मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र|
अध्याय ॥८॥

चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥८॥

सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीशारदांबायै नमः ॥ श्रीशंकराश्रमस्वामीगुरुभ्यो नमः ॥ श्रीभवानीशंकराय नमः ॥ॐ॥
जय जय द्वितीय शंकराश्रमा । भक्तकामकल्पद्रुमा । कैसी वर्णावी तुझी महिमा । सांग तूंचि दयाळा ॥१॥
मी कांहीं वेडें वांकुडें । बोलतसें देवा तुजपुढें । परी तूं क्षमा करिसी एवढें । धैर्य म्हणोनि बडबडतों ॥२॥
कैसें तरी बोले बाळ । नाहीं त्यासी काळवेळ । बोबडे अथवा अर्धवट बोल । तरी मातेसी त्याचा वीट न ये ॥३॥
तद्वत् देवा सद्गुरुराया । न ये बीट तुजला सखया । निजदासाच्या भाषणा म्हणूनियां । करितों अल्प सेवा ही ॥४॥
तूंचि देवा देउनी शक्ति । वदवीं आपुली सुंदर कीर्ति । असो नमन तव चरणांप्रति । देईं सद्गति  सकलांसी ॥५॥
आतां मजवरी कृपा करोनि । द्वितीय भक्ति 'कीर्तन' ही झणीं । देउनी उद्धरी मजलागोनि । ऐसी तव चरणीं प्रार्थना ॥६॥
असो आतां ऐका सज्जन । मागील अध्यायीं निरूपण । परिज्ञानाश्रम यांचें गमन । होय निज-कैलासासी ॥७॥
जाहला सकलांच्या मनासी खेद । सांगते जाहले परम बोध । शंकराश्रम सद्गुरु सुखद । पूर्ण ज्ञानी ते पाहीं ॥८॥
नका करू आतां खेद । विचारें करा 'शिरच्छेद'। हें काय बोलतां तुम्ही अबद्ध । कवणाचा शिरच्छेद करावा ॥९॥
ऐसा प्रश्न जरी करितां । तरी उत्तर त्याचे आतां । सावध करोनि आपुल्या चित्ता । परिसा तुम्ही सकळिक ॥१०॥
येथे खेदासी काय कारण । मन हेंचि असे प्रधान । त्याचेंचि करितां कंदन । खेद उद्भवे कोठोनि ॥११॥
बापचि नसतां पुत्र कोठोन । होईल, सांगें तूं बा उत्पन्न । तैसें मनचि नसतां जाण । कैंचें दुःख होईल ॥१२॥
मनचि एक सर्वासी कारण । सुखदुःख होय त्यापासून । म्हणोनि त्याचेंचि करितां खंडन । कैसें होय सुखदुःख ॥१३॥
सुखदुःख हे मनाचे धर्म । मी आत्मा परिपूर्ण ब्रह्म । मज नाहीं सुखदुःख नाम- । रूपातीत मी  पाहीं ॥१४॥
नाम-रूप सारे खोटें । तेथे कैंचें सुंदर वोखटें । बरवें वाईट तेथें कुठें । केवल ब्रह्म मी पाहीं ॥१५॥
बरवें आणि वाईट जेथें । सुखदुःख असे तेथें । मनचि पाही सारें येथें । बरवें वाईट इत्यादिकां ॥१६॥
पहा कैसें तें सांगूं आतां । लावा येथें आपुल्या चित्ता । आधीं बरवें वाईट तत्त्वतां । विवरूं स्वल्प तें पाहीं ॥१७॥
असे एक फळ उत्तम । तें एकासी आवडे परम । तो म्हणे हें असे अनुपम । दुजा बोले वाईट हें ॥१८॥
एकचि फळ परी दोघांसी । द्विधा लागे खचित त्यांसी । त्यापरी बोलती त्या फळासी । वाईट चांगुलें ऐसें हें ॥१९॥
तें फळ नव्हे वाईट चांगुलें । त्यासी मनचि कारण जाहलें । मन पाही जैसें सगळें । दिसे तैसें त्यासी पैं ॥२०॥
यावरी दुजा दृष्टांत ऐका । लिहिणें वाचणें मुलासी एका । नावडे कधींही, त्या लेका । खेळ आवडे बहुतचि ॥२१॥
तेव्हां तो म्हणे खेळ चांगुला । शिकणें वाईट वाटे त्याजला । मनचि कारण इतुकियाला । कैसें तें ऐका आतां पैं ॥२२॥
खेळ खेळतां तो बाळ । शाळेचा खेळ करुनी एक वेळ । खेळे खेळ म्हणुनी केवळ । बहुत आवडे त्या समयीं ॥२३॥
तेव्हां त्यासी शिकणेंचि गोड । वाटे त्यासी नाहीं तोड । हे मनाचे धर्म जाड । असती दोन्ही निश्र्चयें ॥२४॥
एवं चांगुल्या वाइटा मनचि कारण । तेंचि सुख-दुःख भोगे संपूर्ण । आत्मा वेगळा मनाहून । त्यासी न बाधे सुख-दुःख ॥२५॥
म्हणोनि मनासी आधीं जिंकावें । तेव्हां होय सहज स्वभावें । सुख - दुःखातीत आघवें । सारें जग हें दिसतसे ॥२६॥
ऐसा केला सकलां बोध । आपण आधीचि स्वतः सिद्ध । आत्माराम परम शुद्ध । सद्गुरुकृपेनें असती ते ॥२७॥
गुरुकृपा जाहलिया प्राप्त । मग कैंचा उशीर तेथ । आत्मज्ञान होय त्वरित । परी व्हावें पात्र कृपेसी ॥२८॥
पात्र कैसें व्हावें कृपेसी । ऐसा प्रश्न उद्भवेल मानसीं । तरी जितुकें समजेल मजसी । तितुकें सांगतों आतां पैं ॥२९॥
सद्गुरु जो करिती बोध गोड । धरावा मानसीं तो अखंड । तेव्हां होईल गुरुकृपा सदृढ । नाहीं अनुमान यामाजीं ॥३०॥
असो आपुले सद्गुरु स्वामी । ज्यांसी 'शंकराश्रम' म्हणतों आम्ही । ते गुरुकृपेनें होऊनि निष्कामी । झालें परिपूर्ण ज्ञान तयां ॥३१॥
आणि स्वधर्म आपण करुनी । शिकविताति भक्तांलागुनी । प्रेम धरोनि अंतःकरणीं । बोधिती सकलां निर्लोभें ॥३२॥
नसे अणुमात्र लोभ अंगीं । अथवा कीर्ति व्हावी जगीं । हाही नसे हेतु सुमार्गी । लाविले जन सकलही ॥३३॥
तीव्र बुद्धि, अति चतुर । असती सद्गुण त्यांचे अपार । ऐसी मूर्ति परमसुंदर । काय वानूं कीर्ति त्यांची ॥३४॥
नानाविध विषयांमाजीं । सूक्ष्म विचार करुनी सहजीं । मन घालिती प्रत्येक काजीं । तेणें कार्य सफळ होय ॥३५॥
अर्थात् जें जें करिती कार्य । तें तें सूक्ष्म विचारेंचि होय । म्हणोनि बळकट निश्चय । त्यांचा न ढळे कदापिही ॥३६॥
आम्ही मानव करितों काय । विचारावांचुनी करितों कार्य । म्हणोनि आमुचा निश्चय । ढळे वारंवार तो पाहीं ॥ ३७ ॥
असो आतां सद्गुरुनाथ । आपुल्या प्रेमळ भक्तांप्रत । बोधामृत पाजुनी सतत । देह झिजविती सत्कार्या ॥३८॥
काय तयांची लीला सुंदर । यावरी एक कथा सविस्तर । सांगूं आतां चमत्कार । चित्त देऊनि अवधारा ॥३९॥
गोकर्णाजवळी एक ग्राम । 'बंकीकोड्ल' ऐसें नाम । तेथें एक ब्राह्मण उत्तम । सारस्वत होता पैं ॥४०॥
असे धनाढ्य महाथोर । परम भाविक आणि उदार । शंकराश्रम श्रीसद्गुरुवर । यांचा भक्त होता तो ॥४१॥
वारंवार भंडिकेरी-मठासी । जाउनी घेई दर्शनासी । सदा अंतरीं श्रीस्वामींसी । आठवीतसे तो भक्त ॥४२॥
त्याचा असे एक नेम । संध्यापूजादि उरकुनी काम । जाउनी मार्गावरी तो इसम । वाट पाहे अतिथीची ॥४३॥
जरी असे अतिथि ब्राह्मण । तरी त्यासी संगें घेऊन । करीतसे प्रेमें भोजन । ऐसा नेम तयाचा ॥४४॥
जरी भेटला अतिथि शूद्र । तरी त्यासी वाढुनी समग्र । मग जाउनी आपण शीघ्र । करी भोजन प्रत्यहीं ॥४५॥
ऐसा नेम असे तयाचा । सद्गुरुरूप समजुनी साचा । करी सदा तो अतिथींचा । सत्कार पूर्ण निजभावें ॥४६॥
ऐसें असतां एके दिवशीं । रात्रीं झोंपतां विचार मानसीं । करिता झाला कीं श्रीगुरूसी । आमुच्या गृहासी आणावें ॥४७॥
जेथें तेथें पाचारिती भक्त । कधींही आम्हीं श्रीस्वामींप्रत । पाचारिलें नाहीं सदनांत । काय अपराध हा म्यां केला ॥४८॥
तरी आठ दिवसांआंत । पाचारुनी आणावें खचित । नातरी आमुचें जिणें व्यर्थ । ऐसा निश्चय दृढ केला ॥४९॥
असो मग तो ब्राह्मण । निद्रिस्त झाला न लागतां क्षण । उठतां दुसऱ्या दिवशीं जाण । बोले आपुल्या बंधूप्रति ॥५०॥
म्हणे मीं एक केला विचार । शंकराश्रम - स्वामी गुरुवर । त्यांसी येथें बोलावुनी साचार । आणावें ऐसें वाटतें ॥५१॥
ठेवुनी घ्यावें चार दिवस । आणिक उत्सव करावा बहुवस । ऐसें वाटतें माझ्या मनास । सांगतों आतां तुजप्रति ॥५२॥
ऐकुनी वडील बंधूचा विचार । म्हणे धाकुटा बंधु त्यावर । कासया इतुकें अवडंबर । असावी भक्ति मानसीं ॥५३॥
उगीच कासया आणावें सदनीं । तेथेंचि करावी पूजा जाउनी । योग्य न वाटे आपुली करणी । वृथाचि देह शिणवावा ॥५४॥
घेतां ठेवुनी दिवस चार । कष्टचि होतील आम्हां साचार । म्हणोनि तुझा हा विचार । देईं सोडुनी तूं बापा ॥५५॥
ऐकतां बंधूचें हें वचन । खिन्न जाहलें अंतःकरण । परी न बोलतां कांहींच आपण । स्तब्ध राहिला तो भ्राता ॥५६॥
म्हणे आपुल्या मानसीं तेव्हां । काय हें प्रारब्ध आमुचें देवा । प्रपंची बहुत होती सर्वां । कष्ट नानापरी नित्यचि ॥५७॥
परी तुज आणावयासी । त्रास वाटती बहुत आम्हांसी । म्हणोनि बंधु सांगे मजसी । काय प्रारब्ध माझें पैं ॥५८॥
जेव्हां येईल तुझ्या मनासी । तेव्हां येसीं माझ्या गृहासी । तूंचि माझी इच्छा पुरविसी । श्रीगुरुनाथा दयाळा ॥५९॥
तुजला कळे मम अंतर । तूंचि करावी कृपा मजवर । ऐसें बोलतां येई गहिंवर । त्या ब्राह्मणाच्या मानसीं ॥६०॥
कंठ जाहला सद्गदित । प्रेमाश्रु आले नयनांत । ओठ थरथरां कांपती बहुत । जाहला परम दुःखित तो ॥६१॥
मग करोनि विवेक मानसीं । लागला आपुल्या कामासी । नित्यनेमापरी त्या दिवशीं । गेला मार्गप्रतीक्षा करावया ॥६२॥
कुणीही अतिथी अभ्यागत । मिळतील कीं ऐसें बघत । उभा असतां मार्गीं तेथ । भेटले अवचित संन्यासी ॥६३॥
दंड कमंडलु हातीं घेउनी । येतां दिसले तयासी दुरुनी । उभा राहिला पाहात नयनीं । संन्याशासी ब्राह्मण तो ॥६४॥
असतां लांच दहा हात । ओळखुनी त्या संन्याशाप्रत । ब्राह्मण धांवे दुडदुडां तेथ । साष्टांग प्रणिपात घातला ॥६५॥
मग धरोनि त्याच्या करासी । घेउनी येई आपुल्या घरासी । आनंद झाला त्या ब्राह्मणासी । भेटले गुरुराज म्हणोनि ॥६६॥
मग ते शंकराश्रम-गुरुराज । म्हणती त्यासी भिक्षा मज । द्यावी झडकरी ती आज । घेउनी चाललों गोकर्णीं ॥६७॥
तेव्हां लगबगें वाढुनी भिक्षा । म्हणे तो ब्राह्मण एक अपेक्षा । असे माझी, न करा उपेक्षा । रहावें येथेंचि आजि पैं ॥६८॥
मग म्हणती स्वामिराय । तुझी इच्छा सफल होय । धरीं मानसीं प्रभूचे पाय । नाहीं कदापि भय तुजला ॥६९॥
ऐसें म्हणोनि लवलाहीं । भिक्षा घेतसे सद्गुरुमाई । बैसविली आसनीं ब्राह्मणे पाहीं । तेव्हां चमत्कार थोर झाला ॥७०॥
आसनीं सद्गुरूंसी बैसवुनी । क्षणभरी तो गेला कामालागुनी । पुन्हां पहातो तेथें येउनी । तंव स्वामिराज दिसती ना ॥७१॥
मग गेला लगबगें थेट । गोकर्णामाजीं ब्राह्मण त्वरित । भंडिकेरी मठाप्रत । जाउनी बषे त्या स्थानीं ॥७२॥
म्हणे तो तेथील जनांसी । स्वामी आले का सांगा मजसी । येरू बोलती श्रीस्वामींसी । झोंप लागली या समयीं ॥७३॥
भिक्षा होउनी केलें शयन । मग भेटवूं तुम्हांलागुन । ऐकतां विस्मित झाला ब्राह्मण । बंकी कोड्‌ल - ग्रामींचा ॥७४॥
यावरी म्हणे, 'सद्गुरुराय । यांची भिक्षा कुठें होय । येथेंचि जाहली कीं काय' । तेव्हां येरू 'होय' म्हणती ॥७५॥
हें ऐकुनी तयांचे वचन । गहिंवरला तो ब्राह्मण । मनामाजीं बोले आपण । अहा देवा कृपाघना ॥७६॥
तुझी कोणा न कळे लीला । अगाध महिमा दाविली डोळां । कैसी वर्णावी ती न कळे मजला । श्रीगुरुराया दयाघना ॥७७॥
माझी इच्छा केली पूर्ण । आमुच्या सदनीं त्वां येऊन । भिक्षा घेउनी दिधलें दरुशन । काय नवलाई तव देवा ॥७८॥
ऐसें म्हणोनि होय सद्गद । पुढें बोलवेना एकही शब्द । राहे तैसाचि होउनी स्तब्ध । चित्तीं गुरुमूर्ति न्याहाळी ॥७९॥
यावरी जातां कांहीं क्षण । सद्गुरु उठले ऐसें म्हणोन । सांगण्या आले याजलागोन । तेथील जन ते पाहीं ॥८०॥
तेव्हां गेला झडकरी उठोन । श्रीस्वामींचे घेतलें दरुशन । सांगितलें सकल वर्तमान । संनिधीप्रती तेधवां ॥८१॥
मग सद्गुरुस्वामी सदय । म्हणती तुझी ही भक्तीच होय । फळली तुजला  म्हणोनि पाय । देखिले त्वां बा निजसदनीं ॥८२॥
धरितां दृढतर भक्तिभाव । तयांसी भेटती सद्गुरुदेव । येथे नसे सर्वथैव । संशय तिळभरी निर्धार ॥८३॥
ऐसें बोलुनी सद्गुरुनाथ । देते जाहले फलमंत्राक्षत । इकडे बंकीकोड्‌ल ग्रामांत झालें वर्तमान तें ऐका ॥८४॥
या भक्ताचा बंधु धाकुटा । आधींच जेवुनी कामाकरितां । गेला होता सदनीं नव्हता । स्वामी आलिया वेळेसी ॥८५॥
मग येतां गृहामाजीं । कळली सकल वार्ता सहजीं । तेव्हां म्हणे असो आजि । जाउनी येतों गोकर्णा ॥८६॥
मग तो गेला शीघ्रगतीं । भंडिकेरी मठाप्रति । भेटे जाउनी सद्गुरुमूर्ति । जेथे असे तेथे पैं ॥८७॥
तेथें ऐकिला सकल वृत्तांत । कीं स्वामी आपुल्या  सदनाप्रत । न येतांचि दर्शन अवचित । दिधलें बंधूसी आपुल्या ॥८८॥
तेव्हां आश्र्चर्य वाटले बहुत । म्हणे मानसीं काय हें अद्भुत । घालूनियां साष्टांग दंडवत । बोले सगुरो दयाळा ॥८९॥
तुझी महिमा इतुकी थोर । न कळतां मी अज्ञ पामर । माझ्या बंधूलागीं मी खर । बोलिलों विरुद्ध आज पैं ॥९०॥
ऐसें म्हणोनि सकलही वृत्तांत । निवेदिला स्वामींसी त्वरित । आणिक म्हणे देवा मजप्रत । क्षमा करावी दयाळा ॥९१॥
अज्ञपणें बोलिलों म्हणुनी । न धरीं तूं कोप स्वमनीं । यावें आपण आमुच्या सदनी । सद्गुरुराया कृपाळा ॥९२॥
सद्गुरूचें महत्त्व मजला ।  न कळतां जन्म चायां गेला । असती आपुले गोकर्णाला । स्वामी एक सारस्वतांचे ॥९३॥
जनांनी त्यांसी स्वामी केलें । आमुच्यापरीच ते मनुष्य भले । त्यांसी कां भजावें ऐसें वाटलें । क्षुद्र बुद्धि ही माझी ॥९४॥
परी आतां कळलें मजला । उगीच स्वामींसी दोष दिधला । ऐसा अनुताप पोटीं जाहला । काय करावें म्हणोनियां ॥९५॥
देवा आतां त्वांचि मजला । उद्धरावें खचित ये वेळां । तुजवांचोनि परम कृपाळा । नाहीं त्राता अन्य जगीं ॥९६॥
ऐशा पतितासी कवणही नाहीं । उद्धरिता तुजवांचोनि पाहीं । तूंचि कृपा करी गे आई । शांत सद्गुणे बेल्हाळे ॥९७॥
आतां न जाईं मी येथोनि । संनिधींच राहतों वास करोनि । नातरी त्वांचि आमुच्या सदनीं ।  राहावें येवोनि सर्वदा ॥९८॥
यापरी बहुविध केली प्रार्थना । घाली प्रेमें लोटांगणा । पुनरपि करोनि वंदन चरणां । ओतिला कलश नयनांचा ॥९९॥
केला अभिषेक अश्रुधारें । मग गुरुनाथें उठवोनि स्वकरें । म्हणती न करीं विलाप बा रे । सांगतों विचार तुजलागीं ॥१००॥
पुढील अध्यायी हेंचि निरूपण । कथिती बोध स्वामी त्यालागून । आणिक एका दरिद्रियाचें अन्न । सेवुनी  करिती श्रीमंत त्या ॥१०१॥
श्रीसद्गुरु आनंदाश्रम । शिवानंदतीर्थ पूर्ण ब्रह्म । यांच्या कृपाप्रसादें अष्टम । अध्याय गुरुदासें संपविला ॥१०२॥
स्वस्ति श्रीचित्रापुर - । गुरुपरंपराचरित्र सुंदर । ऐकतां अज्ञान निरसे समग्र । अष्टमाध्याय रसाळ हा ॥१०३॥
अध्याय ८ ॥
ओंव्या ॥ १०३ ॥
ॐ तत्सत्-श्रीसद्गुरुनाथचरणारविंदार्पणमस्तु ॥    ॥छ॥    ॥छ॥
॥ इति अष्टमोऽध्यायः समाप्तः ॥    

N/A

References : N/A
Last Updated : January 19, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP