मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र| अध्याय ॥२०॥ श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र ग्रंथानुक्रम विषयानुक्रमणिका कृताञ्जलिः प्रस्तावना सारस्वतांचें मूळ श्रीगुरुपरम्परा अध्याय ॥१॥ अध्याय ॥२॥ अध्याय ॥३॥ अध्याय ॥४॥ अध्याय ॥५॥ अध्याय ॥६॥ अध्याय ॥७॥ अध्याय ॥८॥ अध्याय ॥९॥ अध्याय ॥१०॥ अध्याय ॥११॥ अध्याय ॥१२॥ अध्याय ॥१३॥ अध्याय ॥१४॥ अध्याय ॥१५॥ अध्याय ॥१६॥ अध्याय ॥१७॥ अध्याय ॥१८॥ अध्याय ॥१९॥ अध्याय ॥२०॥ अध्याय ॥२१॥ अध्याय ॥२२॥ अध्याय ॥२३॥ अध्याय ॥२४॥ अध्याय ॥२५॥ अध्याय ॥२६॥ अध्याय ॥२७॥ अध्याय ॥२८॥ अध्याय ॥२९॥ अध्याय ॥३०॥ अध्याय ॥३१॥ अध्याय ॥३२॥ अध्याय ॥३३॥ अध्याय ॥३४॥ अध्याय ॥३५॥ अध्याय ॥३६॥ अध्याय ॥३७॥ अध्याय ॥३८॥ अध्याय ॥३९॥ अध्याय ॥४०॥ अध्याय ॥४१॥ अध्याय ॥४२॥ अध्याय ॥४३॥ अध्याय ॥४४॥ अध्याय ॥४५॥ अध्याय ॥४६॥ अध्याय ॥४७॥ अध्याय ॥४८॥ अध्याय ॥४९॥ अध्याय ॥५०॥ अध्याय ॥५१॥ अध्याय ॥५२॥ अध्याय ॥५३॥ अध्याय ॥५४॥ अध्याय ॥५५॥ अध्याय ॥५६॥ अध्याय ॥५७॥ अध्याय ॥५८॥ अध्याय ॥५९॥ अध्याय ॥६०॥ अध्याय ॥६१॥ अध्याय ॥६२॥ अध्याय ॥६३॥ आरती श्री सद्गुरुंची मंगल पद चित्रारपुरगुरुपरम्परावन्दनम् श्रीशंकरनारायणगीतम् शरणाष्टकम् आरती श्रीगुरुपरंपरेची श्रीमत् पांडुरंगाश्रम स्वामींजी आरती सद्गुरुंची आरती चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥२०॥ सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय. Tags : chitrapurpothiचित्रापुरगुरुपरंपरापोथी अध्याय ॥२०॥ Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीकेशवाश्रमगुरुभ्यो नमः ॥ श्रीभवानीशंकराय नमः ॥ॐ॥ जय जय पंचम केशवाश्रमा । कोण देवा उद्धरील आम्हां । तुजवांचोनि अज्ञांच्या क्रोध-कामा । जाळील कवण हो स्वामी ॥१॥ आंधळ्या हातीं जैसी काठी । तैसी तुझी मूर्ति गोमटी । सदा राहे भक्तांपाठीं । रक्षिसी संकटीं त्यांसी पैं ॥२॥ ऐसी तूं आमुची माउली । भक्तांसाठीं वेगें धांवली । आणिक कांहीं काज ना या वेळीं । अवनीं यावया तुजला वें ॥३॥ तुज नाहीं जनन - मरण । परी तूं येसी भक्तांकारण । येथें अवनीवरी बापा जाण । काय काज तुजलागीं ॥४॥ शिक्षकासी नाहीं शिकणें । परी शाळेसी जाई नेमानें । मुलांसी शिकवायाकारणें । जावें लागे त्यासी पैं ॥५॥ तैसें देवा भक्तांकारण । घेसी अवतार तूं बा जाण । परी न लागे तुजला बंधन । प्रपंचाचे पाहीं पां ॥६॥ जरी राहिलास तूं प्रपंचीं । तरीही न लागे ममता त्याची । सारें तुजला आत्मरूपचि । तेव्हां कैंचे बंधन पैं ॥७॥ ज्यासी असे मीतूंपण । त्यासीच हें सारें बंधन । तूं तरी गुरुराया संन्यासी पूर्ण । तेव्हां कैचें बंधन तुजलागीं ॥८॥ तुज विषम नाहीं कांहीं कांहीं एक । सारें जग तुजला देख । ब्रह्मरूपचि भासे सम्यक । नाहीं संशय यामाजीं ॥९॥ आतां दुजें न मागें कांहीं । एकचि मागतों मजला देईं । तुजवांचोनि कोणी नाहीं । द्यावया अन्य समर्थ पैं ॥१०॥ 'अर्चन' भक्ति पंचम आतां । देईं दयाळा शमवीं चित्ता । ऐसी प्रार्थना करितों ताता । भक्तवत्सला करुणाळा ॥११॥ असो आतां ऐका सज्जन । मागील अध्यायीं केलें निरूपण । श्रीशंकराश्रम - स्वामींचें महिमान । मल्लापुर येथील समाधीचें ॥१२॥ आतां सांगू श्रीकेशवाश्रम - । स्वामी यांचे सद्गुण परम । उत्कृष्ट असुनी दाविला सुगम । मार्ग जनांसी प्रेमानें ॥१३॥ शंकराश्रम मुक्त झालियाउपरी । यांसी बेसविती गादीन वरी । स्वधर्म-राज्याचे अधिकारी । करिती सारस्वतवृंदाचे ॥१४॥ मूर्ति असे परम सुंदर । ब्रह्मतेज झळके मुखावर । म्हणती साक्षात् विष्णूचा अवतार । भेटला आम्हां जगतीं या ॥१५॥ जनांलागीं अति प्रेमानें । बोधुनी आकर्षिलें जवळी तयानें । युक्तीनें भक्ति वाढविली जेणें । होईल समाधान ज्यापरी ॥१६॥ ऐसें करितां जनांलागीं । भक्ति विशेष उपजली वेगीं । आमुच्या मठाचे सद्गुरूचि हे जगीं । आमुचा उद्धार करितील ॥१७॥ आम्हांसी पाहिजे सद्गुरुराय । मठ इत्यादि हेंचि सुखमय । याहुनी आणिक जगतीं ना प्रिय । ऐसी भावना दृढ झाली ॥१८॥ 'आमुचें' ऐसें ज्याचें मन । त्यासी त्याची चिंता जाण । म्हणोनि त्याचा अभिमान । वाहुनी रक्षण तो करी ॥१९॥ म्हणोनि येथें 'मठ आमुचा'। ऐसा भाव धरी जो साचा । तो वाहे सहजचि मठाचा । अभिमान सारा प्रेमानें ॥२०॥ जेव्हां ऐसा अभिमान वाहे । तेव्हां तो करी त्याचें पाहे । रक्षण, 'माझें' म्हणोनि हें । अतिप्रेमानें अवधारा ॥२१॥ असो यापरी बहुत जन । घेती मठाचा अभिमान । करिती विचार सकल मिळोन । वर्गणी द्यावी आम्हीं पैं ॥२२॥ ऐसा ठराव करोनि देख । देती वर्गणी मठासी प्रत्येक । प्रतिवर्षीं पाठविती रोख । आपापुल्या ग्रामांतुनी ॥२३॥ ज्याच्या त्याच्या उत्पन्नापरी । देती वर्गणी शक्त्यनुसारी । तेव्हां मठासी सहजचि निर्धारीं । ऊर्जित स्थिति आली पैं ॥२४॥ घेतलीं कांहीं शेतें सुंदर । उत्पन्न स्वल्प वाढलें साचार । नाना उत्सव करिती थोर । मठामाजीं त्या काळीं ॥२५॥ असो सद्गुरु केशवाश्रम - । स्वामी आमुचे शांत परम । पूर्णज्ञानी आत्माराम । बघतां प्रेम उद्भवे पैं ॥२६॥ महिमा अपार न वर्णवे कवणा । अमुक ऐसी न होय कल्पना । तशांतही आम्हां अज्ञ जनां । कैसें समजेल सांगा हो ॥२७॥ सूर्याचा प्रकाश आंधळ्यासी । पुसतां कैसें सांगवेल त्यासी । तैसें आम्हां अज्ञ जनांसी । कैसी वर्णवेल महिमा ती ॥२८॥ परी त्या सद्गुरूच्या प्रसादें । जितुकें शक्य तितुकें आनंदें । करूं वर्णन आतां स्वच्छंदें । परिसा सज्जन भाविक हो ॥२९॥ 'मुर्डेश्वर' या नामें एक । खेडें असे शिरालीनजीक । तेथें होता एक भाविक । सारस्वत ब्राह्मण पैं ॥३०॥ तो करीतसे रात्रंदिन । केशवाश्रम - सद्गुरूंचे स्मरण । आणि कधीं कधीं भेटे जाऊन । स्वामींसी परम प्रीतीनें ॥३१॥ किंचित् न धरी मनीं कामना । सदा करी तो नामस्मरणा । वारंवार करी प्रार्थना । देईं भक्ति मज देवा ॥३२॥ याहुनी न मागे कधीं कांहीं । सद्गुरुसंनिधीं खचितचि पाहीं । ऐसें असतां उदया येई । पुण्य त्याचें त्या काळीं ॥३३॥ झाला त्यासी एक पुत्र । परम तेजस्वी अति सुंदर । बघतां होय मन सत्वर । आनंदित सकलांचें ॥३४॥ झालें बाळ सुंदर बहुत । वर्षें झालीं त्यासी सात । परी न बोलेचि तो सुत । मुका म्हणती त्यासी पैं ॥३५॥ परी या गृहस्थाप्रति । न वाटे अणुमात्र त्याची खंती । पत्नी सांगे दिवसरातीं । स्वस्थ कां हो बैसलां ॥३६॥ तुम्ही भजतां स्वामींसी । त्यांच्या चरणीं घाला यासी । नातरी याची गति कैसी । सांगा पुढें होईल ती ॥३७॥ तुम्हां नाहीं अणुमात्र चिंता । सदा परमार्थीं घालितां चित्ता । परी न सुटे संसार सर्वथा । मजलागीं हा पाहीं हो ॥३८॥ तरी करा माझ्यावरी । उपकार आणि चला निर्धारीं । संनिधीपाशीं प्रार्थना सत्वरी । करोनि चरणीं या घाला ॥३९॥ यावरी बोले तो भक्त तियेसी । काय मागावें सद्गुरूपाशीं । सांगतों आतां परियेसीं । चित्त देउनी अवधारीं॥४०॥ ठेविलें राजानें अन्नछत्र । त्यापाशीं मागितलें किंचित तक्र । तेव्हां हंसतील जन समग्र । काय मंदमती म्हणोनि ॥४१॥ तेव्हां त्यासी पाहुनी खचित । आश्चर्य वाटेल राजाप्रत । म्हणे मानसीं यासी विदित । नाहीं मी राजा म्हणोनि ॥४२॥ तैसें येथे सद्गुरुराज । शाश्वत सुख द्यावया सहज । समर्थ असतां की म्हणावें मज । नश्वर प्रपंच द्या देवा ॥४३॥ ऐसें मागतां सद्गुरुराय । हंसतील मज बघुनी सदय । म्हणोनि न मागें मी सांगतों निश्चय । सद्गुरुमाउलीजवळी हें ॥४४॥ पुत्र धन दारा सारें । नश्वर म्हणोनी सदा न उरे । उगीच माझें म्हणोनि मरे । न मानत्र अहंता धरोनि ॥४५॥ जें घ्यावें सद्गुरूपासोन । तें न घेतां भलतेंचि मागतां जाण । होय आपुलेंचि नुकसान । नसे अनुमान यामाजीं ॥४६॥ नुकसान काय म्हणसी जरी । तरी सांगतों तें अवधारीं । उगीच खिन्न न व्हावें अंतरीं । वृथाचि जाण गे पाहीं ॥४७॥ जो द्यावया समर्थ अमृत । तें न मागतां दूध मागत । तरी येथ आपुलीच हानि होत । हें न कळत अज्ञांना ॥४८॥ ज्यानी मिळे हो अमृत । तो होय अमरचि त्वरित । तैसें ते दवडुनी दूध घेत । यासी काय या म्हणावें ॥४९॥ तैसें येथें सद्गुरुमाय । समर्थ असे दावाया चिन्मय । स्वरूप आपुलें, देउनी अभय । निजभक्तांसीं ती पाहीं ॥५०॥ म्हणोनि ऐशा गुरुसंनिधीं । काय मागावें हें आधीं । विचारूनि मानसीं त्या पदीं । शरण जावें मग पाहीं ॥५१॥ तरीच देईल तो करुणार्णव । खऱ्या सुखाचें जाण वैभव । त्याहुनी आणिक सुख तें अपूर्व । सांग आहे कैंचें तें ॥५२॥ हा नव्हे तुझा पुत्र । वृथा न करीं प्रेम अणुमात्र । धरीं तूं मार्ग परम पवित्र । परमार्थाचा बहु सुलभ ॥५३॥ जरी धरिला अति मोह । तरी न राहे हा शाश्वत देह । म्हणोनि न करीं तूं याचा संग्रह। अशाश्वत प्रेमाचा ॥५४॥ जें आपुलें खरें स्वरूप । त्याचा न होय कदापि लोप । ऐसे तें निजरूप दावी अमूप । सद्गुरुराणा तो माझा ॥५५॥ ऐशा त्या सद्गुरूपाशीं । विषय मागतां लाज वाटे मजसी । म्हणोनि घडीघडी येविषीं । बोलूं नको मजपाशी तूं ॥५६॥ ऐसें ऐकतां पतीचें वचन । झाली मानसीं क्रोधायमान । बैसली तेव्हां करीत रुदन । आळवी स्वामींसी त्या समयीं ॥५७॥ म्हणे देवा केशवाश्रमा । अपार ऐकिली तुझी महिमा । आमुच्या पतीनें जाळुनी कामा । टाकिलें सर्व निधारें ॥५८॥ त्यासी नको हा संसार । मजसाठीं तूं देईं साचार। माझा एकचि असे पुत्र । मुका जाण तो पाहीं ॥५९॥ हें असे तुजला विदित । म्यां काय सांगावें येथ । त्वांचि समजुनी शिकवीं त्याप्रत । बोलावयासी दयाळा ॥६०॥ मज नाहीं भक्ति-प्रेम । मीं भजलें तुजला सकाम । म्हणुनी नत्र अव्हेरीं, सुगम - । मार्ग दावीं तूंचि पैं ॥६१॥ ऐसी नानापरी करुनी प्रार्थना । चित्तीं आठवी श्रीगुरुराणा । मग ती रात्रीं ललना । पहुडे आपल्या शय्येवरी ॥६२॥ तेचि दिनीं रात्रीं स्वप्नीं । गेली शिराली - ग्रामीं तेथुनी । घेतलें दरुशन स्वामींचें ते क्षणीं । मुलासहित तियेनें ॥६३॥ स्वामींनीं दिधलें अभयवचन । ना भीं बाळे तूं न करी रुदन । तुझा पुत्र सुखसंपन्न । होईल जाण निर्धारें ॥६४॥ इतुकें सांगुनी झाले अदृश्य । स्वामी आणि मठ विशेष । मग पाहतां अंथरुणीं खास । असे ती नारी आपुल्या गृहीं ॥६५॥ होतां संपूर्ण जागृत । जाहली मानसीं विस्मित । आनंद न मावे गगनांत । परी न सांगे कवणाप्रति ॥६६॥ मग दोन दिवस गेलियावरी । तया भक्तासी रात्रीं निर्धारीं । येउनी स्वामी स्वप्नामाझारीं । बोलते झाले तें ऐका ॥६७॥ अगा मद्भक्ता विरक्ता । घेउनी येईं तुझिया सुता । दरुशन करवीं आणुनी आतां । आज्ञा आमुची तुजलागीं ॥६८॥ इतुकें बोलुनी केशवाश्रम । सद्गुरु ते सद्गुण-ग्राम । अदृश्य जाहले क्षणेंचि परम । भाविक भक्तासी भेटोनी ॥६९॥ तेव्हां तो झाला जागृत । पत्नीसी सांगे वृत्तांत । श्रीसद्गुरुस्वामी - मठाप्रत । जाऊं आजि शिराळीसी ॥७०॥ जाहला जो स्वप्नीं दृष्टांत । तो निवेदिला तिजला समस्त । ऐकतां बोले हर्षयुक्त । पत्नी आपुल्या पतीप्रती ॥७१॥ म्हणे ऐका प्राणनाथा । मजही स्वप्न पडिलें, आतां । सांगतें तुम्हांलागीं सर्वथा । असत्य न सांगें मी पाहीं ॥७२॥ दोन दिवस झाले खास । स्वप्न देखिलें परम सुरस । श्रीस्वामींनी सांगितलें, आम्हांस । भेट बालकास घेउनी ॥७३॥ आणि एक सांगितली खूण । तुझा बाळ करील भाषण । ना भीं तूं ऐसें वचन । बोलिले जाण मजलागीं ॥७४॥ यावरी बोले तो सद्गुरुभक्त । काय महिमा सांगूं अद्भुत । चला जाऊं आतां त्वरित । घेऊं दर्शन त्यांचे पैं ॥७५॥ ऐसें बोलुनी तो भक्त । गेला कांता-पुत्रासहित । शिराली - ग्रामीं श्रीमठांत । घेतलें दर्शन स्वामींचे ॥७६॥ तेव्हां बोलती स्वामिराय । घालीं आमुच्या पदीं तनय । ऐकतां चित्तीं पावती विस्मय । पतिपत्नी उभयतां ॥७७॥ गुरु - आज्ञेपरी घातला पायीं । मग तो ठेविता झाला डोई । तास झाला तरी नुचले पाहीं । तो बाळ आपुलें मस्तक ॥७८॥ स्फुंदस्फुंदोनि रहूं लागला । स्वामी उठविती स्वकरें तयाला । म्हणती भिऊं नको तूं बाळा । होईल कल्याण तुझें बा ॥७९॥ ऐसें म्हणोनि ठेविला हस्त । त्याच्या मस्तकीं प्रेमभरित । तेव्हां त्याच्या मातेप्रत । झाला आनंद अमितचि ॥८०॥ असो मग तीं उभयतां । चार दिवस राहिलीं तत्त्वतां । पादपूजादि करूनी चित्ता । पावलीं समाधान त्याकाळीं ॥८१॥ घेतला मंत्र उपदेश जाण । केलें मुलाचें मौंजीबंधन । मुलगा हळूहळू करी भाषण । अद्भुत महिमा श्रीगुरूंची ॥८२॥ मग ती गेलीं पुत्रासहित । आपुल्या ग्रामीं पहा त्वरित । सकल विद्या - पारंगत । झाला पुत्र सुलक्षणी ॥८३॥ तोही शाला सद्गुरुभक्त । आत्मज्ञान पावला त्वरित । प्रपंच करुनी परमार्थ । करी तो प्रेमें सद्भावें ॥८४॥ आणि माताही त्यापरीच । पुढें झाली विरक्त साच । निष्काम भजे ती स्वच्छ । नसे संशय अणुमात्र ॥८५॥ आधीं होती जी परम कामिक । मग झाली निष्काम भाविक । सद्गुरुकृपाचि ही एक । खचितचि जाणा निर्धारें ॥८६॥ असो यापरी सद्गुरुमहिमा । काय सांगूं आतां तुम्हां । पहा कैसें त्यांच्या नामा । अद्यापिही गाती पैं ॥८७॥ कैसें त्यांचे भक्तप्रेम । लीला दावुनि पुरवी काम । ऐशा गुरूचें घेतां नाम । तुटे भवभय पाप्यांचें ॥८८॥ आधीं दावुनी लीला बहुत । मग हळूहळू दाविती सुपंथ । आकर्षिती परमार्थीं चित्त । निजभक्तांचें ते पाहीं ॥८९॥ कडू औषध द्यावयाकारण । माता मुलांसी काय करी आपण । गोड पदार्थ मुखीं घालोन । मग देई ती औषध पैं ॥९०॥ तैसें येथें साधु - संत । दावुनी किंचित् लीला अद्भुत । ओढिती परमार्थीं चित्त । निजभक्तांचें तें पाहीं ॥९१॥ हें सांगाया काय कारण । कीं श्रोते करितील प्रश्न । जरी सद्गुरुमहिमा आहे पूर्ण । तरी न व्हावें दुःख भक्तां ॥९२॥ कित्येक गुरुभक्त असती मोठे । त्यांवरी कासया येती संकटें । तेव्हां महिमा जाय कुठें । ऐसा प्रश्न उद्भवेल ॥९३॥ याचि प्रश्नाचें उत्तर । वरील दृष्टान्तें दिधलें साचार । कीं बाळासी देतां औषध कडुतर । गोड आधीं दे खावया ॥९४॥ तैसें येथे सद्गुरुमाय । अणुमात्र लीला दावुनी सदय । ओढिती प्रेमबळें समुदाय । निजभक्तांचा तो पाहीं ॥९५॥ अवतार घ्यावया काय कारण । केवळ जगाचें कराया कल्याण । आणिक कांहीं येथे काज न । येण्याचें त्या प्रभुलागीं ॥९६॥ भक्तसंकट पाहुनी अवनीं । तळमळ वाटे अंतःकरणीं । कीं 'देहचि हा मी' ऐसें समजुनी । व्यर्थ आयुष्य घालविती ॥९७॥ विषयचि गोड वाटे जीवा । आठवेना क्षणमात्र देवा । काय करावें ऐशिया सर्वां । म्हणोनि अवतरे प्रभुराय ॥९८॥ जधीं जधीं साधु होउनी प्रगटे । हराया जनांचीं नाना संकटें । परी जन आंधळे मोठे । न दिसती साधु तयांसी ॥९९॥म्हणोनि किंचित लीला दावितां । जन ठेविती भावना तत्त्वतां । तेव्हां तयांसी बोधितां । सहज ग्रहण होईल पैं ॥१००॥ जैसे व्यापारी जाहिराती । लिहिती तेथें नाना व्यक्ती । चमत्कारी चित्रें छापिती । कैशा कारणें तें सांगा ॥१०१॥ आपुला माल खरेदी व्हावा । ऐसा हेतु धरोनि नांवा । छापिती मालाच्या तेव्हां । जाहीर करिती व्यापारी ॥१०२॥ आपुलें नांव वाचावें लोकांनीं । ऐसा हेतु धरोनि स्वमनीं । नाना चित्रें त्यावरी छापुनी । लाविती जिथें तिथें तीं पाहीं ॥१०३॥ चित्रें बघतां अद्भुत विचित्र । लक्ष देती तेथें सत्वर । चित्र बघाया उत्सुक थोर । होय मन हें मानवांचें ॥१०४॥तेव्हां बघती जाहिरात । अमुक माल येथे मिळत । म्हणोनि छापिती चित्रें बहुत । व्यापारी जाण ते पाहीं ॥१०५॥ चित्रें बघावीं जनांनीं ऐसा । हेतु नाहीं त्यांच्या मानसा । केवळ माल विकावा सहसा । हेंचि व्यापारी इच्छिती ॥१०६॥याचिकारणें नाना चित्रें । जाहिरातीपुढें छापिती सर्वत्रें । तैसीं साधुपुरुषांची चरित्रे । असती जाणा निर्धारें ॥१०७॥ अर्थात् नाना लीला दाविती । चित्रांपरी असे खचित ती । चमत्कार पाहुनी जन भजती । म्हणोनि किंचित दाविती ते ॥१०८॥ परी हेतु न केवळ त्यांचा । उद्धारावें जनांसी साचा । लीला दावितां तरी याच्या । हृदयीं ठसेल तो बोध ॥१०९॥ ऐसा हेतु धरोनि मानसीं । करिती युक्तीनें बोध जनांसी देह । झिजविती दिवसनिशीं । काय महिमा वर्णावी ॥११०॥ याविण तयांसी न वाटे आपण । लीला दावोनि कीर्ति घेवोन । जनांसी फसवोन उदरंभरण । करावें ऐसें कदापिही ॥१११॥ म्हणोनि न दाविती बहुत लीला । जितुकी पाहिजे कार्याला । तितुकीच दावुनी निजभक्ताला । करिती उद्धार त्यांचा हो ॥११२॥ जेव्हां उपजे भक्ति त्याला । तेव्हां न दाविती त्यासी लीला । आणिक लावुनी कसाला । करिती उद्धार तयांचा ॥११३॥ पुढील अध्यायीं हेंचि कथन । सांगूं गुरुकृपें विस्तारोन । ऐकतां होईल संतुष्ट मन । प्रेमळ श्रोत्यांचें निर्धारें ॥११४॥ आनंदाश्रम-परमहंस । शिवानंदतीर्थ एकचि खास । यांच्या कृपाप्रसादेंचि विंश । अध्याय गुरुदासें संपविला ॥११५॥ स्वस्ति श्रीचित्रापुर - । गुरुपरंपराचरित्र सुंदर । ऐकतां नासती दोष समग्र । विंशतितमाध्याय रसाळ हा ॥११६॥ अध्याय २० ॥ ओंव्या ११६ ॥ ॐ तत्सत् - श्रीसद्गुरुनाथचरणारविंदार्पणमस्तु ॥ ॥छ॥॥ इति विंशतितमोऽध्यायः समाप्तः ॥ N/A References : N/A Last Updated : January 19, 2024 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP