मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|बृहत्संहिता|
अध्याय २४

बृहत्संहिता - अध्याय २४

शके ८८८ फाल्गुन कृष्ण द्वितीया गुरुवारी उत्पलनामकाने ही टीका केली.


सुवर्णमय पाषाणसमुदायांच्या विवरांमध्ये झालेले जे वृक्ष त्यांच्या पुष्पांवर बसणारे जे भ्रमर त्यांचा शब्द आहे ज्यामध्ये अशा व नानाप्रकारच्या पक्ष्यांचा आलाप व देवस्त्रियांच्या (अप्सरांच्या) गायनाचा जो मधुर स्वर यांनी युक्त आहेत बागा ज्यामध्ये, अशा मेरुपर्वताच्या शिखरावर बृहस्पति, नारदाते जे योग सांगता झाला, ते व गर्ग, पराशर, काश्यप, मय हे ऋषि शिष्यसमुदायांस जे योग सांगते झाले त्या रोहिणी व चंद्र यांच्या योगाते, यथाशास्त्र अवलोकन करून, या थोडक्या ग्रंथाने मी त्या योगांच्या फलाते सांगतो ॥१॥२॥३॥

आषाढकृष्णपक्षी, रोहिणी नक्षत्र चंद्राने युक्त होते ते पाहून दैवज्ञाने जगताचे शुभाशुभ सांगावे ॥४॥

हा धिष्ण्ययोग मी पंचसिद्धांतिकेमध्ये सांगितला आहे तो पाहून त्याचे फल चंद्राचे प्रमाण कांति, वर्ण, मार्ग, उत्पात, वायु यांनीकरून सांगावे ॥५॥

नगराच्या उत्तरेस किंवा पूर्वेस जे स्थल असेल तेथे तीन दिवस राहून, उपोषितहोत्साता, हवनतत्पर ब्राम्हाणाने नक्षत्रांसहित ग्रह काढून धूप, पुष्प, बलि यांनीकरून त्यांची पूजा करावी ॥६॥

रत्ने, उदके, औषधी यांनीसहित व वृक्षपल्लवांनी आच्छादित, उत्तम पूजित, काळी बुडे नाहींत अशा चार दिशांस ठेवलेल्या कलशांनी सुशोभित व दर्भांनी आच्छादित अशा स्थंडिलाजवळ ब्राम्हाणाने बसावे ॥७॥

नंतर महाव्रतनामक मंत्राने सर्व बीजांचे अभिमंत्रण करून ती कुंभांमध्ये ठेवावी; आणि त्या कुंभांत सुवर्ण, दर्भ यांनीयुक्त उदक घालावे. नंतर वायु, वरुण, सोम यांच्या मंत्रांनी अग्नीत होम करावा ॥८॥

बारीक वस्त्राची काळी चार हात पताका, बारा हात लांब काष्ठावर बांधून उभारावी. प्रथमच (आरंभीच) दिशासाधन करावे, नंतर रोहिणीचा चंद्राशी योग ज्यावेळी होईल त्यावेळी त्या पताकेने वायु कोणत्या दिशेस जातो तो पहावा ॥९॥

त्या रोहिणीयोगी, प्रहरांनी अर्धमास व प्रहारांशांनी दिवस, वर्षाऋतूमध्ये पर्जन्यासाठी योजा वायु सव्य गेला तर निंतर कल्याणकारक होतो. जो वायु स्थिर राहतो तो बलवान यास्तव त्यावरून शुभाशुभ सांगावे ॥
(याचे तात्पर्य) रोहिणीयोग आषाढकृष्णपक्षी ज्या दिवशी अहोरात्री होईल त्या दिवशी सर्य़ोदयापासून १ प्रहर पर्यंत जर शुभ (चांगला) वारा वाहील तर श्रावणाच्या पहिल्या पक्षी चांगली वृष्टि होते. द्वितीयप्रहरी वाहीक तर दुसर्‍या पक्षी. तिसर्‍या प्रहरी भाद्रादाचा प्र, पक्षी ४ प्रहरी भा. २ पक्षी. रात्रीच्या प्र. प्रहरी आश्विनाचा प्र. पक्षी. दु. प्र. पक्षी. तिसर्‍या प्रहरी कार्तिकाचा प्र. पक्षी. चतुर्थ प्र. द्वि पक्षी. शुभवृष्टि होते. यात अशुभ वायु वाहिला तर या मासी अनावृष्टि होते. यावरून त्रैराशिकाने दिवसही जाणावे ॥१०॥

रोहिणीयोग होऊन गेल्यावर कुंभामध्ये पूर्वस्थापित बीजांतून जी अंकुरित होतील त्यांची वृद्धि होते. अन्यांची वृद्धि होत नाही ॥११॥

चंद्राचा रोहिणीयोग झाला असता, त्यावेळी पक्षी व अरण्यपशु यांच्या मधुरशब्दांनी युक्त दिशा, निर्मल आकाश, शुभवायु ही प्रशस्त होत. मेघ व वायु यांची फले यापुढे सांगतो ॥१२॥

कोठे श्वेतकृष्ण, कोठे श्वेत, कोठे काळेच असे, वलित उदर व पृष्ठ हीच आहेत द्दश्य ज्यांची असे, चंचल विद्युल्लता हयाच आहेत जिव्हा ज्यांच्या असे, मोठया सर्पांसारख्या मेघांनी व्याप्त व प्रफुल्लित कमलोदरासारखे श्वेत, आरक्त किरणकांतीनी तांबडे आहेत समीप भाग ज्यांचे असे, भ्रकर, कुंकुम, पळस यांसारख्या वर्णांचे, चित्रवर्ण मेघांनी रंजित असे आकाश होईल ॥१३॥१४॥

कृष्णमेघांनी व्याप्त, चंचलवीज व इंद्रधनुष्य यांनी चित्रित, असे आकाश हे, गज, महिष (गवे) यांच्या समुदायांनी व्याप्त केलेले व वणव्याने व्याप्त अरण्यासारखे दिसते ॥१५॥

अथवा आकाश कज्जलपर्वताच्या पाषाणसमूहासारख्या काळ्या मेघांनी आच्छादित अथवा बर्फ, मोते, शंख, चंद्रकिरण यांच्या कांतीते हरण करणार्‍य म्ह. श्वेतमेघांनी व्याप्त असेल ॥१६॥

वीजच आहे सुवर्णमय मध्यबंधनरज्जु असे, बगळेपक्षी हेच आहेत बाहेरचे दांत ज्याला असे, पडणारे उदक हेच आहे मदोदक ज्याना असे, चंचल जे प्रांत (शेवटचे) भाग तेच आहेत शुंडादंड ज्यांचे असे, चित्रवर्ण जी इंद्रधनुष्ये तीच जे उंच ध्वज त्यांनी शोभित असे, तमालवृक्ष व भ्रमर यांसारखे नीलवर्ण असे मेघ हेच हत्ती यांनी आकाश व्याप्त असेल ॥१७॥

संध्यासमयी आरक्त आकाशामध्ये राहिलेले, नीलकमलासारखी श्याम आहे कांति ज्यांची अशा मेघांचे समुदाय, पीतांबराने वेष्टित अशा नारायणाच्या कांतीते हरण करतात काय असे ज्या आकाशामध्ये असतील ॥१८॥

मोर, चातक, बेडूक यांच्या शब्दांनी मिश्रित, मधुर व सुंदर असे शब्द करणारे मेघ जर आकाशामध्ये विस्तृत होऊन चहूंकडे जातील तर ते बहुत वृष्टि करतील ॥१९॥

पूर्वी सांगितल्या स्वरूपाच्या मेघांनी तीन दिवस किंवा दोन दिवस अथवा एक दिवस जर आकाश व्याप्त असेल तर सुभिक्ष, लोकांस आनंद, बहुत उदक ही होतील ॥२०॥

रूक्ष, अल्प, वायूने पसरलेले, उंट, काक, प्रेत, वानर यांसारखे अथवा अन्य मार्जारराक्षसादि निंदितांसारखे, मूक (गर्जनारहित) अशा मेघांनी कल्याण होत नाही व वृष्टिही होत नाही ॥२१॥

मेघरहित आकाशामध्ये कठोरकिरणांचा सूर्य वृष्टि करणारा होतो. रात्रीस चंद्रविकासी कमलांनीयुक्त, प्रफुल्लित सरोवरासारखे, स्वच्छ नक्षत्रांनीं युक्त आकाश जर दिसेल तर उत्तमवृष्टि होते ॥२२॥

पूर्वदिशेकडे उत्पन्न झालेल्या मेघांनी धान्यसंपत्ति होते. आग्नेयीस उत्पन्न झालेल्या मेघांनीं अग्निकोप होतो. दक्षिणेचे मेघांनी धान्यनाश होतो. नैऋतीचे मेघांनी अर्ध्या धान्याचा नाश होतो. पश्चिमेचे मेघांनी चांगली वृष्टि होते ॥२३॥

वायव्यदिशेचे मेघांनी वातयुक्त वृष्टि क्वचित होते. उत्तरदिशेचे मेघांनी परिपूर्ण वृष्टि होते. ईशानीचे मेघांनी धान्य उत्तम होते. याप्रमाणेच वायूचींही दिशापरत्वे फले होतात ॥२४॥

उल्का, वीज, अशनि, (यांची लक्षणे पुढे सांगावयाची आहेत) या तिहींचे निपात; दिग्दाह, निर्घात, भूमिकंप, पक्षी व अरण्यपशु यांचे शब्द या सर्वांची फले मेघांसारखी दिशापरत्वे घ्यावी ॥२५॥

उदगादि नामांकित जे पूर्वोक्त चार कुंभ त्यांनी प्रदक्षिण श्रावणादि चार मासांची फले सांगावी. ज्या महिन्याचा कुंभ उदकपूर्ण असेल त्यात वृष्टि होईल. ज्याचा पूर्ण नसेल त्यात वृष्टि होणार नाही. याप्रमाणे जितके कमी झाले असतील तशी वृष्टि स्वबुद्धीने सांगावी. चारही कुंभ पूर्व असतील तर चारही मासांत पूर्णवृष्टिहोईल ॥२६॥

तेथे दुसरे, राजनामांकित व देशनामांकितही पूर्ण कुंभ ठेवावे. त्यांतून ज्यांचे फुटतील त्यांस फार अशुभ. पाझरतील तर उपद्रव, न्यूनजल होतील तर किंचित अशुभ. पूर्ण असतील तर शुभ. याप्रमाणे यथायोग्य फले सांगावी ॥२७॥

चंद्र, दुरून, जवळून किंवा दक्षिणमार्गी राहून जर रोहिणीचा योग करील तर लोकांस दुर्भिक्षादि अशुभ होते ॥२८॥

चंद्र, ज्याकाळी रोहिणीला दक्षिणेकडून स्पर्श करून उत्तरेस जातो त्याकाळी उत्तमवृष्टि व बहुत उपद्रव होतात. जेव्हा रोहिणीला स्पर्श न करून उत्तरेकडून जाईल तेव्हा बहुत वृष्टि होईल व लोकांस लक्ष्मी प्राप्त होईल ॥२९॥

चंद्र, रोहिणीच्या शकटमध्यभागी (शकटभेद करून) राहिला असता, रक्षणकर्ता नसल्यामुळे लोक देशोदेशी जातात व बालकांसाठी अन्न मागणारे व सूर्याने तापविलेले भांडयांतील पाणी पिणारे असे लोक होतात. म्हणजे उदक नाहींसे होते ॥३०॥

अगोदर उदयास पावलेल्या चंद्राच्या मागून, रोहिणीचा उदय होईल तर शुभ होय. त्याकाळी कामाने पीडित स्त्रिया कामीपुरुषांच्या स्वाधीन राहतील ॥३१॥

जसा कामीपुरुषा आवडत्या स्त्रीच्या मागून जातो तसा, चंद्र रोहिणीच्या मागून उदय पावेल तर त्यावर्षी कामबाणांनी पीडित असे पुरुष स्त्रियांच्या स्वाधीन होतील ॥३२॥

रोहिणीच्या आग्नेयी दिशेस चंद्र असेल तर, त्यावर्षी फार उपद्रव होईल. रोहिणीच्या नैऋतीस असेल तर धान्ये अतिवृष्टयादि उपद्रवांनी युक्त होऊन, नाश पावतील. वायव्येस असेल तर, धान्याची वृद्धि मध्यम होईल. ईशानीस असेल तर धान्याची वृद्धिव स्वस्ताई इत्यादिक बहुत गुण होतील ॥३३॥

चंद्र, योगतारेते (नक्षत्राच्या सर्व तारांमध्ये जी ते तेजस्वी व मोठी असेल ती योगतारा) ताडन करील म्हणजे एका टोकाने स्पर्श करील तर मोठे भय होईल व शरीराने (बिंबाने) आच्छादन करील तर राजाचा वध स्त्रीचे हातून होईल ॥३४॥

गाई वनांतून येऊन, गृहप्रवेशसमयी (संध्याकाळी) पुढे बैल जाईल अथवा काळा पशु जाईल तर त्यावर्षी बहुत वृष्टि होईल. काळापांढरा पशु जाईल तर मध्यम वृष्टि होईल. पांढरा पशु जाईल तर वृष्टि होणार नाही. इतर वर्णांचा पशु जाईल तर किंचित किंचित वृष्टि होईल ॥३५॥

हा श्लोक या प्रकरणात आहे म्हणून, रोहिणीयोगाचे दिवशी या श्लोकात सांगितल्याप्रमाणे होईल तर त्याची तशी फळे समजावी.

मेघांनी आच्छादित झाल्यामुळे रोहिणीयुक्त चंद्र द्दष्टिगोचर होणार नाही तर त्यावर्षी मोठे रोगभय होईल व उदक, धान्य यांनीयुक्त भूमी होईल असे सांगावे ॥३६॥


॥ इतिबृहत्संहितायांरोहिणीयोगोनामचतुर्विंशोध्याय: ॥२४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 21, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP