मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
सख्या ! सांगसी बोध हिताच...

राम गणेश गडकरी - सख्या ! सांगसी बोध हिताच...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


सख्या ! सांगसी बोध हिताचा चातुर्याचा तसाच हा ॥

व्यवहाराच्या परी संगती प्रीति होईना सुखावहा ॥

दळादळाची पुरी खुलावट फूल उमलतें जरी ॥

रसिक भ्रमरा तरीच वाटे गुंगावेंसें तदंतरीं ॥

मेघांआडुनि रविकिरणें जरि स्पष्ट दर्शनें नच देती ॥

फुलें खालतीं काय उमलती ? किंवा रसरंगा येती ?

मूठ झांकली लाखाची ती भरिते जरि चालू तूट ॥

दैव उद्यांचें पाहावया परि उघडावी लागे मूठ ॥

गंगास्नानें पावन व्हाया इच्छा झाली जरी मना ॥

देहावरचें वस्त्र वस्त्र तरि दूर करावें लागे ना ? ॥

प्रीतीची रसगंगा बघतां जीव विकारी असे जरी ॥

शिष्ट कल्पना त्यजुनि तयाच्या होतो आत्मा अविकारी

हृदयार्पण जरि करणें आहे स्पष्ट दान तरि करावया ॥

अश्रुजलासह अर्पावं या पुण्यमार्ग एकच सखया ॥

स्वप्रेमातें लपवायाचा बोध तुझा लाभो तुजला ॥

’गोविंदाग्रज’ वाहिल प्रेमा हृदयासह निजअश्रुजला ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP