मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
जगतास जागवायाला केशवसुत ग...

राम गणेश गडकरी - जगतास जागवायाला केशवसुत ग...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


जगतास जागवायाला केशवसुत गाउनि गेले !

इंग्लंद भूमि शेलेची माहेर जडाचें बनलें,

सन्देश गूढ जे त्याचे तैसेच मानसीं जिरले,

तपोवना मानवतेच्या या बघतां मानस हंसलें !

देवांचे हेतु न पुरले,

अर्धेंच कार्य जें उरलें,

ते येथें करुनी गेले,

अवतरुनी फिरुनी शेले ! केशवसुत गाउनि गेले !

एकेका शब्दें भरले काव्याचे अद्‌भुत पेले !

ज्यांसाठीं मानव झटले, ते सुधाकुंभ भरलेले---

वाग्देवी वरुनी टाकी केशवसुतहृदयीं झेले !

अनुभवुनि निजानंदानें

मग त्यांचें केलें गाणें,

श्वासाच्या कारंज्यानें

चहुंकडे उधळुनी दिधलें ! केशवसुत गाउनि गेले !

हे तुषार पडतां अंगीं बिंदूंचे सिंधू झाले !

निजलेल्या जागृति आली, हो ताजें जें थकलेलें !

मरणासचि आलें मरणें, मग केलें त्यानें काळें !

तों शब्द मुक्याला सुचले !

गूढास रुप सांपडलें !

स्वच्छंद अचेतन हालें !

नश्वर तें ईश्वर केलें ! केशवसुत गाउनि गेले !

भेदभाव विलया गेला, सूक्ष्मांत स्थूल मिळालें !

गगनाचे फाटुनि पडदे दिसलें जें त्यापलिकडलें !

मरणाचें मूळच तुटलें, जन्माचें नातें सुटलें !

वस्तूंत वस्तुपण भरलें,

जीवंत जीवही झाले,

आत्म्यास आत्मपद आलें,

ब्रह्मही ब्रह्मसें ठरलें ! केशवसुत गाउनि गेले !

कळलें कीं ’आम्ही कोण !, ’हरपलें श्रेय’ सांपडलें;

आत्मा हो ’वेडापीर’, सृष्टींत ’भृंग’ सा रंगे;

मारुनियां ’गोंफण’ काळा निज ’निशाण’ नाभें फडकविलें !

ऐकतांच विजयि ’तुतारी’

हो चिरंजीव ’म्हातारी’

मग वाजवितांच ’सतारी’

सर्वत्र ’झपूर्झा’ झालें ! केशवसुत गाउनि गेले !

या स्थितींत त्या ब्रह्माची ब्रह्माशीं मिळणी घडली,

जें चिरंतनाच्यासाठीं सांगता तयाची झाली.

परि जनता वेडी कुठली "केशवसुत मेले" वदली !

परि जन्ममरण हें वारें

कल्पनाच नाचवि सारें !

मूर्खांनो ! रडतां कां रे,

कीं "केशवसुत ते मेले !" केशवसुत गाउनि गेले !

जे एकठायीं होते, ते सर्वांठायीं भरले;

सर्वांच्या हृदयीं भरले सर्वांच्या जीवीं भिनले;

विश्व स्थिर ज्यांनीं केलें कां वदतां तेच निमाले ?

लीलेनें त्यांनीं गातां

ही सजीव केली जडता,

अणुरेणूंमधुनी आतां

निघतील तयांचे चेले ! केशवसुत गाउनि गेले !

सर्व ठायिं सर्वहि काळीं सर्वांनीं ज्यास पहावें,

पाहतां पाहतां वाटे डोळ्यांनीं ज्यास गिळावें,

तो विषय होई मरणाचा जन बोले काय करावें ?

जे चकव्यावांचुनि चकले,

जरि ते कुणि कांहीं भकले,

तरि ’गोविंदाग्रज’ बोले

केशवसुत कसले मेले ? केशवसुत गातचि बसले !

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP