मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
नाजुक सुंदर गोंडस चिमणी ब...

राम गणेश गडकरी - नाजुक सुंदर गोंडस चिमणी ब...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


नाजुक सुंदर गोंडस चिमणी बाला दशवर्षा,

कोण कुणाची कुठें चालली उधळित ही हर्षा ?

हात चिमुकले, पाय चिमुकले, चिमुकलाच बांधा,

भूदेवी-स्वर्देवी यांतिल हाच काय सांधा ?

धवल वर्ण हा देहावरती फुलत्या पुष्पाचा,

लाल छटा वर, जणूं पसरला रसचि गुलाबाचा !

त्याच फुलांच्या वळुनि पाकळ्या पोकळशीच घडी

झालि तीच वार्‍यावर हलत्या ओठांची जोडी !

सडा पसरला आंत कोंवळ्या बारिक मोत्यांचा,

ओंठाआडचि अर्धा पडला खेळ पहा त्यांचा !

इवलीशी हनुवटी गोजिरी, खळी तिच्यावरि ही,

निजहृदयिंच उतराया वर्तुळ मुख जणुं लांबवि ही !

सरळ नासिका चांफेकळिचा जणुं अंतर्भाग,

दळांआड दडला परागमय अवकाशांग.

कपाळपट्टी विशालतेचें बालरुप पहिलें,

कुणा भाग्यवंताचेम भावी भाग्य त्यांत लिहिलें ?

किंचित खुलत्या भिंवया-चिमणीं धनुष्येंच साचीं

चित्रपटांतिल काय चिमुकल्या रामलक्ष्मणांचीं ?

नखाएवढया दोन हिरकण्या हंसती, त्याखालीं,

तेजोरुपा श्रीकमला जणुं निजकमलीं रमली !

फुलें बसविलीं वेलीवरतीं, गगनीं तारांना,

त्याच मुहूर्ती त्याच करें का विधि करि या नयनां !

किरणां किरणां टाकुनी भंवतीं या नेत्रांमधुनी

पापस्पृष्टा वसुंधरेला बाला का न्हाणी !

अभ्यासास्तव सोडित उघडुनि नयनांची खाण

बालमदन निर्दोष किरणमय हे बोथट बाण !

केंस कोंवळे सरळचि काळे, कुरळेही कांहीं,

तुळतुळीत मोकळे, मनासम नच बंधन त्यांही !

गालिं लोळती कांहीं, कांहीं कानांवर पळती,

पवनीं खेळति कांहीं किंवा मानेवर डळती;

पाशरुप पुष्कळसे परि ते पाठीवर रुळती,

चकचकीत जणुं लहरि जलाच्या पवनें झुळझुळती !

बालसर्प जणुं, अथवा उपमा कुणीं अशी द्यावी ?

तच्छिरिं बसवुनि साप निजशिरीं पाप कोण बसवी ?

तळपति जललहरी रविकिरणीं जणूं जागजागीं,

उंच सखलशा सुटल्या वेणीच्या बंधनभागीं.

झुळझुळ मंजुळ वाहे चिमणा ओघ जसा कांहीं,

गमते रमते उगमस्थानीं ही कृष्णाबाई !

गाल कोवळ्या गुलाबकळिचीं रुपें विधिमनिंचीं,

पदार्थसंसर्गविण नुसत्या चिंतनमय खनिचीं !

लज्जा निर्मायाची स्फूर्तिच विधिनयनीं चमके,

त्या नयनांनीं बघतां गालीं लाली ही फडके !

चुंबन घेतां येतिल गालचि हे श्‍वासासरसे

वार्‍यावर वाहुनीच चुंबन ओठांसह खासे

सहज मुखावर हंसें खेळतां गालीं गोड खळ्या,

फुटती मुग्धचि आनंदाच्या तयांतुनी उकळ्या !

ओठ कशाचे-देंठचि फुलत्या पारिजातकांचे;

हास्यरसाचे करी मोगरा सांचे कलिकांचे !

कां हंसते सारखी अशी ही ? नेत्रहि हंसती कां ?

फुलें झेलि चालती बोलती ललितदला लतिका !

कीं भावी प्रणयाचें अत्तर हृदयपुष्प पिळुनी--

बालमदन करि; उडे हास्यमय सुवास दरवळुनी.

किंवा कांहीं क्रियाच इजला येत नसे दुसरी

निष्कारण म्हणुनीच सदाची मुद्रा ही हंसरी ?

नखें पदतलीं, कीं वर्खाच्या टिकल्या चकचकत्या !

कापुनि कच्चीं पोंवळींच मृदु केल्या का चकत्या !

करांगुलीमधिं बालमुद्रिका विराजते भद्रा,

पवित्रतेच्या सम्राटाची हीच राजमुद्रा !

तिलक गोजिरे गोंदवणाचे हिरव्या रंगाचे,

शुभ्र मुखावर तुषार कुठल्या दिव्य तरंगाचे ?

निळ्या नभीं कर शुभ्र तारका जमवितात मेळ,

शुभ्रमुखनभीं इथें निळ्याशा तारांचा खेळ !

इचा उद्यांचा धनी कोण , हें ठरवावें म्हणुनी,

पुण्याईचें गणित करित विधि दशांशचिन्हांनीं !

लाल छटा वदनिंची नभींच्या शुभ्र मौक्‍तिकांत

कोर बालचंद्राची विलसे संध्याहृदयांत !

रक्त कपालीं दिला रक्ततर कुंकुमतिलक बरा,

अरुणपटावर मांगल्याचा नव मंगलतारा !

चिमण्या देहा शोभविणारी चिमणीशी साडी

नीटनेटकी नेसवुनी हिस कोण कुठें धाडी ?

घालित बाला चित्रिंचेच का चित्र अलंकार ?

स्वप्नांतिल संसार कुणाच्या घे कीं अवतार ?

केला विधिनें स्त्रीत्वाचा हा टीचभरचि नमुना,

नवतीर्थास्तव हिंडति संगततनु गंगायमुना ?

गर्भजन्य या उपाधि भोगी कीं ही तदतीता

कीं भूमींतुनि अशीच वर ये ही दुसरी सीता ?

उषा-चंद्रिका जणूं भेटल्या; त्या संगमकालीं

तांबुस धवलहि रस पाझरतां काय त्यांत न्हाली !

किंवा स्वर्गांतुनि ही सुटुनी आली आतांच,

नंदनवनिंचा मंद वात तरि करि भंवतीं नाच !

महाकवींच्या कल्पनेंतली भावमूर्ति का ही

बलवत् भावें स्फुटतर होउनि वस्तुरुप वाही ?

पहा थांबली विभ्रमललिता सलीलगति बाला,

बालभाव मनिं विमल, जोडि करयुग परमेशाला,

अहा ! कोणता भाव असे हा पापमना न कळे !

द्रवुनि भक्तिनें आत्मा सारा देहीं कीं खेळे !

देवमनीं निजभक्ताविषयीं वसे भावना जी

भावरुप ती काय खेळते या हृदयामाजीं ?

शुद्ध भाव हा तिच्याच मनिंच्या पुण्याचा वारा,

हाच भाव, भगवंता ! आतां जगत्‍त्रयीं पसरा.

हात जोडुनी विमले बाले ! मागितलें काय ?

स्फूर्तिनेंच कीं पावित्र्याच्या नत झाला काय !

जें पावन, जें विशुद्ध, त्याची तूं मंगलमुर्ति,

देव कोणती करील आतां तव आशापूर्ति ?

तुझ्या मनींचा विमल भाव हा कळतां तया क्षणीं

दगडाचा देवही वांकविल देह तुझ्या चरणीं !

स्वर्गहि तुजवर धरिल सारखी दिव्याची गळती !

त्वदर्शनपुण्याला मुकले गतमुनि हळहळती !

तीर्थें, पुण्यें, देवदेवता ज्यां पाहुनि पळती,

तसलीं पापें नेत्रकिरण तव पडतां क्षणिं जळतीं !

टाक नजर एकदां तरी ती या पाप्यावरती---

स्वर्गिं सहज तरि जाण्याइतकी पुण्याची भरती.

शुद्धभाव-परिपूर्ण मनीं क्षण मजला जाऊं दे,

कवित्व पावन करुन घ्याया जराच राहूं दे.

ओघ एकदां त्या कवितेचा जगांत वाहूं दे.

नांव तरी पापाचें उरतें का मग पाहूं दे.

मम हृदयाच्या हिंदोळ्यावर चल ये घे झोले,

त्यांतुनि निघत्या कवनश्वासें विश्व सहज डोले !

कवनस्फूर्ती, मंगलमूर्ति, जराच धांव गडे !

दिव्य सुधारस वर्पूं जगतीं ये जिकडेतिकडे !

अहा ! चालली बाला टाकुनि मज संशयवादीं

रंगत गुंगत दंग सदा ती आपल्याच नादीं !

नवल न तिजसह नेत्र जरी मन हे भिरभिर फिरती,

भुलतें, खुलतें, डुलतें विश्वचि तिजभवंतीं !

पावित्र्याची उषा काय, कीं कळी पूर्णतेची ?

आशी; कीं ही जगास पुढच्या प्रभुतन्मयतेची !

किंवा कांहीं तरल कल्पना कुणास आठवली,

नटवावी कशि कवनीं ती या विचारिं मति रमली.

तोंच चुकवुनी डोळा धांवे कल्पनाच बाल

स्वच्छंदानें पांगरल्याविण शब्दाची शाल !

पवन पिउनि मग तिचि होत का अशी बालमूर्ति ?

बाला कसली ?---खास तीच ही नवकवनस्फूर्ति !

भरभर फिरते नग वार्‍यावर ताराया जगता

कुण्या कवीची चुकलीमुकली चिमुकलीच कविता !

मूर्तिमती कविताच यापरी हृदया हालवितां

’गोविंदाग्रज’ ही गाई मग चिमुकलीच कविता !

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP