मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र|
अध्याय ॥६१॥

चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥६१॥

सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय.


श्री गणेशाय नमः । श्री महाकाली महालक्ष्मी नमः । श्री महासरस्वती माताय नमः । श्री भवानीशंकराय नमः ॥१॥
सर्व कुलदेवतांसी वंदन । श्री दुर्गापरमेश्वरीसी नमन । सकल गुरुपरंपरेसी वंदून । कथिते पुढील निरुपण ॥२॥
श्री आनंदाश्रमांनी समाधी घेता । कार्यरत जाहले टीकाकार संपूर्णतः। स्वामी परिज्ञानाश्रमांची आध्यात्मिक परिपक्वता । विषयी वाद उमटला ॥३॥
न घेता स्वयें पूर्ण अध्यात्मानुभव । काहींनी केला प्रश्न उद्भव । त्यास्तव विषण्णतेचा प्रादुर्भाव । जाहला अल्प जनमानसीं ॥४॥
स्वामींवरी आला विपरीत काळ । जाहले अंतरी स्वामी व्याकुळ । अपप्रचारा आला सुकाळ । विपर्यासार्थ स्थिती उद्भवली ॥
काय करावे कोठे जावे । सत्य केवी भक्तां सांगावे । मठोन्नतीस कसे साधावे । चिंतिती स्वामी परिज्ञानाश्रम ॥६॥
मानसी आले दडपण । दुर्दैवे लाभले विपर्यासाचे आभूषण । जाहले जीणे कठीण । तन मन त्रस्त जाहले ॥७॥
दिली आरोग्यवृद्धी कारणे । वैद्यांनी एनट्रूयीन एस इंजेक्शने । परी प्रारब्धांशी झगडणे । असाध्य केवळ मानवा ॥८॥
अनारोग्ये वेढले अधिक । श्री परिज्ञानाश्रम कायेसी सात्विक । मधुमेह रक्तदाब आदिक । व्याधींनी ग्रासली काया ॥९॥
नूतन कार्य हाती घ्यावे । त्यात विघ्न नवरूपे यावे । ह्या मायाशक्तीसी काय म्हणावे । सांगा भाविक सज्जनहो ॥१०॥
दृश्य विघ्नांव्यतिरिक्त । आली विविध विघ्ने खचित । करणी जारण मारणादी प्रयोग विपरित । जाहले श्री स्वामींवरी ॥११॥
बारा ऑक्टोबर सदुसष्टला । विजयादशमी सुमुहूर्ताला । जाहला धर्म पट्टाभिषेक सोहळा । स्वामी परिज्ञानाश्रमांचा ॥१२॥
मठाधिपत्य सूत्रे घेऊनी हाती । अवलोकिती मठाची आर्थिक स्थिती । मनी योजूनी मठोन्नती । चिंतिती मानसी श्रीपरिज्ञानाश्रम ॥१३॥
परी सुदैवाने सोडिला हात । सहकार्य उणे पडले कार्यात । विचार विनिमयास्तव प्रत्यक्षात । राही समय उणा कार्यकर्त्यांसी ॥१४॥
सकल रिती नियमांचा करिता अभ्यास । ध्यानी आले श्री स्वामीजींस । प्रचलित कामकाज नियमांस । बदलणे जरूरी असे ॥१५॥
चिंतिती स्वामी परिज्ञानाश्रम । की बदलता संचलित नियम । होईल जनमानसी संभ्रम । अनाहूतपणे समाजामाजी ॥१६॥
पुरोगामी अन् प्रतिग्रामी जनांत । उद्‌भवेल वैचारिक द्वंद्व समाजात । सामान्य असामी ह्या वितंडवादात । होईल किंकर्तव्यमूढ ॥१७॥
लोकनिंदेस आम्ही भ्यावे । तरी मठोन्नतिस कसे साधावे । साधले सु-इप्सित बरवे । सहकार्य मिळता कार्यकर्त्यांचे ॥१८॥
जाणण्या जमाखर्चाचा मेळ । अभ्यासिले हिशोब सकळ । उपाय शोधिला दुर्मिळ । तो परीसावा सज्जनहो ॥१९॥
नित्य पूजा सेवेंत येती । शेकडो नारळ मठाप्रति । परी त्या श्रीफळांन्वये आर्थिक प्राप्ती । नच होई मठासी ॥२०॥
ह्यास्तव पाहुनी आर्थिक निगमागम । योजिला उपाय सुगम । चार आणे प्रति श्रीफळ ठेवूनी दाम । करावी विक्री मठान्वये ॥२१॥
मठांत श्रीफळ मिळे स्वस्त । मंडईतील किंमती होत्या जास्त । खरेदी करिती सकल ग्रामस्थ । संतोषाने मठांतूनी ॥२२॥
धनप्राप्ती जाहली मठासी । नच रूचले नवनियम प्रतिगाम्यांसी । ह्यास्तव पूर्ण सहकार्य स्वामींसी । नच लाभले कार्यामाजी ॥२३॥
जाइला अपप्रचार अमित । भक्तजन जाहले संभ्रमित । कथिण्या जनांसी सत्य घटित । लिहिले पत्र कन्नड भाषेत ॥२४॥
देऊनी पत्रासी नाव 'प्रबुद्ध परिज्ञान' । दिधले सत्याधारित स्पष्टीकरण । सुबुद्ध सारस्वत समजालागोन । स्वामी परिज्ञानाश्रमांनी ॥२५॥
नंतर त्या पत्राचे इंग्रजी रूपान्तर । केले मुंबई शिष्यवृंदाने नंतर । ज्या निमित्ते जाहला जनजागर । ऐकूनी सद्‌गुरु मानस ॥२६॥
मठ व समाजाच्या प्रेमापोटी । रचिली उन्नतिची बीजें गोमटी । परी विपर्यास तो उठाउठी । घेई असंतोषाचे रूप ॥२७॥
समाजकार्ये ती सुरेख । होती सहकार्यानेची अनेक । निमाला स्वार्थापोटी विवेक । काही जन मानसी ॥२८॥
दाविता सद्गुरुंवरी अविश्र्वास । मनाई केली स्वामींनी पादपूजेस । "नको हा मान-सन्मान आम्हांस"। म्हणती स्वामी परिज्ञानाश्रम ॥२९॥
देव तो भावाचा भूकेला । त्यामी कासया व्याप सगळा । सद्‌गुरुरूपी अलख निरंजन प्रेमळा । नच कांही उणे जगी ॥३०॥
सद्गुरुंसी हवे भक्ती प्रेम । अविरत विश्वास अनुपम । साशंक चित्ते पूजिता अवमान । होई सद्गुरुंचा निश्र्चये ॥३१॥
प्रथम पाद्यपूजा स्वीकारिली । स्वामींनी बाहत्तर साली । आयोजिला समारंभ ज्यावेळी । कॅनरा सारस्वत असोसिएशनने ॥३२॥
ह्या उत्कृष्ट समारंभात । गोकर्ण पर्तगाळी मठाधीशांसमवेत । केली गुरुद्वयांची पाद्यपूजा साद्यंत । चिक्रमने श्रीपादाने ॥३३॥
सहकार्य देण्यास्तव प्रत्यक्षात । केले नालकूर श्रीपादासी उद्युक्त । स्वामी आनंदाश्रमांनी देऊनी दर्शन साक्षात । या गुरुभक्तासी ॥३४॥
सहकार्य भक्तांचे लाभता । आनंद जाहला स्वामींच्या चित्ता । मठोन्नतीने वेग घेतला आता । स्वामी परिज्ञानाश्रमकृपे ॥३५॥
सुदैव पुनश्र्च आले द्वारी । विविध सत्कार्ये करुनी मठासी तारी । गुरुपरंपरेचीच कृपा ही सारी । यामाजी न घ्यावा संशय ॥३६॥
ज्याकारणे मठ जाहला प्रगत । कथिते त्याना आढावा शब्दात । एकता तृप्ती लाभे चित्तात । परिसा सत्कार्य स्वामींचे ॥३७॥
अलवेकोडी कँब्रे मळ्यात । पेरविली बीजें फळ भाज्यांची त्यात । पीक आले घमघशीत । हिरवळ पसरली चोहीकडे ॥३८॥
लावियले बँग्रे समुद्र किनारी । उत्तम माड सत्वरी । दाविल्या गोड पाण्याच्या विहीरी । समुद्र किनारी अडीच फूटावरी ॥३९॥
वृद्धिंगत जाहले उत्पन्न । जाहला मठ स्वायत्त संपन्न । समृद्ध जाहले मठ व्यवस्थापन । अल्प कालावधी माजी ॥४०॥
दीन होतकरू विद्यार्थी साहाय्यार्थ । संस्कृत विद्या उत्तेजनार्थ । विद्यार्थी सर्वांगीण विकासार्थ । दिधल्या अनेक शिष्यवृत्त्या ॥४१॥
संस्कृत विद्यापीठ स्थापनार्थ । उद्दिष्ट ठेवूनी मनी यथार्थ । सूचित केले समाजात समर्थ । विज्ञापन देऊनी मासिकात ॥४२॥
परी विद्यार्थी एकही नच मिळाला । संस्कृत विद्यापीठ स्थापनेला । स्वप्न विरले त्याची समयाला । स्वामी परिज्ञानाश्रम मनीचे ॥४३॥
धर्म विज्ञान शास्त्राचा माधूनी समन्वय । भक्तां द्यावे चिरंतन अभय । ग्रामस्थांसी करुनी निर्भय । साधावी चित्रापूर ग्राम समृद्धी ॥४४॥
ह्यास्तव भेटूनी स्वयें मठ परिवारास । अन् सकल ग्रामस्थांस । जाणिले सर्वांच्या हृद्गतास । स्वामी परिज्ञानाश्रमांनी ॥४५॥
या विषयीचे उदाहरण । परिसा जे हृदयद्रावक पूर्ण । निर्णय घेतला महत्त्वपूर्ण । स्वामी परिज्ञानाश्रमांनी ॥४६॥
एक दुःस्वी इमाई स्त्री ग्रामस्थ । आली श्री भवानीशंकर दर्शनार्थ । विधर्मीय म्हणूनी प्रवेशार्थ । अनुर्मात तिज ना मिळाली ॥४७॥
स्वामींनी पाहूनी दीन स्त्रीसी । पुसिले कारण रुदनाचे तिजसी । 'काय कारणे येथ बैसलीसी । व्यथित होऊनी अंतरी ॥४८॥
इसाई स्त्री म्हणे स्वामींनी । 'शस्त्रक्रियेस्तव निघाले इस्पितळासी । मम आरोग्यास्तव प्रार्थिण्यासी । आले मी येथे भक्तीभावे ॥४९॥
परि मी विधर्मीय असुनी । कसे प्रवेशावे मठालागोनी । प्रार्थण्यासी श्री भवानीशंकर चरणी । जो मज येशुसम भासे ॥५०॥
परी वाटे जाहला अपशकुन । नच जाहले प्रभु दर्शन । सुरक्षित घरी परतोन । येईन का ऐसे वाटे मनीं’ ॥५१॥
ऐकता तियेचे प्रांजळ भाषण । आणिक तिची श्रद्धा पाहुन । द्रवन्ले करुणेने निर्मळ मन । स्वामी परिज्ञानाश्रमांचे ॥५२॥
वदती स्वामी त्या स्त्रीसी । यावे प्रभुदर्शनार्थ मठासी । भक्तीभावे स्मरुन श्री भवानीशंकरासी । घ्यावा आशिरूपी प्रसाद ॥५३॥
स्वयें नेऊनी तिजसी मठात । दिधला प्रसाद आशिषयुक्त । येशु अवतरला खचित । ऐसे वाटे तिज अंतरी ॥५४॥
हा साक्षात् श्री भवानीशंकर । अथवा सगुण येशु साकार । जणू परमात्मा जगदाधार । आला स्वामी परिज्ञानाश्रमरूपे ॥५५॥
मानवधर्म जो महान । तोची सकळ धर्मांचे अधिष्ठान । मानवतेचे जो जाणे महिमान । तो जाणे सर्व धर्मांचे सार ॥५६॥
निर्गुण अद्वैत तत्त्वापायी । नच राही भेद हिंदू इसाई । परमात्मा वसे सर्वांठायी । फक्त मानवताधर्म मानती स्वामी ॥५७॥
आता ऐकावे महिमान । इंग्रजी व इलेक्ट्रॉनिक्सचे अध्ययन । अल्पकाळांत तीक्ष्ण बुद्धीने जाण । स्वामींनी केले तज्ज्ञान्वये ॥५८॥
स्वामी पांडुरंगाश्रम प्रसादीत । पंचवटी करावी सुशोभित । कार्यान्वित करावा प्रांत खचित । जनकल्याण साधण्यासी ॥५९॥
हा उद्देश ठेवूनी मनात । बांधविली नूतन इमारत । रक्तचाचणी प्रयोगशाळा प्रस्थापित । केली प्रयत्नशील राहुनी ॥६०॥
केली गणेश मूर्ती तेथे स्थापित । आसमंत केला सुशोभित । रंगीबेरंगी पुष्पलतिकांसहित । दोनशे निवडुंग लावियले ॥६१॥
बांधियले एक मृगवन । पाळियला व्याघ्र । बछडा लहान । संवर्धिले अश्व श्वान । प्रेमभरे त्यांसी संरक्षूनी ॥६२॥
उपयुक्त यंत्र तपमानदर्शक । प्रस्थापिले पंचवटीवरी सुरेख । काजू आम्रफळे वृक्ष अनेक । लावियले आसमंतात ॥६३॥
चित्रापूर ग्राम लहान । संपर्क जगाशी साधणे कठीण । घेतले बिनतारायंत्रणेचे शिक्षण । स्वामी परिज्ञानाश्रमांनी ॥६४॥
स्वयें बिनतारायंत्रे निर्मिली । व्यवस्था समयसूचक भोंग्याची केली । मासिक प्राप्ती वैदिकांची वाढविली । सुधारुनी वेतन श्रेणी ॥६५॥
जातिधर्म निर्बंध तोडूनी । मानवता धर्म ध्यानी धरूनी । प्रगत भविष्यकाळ अनुरोधूनी । मठ प्रवेशार्थ सर्वां मान्यता दिली ॥६६॥
सकल कामगारांसी करण्या समर्थ । सुखसोयी दिधल्या यथार्थ । दिधल्या मुलांच्या अध्ययनार्थ । शिष्यवृत्त्या अनेक ॥६७॥
स्थापूनी पुरातन मूर्ती संग्रहालय । दिधला दुर्लक्षित मूर्तींना न्याय । कथिण्या मूर्तींचे नाम रूप आशय । नियुक्त केला मार्गदर्शक ॥६८॥
चित्रापूर यंग मेन्स असोसिएशन नामें । म्थापून एक संस्था प्रेमे । उत्तेजिण्या बाल-तरूणांसी सप्रेमे । केली व्यवस्था परिपूर्ण ॥६९॥
देऊनी 'आनंदाश्रय' नाम । वृद्ध निवासार्थ पुण्यमय सुखधाम । वृद्धापकाळी भजण्या प्रभुनाम । बांधियले मठाजवळी ॥७०॥
जनांनी धर्म वर्ण भेद विसरुनी । समत्व भाव ठेवावा मनी । धर्म सांस्कृतिक प्रोत्साहनार्थ स्वामींनी । केला पुनश्च रथोत्सव प्रारंभ ॥७१॥
चित्रापूर रथोत्सव वर्णन । गुरुदासे कथिले चरित्रात संपूर्ण । त्यास्तव आध्यात्मिक गूढार्थ निरुपण । करिते गुरुकृपेने ॥७२॥
अंतर्जगातील मार्ग सुगम । दावी जो सत्स्वरुप उत्तम । सामान्य चक्षूंसी पथ तो अनुपम । नच दिसे कदापि जीवनी ॥७३॥
मानवी काया महत्त्वपूर्ण । अंशरूपी ब्रह्मांडाची प्रतिकृती पूर्ण । चंद्र सूर्यादी ग्रह तारे महान । वसती तेथे गुप्तरूपे ॥७४॥
गुदद्वारा पानूनी शिरापर्यंत । असती मुख्य सप्तचक्रे येथ । हाची अध्यात्म मार्ग सुपंथ । जेथ चित शक्ती, प्रयाण करी ॥७५॥
रथात मुख्य चक्रे चार । अंतर्भागी दोन चक्रे साकार । कलश बिंदू सूक्ष्म अतितर । जाणावा सातव्या चक्रापरी ॥७६॥
पंचज्ञानेंद्रिये पंचकर्मेंद्रिये उत्तम । रथ पायऱ्या सर्वोत्तम । मनोनिग्रह सद्‌स‌द्‌विवेक अनुपम । हेची द्विरज्जू रथाचे ॥७७॥
रथचक्रासमोरी असती फळे । तीच कर्म-अकर्मांची सुफळे । कर्म बेष्टित जीवन सगळे । साधक पार करी प्रयत्न बळे ॥७८॥
भक्ति विश्वास धरूनी चित्तात । हृदयी परमात्म्यासी स्मरत । ठेविता ही तनु अध्यात्मी रत । अध्यात्म सुपंथी चाले साधक ॥७९॥
बिजाक्षरयुक्त गुरुमंत्र सबळ । स्मरता अर्थ जाणूनी सांज सकाळ । लाभूनी सत्वर गुरुकृपा बळ । साधक चक्रभेद करी ॥८०॥
प्रथम चक्र ते मूलाधार । द्वितीय स्वाधिष्ठान चक्र साकार । तृतीय मणिकपूर चक्र घेई आकार । नाभीदल परिसरान्तरी ॥८१॥
अनंत सद्गुरु निराकार । अंतरी देई भक्ता विवेकाधार । प्रयत्नबळे साधक करिता संचार । पोहोचे अनाहत चक्रे हदयी ॥८२॥
ह्या चक्रातूनी करिता पथक्रमण । दिने त्रिवेणी संगम महान । ईडा पिंगला एकरूप होऊन । मिसळती मुख्य सुषुम्ने माजी ॥८३॥
ज्ञानशक्ती महासरस्वती । गुप्तरूपे करी प्रयाण निश्चिती । हंसरूपे साधक जगे जगती । योग्यायोग्य पाहुनी ॥८४॥
प्रेमभक्तीचा होई विलास । हृदय मंदिरात खास । जेथे कृष्णरूपी सद्गुरु निवास । राही सदा सर्वदा ॥८५॥
तेथुनी करिता साधक प्रयाण । करी विशुद्ध चक्रभेदन । प्राण वाही जो गुप्त रूपातून । ज्ञान होई त्याचे साधकासी ॥८६॥
शक्ती प्रयाण करी आज्ञाचक्रात । शिवशक्तीच्या मीलन बिंदूत । सप्तदल पातालादी विश्व पताकांत । वास करी चित्शक्ती ॥८७॥
ही द्वैताची परम सीमा । दावी सद्‌गुरु कृपेचा मधुरिमा । ऋद्धी सिद्धीच्या निगमागमा । जाणे साधक चित्तांतरी ॥८८॥
संपते द्वैतविश्व येथे समस्त । चित्त राही सदा प्रफुल्लित । परी निर्गुण निर्विकार अद्वैत । नच भासे या स्थानी ॥८९॥
विश्वंभर सद्गुरु कृपेविना । असाध्य मार्गक्रमण भक्तांना । सप्तमचक्री मस्तकी प्रवेशताना । लागे अनन्य शरणागती ॥९०॥
कळस रथाचा अनुपम । सहस्त्रार चक्र मूळ धाम । जेथ वसे श्री भवानीशंकर परब्रह्म । निजानंदीरत साक्षीभावे ॥९१॥
हेची ज्ञानशक्तीचे मूळधाम । परम शांत मनोरम । आनंद ज्ञान शांतिसंगम । होई ह्या चक्री मस्तकांतरी ॥९२॥
येथवरी रथाचा गुढार्थ कथिला । जो स्वामींनी उपदेशिला । आता आरंभिते निरुपणाला । पुढे ऐकावे सज्जनहो ॥९३॥
होई सायंकाळी 'अभिनव' संमेलन । आयोजिले स्वामींनी महान । बौद्धिक, वैचारिक आदान प्रदान । होई ह्या संमेलना कारणे ॥९४॥
संस्कृती धर्म ज्ञान विज्ञान । विविध विषयांतील येतील तज्ज्ञ । सर्वसामान्य भाविक सुज्ञ । लुटती श्रवणमुख अलौकिक ॥९५॥
करूनही इतुके सत्कार्य । लाभली टीकास्त्रे अनिवार्य । जेणे व्यथित जाहले गुरुवर्य । किंकर्तव्य स्थिती होऊनी ॥९६॥
केले वाराणसीस प्रयाण स्वामींनी । संस्कृत विद्यापीठांत अध्ययन करुनी । सहजतेने उत्तीर्ण होऊनी । परतले चित्रापुरामाजी ॥९७॥
अध्ययनी नव्हते कधीच ध्यान । अध्ययन राहिले अपूर्ण । ऐसा टीकास्त्रांचा शर तीक्ष्ण । वेधिला टीकाकार धनुर्धारींनी ॥९८॥
मानवी अहंकारास म्हणावे काय । करावा कोणी जगीं न्याय । थोपवावा कसा अन्याय । या घोर कलियुगामाजी ॥९९॥
कांही बुद्धिजीवी सुधारकांनी । नानाविध आरोप करुनी । दावा पोलीस व कोर्टात केला झणी । कांही विपर्यासापायी ॥१००॥
मानवी अहंकार तो धुंद । कोर्टात जाऊनी बैसता स्वच्छंद । संभ्रमित जाहला समाज सबंध । पाहूनी हे अघटित कृत्य ॥१०१॥
सर्व समाजस्थिती पाहूनी । चित्त वाहीले परमाणू संशोधनी । ज्या विषयी लिहिले आम्ही समजावूनी । मागील अध्यायामा जी ॥१०२॥
सद्‌गुरुंची घेऊनी अनुमती । जोडीली स्वामींनी पुर्णशक्ती । विविध प्रयोग करण्या अध्यात्म जगती । अनेक धर्मपंथापरी ॥१०३॥
ह्या संशोधनासी लागे एकान्त । परी दुर्मिळ मिळणे एकान्त शांत । तरीही धरुनी निग्रह मनांत । जोपासले व्रत संशोधन ॥१०४॥
वदती आपुलकीने भक्तांपाशी । प्रेमे सांभाळूनी त्यांसी । ऐकूनी भक्तांच्या शंकाकुशंकासी । निरसती समस्या भक्तांच्या ॥१०५॥
सामान्यापरी बालनी सर्वांशी । परी अंतरी दृष्टी जडली परमाणूशी । परमाणूंत प्रवेशली दृष्टी जशी । तसे भासती अधिक सामान्यांपरी ॥१०६॥
कधी बैसुनी जाती तुर्यावस्थेत । स्वर बदले कधी क्षणात । बोलती अर्थपूर्ण संदेशात । कधी राहती शुन्यावस्थेंतरी ॥१०७॥
कधी नाचती आनंदाने । गीत गाती कधी प्रेमाने । वागती कधी उग्र तपस्व्याप्रमाणे । बुडती की पठणांत ॥१०८॥
याचा आला अनुभव भक्तांसी । या विषयी नच मंशय मजसी । परी षड्रिपुंनी ग्रासले मानवासी । कोण प्रयत्न करी जाणण्याचा ॥१०९॥
करिता सद्गुरुंवरी अनन्य भक्ती । वृद्धिंगत होई विश्र्वास चित्ती । सहजतेने हाई चित्तशुद्धी । भक्त वर्तता सद्गुरु आज्ञेपरी ॥११०॥
प्रगटले परब्रह्म प्रत्यक्षात । आमुच्या चित्रापूर सारस्वतात । आला परमात्मा तारण्या विश्र्वात । समाजोद्धारा कारणे ॥१११॥
आम्ही म्हणवितो सुशिक्षित सज्जन । अहंकारे मदोन्मत्त होऊन । नच जाणिले सद्गुरु रूप महान । स्वामी परिज्ञानाश्रमांचे ॥११२॥
प्रशांत ज्ञानी सद्गुरु दयाधन । श्री परिज्ञानाश्रम महान । याचे परिसावे उदाहरण । शांत सावध चित्ते भाविकहो ॥११३॥
विचारी भक्त स्वामींसी । आपुले अगम्य वर्तन ना उमगे जनांसी । ज्या कारणे उ‌द्भवल्या जनमानसी । शंकाकुशंका अनेक ॥११४॥
तेणेच निर्मिले वितंडवाद । पुरोगामी प्रतिगामी मतभेद । प्रतिद्वंदींचा संशय वेध । नेई विरोधकां कोणत्या गतीसी ॥११५॥
ऐसे ऐकता प्रसन्न वदने वदले । त्या भक्तासी स्वामीजी भले । बहुमुल्य संदेशासी उपदेशिले । श्रवण मनन करा श्रोतेहो ॥११६॥
इतुक्या अनंत स्वरूपात । कोण विरोधी कोण भक्त । क्षणभंगूर हे नश्वर जीवित । खेळ मारा श्री भवानीशंकराचा ॥११७॥
सकल जीव सृष्टीत गही । अनंत निर्विकार परमात्मा पाही । सगुणरूपे भजती त्यासीही । मानव स्थलकाल गुणानुरूप ॥११८॥
जगदंबेचे एकपात्री प्रयोग अनेक । चालती ब्रह्मांडपटावरी सुरेख । तीच ब्रह्मा तीच ब्रह्माणी एक । नाव रूप कल्पनातीत जी ॥११९॥
तीची ब्रह्मा विष्णु महेश । तीची ॐकार स्वरूप गणेश । अल्ला बुद्ध महावीर ईश । तीच विश्वंभर सद्गुरुमाऊली ॥१२०॥
जगी अनंत संत झटले । व तिचे स्वरूप गूढ कोणा ना कळले । तिजविषयी करूनी तर्क थकले । सारे बुद्धीवादी ॥१२१॥
आम्ही चालतो योग्य मार्गावरी । जगदंबा माझा हात धरी । वाहिले आम्ही सर्वस्व तिजवरी । साक्षी राही आम्हा सद्गुरु रूपे ॥१२२॥
अजातशत्रू आम्ही जीवनान्तरी । जरी भासे मी कांहीस शत्रूपरी । आमुचा किंचितही रोष नसे त्यांवरी । कळकळ त्यांची मठाप्रति ॥१२३॥
आमुच्यावरी जरी श्रद्धा त्यांना नसली । असे गुरुमठावरी प्रीत चांगली । नाहीतर असती घरी बसली । स्वस्थ आरामांत ॥१२४॥
श्रद्धा भक्ती मठावरी त्यांची । देई शक्ती त्यांसी विरोधाची । नाहीतर इतुके कष्ट झेलण्याची । त्यांसी गरज ती काय? ॥१२५॥
वैचारिक मतभेद अनेक । वसती घरोघरी प्रत्येक । परी वैचारिक मनोमिलनांचे सुख । असे अगत्याचे समाजांत ॥१२६॥
जयांसी नसे आम्हावरी विश्र्वास । त्यांवरी नसे आम्हा रोष । असे आमच्या प्रारब्धाचा दोष । लाभला आम्हा दुर्दैवे ॥१२७॥
जग मतैक्ये समाजाची होईल प्रगती । साधेल विक्रमी उत्क्रांती । सारस्वतांत वर्तेल परमशांती । गुरुपरंपरा कृपाप्रसादाने ॥१२८॥
भक्तीची असती अनेक रूपे । शास्त्रांत कथिली नऊ मुख्य रूपे । नटली जी सात्त्विक स्वरूपे । उदाहरणे याची अनंत ॥१२९॥
विरोधक, ऐसे म्हणती ज्यांसी । स्वीकारिले त्यांनी विरोधभक्तीसी । विकल्पयुक्त त्यांच्या मानसी । होई आपैसे प्रभुस्मरण ॥१३०॥
मागितली विरोधभक्ती । अनेकांनी जन्मोजन्मान्तरी । रावण कुंभकर्ण हिरण्यकश्यपूची भक्ती । असे उदाहरण याचे ॥१३१॥
सुख येता जीवनी । विसरती मित्रभावासी मनी । परी सुखदु:ख येता दोन्ही । कोणीही नच विसरे शत्रूंसी ॥१३२॥
विरोधभक्तीची महती । नसे उणी मुळीच या जगती । अनवधानाने ध्यास लागे गुरुप्रति । त्याचेही मोल नच उणे ॥१३३॥
निंदकाचे घर असावे शेजारी । वदती तुकारामादी मंडळी खरी । त्यांच्या योगे वाढे जागरूकता भारी । महत्त्वपूर्ण जी अध्यात्मी ॥१३४॥
विरोधभक्ती लागना प्रभुचरणी । दुश्वासरूपे ही प्रभुस्मरणी।  मिळे त्यांसीही फळ झणी । पाहा सज्जनहो विरोधाचे फळ ॥१३५॥
सुयोग्य समय येता । कळे त्यांसी आपुली चूक समूळतः । सत्य असत्याची जाण होता । पश्चात्ताप होतो अंतरी ॥१३६॥
पश्चात्ताप देई संताप । भवतापे जळे सर्व पाप । पापे निरसता येई शरण आपोआप । पोहोचे ज्ञानमार्गावरी ॥१३७॥
सर्वश्रेष्ठ असे पराभक्ती । प्रभुचरणी वसे अनन्य प्रीती । हंसक्षीर न्याये वर्तूनी जगती । स्वीकारी प्राप्त जे प्रभुकृपे ॥१३८॥
जे सुखदुःख प्राप्त जीवनी । तेंची भगवत् प्रसाद मानूनी । त्यातील पूर्ण मर्म जाणूनी । रत राही प्रभुस्मरणी ॥१३९॥
जे होई ते भल्यासाठी । ऐसा विश्वास ठेवूनी पोटी । करी सर्व कर्में गोमटी । राजहंसाचे हे प्रतिक ॥१४०॥
विविध पशुवृत्ती वेगळ्या । तेवीच मानवी मनोवृत्ती आगळ्या । प्रीतीमाजीही असती सगळ्या । सिंह, हत्ती, मंडूक, बगळ्यापरी वृत्ती ॥१४१॥
हिंदीत 'बगुलाभगत' म्हणती जयासी । जो लक्षी सदैव भक्षासी । काय म्हणशी ऐशा भक्तासी । लक्ष ज्याचे स्वार्थावरी ॥१४२॥
असमर्थ राही चिखल खास । गढूळ करण्यासी कमलपत्रास । ऐशा श्रेष्ठ कमल पुष्पास । सेवन करी भृंगा प्रेमे ॥१४३॥
येऊनी गुरुचरणी अधूनमधून । गुरुप्रेम मध सेवी भक्तीतून । सर्वही कर्मे सुभट करून । राही जगी भ्रमरापरी ॥१४४॥
मंडूक राही सतत कमलापाशी । परी ना जाणे कमल श्रेष्ठतेसी । भक्षी स्वार्थ अहंकार मानसी । मंडूकापरी भक्तास काय म्हणशी ॥१४५॥
गजापरी बलाढ्य बुद्धिमान । तन मन धनाने शक्तीमान । राखूनी स्वयें स्वाभिमान । स्मरी सद्गुरुरायांसी अंतरंगी ॥१४६॥
परम सात्त्विक सेवाभावी । गुरुचरणी विनम्र, सुस्वभावी । हाकेसरशी निःस्वार्थपणे धावी । गुरुआज्ञा झेलण्यासी ॥१४७॥
स्वामी वदती भक्तांसी । विरोधक म्हणती जन ज्यांसी । ते दुःश्वासरूपे स्मरती मानसी । तेही पाहता नच थोडके ॥१४८॥
सिंहापरी निंदक गर्जना करी । धैर्याने सर्वांचा सामना करी । जागरूकतेने पाठपुरावा करी । स्मरी गुरुंसी विरोधात ॥१४९॥
स्वामी मग वदती भक्तांसी । आतां सांगावे कुणी आम्हासी । भक्त विरोधक या तुलनेसी । कैसे मानावे आम्ही ॥१५०॥
ऐसे विविध रूपांत पाहिले भक्त । आम्ही आमच्या जीवनात । पाहतो आम्ही सारे जीवनमुक्त अद्वैत दृष्टीने पाहता ॥१५१॥
मम जीवनरूपी नाट्यात । परमेश्वर वेंचिली जी पात्रे विश्वात । मुक्तहस्ते करिती जीवनात । आपापुली कार्ये ॥१५२॥
म्हणती श्री परिज्ञानाश्रम प्रेमळ । सारा ऋणानुबंधाचा खेळ । जोवरी जीवन तोवरी मेळ । संपते सर्वही ॠण ओसरता ॥१५३॥
सहिष्णुता विनयशीलता । जागरूकता धर्म तत्परायणता । ज्ञान विज्ञान आनंद एकरूपता । याचे प्रतिक श्री परिज्ञानाश्रम ॥१५४॥
इतुके करूनी चरित्र कथन । करिते एकषष्टदशाध्याय संपूर्ण । अर्पिते श्री परिज्ञानाश्रम चरणी भावपूर्ण । स्मरुनी त्यांसी हृदयांतरी ॥१५५॥
अध्याय - ॥६१॥
ओंव्या १५५ ॥ ॐ तत्सत्-श्रीसद्गुरुनाथचरणारविंदार्पणमस्तु ॥
॥ इति एकषष्टदशाध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 23, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP