मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
नमो पांडुरंगा ! नमस्ते श...

राम गणेश गडकरी - नमो पांडुरंगा ! नमस्ते श...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


नमो पांडुरंगा ! नमस्ते श्रीरंगा । रुक्मिणीच्या रंगा नमोनमः ॥१॥

सर्वा मंगळाचा एकरुप निधि । तूंच देवा विधि-हरिहर ॥२॥

ऐकिल्या देवांच्या तेहतीस कोटी । तीं रुपें गोमटीं देवा तुझीं ॥३॥

निर्गुणाचें ब्रह्म सगुणाची मूर्त । दोहीं ठायीं कीर्त एका तुझीं ॥४॥

म्हणे ’x x ’ अगा पंढरीच्या देवा । अनामिक सेवा घ्यावी आतां ॥५॥

१.

कवित्वाचा येथें वाहिला मीपणा । लक्ष्मीनारायण तुझे पायीं ॥१॥

गणांमात्रांचा तो नको ताळेबंद । नको वृत्त छंद नाम गाया ॥२॥

विना कानामात्रा आणिक वेलांटी । लेखन-कामाठी मांडिली हे ॥३॥

साहित्याची कळा झाली तिर्‍हाईत । शुद्धाशुद्धातीत नाम तुझें ॥४॥

म्हणे ’x x ’ जें जें मनीं मुखीं आलें । तें तें येथ झालें ब्रह्मार्पण ॥५॥

२.

क्षणमात्र थांबा असंगाच्या संगा । अहो पांडुरंगा कृपावंत ॥१॥

मनाचा मुहूर्त साधुनि हा आज । सोडूनिया लाज बोलतों मी ॥२॥

माझ्यावरी मीच मांडीन फिर्याद । तुझ्यापायीं दाद मागावया ॥३॥

नका देवराया धरुं भीडभाड । कराल तो निवाड मान्य आहे ॥४॥

म्हणे ’x x ’ देवा रखुमाईच्या कांता । परी दूर आतां नका राहूं ॥५॥

३.

जीवेंभावें देवा आम्ही अमंगळ । जातीचे चांडाळ, थोर नांवें ॥१॥

पांडुरंगा आम्ही युगांचे दुर्जन । क्षणाचे सज्जन पश्चात्तापें ॥२॥

व्रत एकादशी मात्र हें देहाशीं । नित्य मनापाशीं दिवाळीच ॥३॥

नांवाचेच साव आम्ही थोरथोर । मनाचे हे चोर सर्वकाळ ॥४॥

तुझे पायीं आतां चोरी नसे कांहीं । म्हणे ’x x ’ नाहीं भयभीत ॥५॥

४.

मागायाची आहे मेख । तुजपाशीं हीच एक ॥१॥

सुखदुःखें हीं केवळ । जन्मा आलियाचें फळ ॥२॥

इंद्राचंद्रा कर्मरेखा । तेथें माझी कोण लेखा ? ॥३॥

हेंचि एक द्यावें दान । घडी कांहीं तुझें गान ॥४॥

म्हणे ’x x ’ हीनदीन । मृगजळींचा हा मीन ॥५॥

५.

नाहीं भक्तिभाव नीट । तरी हांक मोकली तो धीट ॥१॥

नाहीं मुक्तीचा हव्यास । नसे नामाचाही ध्यास ॥२॥

नेमधर्म कोणा ठावा । एकरुप उजवाडावा ॥३॥

तुम्ही यावें आम्हांसाठीं । कवित्वही न ऐसें गांठीं ॥४॥

म्हणे ’x x ’ हांके साच । अधिकार पाप हाच ॥५॥

६.

आला गोपगोपींसाठीं । देवा तुम्ही यमुनाकांठीं ॥१॥

पुंडलिका द्याया भेटी । देव आले वाळवंटीं ॥२॥

नामयाच्या कारणीं । राउळाचीही फिरवणी ॥३॥

दामाजीच्या संकष्टीं । विठू धेड होई कष्टी ॥४॥

म्हणे ’x x ’ मायबापा । भीशी काय माझ्या पापा ॥५॥

७.

धन्य धन्य माझें पाप । तुज आणिल आपोआप ॥१॥

माझ्या पातकांची रास । देवा पाडील इरेस ॥२॥

"आजवरी थोरथोर । पायीं नेले पतित घोर-॥३॥

परि याचें पाप फार । पाहूं होतो का उद्धार" ॥४॥

म्हणे ’x x ’ ऐशा भरीं । देवा याला माझ्या घरीं ॥५॥

८.

नेघे देवा तुझ्या नांवा । तुझा माझा उभा दावा ॥१॥

नामें उद्धरिले सारे । मीच एक राहिन बा रे ? ॥२॥

तुझ्या नांवा गालबोट । सुखें खावे दांतओठ ॥३॥

पाहूं बोलाविल्यावीण । हरी का तें माझा शीण ॥४॥

देवा तुझी घ्याया लाज ॥ ’x x ’ ठाकलासे आज ॥५॥

९.

काय महिमा नामांकित । आज दाखवा प्रचीत ॥१॥

पूर्वीं नांव झालें फार । नको त्याचा बडिवार ॥२॥

दाविं मज प्रत्यय कांहीं । नको संतांची ग्वाही ॥३॥

देणेंघेणें हातोहात । उधारीची नाहीं बात ॥४॥

धन्य ’x x ’ भाग्यवंत । देवा तुझा पाही अंत ॥५॥

१०.

काळयवनाच्या भेणें । दडी पाण्यापोटीं देणें ॥१॥

धाकें आणि दैत्याच्याच । मोहिनीचा केला नाच ॥२॥

काच बळीचा अगोचर । देवा झाला मूठभर ॥३॥

परि येतां पापें माझीं । कुठें दडला देवाजी ? ॥४॥

म्हणे ’x x ’ धीटपाठ । येथें अस्सलाशीं गांठ ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP