मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र|
अध्याय ॥४४॥

चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥४४॥

सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीमत्पांडुरंगाश्रमगुरुभ्यो नमः ॥ श्रीभवानीशंकराय नमः ॥ॐ॥
जय जय सद्गुरो करुणाकरा । तुजला पाहतां सामोरा । आणिक न दिसे अन्य पसारा । ऐसी मूर्ति तव देवा ॥१॥
तरी एक असे आक्षेप । कीं ध्यातां तुझें सुंदर स्वरूप । कवणही न ये आमुच्या समीप । तूंचि एक दिससी पैं ॥२॥
तुजवांचोनि अन्य नसतां । मीं - तूंपणा कैसा ये ताता । मीं - तूंपणाविण सर्वथा । प्रेम कैंचें उद्भवे तें ॥३॥
जगीं जरी नसे द्वैत । तरी कैंचे प्रेम होय उपस्थित । कैंचा मानसीं भगवंत । येईल ध्यानीं आमुच्या बा ॥४॥
एका गृहीं एक पुरुष । बैसला तेव्हां मन उदास । दुजा येतां होय हरुष । त्या पुरुषासी तत्काळ ॥५॥
दुजा येतां प्रेम उपजे । म्हणोनि मनासि हरुप होईजे । एवं द्वैतेंचि प्रेम हें साजे । हें सिद्ध होय निर्धारें ॥६॥
तैसें तुझ्या मूर्तिदर्शनें । मानसीं अथवा प्रत्यक्षपणें । प्रेम उद्भवे निश्र्चयें तेणें । एवं द्वैतेंचि प्रेम भरे ॥७॥
द्वैतावांचुनी नुद्भवे प्रेम । प्रेमाचा तो कोठुनी उगम । तुझ्या स्वरूपाची गोडी परम । कारण यासी अन्य नसे ॥८॥
स्वरूपीं नाहीं निश्र्चयें द्वैत । प्रेम हें तेथूनि उत्पन्न होत । तेव्हां वाटे प्रेम अद्भुत । द्वैत कीं अद्वैत न कळे हें ॥९॥
अद्वैत जरी म्हणूं जातां । तुजवीण प्रेम नुपजे चित्ता । तुझी प्रेमळ मूर्ति बघतां । आनंद होय अनिवार ॥१०॥
जरी  द्वैत म्हणावें तरी । तुझी मूर्ति ध्यातां अंतरीं । प्रेम उपजोनि होय सत्वरी । वृत्ति लीन तव  चरणीं ॥११॥
मग कैंचा द्वैतभेद । गुरुशिष्य - भाव प्रसिद्ध । केवळ एक ब्रह्मानंद । ऐसा सद्गुरु तूं माझा ॥१२॥
खोल विचार केलिया देवा । आक्षेपही झडोनि जावा । ऐसा सद्गुरुकृपेचा ठेवा । कुणीं विसरावा सांगें बा ॥१३॥
आधीं धराया मूर्ति सगुण । द्वैतावीण न होय जाण । कीं माझी सद्गुरुमाउली म्हणोन । उद्भवे आनंद तो पाहीं १४॥
तुझें माझें प्रेम एक । होतांक्षणीं निश्चयात्मक । आनंद प्रगटे त्यांतुनी देख । तेंचि निजरूप बा पाहीं ॥१५॥
तेव्हां कैंचा उरे भेद । एकचि ब्रह्म सहज सिद्ध । तुजवांचोनि जग ना द्विविध । हाचि निर्णय दावियला ॥१६॥
म्हणोनि देवा तव प्रेमासी । कैसें वणींचें न कळे मजसी । सार्‍या प्रेमाचा तूंचि होसी । उगमस्थान कृपाधना ॥१७॥
उगम म्हणतां श्रोते हो सज्जन । तुम्ही कराल भला प्रश्न । अमुक नदीचें उगमस्थान । अमुकचि देशीं असे पैं ॥१८॥
तैसे सद्गुरु-स्वामी आमुचे । एकदेशी असती कीं साचे । ऐसा प्रश्न करितां वाचे । देजे उत्तर गुरुकृपेंचि ॥१९॥
श्रीसद्गुरुनाथ हे आपुले । प्रेमाचें उगमस्थान तें भलें । साया ब्रह्मांडीं संचलें । व्यापक आकाशसम एक ॥२०॥
देश - काल - वस्तुपरिच्छेद । सजातीय - विजातीय स्वगतभेद । नाहीं अणुमात्र भेद त्रिविध । असे सर्वत्र व्यापक ॥२१॥
'उगम' ही न शोभे उपमा । परी काय हो सांगूं तुम्हां । गुरुप्रेमामी नसे हो सीमा । अमुक ऐसी कांहीं एक ॥२२॥
नाहीं त्यासी विधि - निषेध । न होय ठेवाया त्यासी शब्द । ऐमा सद्गुरुप्रेमाचा आनंद । असे विदितचि गुरुभक्तां ॥२३॥
पुनरपि येथे सांगावें नलगे । परी प्रेमचि बोलवी काय करूं सांगें । बोलिल्यावीण न राहे उगें । मन आमुचें तव प्रेमें ॥२४॥
असो आतां क्षमा करावी । सद्गुरु आमुचे महालाघवी । ऐका आणिक कथा बरवी । तुम्ही सज्जन श्रोते हो ॥२५॥
मागील अध्यायीं निरूपण । श्रीस्वामी सद्गुरु सघन । यांसी प्रार्थना केली जाण । भक्तजनांनीं शिष्य कराया ॥२६॥
परी न केली प्रार्थना मान्य । तेव्हां विन्मुख होउनी ते जन । गेले आपुल्या ग्रामालागोन । करीत ध्यान स्वामींचें ॥२७॥
कधीं करितील शिष्य स्वीकार । कां न करिती ऐसा विचार । करोनि होती चिंतातुर । निज मानसीं भक्तजन ॥२८॥
इकडे शिरालीमाजीं ऐका । बैंदूर नारायण तो देखा । ध्यास लागला त्यासी निका । करी प्रार्थना दिनरजनीं ॥२९॥
म्हणे मानसीं सद्गुरुनाथा । जरी झाला अपराध आतां । तरी क्षमा करोनियां ताता । करावा शिष्य - स्वीकार झणीं ॥३०॥
देई धीर आम्हां दयाळा । इतुके निष्ठुर कां हो झालां । त्यागितां तूं जाऊं कुणाला । शरण देवा सांग मज ॥३१॥
कां तूं लाविलें आम्हां वेड । दाविले कां चरण गोड । तरी पुरवीं आतां कोड । सांगतों उघड तुजलागीं ॥३२॥
तुझें प्रेम लागतां पाठीं । कैसें धिक्कारूं उठाउठी । तूंचि घातली इतुकी मोठी । प्रेमाची गांठी हो पाहीं ॥३३॥
जरी न केला शिष्य - स्वीकार । पुढें सुटेल गांठी प्रेमाची सत्वर । वारंवार बोधिल्यावीण निर्धार । न होय घट्ट ती पाहीं ॥३४॥
आमुची गोष्ट असो आतां । सार्‍या आमुच्या सारस्वतां । कैसें कळेल सद्गुरु नसतां । स्वधर्म थोर अनिवार ॥३५॥
लोकांमाजीं नसतां राजा । धुंद होईल सारी प्रजा । एकमेकां मारुनी मौज । करितील जन निर्भयेंचि ॥३६॥
तैसें येथें नसतां गुरुराज । सारा अधर्मचि माजेल सहज । हें सारें असुनी विदित बा तुज । कासया कृपा न करिसी ॥३७॥
असो आतां बहुत कासया । बोलावें मी अज्ञ असूनियां । तूं जें करिसी तें करीं सदया । भार सारा तुझ्यावरीच ॥३८॥
परी केली प्रार्थना तुजपुढें । तूंचि फेडिसी आमुचें सांकडें । म्हणोनि कृपादृष्टि मजकडे । करीं देवा दयाळुवा ॥३९॥
ऐसी प्रार्थना केली बहुविध । बैंदूर नारायणें मानसीं शुद्ध । यापरीच सर्व भक्तवृंद । करिती प्रार्थना निजमानसीं ॥४०॥
जरी केली मानसीं प्रार्थना । कळे हृदयीं त्या दयाघना । परी न दाविती बाहेरी जनां । कांहीं नेणे ऐसें दाविती ॥४१॥
असो आतां ऐका सकळ । सद्गुरुस्वामींचें चरित्र प्रेमळ । ऐकतां होय मन निर्मळ । क्षण न लागतां हो पाहीं ॥४२॥
स्वामी सद्गुरु झाले क्षीण । उपचार करिती सारे जन । ऐसें असतां एके दिन । झाला चमत्कार तो ऐका ॥४३॥
शिष्य - स्वीकार न करिती म्हणोन । गृहस्थ गेले ग्रामांलागुन । राहिला एक बैंदूर नारायण । कथिलें मागील अध्यायीं ॥४४॥
मग गेले दोन दिवस । रात्रीं पहुडले जगन्निवास । जागृत राहती जन बहुवस । स्वामी आजारी ना म्हणोनियां ॥४५॥
कीं स्वामींसी व्यथा होय दारुण । म्हणोनि करिती जन जाग्रण । घड्याळावरी वाजले दोन । बैसले स्तब्ध तिष्ठत ते ॥४६॥
तेव्हां सद्गुरुस्वामीयांसी । स्वप्नों येऊनि एक संन्यासी । शिष्य - स्वीकार करीं ऐसी । आज्ञा करिती स्वामींतें ॥४७॥
तेव्हां बोलती निद्रेमाजीं । आमुचे पांडुरंगाश्रम गुरुजी । कोण आले येथें आजि । करा सत्कार अतिथींचा ॥४८॥
करोनि पादप्रक्षालन । द्यावें झडकरी त्यांसी आसन । कां न करितां येथे असोन । ऐसें बोलिले स्पष्ट पहा ॥४९॥
तये समयीं नारायण बैंदूर । हेम्माड वीरप्पादि कांहीं नर । जागे बैसले होते, समग्र । ऐकिले भाषण स्वामींचें ॥५०॥
तेव्हां कळले ऐकुनी वचन । कीं स्वामी स्वप्नांत बोलती म्हणोन । हेम्माड वीरप्पा जवळी जावोन । प्रार्थना करी ते समयीं ॥५१॥
म्हणे "स्वामिन् " वीरप्पा हेम्माडी। "आतां रात्र उरली थोडी । आणिक शेष दहा घडी । शयन करावें ये वेळीं" ॥५२॥
मग पुनरपि वाजतां चार । निद्रेमाजींच बोलती साचार । “अजुनी त्यांचा सत्कार । कां न केला अतिथींचा ॥५३॥
किती वेळ सांगा त्यांनीं । उभें रहावें ऐसें म्हणोनि । बोलिले जनांसी दरडावोनि । बैसले उठोनि तत्काळ ॥५४॥
आणि हांक मारिली अनुक्रमें । सुब्राय रामचंद्र मंगेश या नामें । बोलविलें त्यांसी जवळी प्रेमें । आले सारे तत्काळ ॥५५॥
संनिध येउनी कर जोडोनि । काय आज्ञा ऐसें म्हणोनि । उभे राहिले पाहत नयनीं । मूर्ति सुंदर त्या समयीं ॥५६॥
तेव्हां बोलती स्वामिराय । सुब्राया तुम्हीं प्रार्थिलें सविनय । कीं करावा आतां शिष्यवर्य । होईल तें कार्य बघ आतां ॥५७॥
कारण तैसेंचि कराया आम्हांलागीं । प्रेरणा देवाची झाली वेगीं । सिद्धता त्वरें करा, वाउगी । वेळ दवडूं नका आतांची ॥५८॥
ऐशी सद्गुरु - आज्ञा होतां । सुब्रायभट नमवी माथा । आनंद झाला त्याचिया चित्ता । बोले अति प्रेमानें तो ॥५९॥
म्हणे स्वामिन् सद्गुरुनाथा । तुमचा हा निश्चय ऐकतां । परम हरुष झाला चित्ता । सार्‍या जनांच्या हो स्वामी ॥६०॥
यास्तव देवा या चरणांचे । आणि भवानीशंकर - देवाचे । आभारी आहों आम्ही साचे । म्हणोनि घातलें दंडवत ॥६१॥
तेव्हां म्हणती कत्रणालागीं । शिष्य करावा हो या जगीं । कळलें नाहीं आम्हांलागीं । कृपा करणे स्वामींनीं ॥६२॥
यावरी सद्गुरुस्वामी दयाळ । मंगेशभटासी बोलावुनी जवळ । म्हणती मंगेशा ये वेळ । देईं पुत्रासी तव पाहीं ॥६३॥
तुजला पुत्र असती तीन । एक देईं आम्हांलागून । शिष्य स्वीकार करावया जाण । ऐसें बोलिले प्रेमभरें ॥६४॥
यावरी शुक्लभटजी बोले । सद्गुरुस्वामीसंनिध ते वेळे । मम पुत्रासी द्यावया दयाळे । न होय अनुकूळ मजलागीं ॥६५॥
यावरी बोलती सद्गुरुस्वामी । विचार करीं अंतर्यामीं । येरु बोले काय सांगूं मी । सद्गुरुराया दयाळा ॥६६॥
कवणाही द्यावया मजसी । न होय अनुकूळ तेजोराशी । ऐकुनी वाटलें जनांसी । कीं विघ्न - पर्वत कोसळला ॥६७॥
मंगेशभटजी भाविक असोनी । कां न देई पुत्रालागुनी । ऐसे तळमळती गृहस्थ निजमनीं । प्रार्थिती अंतरी श्रीगुरूसी ॥६८॥
मंगेशभटजी खचितच भाविक । हृदय त्यांचें परम सात्त्विक । त्यांच्या सद्गुणांचें सकळिक । पुढें वर्णन यईल ॥६९॥
असो मग सद्गुरुस्वामी । रामचंद्र - भटजीमी म्हणती, आम्ही । मागतों तव सुतासी या कामीं । शांतमूर्तीसी दे आतां ॥७०॥
यावरी सुब्रायभटजी आपण । रामचंद्र - भटजींस करिती खूण । तेव्हां तत्काळ हालविली मान । हरिदाम रामचंद्र- भटजींनी ॥७१॥
म्हणे सद्गुरुस्वामींची आज्ञा । शिरसावंद्य असे कृपाघना । अर्पण करूं आपुल्या चरणा । द्वितीय पुत्र शांतमूर्ति ॥७२॥
यावरी बोलती सद्गुरुनाथ । आतां सदनीं जाईं त्वरित । विचारीं तव कांतेप्रत । कीं संमती काय असे ॥७३॥
आज्ञेपरी गेला गृहासी । म्हणे तेव्हां निजकांतेसी । सद्गुरु - आज्ञा झाली परियेसीं । शांतमूर्तीसी मागती ते ॥७४॥
शिष्य-स्वीकार कराया सिद्ध । झाले आतां हाचि आनंद । ऐशा समयीं न होत मतिमंद । देणें योग्य मज वाटे ॥७५॥
ऐसें ऐकतां पतींचे वचन । क्षणभरी ती धरी मौन । मनीं विचार करोनि पूर्ण । बोले ती प्रेमळ पतिलागीं ॥७६॥
म्हणे इच्छा सद्गुरुस्वामींची । तैशीच जरी आहे तुमची । नाहीं म्हणाया आम्हां कैंची । प्राज्ञा असे सांगा हो ॥७७॥
देवाच्या इच्छेवरी आमुची । इच्छा घडेल कैसी साची । कर्ता करविता सर्वही तोचि । काय करील मानव ॥७८॥
ऐसे तिचे ऐकतां शब्द । जनांसी झाला बहुत आनंद । धांवती लगबगें भक्तवृंद । शांतमूर्तीच्या संनिधीं ॥७९॥
मग सद्गुरुआज्ञेपरी । शांतमूर्तीची संमती सत्वरी । घ्यावी म्हणोनि ते अवसरीं । गेले शोधाया त्यासी जन ॥८०॥
शांतमूर्तीसी हें न विदित । तो श्रीकृष्णाच्या देउळांत । बैसला होता पुष्पें निवडीत । नित्यापरी बाळभावें ॥८१॥
हें कळलें जनांसीं मार्गीं । आले धांवुनी तेथे वेगीं । आणि सर्व शांतमूर्तिलागीं । बघतचि उभे राहिले ॥८२॥
म्हणे कायकिणी सुब्रायभटजी । आमुच्या सद्गुरुस्वामींनी आजि । शिष्यस्वीकार - संमती दिधली, ही ताजी । बातमी सांगाया आलों हो ॥८३॥
ऐसें ऐकतां शांतमूर्तीचे वदन । हरुषें प्रफुल्लित झालें पूर्ण । आणि म्हणे निवडिला कवण । शिष्य कराया मज सांगा ॥८४॥
मंगेश - मामाचे पुत्र तीन । यांतील एक करितील म्हणोन । ऐसें वाटतें मजलागोन । होय कां आतां सांगा तें ॥८५॥
यावरी बोले सुब्रायभट । तुमचा मामा संमति न देत । म्हणोनि स्वामी - सद्गुरुनाथ । यांनीं तुम्हांसीच निवडिलें ॥८६॥
तेव्हां बोले रामचंद्रतनय । श्रीस्वामी - सद्गुरुराय यांनीं मजलाचि निवडिलें काय । स्पष्ट सांगा मजप्रति ॥८७॥
इतुकें बोलुनी शांतमूर्ति । विचार करीत बैसले चित्तीं । हातींचे काम ठेवुनी खालती । क्षणभरी तेव्हां स्तब्धपणें ॥८८॥
मग बोले स्मितमुखेंकरुनी । श्रीसद्गुरुस्वामीरायांनीं । जरी मजला काढिलें निवडोनी । तरी ती आज्ञा मज मान्य ॥८९॥
त्यांची इच्छा तीचि श्रेष्ठ । ते जें करिती तेंचि इष्ट । तेणेंचि हरती सारे कष्ट । जनांचे जाणा लवलाहीं ॥९०॥
म्हणोनि इच्छा गुरुदेवांची । मजला संमत असे साची । नाहीं म्हणाया वाचा कोणाची । समर्थ होईल ती सांगा ॥९१॥
ऐसें ऐकतां प्रेमळ वचन । सुब्रायभटजी आणि सारे जन । आनंदित झाले पूर्ण । निजमानसीं तेधवां ॥९२॥
मग सारे गेले धांवुनी। श्रीस्वामीसद्गुरुस्थानीं । सकल वृत्तांत निवेदिला त्यांनीं । श्रीस्वामीसंनिधीसी ॥९३॥
तेव्हां बोलती स्वामिराय । सुब्रायभटजीप्रति सदय । झणीं सिद्धता करा ये समय । शिष्य - स्वीकार करायाची ॥९४॥
ऐसी आज्ञा करितां गुरुवरें । सुब्रायभटजी बोलिले त्वरें । प्रभो स्वामिन्  सांगतों खरें । ये दिनीं मुहर्त ना बरवा ॥९५॥
यावरी बोलती सद्गुरुराय । आमुच्या देहाचा भरंवसा काय । देशील कीं तूं आम्हां अभय । सांग तूं बा सत्वरी ॥९६॥
म्हणोनि आतां करा वेगीं । तयारी शिष्य - स्वीकारालागीं । आतांचि तुम्ही सामुग्री अवधी । करा सिद्ध, उशीर नको ॥९७॥
मुख्य शेवटील उपदेशकार्य । त्यासी बघोनि मुहर्तसमय । करूं ते शुभदिनीं निर्भय - । चित्तें, ऐसें आज्ञापिती ॥९८॥
हें ऐकतां सद्गुरुवचन । गेले सर्वही न लागतां क्षण । सारी सिद्धता करावया पूर्ण । अति उल्हासें लागले ॥९९॥
पुढील अध्यायीं हेंचि कथन । करितील शिष्य - स्वीकार दयाघन । स्वामी 'आनंदाश्रम' म्हणोन । होतील प्रसिद्ध सर्वत्र ॥१००॥
सर्वांसी परिचय असे म्हणोनि । ऐकाया उत्सुक होतील निजमनीं । तैसेंचि माझ्याही अंतरापासूनि । निघेल वर्णन हौसेनें ॥१०१॥
तेचि करविती सकल कार्य । निमित्तमात्र मी कीं होय । म्हणोनि पाठीसी असतां गुरुवर्य । चिंता कासया करावी ॥१०२॥
आनंदाश्रम - परमहंस । शिवानंदतीर्थ पुण्यपुरुष । यांच्या कृपाप्रसादें चतुश्चत्वारिंश । अध्याय गुरुदासें संपविला ॥१०३॥
स्वस्ति श्रीचित्रापुर - । गुरुपरंपराचरित्र सुंदर । ऐकतां दोष हरती समग्र । चतुश्चत्वारिंशाध्याय रसाळ हा ॥१०४॥
अध्याय ४४॥
ओंव्या १०४॥
ॐ तत्सत् - श्रीसद्गुरुनाथचरणारविंदार्पणमस्तु ॥
॥ इति चतुश्चत्वारिंशोऽध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 20, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP