मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|बृहत्संहिता|
अध्याय ५६

बृहत्संहिता - अध्याय ५६

शके ८८८ फाल्गुन कृष्ण द्वितीया गुरुवारी उत्पलनामकाने ही टीका केली.


बहुत उदक करून, वृक्षवाटिका स्थापून, यश व धर्म यांच्या वृद्धयर्थ तेथे देवालय करावे ॥१॥

यज्ञ व वापीकूपतडागादी यांनीकरून जे लोक प्राप्त होतात त्यांते इच्छिणार्‍या पुरुषांनी देवालय करावे. देवालय करण्यात यज्ञ व वाप्यादिक ही दोनही प्राप्त होतात ॥२॥

उदक व उपवने यांनी युक्त व नवी केलेली किंवा स्वत: सिद्ध अशा स्थानी देवतासान्निध्य करितात (तेथे येतात)॥३॥

कमळे हीच छ्त्रे त्यांनी दूर केले आहेत सूर्यकिरण जेथे अशा सरोवरात, हंसभुजांनी ताडित कमलयुक्त तरंगांनी स्वच्छ आहेत उदके जेथे अशा, हंस, कारंडव, क्रौंच, चक्रवाक, हे शब्द करतात जेथे अशा, आसमंताद्भागी जलवेतसांच्या छायेत विश्रांत आहेत जलचर जेथे अशा सरोवरात देवता राहतात ॥४॥५॥

क्रौंचपक्षी हेच आहेत कांची (कमरपट्टा) समुदाय ज्यांचे अशा, पीतवर्ण हंसांचे आहेत मधुर शब्द ज्यांच्या ठाई अशा, उदके हीच आहेत वस्त्रे ज्यांची अशा, बारीक मत्स्यच आहेत मेखला ज्यांच्या अशा नंद्यांचाठाई देवता रमतात ॥६॥

फुललेले जे तीरस्थ वृक्ष हेच आहेत कर्णभूषणे ज्यांची अशा, दोन नद्यांचा जो संगम तोच आहे श्रोणिमंडल ज्यांचा अशा, तीरांमध्ये जे उन्नत भाग तेच आहेत स्तन ज्यांचे अशा, हंस हेच आहेत हास्ये ज्यांची अशा नद्या जेथे असतील तेथे देवता रमतात ॥७॥

वनसमीप नद्या व पर्वतांच्या पाझरांसमीप भूमीचाठाई व बागांनी युक्त अशा नगरांमध्येही नित्य देवता रमतात ॥८॥

ब्राम्हाणादि वर्णास ज्या भूमि वास्तुकर्मी (अ० ५३ श्लो० ९६।९७) सांगितल्या त्याच ब्राम्हणादी वर्णांस देवालय बांधण्याविषयी प्रशस्त होतात ॥९॥

देवालय, सर्वकाल चतु:षष्टिपद (अ. ५३ श्लो. ५५) यात सांगितल्यासारखे ६४ पदांचे करावे. त्या देवालयास समदिशेस मध्यम भागात द्वार प्रशस्त होय ॥१०॥

देवळाच्या चौथर्‍याच्या रुंदीचे जितके हात असतील, त्याचे दुप्पट हात देवळाची उंची असावी. उंचीच्या तृतीयांशाइतकी कटि म्ह० गाभारा किंवा घुमटी इची उंची असावी ॥११॥

रुंदीच्या तृतीयांशाइतकी गाभार्‍याची रुंदी (व लांबी) असावी. गाभार्‍याच्या चौफेर भिंती घालाव्या. गाभार्‍याच्या रुंदीच्या चतुर्थांशाहतकी दाराची रुंदी करावी व तिच्या दुप्पट दाराची उंची करावी ॥१२॥

दाराच्या उंचीच्या चतुर्थांशाइतकी बाजवांची रुंदी असावी. तसेच उंबरठे करावे. बाजवेच्या रुंदीच्या चतुर्थांशाइतकी बाजवेची जाडी असावी ॥१३॥

ही जाडी ३।५।७।९ इत्यादि शाखांनी (फळ्यांनी) पुरी करावी. बाजूच्या खालच्या चतुर्थांशात प्रतीहार (नंद्यादिक) ठेवावे ॥१४॥

शाखेचे बाकीवरील भाग मंगलपक्षी, स्वस्तिकघट, मिथुने, पत्रवल्ली, गण यांनी सुशोभित करावे ॥१५॥

दाराच्या उंचीच्या अष्टमभागाहून कमी, पिंडीसहित प्रतिमा करावी. त्यांत दोन भाग मूर्ति व तिसरा भाग पिंडी करावी ॥१६॥

उदाहरण. १६ हात लांब व १६ हात रुंद देवळाचा चौथरा असेल तेव्हा, त्या देवळाचे शिखर (कळस) ३२ हात उंच करावे. म्ह० देवळाची ३२ उंची असावी. तिचा तृतीयांश १० हात १६ आंगळे इतकी कटी म्ह० गाभारा, याची उंची करावी. काही पायर्‍या करून त्यावर सिंहासन बसवावे. सिंहासनापासून वर गाभार्‍याची उंची मोजावी. रुंदी हात १६ इचे अर्ध हात ८ इतकी गाभ्याची लांबीरुंदी करावी. त्याचे सभोवार भिंती घालाव्या. गर्भाचा चतुर्थांश हात २ इतका रुंद दरवाजा करावा. रुंदीचे दुप्पट म्ह० ४ हात उंच करावा. उंचीचा चतुर्थांश म्ह० १ हात इतकी बाजवांची व उंबरठयांची रुंदी असावी. १ हात रुंद भिंत घालावी. बाजवेच्या रुंदीच्या चतुर्थांश म्ह० ८ आंगळे इतकी वाजवेची जाडी करावी. ही जाडी जरूर असेल तशी ३।५।७।९ फळ्यांनी (एकाशी एक जाडी करिता बसवून) जाडी पुरी करावी. शाखेच्या उंचीचा खालचा चतुर्थांश एक हात आहे. त्यात द्रारपाळ करावे किंवा स्थापावे. वरील ३ हात जाग्यात, मंगलकारक पक्षी, श्रीवृक्ष (नारळ इत्यादि) स्वस्तिके वगैरे काढिलेले ते घट, स्त्रीपुरुषांची चित्रे, पानांच्या वल्ली, त्या त्या देवतेचे पार्षदगण, यांची चित्रे काढून ती जागा सुशोभित करावी. द्वाराची उंची ४ हात, त्याचा अष्टमांश १२ आंगळे. तितकी कमी म्ह० साडेतीन हात बैठक व मूर्ति यांची उंची करावी. त्यात २८ आंगळे बैठक व ५६ आंगळे उंच मूर्ति करावी. पाषाणांनी बांधावयाचे देवळांचा हा प्रकार होय. उत्तरहिंदुस्थानात अशाअप्रकारची देवालये बहुत आहेत. मुंबईतील ठाकुरद्वारचे राममंदिर हे अशाच प्रकारचे आहे. नाशिकचे राममंदिरही याच प्रकारचे आहे.  देवळाचा चौथरा बराच उंच असून त्यावर काही पायर्‍या करून त्यावर सिंहासन व त्यावर, वर सांगितलेल्या प्रमाणाप्रमाणे उंचीची मूर्ति असली म्ह० दरवाज्यासमोर उभी रहाणारी मंडळी फार लांबीवर असली तरी सर्वांस मूर्तीचे पूर्णदर्शन होते.

१ मेरु २ मंदर ३ कैलास ४ विमानच्छंद ५ नंदन ६ समुद्न ७ पद्य ८ गरुड ९ नंदिवर्धन १० कुंजर ॥१७॥

११ गुहराज १२ वृष १३ हंस १४ सर्वतोभद्र १५ घट १६ सिंह १७ वृत्त १८ चतुष्कोण १९ षोडशास्रि २० मष्टास्रि ॥१८॥

ही २० नावे प्रासादांची मी सांगितली. पुढील श्लोकापासून याच नामानुक्रमाने या प्रासादांची लक्षणे सांगतो ॥१९॥

त्या प्रासादामध्ये षट्रकोण, बारा मजले, नानाप्रकारच्या खिडक्यांनी युक्त, चार दिशांत चार द्वारांनी युक्त, ३२ हात रुंद, ६४ हात उंच असा मेरुप्रासाद होय ॥२०॥

षटकोण, ३० हात रुंद, ६० हात उंच, दहा मजल्यांच शिखरयुक्त मंदर संज्ञक प्रासाद होय. कैलास प्रा० ही षट्रकोण, शिखरयुक्त २८ हात रुंद ५६ हात उंच, आठ मजल्यांचा होय ॥२१॥

विमानसंज्ञक प्रासाद जाळीच्या खिडक्यांनी युक्त २१ हात रुंद, ४२ हात उंच, आठ मजल्यांचा होय. नंदनसं० सहा मजल्यांचा, ३२ हात रुंदी ६४ हात उंच १६ शिखर व एकच मजला असे दोनही पूर्वोक्त प्रासाद होत ॥२३॥

गरुड व नंदिवर्धन हे दोनही गरुडाकृति होत. त्यात प्रथमपक्ष पुच्छसहित व दुसरापक्ष पुच्छरहित, व २४ हातरुंद ४८ हात उंच, सातमजली, २० शिखरांनी शोभित असे दोनही असावे ॥२४॥

कुंजरसं० हस्तिपृष्ठासारखा याची १६ हात रुंदी ३२ हात उंची होय. गुहराजसं० गुहाकार १६ हात रुंद ३२ हात उंच व दोन्ही प्रासादांची एक भूमि व वलभी तीन शिरोगृहांनी युक्त असावी ॥२५॥

वृषसं० प्रासाद (देवालय) एक मजला व एक शिखर, १२ हात रुंद २४ हात उंच आणि वर्तुळाकार होय. हंससं० हंसाकार एक मजला व एक शिखर ८ हात रुंद १६ हात उंच होय. घट्सं० कलशासारखा ८ हात रुंद व १६ हात उंच, एक मजला व एक शिखर होय ॥२६॥

सर्वतोभद्रसं० चार दिशांस चार द्वारांनी युक्त, बहुत शिखरांनी युक्त, बहुत सुंदर शिरोगृहांनी युक्त, २६ हात रुंद ५२ हात उंच पाच मजली, चतुरस्र होय ॥२७॥

सिंहसं० सिंहासारखा द्वादशकोण, ८ हातरुंद, १६ हात उंच, एकमजली करावा. वृत्त, चतुष्कोण, षोडशकोण, अष्टकोण, हे चारही नामासारखेच (वर्तुळ, चतुष्कोण इ०,) अंधारयुक्त, एकशिखर होत. त्यात चतुष्कोण मात्र पांच शिखरांनी युक्त असावा बाकी तीन एक शिखर होत (या चार प्रासादांसभोवती भिंती घालून आच्छादन करून एक द्वार ठेवावे) ॥२८॥

मयनामकाच्यामते १०८ अंगुले भूमिका (सर्व उंची) होय. विश्वकर्म्याने साडेतीन हात भूमिका सांगीतली ॥२९॥

विद्वान शिल्पशास्त्रज्ञ जेते या दोन मतांचे ऐक्य करितात. ते असे की, कमीमान कपोतपालिकेने युक्त केले असता बरोबर होते ॥३०॥

हे प्रासाद्लक्षण जे मी यात सांगितले ते गर्गाने केलेले प्रासादलक्षण सर्व आहे. मन्वादिकांनी केलेली विस्तृत जी प्रासादलक्षणे ती पाहून मी येथे हा अधिकार केला ॥३१॥


॥ इतिबृहत्संहितायांप्रासादलक्षणंनामषटपंचाशोध्याय: ॥५६॥

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP