राण अन्न आहे. ते अन्न वर्षाकालाच्या स्वाधीन आहे. यास्तव प्रावृट् (वर्षा) कालाची प्रयत्नाने परीक्षा करावी ॥१॥

त्या वर्षाकालाची लक्षणे, वसिष्ठादि ऋषींनी जी बद्ध ती व गर्ग, पराशर, काश्यप, वात्स्य, इत्यादिकांनी रचित जी तीही  पाहून हे बृहत्काललक्षण करितो ॥२॥

जो दैववित (ज्योतिषी) गर्भलक्षणांच्याठाई रात्रंदिवस एकाग्रचित्त होतो; त्याची वाणी, वृष्टि सांगण्याविषयी (पर्जन्य कधी पडेल ते सांगण्याविषयी) ऋषीप्रमाणे खोटी होत नाही ॥३॥

या गर्भलक्षणशास्त्राहून किंवा ज्योति:शास्त्राहून दुसरे शास्त्र श्रेष्ठ काय आहे. जे समजूनच, सर्व शास्त्रांचा नाश करणार अशा कलियुगामध्येही, तो समजणारा पुरुष, भूत, भविष्य, वर्तमान हे त्रिकाळ पाहणारा होतो ॥४॥

कार्तिकशुक्ल पौर्णिमेपुढे (वद्य प्रतिपदेपासून) गर्भदिवस होतात असे कोणी (सिद्धरोमादि) आचार्य म्हणतात;  परंतु ते बहुतांचे मत नाही. यास्तव गर्गादि बहुऋषिमत सांगतो ॥५॥

मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेपासून, ज्या दिवशी चंद्र पूर्वाषाढानक्षत्री असेल त्या दिवसापासून, गर्भाचे लक्षण जाणावे ॥६॥

ज्या नक्षत्री चंद्र प्राप्त होऊन, जो गर्भ होतो तो १९५ दिवसांनंतर त्याच नक्षत्रास चंद्र येईल तेव्हा प्रसूति पावतो ॥७॥

शुक्लपक्षी झालेले गर्भ १९५ दिवसांनी कृष्णपक्षी प्रसव पावतात. कृष्णपक्षी झालेले गर्भ शुक्लपक्षी, दिवसास झालेले रात्रीस, रात्रीस झालेले दिवसास, प्रात:संध्येस झालेले सायंसंध्येस, सायंसंध्येस झालेले प्रात:संध्येस प्रसव पावतात ॥८॥

मार्गशीर्षशुक्लपक्षी झालेले गर्भ अल्पफल देतात. तसेच पौषशुक्लपक्षी झालेलेही गर्भ अल्पफल देतात. (या गर्भलक्षणी शुक्लप्रतिपदादि अमावास्यात महिने जाणावे) पौषकृष्णात जे गर्भधारण झाले, त्याचा पर्जन्य श्रावणशुक्लात पडतो ॥१०॥

फाल्गुनकृष्णातल्या गर्भाचा पर्जन्य भाद्रपदकृष्णात पडतो. फाल्गुनकृष्णातल्या गर्भाचा पर्जन्या आश्विनशुक्लात पडतो ॥११॥

चैत्रशुक्लातल्या गर्भाचा पर्जन्य आश्विनकृष्णात पडतो. चैत्रकृष्णपक्षातल्या गर्भाचा पर्जन्य कार्तिकशुक्लपक्षात पडतो ॥१२॥

पूर्वेकडे उत्पन्न झालेले मेघ पश्चिमेकडून येतील व पश्चिमेकडे झालेले मेघ पूर्वेकडून येतील. याप्रमाणेच अन्यदिशांचाही व्यत्यय जाणावा. तसाच वायूचाही व्यत्यय जाणावा. गर्भधारणी पूर्वेकडील वायु असला तर पर्जन्यसमयी पश्चिमेकडील होईल असे जाणावे ॥१३॥

आनंदकारक, मृदु (सुखस्पर्श,) उत्तर, ईशानी, पूर्व या दिशांकडून वायु सुटेल; आकाश निर्मल होईल; चंद्रसूर्य स्निग्ध, श्वेत, कृष्णवर्ण अशा परिवेषांनी (खळ्यांनी) वेष्टित होतील ॥१४॥

विस्तीर्ण, काळे, स्निग्ध अशा मेघांनी युक्त आकाश होईल; सूच्याकार अ. क्षुराकार मेघाने अ. तांबडया मेघाने युक्त आकाश होईल; कावळ्याच्या अंडयासारखा अ. मोराचे कंठासारखा वर्ण व चंद्र व नक्षत्रे स्वच्छ ज्यामध्ये असे जाकाश होईल ॥१५॥

प्रात:संध्या किंवा सायंसंध्या इंद्रधनुष्य, मधुरमेघशब्द, वीज, एककालीच द्वितीयसूर्य यांनी युक्त होईल; पक्षी व अरण्यपशु यांचे समुदाय हे उत्तर, ईशानी, पूर्व या दिशांस असून मधुरशब्द करतील ॥१६॥

ग्रह विस्तीर्णबिंबांचे, सव्य फिरणारे म्ह. नक्षत्रांचे उत्तरमार्गाने फिरणारे, स्निग्धकिरण व उपद्रवरहित असे असलील; चांगल्या पल्लवांनी युक्त वृक्ष होतील; मनुष्य व चतुष्पाद प्राणी आनंदित होतील ॥१७॥

ही पूर्वोक्त लक्षणे होतील तेव्हा गर्भाची पुष्टी होईल. येथे गर्भवृद्धिविषयी स्वऋतुस्वभावाने उत्पन्न झालेला विशेष पुढे सांगतो ॥१८॥

मार्गशीर्ष व पौष या मासी संध्याराग (प्रात:सायंसंध्यासमयी आरक्त होणे),  चंद्रसूर्यांस खळें, मेघ; व मार्गशीर्षमासी थोडी थंडी, पौषमासी बहुत थंडी ॥१९॥

माघमासी बहुत वायु, हिमकांति (थंडतेज) सूर्य, कलुषद्युति (मलिनकांति) चंद्र, बहुत थंडी, मेघयुक्तसूर्याचे अस्तोदय शुभ होत ॥२०॥

फाल्गुनमासी कठीन व मोठा वायु, सजल मेघोद्भव, सूर्यचंद्रांस मध्ये तुटलेली कळी, पिंगत व ताम्रवर्ण सूर्य शुभ होय ॥२१॥

चैत्रमासी चंद्रसूर्यांस खळी व वायु, मेघवृष्टि यांही युक्त गर्भ शुभ होत. वैशाखमासी मेघ, वायु, वृष्टि, वीज, गर्जित ही शुभ होत ॥२२॥

मोती व रुपे यांसारखे पांढरे, तमालवृक्ष, नीलकमल, काजळ यांसारखे काळे, जलचर (मासे व कांसवे) या प्राण्यांच्या आकाराचे, असे मेघ गर्भामध्ये बहुत उदक धारण करतात ॥२३॥

अत्यंत तप्त सूर्यकिरणांनी फार तापलेले व अल्पवायूने युक्त, असे गर्भकाली जे मेघ असतात, ते प्रसवकाली १९५ दिवसांनंतर, रागे भरल्या सारखे, मोठया धारांनी उदक सोडितात (अतिवृष्टि करितात) ॥२४॥

उल्का (आकाशातून अग्निरूप तारा पडतो तो,) वीज, रजोवृष्टि, दिशेचा दाह, भूमिकंप, गंधर्वनगर, तामसकीलक केतु (शेंडयेनक्षत्र,) ग्रहांचेयुद्ध,  मेघगर्जना ॥२५॥

रक्तादि वृष्टिविकार, परिघ (वक्ष्यमाण,) इंद्रधनुष्य, चंद्रसूर्यग्रहण, ही गर्भनाशाची चिन्हे होत. यांनीकरून व अन्य त्रिविध उत्पातांनीकरून गर्भ नष्ट झाला असे सांगावे ॥२६॥

पूर्वोक्त ऋतुस्वभावजनित जी सामान्य लक्षणे, त्यांनीकरून गर्भाची वृद्धि होते व तीच लक्षणे विपरीत झाली तर विपर्यय (गर्भनाश) होतो. ॥२७॥

पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपदा, उत्तराषाढा, पूर्वाषाढा, रोहिणी या पांच नक्षत्रांच्याठाई सर्वऋतूंमध्ये (मार्गशीर्षदिमासी संध्यारागादि लक्षणांनी) वाढलेला गर्भ बहुतवृष्टि देणारा होतो ॥२८॥

शततारका, आश्लेषा, आर्द्रा, स्वाती, मघा या नक्षत्री झालेला गर्भ शुभ होय. तो गर्भ बहुत दिवस वृष्टि करितो. तोच गर्भ त्रिविधउत्पातांनी हत झाल्यास आपण नाश पावतो ॥२९॥

शततारकादि पूर्वश्लोकोक्त पांच नक्षत्रांतून कोणत्याही नक्षत्री मार्गशीर्षमासी गर्भधारण झाले तर त्याची वृष्टि आठ दिवस होईल. पौषमासी गर्भधारण झाले तर सहा दिवस. माघमासी १६ दिवस. फाल्गुनमासी २४ दिवस. चैत्रमासी २० दिवस. वैशाखमासी ३ दिवस वृष्टि होईल. हे वृष्टिदिवस १९ दिवस गेल्यानंतर असे जाणावे ॥३०॥

गर्भनक्षत्र पापग्रहाने युक्त असले तर गारा, वीज, मत्स्य यांनी युक्त वृष्टि होते. चंद्र किंवा सूर्य, शुभग्रहाने युक्त किंवा द्दष्ट असला तर त्या गर्भाची बहुत वृष्टि होते ॥३१॥

गर्भधारणकाली, (प्रायोग्रहणां. अ. २९ श्लो. २०) इत्यादि निमित्तावांचून अतिवृष्टि होईल तर त्या गर्भाचा नाश होतो. द्रोण (२०० पले) पल (४ तोळे) द्रोणाचा आठवा हिसा २५ पले (१०० तोळे) याहून अधिक वृष्टि झाली तर गर्भसाव झाला असे जाणावे ॥३२॥

जो गर्भ, धारणकाली पुष्ट होऊन १९५ दिवसांनंतर, वृष्टिप्रतिबंधक ग्रहाच्या योगाने अथवा उत्पाताच्या योगाने, वर्षला नाही, तो आपल्या दुसर्‍या गर्भग्रहणकाली गारांनी मिश्रित उदक देतो (वृष्टि होते) ॥३३॥

जसे बहुत दिवस ओटीत राहिलेले गाईचे दूध कठीण होते तसे वृष्टिकाल अतिकांत करून राहिलेले उदक कठिणत्व पावते (गारा होतात) ॥३४॥

वायु, वृष्टि, वीज, गर्जना, अभ्र या पांचही निमित्तांनी युक्त जो गर्भ, तो आसमंताद्भागी शंभर योजने वृष्टि करितो. चार निमित्तांनी ५० योजने, तीन निमित्तांनी २५ योजने, दोन निमित्तांनी १२ योजने, एक निमित्ताने ५ योजने आसमंताद्भागी भूमीवर वृष्टि करितो ॥३५॥

पंचनिमित्तांनी युक्त गर्भ असता, द्रोणपरिमित वृष्टि होते. वायु युक्त गर्भ अ. तीन आढक वृष्टि होते. विजेने युक्त गर्भ अ. सहा आढक वृष्टि होते. अभ्रांनी ९ आढक वृष्टि. गर्जिताने १२ आढक वृष्टि होते ॥
आढकाचे प्रमाण अ. २३ श्लो. २ यात सांगितले आहे ॥३६॥

वायु, उदक, वीज, गर्जना, अभ्र यांनी युक्त जो गर्भ तो पंचरूपयुक्त बहुत जल देणारा होतो. गर्भकाली बहुत वृष्टि होईल तर प्रसवसमय प्राप्त होईल त्यावेळी बारीक बिंदूंची वृष्टि होते ॥३७॥


॥ इतिबृहत्संहितायांगर्भलक्षणंनामैकविंशोध्याय: ॥२१॥

N/A

References : N/A
Last Updated : February 19, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP