मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
गा रे गा रे गाच जरा ॥ माझ...

राम गणेश गडकरी - गा रे गा रे गाच जरा ॥ माझ...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


गा रे गा रे गाच जरा ॥ माझ्या चिमण्या मुशाफरा ॥धृ०॥

ठराविकाला, नियमांला ॥ बंधाला जड जगताला ॥

जीव पहा त्रासुनि जाई ॥ नको नकोसें त्या होई ॥

करी जराशी बा घाई ॥ रिझवाया त्याला गाई ॥

गोजिरवाणें । अमोल गाणें । हृदयीं बाणे ॥

अस्पष्टाचा सोड झरा । झटपट पळत्या मुशाफरा ॥१॥

आम्ही गातों जें गाणें ॥ तें जगताचें रडगाणें ॥

हृदयीं जो भरला त्रास ॥ तो कविताचरणीं प्रास ॥

शब्दापाठीं हपापले ॥ अर्थासाठीं जन टपले ॥

हृदय करपलें । रसहि हरपले । कवनचि खपलें ॥

गा तूं आतां गाच जरा ॥ रसगंगेच्या मुशाफरा ॥२॥

नियमांनीं झालों ठार ॥ ठराविकानें बेजार ॥

हा जगण्याचा बाजार ॥ सजीवतेचा आजार ॥

अमुच्या कवनाचा पूर ॥ मरत्या जीवाचा सूर ॥

परि तव कवनें । हलतां पवनें । भुलतिल भवनें ॥

त्या कवनाचा सूर खरा ॥ गा, बागडत्या मुशाफरा ॥३॥

स्वैरवृत्ति कवितादेवी ॥ बालवृत्ति तूंही तेवीं ॥

ती सौंदर्याची छाया ॥ तव वदनींही ती माया ॥

गालावरची लाल मजा ॥ दाविं प्रीतिच्या यशोध्वजा ॥

कवनचि रदनीं । कवनचि वदनीं । कवनचि नयनीं ॥

झुलवी खुलवी जीव जरा ॥ सुंदरतेच्या मुशाफरा ॥४॥

हृदयाचे घुंगुर गोड ॥ मन्मनिंचे हरितिल कोड ॥

हृदयाच्या हृदयीं खोल ॥ ओत कवनरस बिनमोल ॥

फुललें विश्‍वाचें फूल ॥ वर आकाशाची झूल ॥

सुखदुःखांची । बाग जगाची । जरि कांठयांची ॥

फुलांचाच तूं धनी खरा ॥ फुलांत फिरत्या मुशाफरा ॥५॥

चिखल दाट हा जगताचा ॥ रुढीचा, निर्बंधाचा ॥

मम हृदयाचें कल्हार ॥ पवनजलावर अवतार ॥

घेत असे करुनी धीर ॥ तूंच तयाचा शाहीर ॥

त्यांतच राही । गुंगत कांहीं । दंग सदाही ।

गा हृत्कमलाच्या भ्रमरा ॥ मनांतल्या तूं मुशाफरा ॥६॥

हिमवंतीच्या कणांपरी ॥ तव शब्दांची मजा खरी ॥

थेंब न बा ते पाण्याचे ॥ खडेहि किंवा स्फटिकाचे ॥

अस्फुट त्यांचा आकार ॥ वार्‍यावर पळते स्वार ॥

अर्थ बोबडे । वेडे बगडे । बोल ते गडे ॥

उडवी त्यांना भराभरा ॥ वार्‍यावरच्या मुशाफरा ॥७॥

अर्थकल्पनांसाठिं गडे ॥ कां बघसी इकडे तिकडे ? ॥

अर्थशब्द सोंगें सारीं ॥ बडेजाव हा बाजारीं ॥

धांव न कसली धरि हांव ॥ धांवायासाठिंच धांव ॥

अर्थ मरुं दे । शब्द खरुं दे । काव्य झरुं दे ॥

परी भरुं दे नादभरा ॥ चुकल्या मुकल्या मुशाफरा ॥८॥

अर्थ कळेना जरी कुणा ॥ तरि तो नशिबाचाच उणा ॥

मार्ग कुणा का दावाया ॥ ढगांमधें चमके माया ? ॥

मूठ झांकली लाखाची ॥ उघडतांच कुचकामाची ॥

अस्फुट गाना मिरक्या ताना । त्या घेतांना ॥

नाच बिजलिच्या धरुनि करा ॥ मेघावरच्या मुशाफरा ॥९॥

मुग्धापदिं घुंगुरवाळा ॥ गायाचा त्याला चाळा ॥

स्वैराचें बंधन त्याला ॥ खुला ताल त्या नाचाला ॥

रुम्‌झुम् शब्दा अर्थ नसे ॥ थबथबती परि दिव्य रसें ॥

त्या स्वच्छंदा । त्या मकरंदा । त्या रसकंदा ॥

नाचूं दे कवनांत जरा ॥ हृदयामधल्या मुशाफरा ॥१०॥

मार भरारी नभाकडे ॥ मेघावरतीं नाच गडे ॥

करि त्यांचे तुकडे तुकडे ॥ उडवी जग जिकडे तिकडे ॥

कविताजल जें चहूकडे ॥ पडतां आत्मा थंड पडे ॥

’पाउसपाणी । अभाळदाणी ।’ इकडे आणी ॥

शांत करी ही वसुंधरा आकाशांतिल मुशाफरा ॥११॥

ऐकवि गगनाचें गान ॥ जीव तुझ्यावर कुरबान ॥

सूर सारखा लाव चढा ॥ दिव्य नाद करि पुढें खडा ॥

शब्दा शब्दा मुशाफरा ॥ जिवाचाच देईन हिरा ॥

जीव किरकिरा । फारच अधिरा । बहिरासहिरा ॥

करावया मंजुळ मुखरा ॥ गा गगनांतिल मुशाफरा ॥१२॥

अवकाशाच्या पानबुडया ॥ तरल जलीं जा टाक उडया ॥

आनंदाच्या पलीकडे ॥ काय मजा मज सांग गडे ॥

अज्ञेयाच्या परतीरा ॥ नाचत नाचत जाच जरा ॥

तसा तरंगत । तसाच रंगत । नसतां संगत ॥

हात घाल जा परात्परा ॥ अवकाशांतिल मुशाफरा ॥१३॥

विश्वाचीं अवघड कोडीं ॥ कवनाच्या मंत्रें सोडी ॥

स्वानंदाच्या पैलथडीं ॥ ब्रह्माची चल उकल घडी ॥

सवेंच खालीं पहा बरें ॥ जगास विसरुं नको बरें ॥

परात्पराचा । भवरा साचा । विस्मरणाचा ॥

नको सांपडूं त्यांत जरा । स्वानंदाच्या मुशाफरा ॥१४॥

परमात्म्याच्या भवर्‍यांत ॥ पडतां तूं गिरक्या खात ॥

त्या विस्मरणाची माती ॥ जमतां , मोरा तुजवरतीं ॥

फुंकर तीन्ही काळांचा ॥ मारुनि उडवूं थर वरचा ॥

झिम् झिम् मोरा । ये सामोरा । थोरापोरां---॥

वर न्याया कर देच खरा । चिरंतनाच्या मुशाफरा ॥१५॥

थकतां मग कोमल काया ॥ घेच विसावा श्रम जाया ॥

विश्वकटाहावर पैस । पाय पसरुनी बा बैस ॥

शीळ वाजवुनि पवनांत ॥ समाधान मिळवी शांत ॥

तरि त्या स्थानीं । मधुनी मधुनी । रंगुनि कवनीं ॥

गा रे गा रे गाच जरा ॥ माझ्या चिमण्या मुशाफरा ॥१६॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP