मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र| अध्याय ॥३१॥ श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र ग्रंथानुक्रम विषयानुक्रमणिका कृताञ्जलिः प्रस्तावना सारस्वतांचें मूळ श्रीगुरुपरम्परा अध्याय ॥१॥ अध्याय ॥२॥ अध्याय ॥३॥ अध्याय ॥४॥ अध्याय ॥५॥ अध्याय ॥६॥ अध्याय ॥७॥ अध्याय ॥८॥ अध्याय ॥९॥ अध्याय ॥१०॥ अध्याय ॥११॥ अध्याय ॥१२॥ अध्याय ॥१३॥ अध्याय ॥१४॥ अध्याय ॥१५॥ अध्याय ॥१६॥ अध्याय ॥१७॥ अध्याय ॥१८॥ अध्याय ॥१९॥ अध्याय ॥२०॥ अध्याय ॥२१॥ अध्याय ॥२२॥ अध्याय ॥२३॥ अध्याय ॥२४॥ अध्याय ॥२५॥ अध्याय ॥२६॥ अध्याय ॥२७॥ अध्याय ॥२८॥ अध्याय ॥२९॥ अध्याय ॥३०॥ अध्याय ॥३१॥ अध्याय ॥३२॥ अध्याय ॥३३॥ अध्याय ॥३४॥ अध्याय ॥३५॥ अध्याय ॥३६॥ अध्याय ॥३७॥ अध्याय ॥३८॥ अध्याय ॥३९॥ अध्याय ॥४०॥ अध्याय ॥४१॥ अध्याय ॥४२॥ अध्याय ॥४३॥ अध्याय ॥४४॥ अध्याय ॥४५॥ अध्याय ॥४६॥ अध्याय ॥४७॥ अध्याय ॥४८॥ अध्याय ॥४९॥ अध्याय ॥५०॥ अध्याय ॥५१॥ अध्याय ॥५२॥ अध्याय ॥५३॥ अध्याय ॥५४॥ अध्याय ॥५५॥ अध्याय ॥५६॥ अध्याय ॥५७॥ अध्याय ॥५८॥ अध्याय ॥५९॥ अध्याय ॥६०॥ अध्याय ॥६१॥ अध्याय ॥६२॥ अध्याय ॥६३॥ आरती श्री सद्गुरुंची मंगल पद चित्रारपुरगुरुपरम्परावन्दनम् श्रीशंकरनारायणगीतम् शरणाष्टकम् आरती श्रीगुरुपरंपरेची श्रीमत् पांडुरंगाश्रम स्वामींजी आरती सद्गुरुंची आरती चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥३१॥ सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय. Tags : chitrapurpothiचित्रापुरगुरुपरंपरापोथी अध्याय ॥३१॥ Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीमत्पांडुरंगाश्रमगुरुभ्यो नमः ॥ श्रीभवानीशंकराय नमः ॥ॐ॥ जय जय सद्गुरो जगदीशा । भक्तवत्सला पुराणपुरुषा । करीं देवा भवभयनाशा । देउनी भक्ति मजलागीं ॥१॥ दृढ भक्ति असतां पूर्ण । मग कैंचे त्यासी बंधन । म्हणोनि देवा तीचि जाण । मागतों आतां तुजपाशीं ॥२॥ तुजला कैंचें असाध्य बापा । दाविसी झणींच मार्गा सोपा । तेव्हां सहजचि चुकती खेपा । जन्ममरणाच्या बा पाहीं ॥३॥आठवितां तुजलागोन । झणीं येसी हो धांवोन । नाहीं तुजला मानावमान । अणुमात्र स्तवितां भुलसी तूं ॥४॥ ऐसा तूं माझा सद्गुरु सदय । प्रकाशरूप अससी अद्वय । म्हणोनि धैर्यानें करितों कार्य । चरित्रलेखन या समयीं ॥५॥ जरी बोलिलों वेडें वांकुडे । तरी देवा तुजला आवडे । म्हणोनि करितों कवन मी थोडें । आतां तुजपुढें गुरुराया ॥६॥ तूंचि अससी सर्व जगांत । तुजवीण अन्य वस्तु नसे त्रिभुवनांत । तेवींच तू सर्व शब्दांत । अससी व्यापक हो पाहीं ॥७॥ म्हणोनि या कवनामाजीं । असे सच्चिन्मूर्ति तुझी । त्यावीण आणिक नाहीं दुजी । सत्व जाण गुरुराया ॥८॥ एवं शब्दशब्दांतरीं । तूंचि अससी व्यापक श्रीहरी । जैसें सुवर्ण अलंकारीं । तैसा शब्दीं तूं भरलासी ॥९॥ अलंकार करितां वेडा वांकुडा । जरी झाला कैसाही बापुडा । सुवर्णासी अणूएवढा । नाहीं संबंध त्याचा पैं ॥१०॥ तें न होय कधींही ओखटें । सुंदरचि असे तें गोमटें । जाडें वांकुडें नाजूक हें खोटें । नामरूप त्याचें पैं ॥११॥ मुद्रिका मणि नाम हें सारें । नाजूक गोल रूप हें साजिरें । परी त्यामाजीं सुवर्णचि भरे । गोल मुद्रिका नामरूपीं ॥१२॥ तैसे देवा माझे शब्द । जरी गायिले अबद्ध सुबद्ध । तरी त्यांमाजीं तूंचि शुद्ध । भरला अससी परिपूर्ण ॥१३॥ ज्यासी पाहिजे केवळ सुवर्ण । तो न विचारी अलंकारालागुन । तैसे सद्भक्त तुझे जाण । आनंद मात्र घेतील ॥१४॥ शब्द आणि वाक्यरचना । त्यांकडे ते ढुंकून बघती ना । केवल तव प्रेमचि जाणा । धरितील ऐसा निश्चय ॥१५॥ म्हणोनि देवा करुणाकरा । लागलों चरित्र कराया त्वरा । पार घालीं यांतुनी पामरा । तूंचि गुरुराया दयाळा ॥१६॥ तूंचि कर्ता करविता एक । ऐसा भाव निश्चयात्मक । देऊनि वदवीं ग्रंथ सुरेख । या बालकाकडूनियां ॥१७॥ असो आतां श्रोते हो सज्जन । मागील अध्यायीं निरूपण । पांडुरंगाश्रम यांचे सद्गुण । उपजल्यापासूनि वर्णियेले ॥१८॥ आतां परिसा सावधान । आणिक त्यांचें सद्गुरुवर्णन । जगाच्या कल्याणाकारण । झिजविला देह त्यांनीं निज ॥१९॥ मठाची बहुपरी केली उन्नती । बहुत वाढविला मठ हा निश्र्चितीं । अर्थात् बांधविला विशेष रीतीं । केवळ जनांच्या कल्याणा ॥२०॥ यांत जनांचे काय कल्याण । ऐसा येईल कवणाही प्रश्न । तरी पुढे करूं कथन । प्रस्तुत ऐका गुणमहिमा ॥२१॥ मठांतील सकल समाधि । फिरूनि नेटक्या बांधविल्या आधीं । आणि घालविलें ताम्रशासनादि । परम सुंदर हो जाणा ॥२२॥ नूतन आणिक बहुत शेतें । घेतलीं असती सद्गुरुनाथें । उत्पन्न वाढलें अमितचि तें । मठाचे जाणा त्या समयीं ॥२३॥ मठाच्या संनिध विस्तृत जागीं । स्वच्छ पाण्याचें सरोवर वेगीं । बांधविलें जनांच्या उपयोगीं । पडावें याकारणें ॥२४॥ तेथील जुनीं देवालयें थोर । केला त्यांचा जीर्णोद्धार । आणिक एक ऐका सविस्तर । तुम्ही सकल श्रोते हो ॥२५॥ ग्रामांतील कांहीं देउळें । मठाजवळीच आणुनी ते वेळे । राजमार्गाच्या बाजूनें सत्ताबळें । स्थापिलीं स्वामी - सद्गुरूंनीं ॥२६॥ तेथेंचि शिराली ग्रामांतरीं । नजीकचि पहा डोंगरावरी । इमारत बांधविली साजिरी । दोन मजली ती असे ॥२७॥ वटवृक्ष लाविले पांच । इमारतीजवळीच साच । 'पंचवटी' त्या स्थानासीच । नाम ठेविलें गुरुरायें ॥२८॥ तेथें जावया मार्ग सुखकर । करविला विशालसा सुंदर । आणिक शिरालीहूनि चित्रापुर । मठापर्यंत मार्ग केला ॥२९॥ पंचवटीची इमारत । असे परम शोभिवंत । दुरूनिही ती अत्यंत । सुंदर दिसे नयनांला ॥३०॥ तेवींच गृहें बांधावीं लोकांनीं । राजमार्गाच्या दोन्ही बाजूंनीं । ऐशी व्यवस्था केली स्वामींनीं । लोकहिताकारणें ॥३१॥ आणि मठाच्या संनिध पाहीं । पोस्ट - ऑफिस आणाया सर्वही । व्यवस्था केली त्या ठायीं । परम उत्कृष्ट जाणा हो ॥३२॥ पोस्ट आणि पोस्ट - मास्तर । यांकरितां गृह सुंदर । बांधवुनी, आणविलें तेथेंचि सत्वर । शिरालीचें ऑफिस तें ॥३३॥ आणि तेथेंचि मठाजवळी । कर्नाटक - शाळा बांधवुनी ते वेळीं । स्वामींनीं प्रेमें स्थापियली । लोकांकरितां जाणा हो ॥३४॥ आठवड्यामाजीं एक वार । भरावा तेथें बाजार । ऐसीही व्यवस्था केली थोर । परोपकारासाठीं हो ॥३५॥ आणिक राजमार्गावरी । जेथें तेथें दीपस्तंभ झडकरी । ठेवविले प्रकाश पडावया भारी । रात्रिसमयीं सुंदर ते ॥३६॥ऐसींच कार्ये नानापरींचीं । बहुजनांच्या उपयोगाचीं । मठाच्याचि आश्रयें साचीं । करविलीं आपण आनंदें ॥३७॥ वाक्य कानीं पडतांचि सत्वर । काम करिती जन समग्र । न धिक्कारी कवणही नर । त्यांचें वचन कसलेंही ॥३८॥ शब्द निघतां मुखांतुनी । कार्य तें होय निश्चयें झणीं । यावरी एक तुम्हांलागुनी । सांगतों वृत्तांत सुंदरसा ॥३९॥ जेव्हां मठ बांधविला थोर । तेव्हां एक घडला चमत्कार । तो वृत्तांत तुम्हां समग्र । सांगूं ऐका प्रेमानें ॥४०॥ मठ पूर्ण बांधिल्यावरी । भोजनशाला बांधावी सत्वरी । ऐसा विचार केला, उपरी । एक प्रतिबंध आढळला ॥४१॥ तेथें होता एक नारिकेल वृक्ष । तेणें प्रतिबंध वाटे बांधावयास । याचा विचार चालिला बहुवस । एके दिनीं रात्रीं पैं ॥ ४२ ॥ जरी उपटावा तो कल्पवृक्ष । तरी असे परमदोष । ठेवितां अडथळा होय खास । भोजनशाळा बांधावया ॥४३॥ म्हणोनि श्रीसद्गुरुराय । विचारिती होउनी चिंतामय । काय करावा यासी उपाय । म्हणोनि बोलिले सहजचि ॥४४॥ मग सर्वही रात्रीं जाण । स्वामीसहित झोंपले जन । तेव्हां ऐका वर्तमान । काय झालें तें सारें ॥४५॥ अवचित भरलें ढगानें आकाश । अंधकार पडला तैं विशेष । सौदामिनीचा लखलखे प्रकाश । झाला गडगडाट भयंकर ॥४६॥ पडला पर्जन्य महाथोर । वीज पडली कल्पवृक्षावर । वृक्ष सहजचि मेला सत्वर । निमिषामाजीं तो पाहीं ॥४७॥ पहा काय चमत्कार । श्रीस्वामींचा पराक्रम थोर । शब्द निघतां मुखाबाहेर । होय अनुकूल सारें तें ॥४८॥ साक्षात् दत्ताचा अवतार । तया काय असाध्य भूवर । इच्छामाथें होय साचार । सारें अनुकूल सहजचि ॥४९॥ त्यांच्या अंगीं नाहीं स्वार्थ । सारें करिती जनहितार्थ । कार्याकार्यविचार धूर्त । शुद्ध वृत्ति त्यांची असे ॥५०॥ सदा बोलती सत्यवचन । सदा इच्छिती जनकल्याण । म्हणोनि त्यांचे मुखींचें भाषण । न होय असत्य कदापिही ॥५१॥ ते न करिती कधींही अविचार । म्हणोनि वृक्ष उपटों न देती साचार । कल्पवृक्ष तोडितां थोर । पाप होय म्हणोनि ॥५२॥ सद्गुरुस्वामींसी निश्चित । पाप पुण्य न लागे खचित । परी ते करीत नसत । अधर्माचरण कदापिही ॥५३॥ खरे जे साधुसंत । हे अवतारीच असती समस्त । तेव्हां ते कैसे होतील प्रवृत्त । अधर्माचरण करावया ॥५४॥ जनांसी शिकविती धर्म । तेचि कैसे करितील अधर्म । म्हणूनि त्यांचे प्रेमानें नाम । अद्यापिही जन घेनी ॥५५॥ बहुत राजे होऊनि गेले । अनेक पंडित शास्त्री झाले । ऐसे बहुविध जन्मूनि मेले । कुणीही न घेती नाम त्यांचें ॥५६॥ परी जे साधु अवतारिक । त्यांची कीर्ति गाती सकळिक । जेथें तेथें देवालयें सुरेख । बांधिती त्यांचीं प्रीतीनें ॥५७॥ पहा 'जय जय रामकृष्ण'। ऐसें करिती त्यांचे भजन । दशरथ वसुदेव यांचें कोणी न । करिती भजन कदापिही ॥५८॥ त्यापरीच सद्गुरुस्वामी । यांचें नाम घेती नेहमीं । धरोनि मूर्ति अंतर्यामीं । आठविती त्यांसी सद्भक्त ॥५९॥ परी त्यांच्या वडिलांलागीं। न भजती कुणीही या जागीं । नाम त्यांचे कवणही विरागी । सद्भक्तही न घेती ॥६०॥ अहो पहा आमुचे पूर्वज । होऊनि गेले बहुतचि आज । त्यांचीं नामें निश्चयें मज । नमती विदित तीं जाणा ॥६१॥ हें मज मात्र नव्हे ऐका । कवणासीही विदित न देखा । कीं आमुचे आजे पणजे जे कां । त्यांचीं नामें काय तीं ॥६२॥ परी आमुचे स्वामी आनंदाश्रम । त्यांचे सद्गुरु पांडुरंगाश्रम । त्यांचे गुरु ते कृष्णाश्रम । वामनाश्रम त्यांचे गुरु ॥६३॥ त्यांचे गुरुजी केशवाश्रम । त्यांचे सद्गुरु शंकराश्रम । त्यांचे गुरु परिज्ञानाश्रम । शंकराश्रम यांचे सद्गुरु ॥६४॥ आणि त्यांचे गुरुजी ऐका । आद्य परिज्ञानाश्रम देखा । ऐसी नामावळी ही सकळिकां । अद्यापिही विदित असे ॥६५॥ त्या समयींचे जे आमुचे । पूर्वज होऊनि गेले त्यांचें । नामही न जाणती साचें । मग स्मरण कैंचें करितील ॥६६॥ नामें त्यांचीं नाहींत विदित । आम्हांलागीं कवणाप्रत । हें सांगावेंचि न लागत । असे सकलांसी विदितचि ॥६७॥ एवं हे साधुसंत । त्यांचीं नामें असती प्रख्यात । काय कारण तरी तेथ । नाहीं द्वेत म्हणोनियां ॥६८॥ असो ऐसे ते सद्गुरु सदय । त्यांच्या हातूनि अधर्म न होय । नाहीं यामाजीं अणुभरी संशय । धन्य धन्य ते जगतीं ॥६९॥ म्हणोनि त्यांसी पडिला विचार । कीं कल्पवृक्ष असतां थोर । भोजनशाळा बांधावया साचार । काय करावें यासाठीं ॥७०॥ तेव्हां भवानीशंकर - देवें । आपुल्या भक्तासि अनुकूल बरवें । करोनि दिधलें सहजचि आघवें । चिंता सर्व निवारिली ॥७१॥ मेलियावरी कल्पवृक्ष । उपटितां नाहीं कवणही दोष । न करितां साहस विशेष । झाले कार्य उत्तम तें ॥७२॥ एवं सद्गुरु स्वामिवर । यांच्या मुखांतुनी निघतां सत्वर । कार्य तें व्हावेंच हा निर्धार । पहा कैसें झालें तें ॥७३॥ मग बांधविली भोजनशाळा । अनुकूल झालें सकल जनांला । किती बंदावें ऐशा गुरूला । न कळे आम्हां अज्ञांसी ॥७४॥ जे असती पूर्ण ज्ञानी । आपणा सुख व्हावें म्हणोनि । हेतु त्यांच्या नसतो मनीं । अणुमात्रही जाणा हो ॥७५॥ ते जें करिती कार्य । केवल जनहितार्थचि होय । स्वार्थ नाहीं ऐसे गुरु सदय । लाभणें दुर्लभ निश्र्चयेंसीं ॥७६॥ परोपकारा झिजविती देह । आणि असती अति निःस्पृह । यामाजीं नाहीं संदेह । अणुइतका हो जाणा ॥७७॥ त्यांची वृत्ति असे अविनाश । अकर्ता अभोक्ता आपण खास । तेव्हां कैंचा येईल त्यांस । अभिमान तो सांगा हो ॥७८॥ अभिमान धरूनि जरी कार्य । केलें तरी तें निष्फल होय । तोचि एक आमुचें हृदय । गृह करोनि बैसला ॥७९॥ त्यासी घालविल्यावांचोनि । आत्मज्ञान दृढावे ना मनीं । परी तो न जाय सोडुनी । हृदयभुवन आमुचें हें ॥८०॥ म्हणोनि यासी एकचि उपाय । धरावे सद्गुरूचे पाय । तेचि सांगती साधन सदय । घालवाया अभिमाना ॥८१॥ निष्काम चित्तें जातां शरण । तेचि तारिती न लागतां क्षण । अन्य जरी केले प्रयत्र । व्यर्थ होती ते सारे ॥८२॥रोग जावा जरी समूळ । हुशार वैद्य आणावा ते वेळ । तेव्हांच रोगी बरा होईल । सर्व पीडा जाऊनियां ॥८३॥ तैसें श्रीगुरूंचा उपदेश ग्रहण । करितां होय भवरोग - निरसन । होय वृत्ति निरभिमान । निश्र्चयें जाणा तुम्ही हो ॥८४॥ असो ऐका आणिक वर्णन । करा चित्त सावधान । तेणें होय समाधान । सद्गुरुगुण ऐकतांचि ॥८५॥ यापरी करोनि नाना प्रयत्र । झिजवुनी आपला देह जाण । केली व्यवस्था उत्तम करोन । शिराली - ग्रामामाजीं पैं ॥८६॥ एवं चित्रापुरग्राम सुंदर । आमुच्या जनांचे क्षेत्र मनोहर । बनविलें खेड्याचें शहर । पांडुरंगाश्रमस्वामींनीं ॥८७॥ जणूं काय म्युनिसीपालिटी । असे कीं तेथे गोमटी । व्यवस्था केली कैसी मोठी । बघतां दृष्टी लागे हो ॥८८॥ श्रीमंत मोठे आणि युरोपियन । सरकारी अधिकारी वगैरे जन । जेव्हां येती प्रवासालागुन । मठ बघावया येती ते ॥८९॥ बधोनि तेथील सुंदर व्यवस्था । ही स्वामींची बुद्धि - कौशल्यता । ऐसें म्हणोनि त्यांच्या चित्ता । होय संतोष निश्र्चयेंसीं ॥९०॥ तेथील तीं सकल कार्यें । केलीं असती बुद्धिचातुर्यें । इंजिनियरापरीच केलें स्वयें । बघतां आश्चर्य वाटतें त्यां ॥९१॥ पाहूनि करिती वाखाणणी । म्हणती चातुर्याची हे खाणी । ऐसी सद्गुरुमूर्ति पाहुनी । संतोषती जन सारे ॥९२॥ अठराशें नऊ शकामाझारीं । काशीयात्रेसी गेलियावरी । तेथील पंडितांनीं सन्मान भारी । दिधला यांनी प्रेमभरें ॥९३॥ जेथे जाती तेथें त्यांसी । सन्मानचि देती बहुवसी । मुख वघतांचि तेजोराशी । तोषतें मन सकलांचें ॥९४॥ आणि करिती नमस्कार । त्यांच्या चरणांवरी सत्वर । जरी तो असे निंदक पामर । बघतांचि मन विरे त्याचें ॥९५॥ ऐशी मूर्ति शांत सुंदर । पसरली कीर्ति जगभर । असे साक्षात् अवतार । श्रीदत्ताचा म्हणोनियां ॥९६॥ प्रवचनें देती परम सुंदर । गीर्वाणींही बोलती चतुर । न चुकती त्यांत अणुमात्र । महाविद्वान पंडित ते ॥९७॥ यांची कीर्ति ऐकुनी पाहीं । भजती सकल इतर जातीही । संकटकालीं ते लवलाहीं । करिती नवस यांपाशीं ॥९८॥ तेव्हां त्यांचीं सकल संकटें । स्वामी निवारिती नेटें । ऐसें हें रत्न परम गोमटें । कोण दवडील सांगा हो ॥९९॥ त्या कथा वर्णं पुढती । आणिक सांगू यांची प्रख्याति । परंतु आपण धरावे चित्तीं । त्यांचे सद्गुण दिनरजनीं ॥१००॥ तेवींच करावी कथा श्रवण । धरोनि मनीं सारे सगुण । करावें त्यापरी आपणही वर्तन । तरीच जन्म सफल खरा ॥१०१॥ करितां ‘तत्कथन तच्चिंतन' । सारे जाउनी आपुले दुर्गुण । येती आमुच्या अंगीं सद्गुण । म्हणोनि चरित्र ऐकावें ॥१०२॥ असो आतां पुढील अध्यायीं। आणिक सद्गुण बोलूं लवलाहीं । आपण श्रोते जन सर्वही । तिष्ठत असाल अमित हो ॥१०३॥ माझ्या अंगीं जरी ना भक्ति । श्रोत्यांच्या प्रेमासाठीं करविती । श्रीसद्गुरुस्वामी निश्र्चिंतीं । ग्रंथ हा सारा मजकडुनी ॥१०४॥ जरी आपुल्या प्रेमासाठीं । करविला ग्रंथ सरळ मराठी । तरी मजही लाभेल गोमटी । प्रेमाची गोडी अणुमात्र ॥१०५॥वत्साकरितां दूध दे गाई । त्याचा सकलांसी लाभ होई । तैसी तुमच्या प्रेमाची नवलाई । मजही लाभेल गोडी ती ॥१०६॥ असो पुढील अध्यायीं सुरस । कथा सांगू गुरुकृपेंचि खास । ऐकतां होईल परम संतोष । तुम्हां भाविक श्रोत्यांसी ॥१०७॥ आनंदाश्रम-परमहंस । शिवानंदतीर्थ पुण्यपुरुष । यांच्या कृपाप्रसादें एकत्रिंश । अध्याय गुरुदासें संपविला ॥१०८॥ स्वस्ति श्रीचित्रापुर । गुरुपरंपराचरित्र सुंदर । ऐकतां निरसे अज्ञान समग्र । एकत्रिंशाध्याय रसाळ हा ॥१०९॥ अध्याय ३१ ॥ ओंव्या १०९ ॥ ॥ॐ तत्सत्-श्रीसद्गुरुनाथचरणारविंदार्पणमस्तु ॥इति एकत्रिंशाऽध्यायः समाप्तः ॥ N/A References : N/A Last Updated : January 20, 2024 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP