मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
प्रेमा ! उठ ----चल उघड ...

राम गणेश गडकरी - प्रेमा ! उठ ----चल उघड ...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


प्रेमा ! उठ----चल उघड, झाकली मूठ !

तुंबळ सागर तव खळबळला,

हृदयीं तटवूं त्यास कशाला ?

जगभर लाटा उधळायाला

दिली तुज सूट-चल उघड, झाकली मूठ !

कोंडुनि असला सागर धरिला,

माझा मुर्खपणा मज कळला,

मिळतां स्थल तुज नाचायाला

करीं रे लूट-चल उघड, झांकली मूठ !

क्षणभर वाटत होतें मजला,

कीं तव ओघ आटुनी गेला,

परि जो अखंड भरला त्याला

कशाची तूट ?---चल उघड, झाकली मूठ !

उगवे सूर्य काल मावळतां,

फिरुनी फुलतें फूलहि मिटतां,

प्राणजीवना, तुजही शिवतां,

मरण हें झूट--चल उघड, झाकली मूठ !

द्वेषावरतीं, दुःखावरतीं,

फिरवी तुझ्या यशाची महती,

जा, जा, नाच सर्वहि जगतीं,

धांव बेछूट---चल उघड, झाकली मूठ !

विसरुनि जाऊं अनुभवजाला,

तुडवूं पायीं चल खेदाला !

टाकूं जाळुनि नैराश्याला !

दुःख सब् झट ।---चल उघड, झाकली मूठ !

तुझिया श्वासाच्या उद्‌गारें

टाकूं भरुनी जग हें सारें,

एकच नादें करुं आतां रे,

सुखाची लूट---चल उघड, झाकली मूठ !

मी तूं दूर न राहूं आतां,

दाखवुं शक्ती अपुली जगता,

आणूं परमेश्वरही हातां,

ऊठ रे ऊठ--चल उघड, झाकली मूठ !

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP