मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र| अध्याय ॥५॥ श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र ग्रंथानुक्रम विषयानुक्रमणिका कृताञ्जलिः प्रस्तावना सारस्वतांचें मूळ श्रीगुरुपरम्परा अध्याय ॥१॥ अध्याय ॥२॥ अध्याय ॥३॥ अध्याय ॥४॥ अध्याय ॥५॥ अध्याय ॥६॥ अध्याय ॥७॥ अध्याय ॥८॥ अध्याय ॥९॥ अध्याय ॥१०॥ अध्याय ॥११॥ अध्याय ॥१२॥ अध्याय ॥१३॥ अध्याय ॥१४॥ अध्याय ॥१५॥ अध्याय ॥१६॥ अध्याय ॥१७॥ अध्याय ॥१८॥ अध्याय ॥१९॥ अध्याय ॥२०॥ अध्याय ॥२१॥ अध्याय ॥२२॥ अध्याय ॥२३॥ अध्याय ॥२४॥ अध्याय ॥२५॥ अध्याय ॥२६॥ अध्याय ॥२७॥ अध्याय ॥२८॥ अध्याय ॥२९॥ अध्याय ॥३०॥ अध्याय ॥३१॥ अध्याय ॥३२॥ अध्याय ॥३३॥ अध्याय ॥३४॥ अध्याय ॥३५॥ अध्याय ॥३६॥ अध्याय ॥३७॥ अध्याय ॥३८॥ अध्याय ॥३९॥ अध्याय ॥४०॥ अध्याय ॥४१॥ अध्याय ॥४२॥ अध्याय ॥४३॥ अध्याय ॥४४॥ अध्याय ॥४५॥ अध्याय ॥४६॥ अध्याय ॥४७॥ अध्याय ॥४८॥ अध्याय ॥४९॥ अध्याय ॥५०॥ अध्याय ॥५१॥ अध्याय ॥५२॥ अध्याय ॥५३॥ अध्याय ॥५४॥ अध्याय ॥५५॥ अध्याय ॥५६॥ अध्याय ॥५७॥ अध्याय ॥५८॥ अध्याय ॥५९॥ अध्याय ॥६०॥ अध्याय ॥६१॥ अध्याय ॥६२॥ अध्याय ॥६३॥ आरती श्री सद्गुरुंची मंगल पद चित्रारपुरगुरुपरम्परावन्दनम् श्रीशंकरनारायणगीतम् शरणाष्टकम् आरती श्रीगुरुपरंपरेची श्रीमत् पांडुरंगाश्रम स्वामींजी आरती सद्गुरुंची आरती चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥५॥ सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय. Tags : chitrapurpothiचित्रापुरगुरुपरंपरापोथी अध्याय ॥५॥ Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ।॥ श्रीपरिज्ञानाश्रमगुरुभ्यो नमः ॥ श्रीभवानीशंकराय नमः ॥ॐ॥ जय जय जय जय त्रिगुणातीता । निर्विकारा अव्यया अव्यक्ता । बंधमोचका भवभयहर्ता । सगुणसांद्रा सुखमूर्तें ॥१॥ नमो परिज्ञानाश्रम ताता । भक्तजनांच्या पुरविसी आर्ता । न धरिसी अणुमात्र अंतरीं स्वार्था । काय वाखाणूं गुणमहिमा ॥२॥ परम उदारा शांत दयाळा । धांवलासि नतजनकार्याला । बोधामृत पाजुनी उद्धरिलें सकलां । देवा दयाळा तूं पाहीं ॥३॥ मज दावीं आतां वाट । तूंचि कृपा करोनि नीट । वृत्तीचा मार्ग करोनि सपाट । नेई मोक्षासी बा वेगीं ॥४॥ असो आतां तुम्ही हो सजन । ऐका पुढील वर्तमान । मागील अध्यायाचें निरूपण । बोलूं आतां लवलाहीं ॥५॥ मागील अध्यायीं परिज्ञानाश्रम । स्वामी सद्गुरु ते गुणग्राम । नगर - संस्थान सोडुनी धाम । जावया निघाले श्रृंगेरीं ॥६॥ मग स्वामी श्रृंगेरीसी । परिवारसहित येती मठासी । उरकुनी स्नान-अनुष्ठानासी । जाती दर्शना देवीच्या ॥७॥ परी स्वामींसी न पुसे कोणी । बघती सकलही आपुल्या नयनीं । गेले आपापल्या गृहालागुनी । अर्चकादि सकलही ॥८॥ कुलुप लाविले देउळाद्वारीं । तैसेंचि ठेविती सायंकालवरी । कोणीही न येती पाहुनी त्यावरी । कळलें अंतरीं स्वामीसी ॥९॥ केला जनांनीं अपमान । न होय हें स्वामींसी सहन । तेव्हां प्रार्थिती शारदादेवीलागून । भक्तिप्रेमपुरःसर ॥१०॥ शंकराचार्यें आणिली मूर्ति । काश्मीराहुनी स्थापिली तिजप्रति । परम सुंदर लावण्यवती । शारदांबा देवी त्या ठायीं ॥११॥ आळविती तिज सद्गुरुस्वामी । खिन्न होउनी अंतर्यामीं । येथे शंका कराल तरी मी । सांगतों विवरुनी आधीं पैं ॥१२॥ म्हणतां स्वामींचें हृदय शांत । तरी आली कैसी खिन्नता तेथ । तरी सावध करोनि चित्त । अवधारा भाविक चतुर हो ॥१३॥ आम्हां अज्ञांचा शोक तो अनिवार । मी कर्ता भोक्ता ऐसा निर्धार । तेंचि ध्यान लागे निरंतर । म्हणोनि शांतता नाहीं पैं ॥१४॥ परी ज्ञानियांलागीं उदकावरी । अक्षरें काढितां राहती कोठवरी । तैशीच क्षणिक त्यांची खिन्नता सारी । मानी अकर्ता अभोक्ता आपण ॥१५॥ म्हणोनि ज्ञात्यांच्या अंतःकरणीं । शांतता राहे वास करोनी । भोग्य भोगणें नसतां दोन्हीं । भोक्ता कैंचा होईल तो ॥१६॥ जो भोक्ताचि नव्हे मानी आपण । तया खेद कैंचा होय उत्पन्न । खेद व्हावया काय कारण । तेंचि आतां बोलूं पैं ॥१७॥ जेथें राहे सदा भेद । तेथें वसे परम खेद । ज्याच्या अंगीं शुद्ध बोध । त्यासी नाहीं भेद तो ॥१८॥ दांत लागतां ओंठा जाणा । दोष तो द्यावा सांगा कवणा । तैसें ज्ञानिया अन्य दिसेना । म्हणोनि अपमान ना तेथें ॥१९॥ परी जनीं ज्यांचा असे व्यवहार । त्यांनीं त्यापरी वागणें हें कर्तव्य थोर । अंध नव्हे त्यांचा विचार । मानवांपरी ज्ञानियांचा ॥२०॥ नाहीं तयांसी दुरभिमान । परी असतो सदभिमान । जरी झाला ज्ञानी पूर्ण । न होय अपराध तो त्यांचा ॥२१॥ नाटकामाजी घेतां वेष । त्यापरी करावें लागे त्यास । परी विसरेना मी कोण यास । दावी शोक वरीवरी ॥२२॥ तद्वत् स्वामींचे लक्ष निरंतर । 'असें मी ब्रह्म' ऐसा निर्धार । परी संन्यासी असतां महाथोर । अवमानिलें तें न साहे ॥२३॥ धर्मस्थापक असतां संन्यासी । सन्मुख करिती अधर्मराशी । कैसें साहेल सांगा तयांसी । म्हणाल काय अधर्म जाहला ॥२४॥ तरी ऐका संन्याशां अपमान । तोचि अधर्मासी मूळ कारण । त्यावीण थोर पाप आन । नसे कांहीं जगतीं या ॥२५॥ म्हणोनि स्वामी झाले खिन्न । आणि गेले तेथुनी उठोन । मग करोनि अनुष्ठान । आरंभिलें स्तवन शारदेचें ॥२६॥ जय जय भगवते शारदा देवी । भिन्न तूं नससी मजहूनि पाहीं । नमन करावें कवणा केवीं । सांग सुंदरे करुणाळे ॥२७॥ तुझें स्वरूप न कळे कवणा । मग कैसें करावें तुझ्या स्तवना । कोण करील त्वद्गुण-वर्णना । प्रणवरूपिणे जगदंबे ॥२८॥ आम्हां अज्ञांसी न कळे कांहीं । म्हणुनी करितों प्रार्थना तव ही । येईं आतां सन्मुख पाहीं । देईं दरुशन आम्हांसी ॥२९॥ देउळाचें लाविलें द्वार । करितों पूजा येथेंचि सत्वर । करोनि घेईं स्वीकार । पूजेचा आमुच्या करुणाळे ॥३०॥ करीं सकलांचें कल्याण । देउनी पूर्ण आशीर्वचन । निंदक वंदक सारे समान । ब्रह्मस्वरूप सर्वही ते ॥३१॥ काय तुझें तें स्वरूप-लावण्य । येईं आतां संनिधीं जाण । देउनी आम्हांसी प्रेमें दरुशन । सांभाळीं माते गुणसांद्रे ॥३२॥ ऐसें म्हणोनि जाहले ध्यानस्थ । मानसपूजा आरंभिली तेथ । शारदांबा येउनी बैसत । हृदयांतरीं त्या काळीं ॥३३॥ साक्षात् शंकर अवतार पूर्ण । असाध्य कैंचें त्यांप्रति जाण । असे संनिधींत येईल कोठून । परी दावीत लोकां चमत्कार ॥३४॥ मग करोनि षोडशोपचार । पूाज भक्तिप्रेमपुरःसर । आपुल्याकडे आकर्षिलें समग्र । तेज देवीचें तपोबळें ॥३५॥अहाहा तें सामर्थ्य काय । तपोबळाचें थोर होय । स्वामी समर्थ सद्गुरुराय । धन्य धन्य तयांची ॥३६॥ ऐशी त्यांनीं करुनी पूजा । तोषविलें पूर्ण तिजला सहजा । प्रसन्न होउनी भक्तकाजा । सिद्ध जाहली वेल्हाळ ती ॥३७॥ म्हणे मद्भक्ता परमश्रेष्ठा । प्रसन्न जाहल्यें तुजला आतां । ऐसें म्हणाया लाज वाटे चित्ता । प्रभो शंकरा गुरुराया ॥३८॥कारण तूं सकळ देवांचा देव । तुजहुनी नाहीं दाविता ठाव । निजरूपाचा, म्हणोनि सर्व । येती शरण तुजलागीं ॥३९॥ ऐशा सगुरो तुझें दरुशन । घ्यावया आल्यें मी धावोन । तुझ्या संगतीं येत्यें येथून । म्हणोनि अदृश्य जाहली ॥४०॥ मग जाहला चमत्कार । शृंगेरी मठाचे स्वामी गुरुवर । पहुडले असतां रात्रीं थोर । देखती स्वप्न अद्भुत तें ॥४१॥ म्हणे सरस्वती जगद्गुरूंसी । काय झालें तुझिया मठासी । न कळे कांहीं बापा तुजसी । अपराध थोर त्वां केला ॥४२॥ येथें येउनी कैलासनाथ । राहिला असतां परिवारासहित । योग्य सन्मान तयांप्रत । दिधला नाहीं तुमच्या जनीं ॥४३॥ इतुकेंचि नव्हे आणिक एक । सांगत्यें चित्त देउनी ऐक । येतां भेटीस ते माझ्या देख । पूजारी गेले द्वार झांकोनि ॥४४॥ ऐसा त्यांचा जाहला अपमान । पाहुनी कळवळलें माझें मन । आतां जात्यें मी येथोन । त्यांचिया संगें खचितचि ॥४५॥ ऐसें सांगोनि शारदांबा । अदृश्य जाहली ती जगदंबा । तैं जगद्गुरूंसी वाटे अचंबा । करिती विचार बहु मनीं ॥४६॥ मग उठोनि लगबगेंसीं । पाचारोनि सांगती जनांसी । जाऊं आतां राउळासी । पूजासामग्री सिद्ध करा ॥४७॥ ऐसें म्हणोनि स्नानादिक । करूनि नित्याचें आन्हिक । गेले पूजेसी अंबेसन्मुख । राहिले उभे त्या वेळीं ॥४८॥ मूर्ति बघतां दचकले भारी । कळा उतरली देवीची सारी । आतां काय करावें, म्हणती अंतरीं । खरा दृष्टांत रात्रींचा ॥४९॥ तेव्हां बोलावूनि निजपरिवारासी । म्हणती कोण नूतन आले, आम्हांसी । सांगा आतां, तुम्हीं तयांसी । कां न केला सन्मान ॥५०॥ योग्य प्रकारें करावा सन्मान । ऐसें असतां गेलां पळोन । रात्रीं पाहिलें आम्हीं स्वप्न । देवी क्षोभली आम्हांवरी ॥५१॥ बघा देवीचें गेलें तेज । मुखकमलींचें कैसें आज । सांगा घडला वृत्तांत जो निज । म्हणोनि क्षोभले तयांवरी ॥५२॥ तेव्हां सांगती सकल वृत्तांत । अपराध जाहला आमुचा अत्यंत । क्षमा करावी, आतां तयांप्रत । सन्मानूनि आणूं गुरुराया ॥५३॥ सारस्वत ब्राह्मणांचे स्वामी । अजूनी असती याचि ग्रामीं । तयांसंनिधीं जाउनी आम्हीं । आणूं बोलावुनी आज्ञेपरी ॥५४॥ मग जगद्गुरु निजपरिवारासहित । आले स्वामी असती जेथ । घेतली आदरें तयांची भेट । आणि बोलिले तें ऐकावें ॥५५॥ आमुच्या जनांचा अपराध थोर । नाहीं केला आपुला सत्कार । क्षमा करावी तयां साचार । ऐसें विनविते जाहले ॥५६॥ यावरी बोलती स्वामी सुंदर । अपराध कवणाचा नाहीं, सर्वत्र । भरला प्रभु भवानीशंकर । दोषातीत असे तो ॥५७॥ ऐकतां ऐसें स्वामींचें वचन । आणि ब्रह्मतेजाचें पाहतां वदन । संतोषलें जगद्गुरूंचें अंतःकरण । मग प्रेमें बोलती उभयतां ॥५८॥ तेव्हां तयांचे कळलें संपूर्ण । विद्वत्ता आणि तपोबल पूर्ण । स्वप्नीं सांगितली जी खूण । सत्य वाटली त्यांलागीं ॥५९॥ शारदादेवीचें तेज तें जाण । घेतलें यांनीं आकर्षून । ऐसी योग्यता आहे पूर्ण । सत्य सत्य यांच्यांत ॥६०॥ ऐसें म्हणोनि अंतर्यामीं । विचार करितीन जगद्गुरु स्वामी । कीं शारदादेवीचें तेज तें आम्हीं । घेऊं माघारें विनवोनि ॥६१॥ नातरी आपुल्या पवित्र मठाची । कीर्ति नष्ट होईल साची । म्हणोनि कला शारदेची । मागुनी घ्यावी त्यांपाशीं ॥६२॥ ऐसें विचारोनि मानसीं । म्हणती आमुच्या स्वामींसी । शारदादेवीची कला जैसी । घेतली तैसी द्या हो ॥६३॥ करावें पुनरपि आवाहन । कलेचें प्रतिमेमाजीं पूर्ण । ऐकतां तयांचे प्रेमळ वचन । डोलविती मान स्मितमुखें ॥६४॥ अवश्य देऊं कला तेज आतां । नका करूं कांहीं चिंता । सकलही कर्ता करविता । तोचि भवानीशंकर ॥६५॥ ऐसे ऐकतां मधुर बोल । जगद्गुरूंच्या आनंदा नाहीं मोल । त्वरेंचि आणवुनी वाजंत्री ढोल । मिरवित नेलें मठासी ॥६६॥ देउनी नाना वस्त्रें भूषणें । गौरविलें बहुत सन्मानानें । आणि देउळीं नेउनी त्वरेनें । देवविलें दरुशन देवीचें ॥६७॥ मग आमुच्या सद्गुरुनाथें । काय केलें सांगतों मी तें । करिते जाहले एकाग्र चित्तें । अनुष्ठान थोर त्या स्थानीं ॥६८॥ आणि करिती प्रार्थना स्तवन । म्हणती शारदे बिंबीं येऊन । बैसें तूं आतां सकलां दरुशन । देईं झडकरी माउलिये ॥६९॥ ऐसें बोलतां स्वामी सुकुमार । काय जाहला चमत्कार । मुखकमळीं तेज तें अनिवार । झळकलें शारदा देवीच्या ॥७०॥ बघतां सकलही आश्चर्यचकित । जगद्गुरु तोषले मानसीं बहुत । मग घातलें दंडवत । जगद्गुरूंनीं तेवेळीं ॥७१॥ उपरी केला सन्मान । संस्थाना शोभे ऐसें भूषण । छत्रचामरादि बिरुदावळी अर्पण । केली आमुच्या स्वामींसी ॥७२॥ आणिक 'आडवी पालखी' याचा । अधिकार दिधला मनःपूर्वक साचा । यावरी म्हणती कांहीं तुमचा । हेतु असेल तो सांगावा ॥७३॥ येथे येण्याचें काय कारण । नाहीं पुसिलें आपुल्यालागुन । आतां सांगावें काय तें पूर्ण । करूं कार्य आपुलें पैं ॥७४॥ यावरी बोलती सद्गुरुस्वामी । पुसतां तें कारण सांगतों आम्हीं । "संमतिपत्र आणावें तुम्हीं । म्हणोनि रायें पाठविलें ॥७५॥ नगर-संस्थानींचा राव । म्हणे तुम्ही सारस्वत हे सर्व । यांचे स्वामी होय हा ठराव । सिद्ध करोनि दावा पैं ॥७६॥ जाउनी शृंगेरी मठासी जाण । आणावें संमतिपत्र जगद्गुरूंकडून । दाखवावें आम्हांलागून । ऐसें बोले तो राव" ॥७७॥ तेव्हां स्वामी जगद्गुरु यांनीं । दिधलें संमतिपत्र तत्क्षणीं । मग सद्गुरु संतोषोनि । परतले परिवारासमवेत ॥७८॥ आश्विन शुद्ध नवमी दिवशीं । अद्यापिही श्रृंगेरीसी । आमुच्या सारस्वत-जनांसी । प्रथम सन्मान देती पैं ॥७९॥ मग नगर-संस्थानीं रायाप्रती । भेटावयासी सद्गुरु जाती । संमतिपत्र तया दाखविती । पाहुनी संतोषला तो राव ॥८०॥त्यानें साष्टांग घातलें दंडवत । म्हणे अपराध माझा झाला बहुत । क्षमा करोनि बालकाप्रत । रक्षीं देवा दयाळा ॥८१॥ नकळतां आपुला महिमा अगाध । शिणविलें आपुल्यासी बहुविध । उद्धरीं आतां हा मतिमंद । असे शरण या पायीं ॥८२॥ ऐकुनियां आपुली कीर्ति । आकर्षिली शारदांबेची कांति । क्रोध नाहीं अणुमात्र चित्तीं । प्रार्थितां दिधली पुनरपि ॥८३॥यापरी श्रृंगेरी-ग्रामीं सकल । महिमा दाविली तेथें विपुल । ऐकतां वर्णन पाषाणही विरेल । काय पाड मानवांचा ॥८४॥ ऐसें करोनि रायानें स्तवन । गौरविलें बहुत सन्मानेंकरून । मग गुरुनाथें गोकर्णीं गमन । केलें परिवारासहित पैं ॥८५॥ राहिले येवोनि मठांतरीं । आनंदले ग्रामींचे नर नारी । केला उत्सव नानापरी । अति प्रेमानें त्या वेळीं ॥८६॥ असो कांहीं दिवस गेले । सद्गुरुस्वामींच्या कृपाबळें । राहती सुखानें तये वेळे । सांगतों वृत्तांत पुढील तो ॥८७॥ श्रीसद्गुरु न स्वामीलागीं । वाटे कीं मी असोनि त्यागी । म्हणिजे आपण संन्यासी योगी । असतां येथेंचि कां राहूं ॥८८॥ सदा सर्वदा मठामाजीं । राहणें उचित नव्हे सहजीं । तीर्थयात्रा करणें आजि । कर्तव्य आमुचें हेंचि पैं ॥८९॥ ऐसा विचार करुनी मानसीं । निवेदिला हेतु भक्तांपाशीं । ऐकतां ताप जाहला सकलांसी । काय सांगूं ती कथा ॥९०॥ पडली जणूं वीज अंगावरी । अथवा भूकंप झाला सत्वरी । ऐसें वाटूनियां नरनारी । करिती आकांत ते समयीं ॥९१॥ लागले चरणीं तये वेळ । करिती प्रार्थना मिळुनी सकल । मंजुळ स्वरें परम कोमल । संनिधीपाशीं त्या काळीं ॥९२॥ प्रभो देवा सद्गुरुराया । करुणा करीं आम्हांवरी सदया । नका जाऊं टाकूनियां । अज्ञ बालकां आम्हां हो ॥९३॥ धेनु टाकितां निजवत्सासी । त्याची गति होईल कैसी । हें सांगावें नलगे तुम्हांसी । अज्ञ म्हणोनि विनवितों ॥९४॥ माता अव्हेरुनी गेली बाळासी । तरी त्याची गति होईल केसी । कोण सांभाळील तयासी । सांगा प्रभो दयाळा ॥९५॥ तद्वत् आम्हां दीन बालकां । टाकितां आपदा येईल देखा । कोण सांगूनि आम्हां विवेका । तारील स्वामी गुरुराया ॥९६॥ शिकवी कोण स्वधर्म सारा । येईल कैसा चित्ता थारा । तुजवांचोनि सर्व पसारा । सांभाळील कोण सांगा हो ॥९७॥ नाना आभरणें वस्त्रें सुंदर । रूप लावण्य वर्ण गौर । परी कपाळीं कुंकूं नसतां सुकुमार । काय शोभा तियेची ॥९८॥तैसे आम्ही सकल भक्त । नसतां सद्गुरु देशीं सतत । कैंच्या सुखासाठीं जगावें जगांत । त्याहुनी मरणें योग्य गमे ॥९९॥ म्हणोनि देवा दयाळा आतां । नका जाऊं सोडुनी ताता । उद्धरावया आपुल्या भक्तां । रहावें येथेंचि आनंदें ॥१००॥यावरी बोलती सद्गुरुराय । येथे आमुचें काज काय । हृदयीं धरोनि सद्गुरुपाय । रहा सुखानें सकलही ॥१०१॥ सद्गुरु व्यापक सर्वत्र भरला । घडिघडी आठवा या मद्वाक्याला । नश्वर शं जाणा दिसे जें तुम्हांला । शाश्वत तें एक परब्रह्म ॥१०२॥ नश्वर ऐशा या देहासी । भुलुनी शेवटीं जावें फांशीं । यमराजाच्या दरबारासी । कर्मापरी आपापुल्या ॥१०३॥ फिरुनी लक्ष चौऱ्यांशीं योनी । येई मनुष्य जन्मालागुनी । हा अमोलिक जन्म दिनरजनीं । विषयसुखांत घालूं नये ॥१०४॥ मी कोण कोठला याचा विचार । करावा मानवें अहोरात्र । तरीच होईल तयांचा उद्धार । गुरुकृपेनें सहजचि ॥१०५॥ म्हणोनि तुम्ही करा विचार । निजस्वरूपाचा वारंवार । देह मी नव्हें ऐसा निर्धार । धरा निर्मल चित्तानें ॥१०६॥ मग होईल परम ज्ञान । यामाजीं नसे अनुमान । करा निर्मल अंतःकरण । तरीच कार्य साधेल ॥१०७॥ असो आतां आम्ही जाण । जाऊं कराया तीर्थाटन । सद्गुरुकृपा असे परिपूर्ण । तुम्हांवरी खचित पैं ॥१०८॥ ऐसें ऐकतां सद्गुरुवचन । झालें सर्वांचं मन उद्विग्न । म्हणती देवा न करीं कठिण । आम्हांवरी हृदय तें ॥१०९॥ बालका मातेवीण पुसे कवण । सांगा हो देवा आम्हांलागून । जावें आतां कवणा शरण । प्रभो गुरुनाथा दयाळा ॥११०॥ देउनी आम्हांसी दरुशन । सुखविलें सकलांसी कांहीं दिन ।आतां गेलां जरी टाकून । जाईल प्राण आमुचा हा ॥१११॥ दीप नसतां जैसें सदन । अंधारें उपयोगा न ये जाण । तैसें श्रीसद्गुरूवांचून । जिणें आमुचें व्यर्थचि ॥११२॥ ऐसी नानापरी करुनी प्रार्थना । म्लान वदनें भाकिली करुणा । आणि घालुनी लोटांगणा । वर्षला पर्जन्य अश्रूंचा ॥११३॥यापरी प्रार्थितां बहुत । द्रवलें सद्गुरुस्वामींचें चित्त । म्हणती तुमच्या भक्तीनें आम्हांप्रत । बांधिलें तें सोडवेना ॥११४॥ तेव्हां संतोषले समस्त । राहवुनी घेतलें तयांप्रत । मठामाजीं प्रेमानें बहुत । सारस्वतवृंदानें तेधवां ॥११५॥ लोटल्यावरी कांहीं दिवस । नगर-संस्थानींच्या जनांस । कळविलें इकडील वृत्तांतास । गोकर्णींच्या जनांनीं ॥११६॥ पुढील अध्यायीं हेंचि निरूपण । सांगूं तुम्हां विस्तारून । शाश्वत मठ तेथें बांधून । शिष्यस्वीकारही करविला ॥११७॥ श्रीसद्गुरु-आनंदाश्रम । आणि शिवानंदतीर्थ सद्गुरु परम । यांच्या प्रसादें पंचम । अध्याय गुरुदासें संपविला ॥११८॥स्वस्ति श्रीचित्रापुर । गुरुपरंपराचरित्र सुंदर । ऐकतां दैन्य हरेल समग्र । पंचमाध्याय रसाळ हा ॥११९॥ अध्याय ५ ॥ ओंव्या ॥ ११९ ॥ ॐ तत्सत्-श्रीसद्गुरुनाथचरणारविंदार्पणमस्तु ॥ ॥ इति पंचमोऽध्यायः समाप्तः ॥ N/A References : N/A Last Updated : January 19, 2024 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP