मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
रंग गुलाबी संध्या पसरी पश...

राम गणेश गडकरी - रंग गुलाबी संध्या पसरी पश...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


रंग गुलाबी संध्या पसरी पश्चिम दिग्भागीं,

समोर पूर्वा स्वमुख रंगवी त्याच रम्य रंगीं.

परी पशिच्माहृदयिं तांबडें सूर्यबिंब विलसे,

कशी रंगली पूर्वा याचें कारण कांहिं नसे.

विनोदचतुरा मुग्धा बाला विचारि निज नाथा,

"शास्त्रज्ञा, पंडिता, उलगडा हें कोडें आतां !

अपरा वदनीं रमते लाली रविसहवासानें,

रवि नसतां परि कां रंगावें प्राचीच्या वदनें ?

रंग इकडचा तिकडे वठला, छटा कुठुनि गेली ?

ही जादूची नजरबंदि कुणिं कधीं कशी केली ?"

विनोदपंडित पति कौतुकला, हंसे तसा थोडें;

ओठ गुलाबी, गाल गुलाबी, गुलाबीच कोडें !

वदे तिला, "हें रहस्य असलें कथीन कानांत !"

करि कंठीं कर एक, दुज्यानें धरि दुसरा हात !

ओढुनि जवळी, ऐकविला तिस मुकाच कानांत,

---गालावरचें गीत कसें तें वठवूं गानांत !

दूर सरकतां लज्जित बाला, प्राणनाथ बोले

"बघ हृदयाच्या आरशांत जें चित्र तुझें डोले !

रविबिंबासम चुंबन-बिंबचि विलसत या गालीं !

सहज तयाची छटा गुलाबी पसरे भंवतालीं.

चुंबनचित्र न परी उमटतां या दुसर्‍या गालीं,

सांग वल्लभे ! नाचतसे कां त्यावरिं ही लाली !

रंग इकडचा तिकडे वठला, छटा कुठुनि गेली ?

ही जादूची नजरबंदि कुणिं कधीं कशी केली ?"

"कांठयानें काढावा कांटा", शास्त्रज्ञा ठावें,

गुलाब टाकुनि गुलाबास मग कां नच उडवावें ?

हीं हृदयाचीं कोडीं सोडवि हृदयांचा मेळ,

शास्त्रांना हा कसा कळावा हृदयाचा खेळ !

ओठगोष्ट मग कशीं बोललीं तीं मिटलीं तोंडें,

’गोविंदाग्रज’ रसिकां टाकी गुलाबीच कोडें !

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP