मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
कौरव -पांडव -संगर -तांडव ...

राम गणेश गडकरी - कौरव -पांडव -संगर -तांडव ...


राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.

कौरव-पांडव-संगर-तांडव द्वापर-कालीं होय अती
तसे मराठे गिलचे साचे कलींत लढले पानपती ॥धृ०॥

जासुद आला कथी पुण्याला-“शिंदा दत्ताजी पडला;
कुतुबशहानें शिर चरणानें उडवुनि तो अपमानियला ।”

भारतवीरा वृत्त ऐकतां कोप अनावर येत महा
रागें भाऊ बोले, “जाऊं हिंदुस्थाना, नीट पहा.

‘काळा ‘शीं घनयुद्ध करूं मग अबदल्लीची काय कथा?
दत्ताजीचा सूड न घेतां जन्म आमुचा खरा वृथा. ”

बोले नाना, “ युक्ति नाना करुनी यवना ठार करा;
शिंद्यांचा अपमान नसे हा; असे मराठयां बोला खरा.”

उदगीरचा धीर निघाला; घाला हिंदुस्थानाला;
जमाव झाला; तुंबळ भरला सेनासागर त्या काळा.

तीन लक्ष दल भय कराया यवनाधीशा चालतसे;
वृद्ध बाल ते केवळ उरले तुरुण निघाले वीररसें.

होळकराचे भाले साचे, जनकोजीचे वीर गडी,
गायकवाडी वीर अघाडी एकावरती एक कडी.

समशेराची समशेर न ती म्यानामध्यें धीर धरी;
महादजीची बिजली साची बिजलीवरती ताण करी.

निघे भोसले पवार चाले बुंदेल्यांची त्वरा खरी;
धीर गारदी न करी गरदी नीटनेटकी चाल करी.

मेहेंदळे अति जळे अंतरीं विंचुरकरही त्याचपरी;
नारोशंकर, सखाराम हरि, सूड घ्यावया असी धरी,

अन्य वीर ते किती निघाले गणना त्यांनी कशी करा ?
जितका हिंदु तितका जाई धीर उरेना जरा नरां.

भाऊ सेनापती चालती विश्वासातें घेति सवें.
सूड ! सूड !! मनिं सूड दिसे त्या सूडासाठीं जाति जवें.

वीररसाची दीप्ती साची वीरमुखांवर तदा दिसे;
या राष्ट्राचे स्वातंत्र्याचे द्दढस्तंभ ते निघति असे.

वानर राक्षस पूर्वी लढले जसे सुवेलाद्रीवरती
तसे मराठे गिलचे साचे कलींत लढले पानपतीं ॥कौ.१॥

[२]

जमले यापरि पानपतावरि-राष्ट्रसभा जणुं दुसरि दिसे;
वीर वीरमदयुक्त सभासद सेनानायक ग्रतिनिधिसे.

अध्यक्ष नेमिले दक्ष भाउ अरि  भक्ष कराया तक्षकसे;
प्रतिपक्षखंडना स्वमतमंडना; तंबू ठोकिति मंडपसे.

शस्त्रशब्द हीं सुरस भाषणें सभेंत करिती आवेशें;
रणभूमीचा कागद पसरुनि ठराव लिहिती रक्तासें.

एका कार्या जमति सभा या, कृति दोघींची भिन्न किती !
बघतां नयनीं बाहतीलची पूर अश्रूंचे स्वैरगति.

पूर्ववीरबल करांत राहे. आहे सांप्रत मुखामधीं:
हाय ! तयांचे वंशज साचे असुनी झालों असे कुधी !

जमले यापरि पानपतावरि भारतसुंदरिपुत्र गुणी
युद्ध कराया, रिपु शिक्षाया, संरक्षाया यशा रणीं ॥कौ०२॥

[३]

अडदांड यवन रणमंडपिं जमले; युद्धकांड येथोनि सुरू.
करिती निश्चय उभयवीर रणीधीर “मारूं वा रणीं मरूं ”

पुढें पडे दुष्काळ चमूंमधिं अन्न न खाया वीरांना;
म्हणती, “ अन्नावांचुनि मरण्यापेक्षां जाऊं चला रणा.

मग सेनेनें एक दिलानें निश्चय केला लक्षण्याचा;
स्वस्थ होळकर मात्र नीचतर पगडभाई तो यवनांचा.

परधान्यहरणमिष करुनि रणांगणिं पढले आधीं बुंदेले;
श्रीशिवराया युद्ध पहाया हांक द्यावया कीं गेले?

धन्य मराठे ! धन्य यवन ते रणांगणामधिं लढणारे !
आम्ही त्यांचे वंशज केवल हक्कांसाठीं रडणारे

आवेश प्रवेशे दोन्ही सैन्यामधें कराया युद्धखळीं;
परि स्वार्थ अनिवार मार दे, आर्यजनांमधिं करि दुफळी.

आर्यजनांचें दैवहि नाचे अभिमानाचें रूप धरी;
करि वसति मनिं सदाशिवाच्या; होय अमुच्या उरा सुरी.

सुरासुरीम जणुं डाव मांडिला बुद्धिबळाचा भूमिवरी;
परि दुदैंर्वें वेळ साधिली प्यादीं आलीं अम्हांवरी !

कलह माजला, झालि यादवी, नवीन संकट ओढवलें;
कारस्थानीं हिंदुस्थाना व्यापुनि पूर्णचि नागविलें.

कुणि यवनांचा बाप जाहला, ताप तयाचा हरावया,
नया सोडुनी जया दवडुनी कुणीं लाविला डाग वया.

कुणि दिल्लीची वाहि काळजी, कोणी तख्तासाठिं झुरे;
कुणा लागला ध्यास प्रीतिचा विचार सारासारिं नुरे.

“लालन लालन !” करि कुणि, साधी मर्जीनेची कुणि मरजी;
असे घसरले, साफ विसरले युद्धरीति अति खडतर जी.

गारदीच मज फार रुचे जरि यवन न सोडी विश्वासा;
निजबंधूंची करणी ऐकुनि सोडिं, वाचका निःश्वासा !

कलहा करिती काय विसरती क्षुद्र वस्तुच्या अभिमानें,
जसे हल्लिंचे लोक तोकसम कलहा करिती नेमानें.

नेमानेमाच्या या गोष्टी कष्टी होतें मन श्रवणीं
असो; बुडाली एकी, बेकी राज्य चालवी वीरगणीं.

सरदारांच्या बुद्धिमंदिरा आग लागली कलहाची
शिपाइभाई परि नच चळले; रीति सोडिलि न मर्दाची.

नाहीं लढले, लढणारहि नच कुणी पुनरपि या जगतीं;
तसे मराठे गिलचे मोठे कलींत लढले पानपतीं ॥कौ०॥३॥

[४]

एके दिवशीं रवि अस्ताशीं जातां झाला विचार हा---
“प्रातःकालीं स्मरुनी काली युद्ध करूं घनदाट महा.”

निरोप गेला बादशहाला, “युद्ध कराया उद्यां चला;
समरांत मरा वा कीर्ति वरा जय मिळवुनि आम्हांवरि अचला.”

सकल यामिनी आर्यवाहिनी करी तयारी लढण्याची;
वीरश्रीचा कळस जाहला परवा न कुणा मरणाची.

परस्परांतें धीर मराठे गोष्टि सांगती युद्धांचा,
वीरश्रीच्या शस्त्रकलेल्या जयाजयांच्या अश्वांच्या.

बोले कोणी, “माझा न गणी वंशचि मृत्यूभयासिं कधीं;
आजा, पणजा, बापहि माझा पडला मेला रणामधीं.

बापसवाई बेटा होई खोटा होइल नेम कसा?
पोटासाठीं लढाइ नच परि मान मिळविण्या हवा तसा !”

कुणी धरी तलवार करीं तिस पाहुनि आनंदें डोले,
फिरवी गरगर करि खालीं वर वीर मराठा मग बोले---

“अफाट वाढीची ही बेटी मोठी झाली लग्नाला
प्राणधनाचें द्याज घेउनी उद्यांचा देइन यवनाला. ”

अशी चालली गडबड सगळी निद्रा कोणा नच आली;
कोठें गेली कशी पळाली रात्र न कोणाला कळली.

प्रभातरूपें ईर्षा आली; भीति पळाली निशामिषें;
भय मरणाचें कैचें त्यांना ? काय करावें हरा विषें ?

शिंग वाजलें संगरसूचक कूच कराया मिळे मुभाः
धांवति नरवर समरभूमिवरघ रागे धनगर दूर उभा.

हटवायातें देशदरिद्रा मुखा हरिद्रा लावुनिया,
कीर्तिवधूते जाति वराया समरमंडपीं धांवुनिया.

शहावलीचा हलीसारखा अताइ नामा पुत्र बली
यवनदलीं मुख्यत्व घेत कीं पापावलिमधिं जसा कली.

प्रणव जसा वेदांस, सदाशिव तसा आर्यबलसेनानी;
विश्वासातें पाहुनि वदनीं अंगुलि घातलि यवनांनीं.

आले यापरि रणभूमीवरि; जसे गात कवि यापुढतीं,
तसे मराठे गिलचे साचे कलींत लढले पानपतीं ॥कौ०॥४॥

[५]

वाढे जैसा दिवस, वाढलें युद्ध तसें अतिनिकरानें
हातघाइला लढाइ आलीह अंबर भरलें नादानें.

उभय वीरवर गर्जति ‘हरहर’,‘अल्ला अकबर’ उल्हासें;
भासे आला प्रळय; यमाला दिली मोकळिक जगदीशें.

अश्ववीरगज भक्तमंडळी गोंधळ भारतदेवीचा;
तलवारींच्या दिवठया केल्या; सडा घातला रक्ताचा.

धूळ उडाली गुलाल झाली; “उदे;; गर्जती भक्तबली,
परस्परांचे बळी अर्पिती भूमि तर्पिती शिरकमळीं.

रणवाद्य भयंकर भराड वाजे शुद्ध न कोणा देहाची;
रणमदमदिरामत्त जाहले, हले फणाही शेषाची.

मनुजेंद्रवलाष्णुं अंत न उरला देवेंद्राची नच परवा
म्हणुनि धूलिकण नभीं धाडुनी मेघसंघ की रचिति नवा ?

रक्तपाट आतदाट वाहती घाट बांधिले अस्थींचे;
मृतगजतुरंग मकर खेळती कृत्य अगाधाचि वीरांचें.

घोर कर्म हें वघुनी वाटे रविहि धरी निजसदनपथाः
कांपे थरथर स्थीर न क्षणभरः इतरांची मग काय कया !

यापरि चाले लढाइ; भ्याले दाढीवाले, मग हटले;
पळती, धांवति सैरावैरा; आर्यवीर त्यांवरि उठले.

आर्यजनां आवेश नावरे; भरे कांपरें यवनांला;
म्हणति “ मिळाला जय हिंदूंला लढाइ आली अंताला !”

तोंच अताई दूरद्दष्टिचा धीर देत निजसैन्याल.
स्वयें धांवला, पुढें जाहला, स्फूर्ति पुन्हां ये यवनाला.

त्वरित पूर्ववत् समर चाललें, हले भरंवसा विजयाचा;
दाढी शेंडी एक जाहली खेळ शहाच्या दैवाचा.

करी अताई जबर लढाई नाहीं उपमा शौर्याला;
त्वावरि ये विश्वास, भासलें कीं खानाचा यम आला !

विश्वासानें अतिअवसानें खान पाडिला भूमिवरी
करिवरचरणीं मरण तया ये, शरश एक मग यमनगरी.

धीर सोडिती वीर शहाचे पळती आवरती न कुणा;
शहावलीची कमाल झाली यत्न तयाचा पडे उणा.

पहात होता शहा खेळ हा दुरूनी, तोही घाबरला,
म्हणे, “करावें काय ? न ठावें !” दैव हात दे परि त्याला.

दक्ष वीर लक्षैकधीर तनुरक्षक सेनेसह धावे;
म्हणे चमूला. “पळति यवन जे कंठ तयांचे छेदावे.”

पुन्हां उलटले यवन लढाया हुकुम ऐकतां हा त्याचा;
शहा तयांतें सहाय होतां मारा करितो जोराचा.

जसे लढावे वीर संगरीं कविजन इच्छा मनिं करीती,
तसे मराठे गिलचे साचे कलिंत लढले पानपतीं ॥कौ०॥५॥

[६]

नभोमध्यगत सूर्य होत मग युद्धदि आले मध्याला;
हाय ! हाय ! या आर्यभूमिचा भाग्यसूर्य तो शेवटला !

सदा अम्हांला विजय मिळावा, प्रताप गावा जगतानें;
परि त्या काळीं फुटक्या भाळीं तसें न लिहिलें दैवानें !

सदाशिवाचा उजवा बाहू राहु रिपुस्त्रीमुखविधुचा,
बाऊ केवळ म्लेंच्छजनांचा, भाऊ माधवरायाचा,

बेटा ब्राह्मण वादशहाचाह पेटा साचा वाघाचा.
वीरफुलांतील गुलाबगोटा, वाली मोठा धर्माचा.

ताण जयाची द्रौणीवर उद्राण आणितां आर्याला,
विजयाचा विश्वास असा विश्वास-लागला शर त्याला !

मर्म हाणी तो वर्मीं लागे कर्म आमुचें ओढवलें;
धर्म-समेला आत्मा गेला, धर्मवधूकरिं शव पडलें.

अश्रू नयनीं आणी लक्ष्मी प्रिय भार्या त्या आर्याची;
उतरे चर्या, अघा न मर्या, परि ये स्मृति तिस कार्याची.

करी विचारा विराचारा दारा वीराची स्वमनीं---
“नाथघात सैन्यांत समजतां धीर उरेल न आर्यजनीं.”

छातीचा करि कोट, लोटिला दुःखलोट अनिवार जरी,
नीट बैसवी प्रेता देवी धनुष्य त्याच्या दिलें करीं.

धन्य सती ती ! धन्य तिचा पति ! धन्यचि जननीजनकाला !
धन्य कवीचें भाग्य असे या म्हणुनि मिळे हें गायाला !

परि जें घडलें लपेल कुठलें ? वेग फार दुर्वार्तेला;
अल्पचि काळें भाउस कळलें---“ गिळिलें काळानें बाळा !”

“ हाय लाडक्या ! काय कृत्य हें? घाय काय हा भान करी
गोंडस बाळा, तोंड पुण्याला दावुं कसें ? कथिं तोड तरी, ”

असा करी तो शोक ऐकुनी दुःख जाहलें सकळांला
अश्वावरतीं स्वार जाहला भाऊराया मरण्याला.

व्यंग समजतां भंग कराया आर्यांच्या चतुरंग बळा
सिद्ध जाहला शहा; तयाला देवानें आधार दिला.

फिरति मराठे आला वाटे अंत शिवाजीराज्याला;
भाऊराया योजि उपाया---तोही वायां परि गेला.

मान सोडिला, साम जोढिला; दूत धाडिला होळकरा;
प्रसंग येतां मत्त किंकरा धनी जोडिती असे करां.

दूत निघाला, सत्वर आला, होळकराला नमन करी;
म्हणे, “ भाउचा निरोप ऐका---‘ साह्य करा या समयिं तरी.

उणें बोललों, प्रमत्त झालों, बहु अपराधी मी काका;
माफ करा, मन साफ करा, या आफतींत मज नच टाका.

मत्प्राणाची नाहीं परवा बरवा समरीं मृत्यु हवा;
परी लागतो डाग यशाला शिवरायाच्या तो दुरवा.

देशकार्य हें व्यक्तीचें नच; सक्ति नको; भक्तीचे हवी;
आसक्ती सर्वाची असतां मिळवूं आतां कीर्ति नवी.

राग नका धरुं; आग लागते यशा; भाग हा सर्वांचा;
शब्द मुलाचा धरितां कैचा ? हाच मान का काकाचा ?

साह्य कराया यवन वधाया धीर द्यावया या काका !’ ”
असें विनविलें, हात जोडिले, दया न आली परी काका.

रट्टा दे भूमातेलाः धरि कट्टा वैरी मान तिची
बट्टा लावी वयास; केली थट्टा ऐशा विनतीची;

दुःखावरतीं डाग द्यायला करी होळकर हुकूम दळा---
“पळा, मिळाला जय यवनाला !” काय म्हणावें अशा खळा ?

फिरले भाले-भाले कैचे ? दैवचि फिरलें आर्यांचें;
पाहे भाऊ, वाहे नयनीं नीर; करपलें मन त्याचें.

निरोप धाडी पुन्हा तयाला---“ पळा वांचवा प्राण तरी
पळतांना परि कुटुंबकविला न्यावा आमुचा सवें घरीं ”

घेत होलकर वीरवधूंतें; मग दक्षिणची वाट धरी;
देशहिताची करुनी होळी नाम होळकर सार्थ करी !

करी दुजा विश्वासघात हा; निजबंधूंच्या दे साची
परवशतेची माथीं मोळी, हातीं झोळी भिक्षेची !

काय कथाची युद्ध-कधा ? मग वृथा भाउचा श्रम झाला;
धीर सोडुनि पळति मराठे, पुर्ण पराभव त्यां आला.

कोणी वेणीमाधव धांवे; वार तयाचा शिरीं जडे;
भारतरमणीकंठतन्मणी धरणीवरती झणीं पडे.

भूदेवीची तुटे गळसरी ! फुटे दैव कीं आर्याचें
आकाशाची कुर्‍हाड पडली; कडे लोटले दुःखाचे !

सैरावैरा आर्य धांवती; हरहर ! कोणी नच त्राता !
यवन करिति ज्या मग प्रळय भयंकरः वदा कशाला तो आतां ?

वर्णन करितां ज्या रीतीनें कुंठित होइल सुकविमति,
तसे मराठे गिलचे साचे कलिंत लढले पानपतीं ॥कौ०॥६॥

[७]

सन सतराशें एकसष्ट अतिनष्ट वर्ष या देशाला
हर्ष मरे, उत्कर्ष उरेना; सकळां आली प्रेतकळा.

फुटे बांगडी दीड लाख ती; राख जहाली तरुणांची
आग पाखडी दैव अम्हांवर: मूर्ति अवतरे करुणाची.

घरोघरीं आकांत परोपरि; खरोखरीचा प्रळय दिसे;
भरोभरीं रक्ताच्या अश्रू अबला गाळिति शोकरसें.

‘दोन हरवलीं मोतिं; मोहरा गेल्या सत्तावीस तशा;
रुपये ख्रुर्दा न ये मोजितां ’--- वचना वदती वृद्ध अशा;

घोर वृत्त हें दूतमुखानें कानीं पडलें नानाच्या;
‘भाऊ भाऊ’ करितां जाई भेटिस भाऊरायाच्या.

उघडा पडला देश तयातें हें नव संकट कां यावें !
दुःख एकटें कविं न येत परि दुःखामागुनि दुःख नवें !

धक्का बसला आर्ययशाला; तेथुनि जाई राज्य लया,
रघुनाथाचें धैर्य हरपलें, जोड उरेना हिमालया.

“नाथ ! चाललां सोड्डनि अबला ! पाहूं कुणाच्या मुखाकडे ? ”
“बाळी ! कैसा जासि लोटुनि दुःखाचे मजवरतिं कडे ?”

जिकडे तिकडे हंबरडे यापरी परिसती जन फिरतां;
कोणिकडेही तरुण दिसेना; सेनासागर होय रिता.

उडे दरारा. पडे पसारा राज्याचा; वळ घेत रजा;
उघडें पडलें महें हत्तिचें वोल्हे त्यावरि करिति मजा !

भलते सलते पुढें सरकले, खरे वुडाले नीच-करीं.
मालक पडतां नीट बैसले पाटावरती वारकरी/

नडे आमुची करणी आम्हां; ! खडे चारले यवनांनीं;
तडे पडोनी यशपात्राला रडे सदोदित भूरमणी.

गंजीफांची डाव संपला दिली अखेरी यवनांतें
स्वातंत्र्यासह सर्वस्वातें दूर लोटिलें निज हातें.

रूमशामला धूम ठोकितां पुणें हातिंचे घालविलें;
दुग्धासाठीं जातां मार्गीं पात्र ठेवुनी घरिं आले !

करि माधव नव उपाय पुढतीं परि ते पडती सर्व फशीं;
परिटघडी उघडिल्या एकदां बसेला कैशी पुन्हां तशी?

जसा नदीचा ओघ फिरावा पात्रीं पडतां गिरिशिखरें
पानपताच्या पर्वतपातें इतिहासाचा ओघ फिरे.

इतिहासाचें पान येथचें काळें झालें दैवबळें,
या देशावर अपमानाची स्वारी दुःखासहित वळे.

सर्वस्वाचा नाश जयानें वर्णुं तयातें अतां किती ?
व्यास वर्णितां थकेल यातें मग मी कोठें अल्पमति ?

जसे झगडतां त्वरित फिरावी सकल जगाची सरल गति
तसे मराठे गिलचे साचे कलींत लढले पानपतीं ॥कौ०॥७॥

[८]

जें झालें तें होउनि गेलें फळ नच रडुनी लेशभरी;
मिळे ठेंच पुढल्यास मागले होऊं शहाणे अजुनि तरी.

पुरें पुरें हें राष्ट्रविघातक परपस्परांतिल वैर अहो !
पानपताची कथा ऐकुनी बोध एवधा तरि घ्या हो !

भारतबांधव ! पहा केवढा नाश दुहीनें हा झाला !
परस्परांशीं कलहा करितां मरण मराठी राज्याला.

हा हिंदू, हा यवन, पारशी हा, यहुदी हा भेद असा.
नको नको हो ! एकी राहो ! सांगुं आपणां किती कसा ?

एक आइचीं बाळें साचीं आपण सारे हें स्मरुनीं.
एकदिलानें एकमतानें यत्न करू तद्धितकरणीं.

कथी रडकथा निजदेशाची वाचुनि ऐसा हा फटका
लटका जाउनि कलह परस्पर लागो एकीचा चटका !

कौरवपांडव-संगरतांडव द्वापरकालीं होय अती;
तसे मराठे गिलचे साचे कलींत लढले पानपतीं ॥८॥

(चालः भल्या भाणसा, दसलाखाची०)

N/A

References : N/A
Last Updated : November 14, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP