मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र|
अध्याय ॥६३॥

चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥६३॥

सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय.


विघ्नहर्ता तूं सुखकर्ता । ॐकार रूपी ब्रह्मांड विधाता । शिवनंदन गौरीसुता । साष्टांग प्रणिपात तव चरणी ॥१॥
श्री महासरस्वतीसी नमन । श्री महाकाली महालक्ष्मीसी वंदन । श्री भवानीशंकर पूजिते चरण । वंदन श्री दुर्गापरमेश्वरीसी ॥२॥
नमन श्री स्वामी परिज्ञानाश्रमांसी । प्रणाम सकल गुरुपरंपरेसी । नमन सकल संत सज्जनांसी । आता परिसा पुढील वर्तमान ॥३॥
स्थापूनिया 'ज्ञानानंद आश्रम' कार्ल्यांत । सन एकोणिसशे पंच्याऐंशीत । आले निवामार्थ स्वामी तेथ । काही भक्त सहकाऱ्यांसंगे ॥४॥
'श्री दुर्गापरमेश्वरी' प्रतिष्ठापना योजुनी । स्वामींनी मनी संकल्प करुनी । 'ध्यानमंदिरा'स्तव भूमिपूजन करुनी । आरंभिले मंदिर स्थापना कार्य ॥४॥
करण्या 'श्री दुर्गापरमेश्वरी' स्थापना । स्वामी आनंदाश्रमांनी कथिले स्वामींना । शिष्यस्वामी चौदा वर्षाचे असताना । हे कथिले पूर्वाध्यायी ॥६॥
स्वामी आनंदाश्रम आदेशिती कार्य । ते संपूर्ण विचारान्ती होय । यामाजी नच धरावा संशय । भक्तांनी कदापि निजांतरी ॥७॥
'श्री दुर्गापरमेश्वरी' नाम । देण्याचे मुख्य कारण परम । योजिले सद्गुरुंनी उत्तम । त्या विषयी परिसा सज्जनहो ॥८॥
श्री वल्ली हे मूळ नाम । शिराली ग्रामाचे होते परम । श्री देवीचे पुण्यमय धाम । असे कथितो पूर्वेतिहास ॥९॥
अध्यात्म ज्ञानाचे स्थान परम । आनंदाचे परम धाम । शक्तीस्रोत वाहतो उत्तम । सहा स्वामींच्या समाधीरूपे ॥१०॥
पूर्वी नगर राज्याच्या काळी । भूमि नांगरते वेळी । श्री दुर्गापरमेश्वरी मूर्ती समुळी । गावली रामय्या नाम व्यक्तीसी ॥११॥
या नागरकट्टी कुटूंबिय गृहस्थाने । रामय्या । नाम मूळ पुरुषाने । सुबक मंदिर बांधूनी प्रेमाने । स्थापिले बडुकुळी येथे ॥१२॥
विनियोगास्तव कांही जमीन । अर्पिली मंदिरास्तव महान । मुलकी येथील अर्चक आणून । आरंभिले पूजा विधीसी ॥१३॥
याच नागरकट्टी भूमी परिसरात । वसे चित्रापूर मठ समस्त । या विषयी गुरुदासे कथिल चरित्रात । परिसा पुढील निरुपण ॥१४॥
चित्रापूर मठ परिसरात । आणावी सारस्वत मंदिरे समस्त । ऐसे स्वामी पांडुरंगाश्रमांनी मनांत । योजिले त्याकाळी ॥१५॥
स्थळेकरकारांचे श्री शांतादुर्गा मंदिर । हरिदासकारांचे श्रीकृष्णमंदिर । श्री दत्तात्रय पवित्र मंदिर । आणिले चित्रापुरामाजी ॥१६॥
पुरातन काळी होती प्रचलित । कौल लावण्याची प्रथा मंदिरात । प्रमुख निर्णय करण्यापूर्वी प्रस्थापित । संलग्न मंदिर दैवताचा ॥१७॥
'श्री दुर्गापरमेश्वरी' मूर्ती स्थलांतरासी । लाविता कौल मूर्तीसी । नकारार्थी उत्तर लाभले स्वामींसी । चित्रापुरांत  स्थापिण्यासी ॥१८॥
या 'श्री दुर्गापरमेश्वरी'चे महत्त्व विशेष । अत्यंत पुरातन मंदिर शेष । चित्रापूर मठाचाही नव्हता लवलेश । त्याही पूर्वीचे मंदिर हे ॥१९॥
रचिण्यापूर्वी शिवगंगा सरोवर । वनभोजनादी विधी सुंदर । होती मंदिर परिसरांत सत्वर । श्री स्वामी पांडुरंगाश्रम काळी ॥२०॥
समय कालानुरूप आपण । विसरलो जगदंबेचे मूळस्थान । जगदंबा प्रवृत्ती धर्माचे प्रमाण । त्यास्तव स्वतंत्र स्थानक दिधले ॥२१॥
प्रवृत्ती धर्म संवर्धनार्थ । करुनी 'श्री ट्रस्ट' संस्था सार्थ । निर्मिली श्री परिज्ञानाश्रमांनी समर्थ । 'जनकल्याणा' कारणे ॥२२॥
सांप्रत असे जी दिव्य मूर्ती । अंतरी देई सत्कार्या स्फूर्ती । श्री दुर्गापरमेश्वरी जाज्वल्य कीर्ती । प्रतिष्ठापिली जी कार्ल्यांत ॥२३॥
ही मूर्ती सुबक परिपूर्ण । कोणी दिली तिजसी आणून । त्या विषयी महिमान । श्रवण करा भाविकहो ॥२४॥
स्वामी परिज्ञानाश्रम इच्छेपरी । शिरूर विजयानंद दांपत्याने सत्वरी । मूर्ती 'श्री दुर्गापरमेश्वरी' सुंदरी । दिली शुभ्र संगमरवराची ॥२५॥
गुरुकृपा भजन मंडळी नावाने । अर्पूनी अन्य भक्तांसंगे प्रेमाने । वंदिले स्वामींस भक्तीने । खार आनंदाश्रम मठांत त्र्याहत्तरांत ॥२६॥
परी देण्या तिज स्वतंत्र स्थानक। नच आला योग शुभकारक । घेतली कार्ल्यात मुंबई नजिक । जागा देवी प्रतिष्ठापनेसी ॥२७॥
जल तृप्त करी तृष्णिक । घटापरी घेई रूप अनेक । रंग लाभे त्यापरी दिसे सुरेख । जलप्रेमी भाविक मनापरी ॥२८॥
जलाचा गुण शितलता । तृष्णा शमवूनी देई प्रसन्नता । सर्व रूप रंगी समरसता । प्रवाहशील काळापरी ॥२९॥
तेवीच निर्गुण निर्विकार परमात्मा एक । तृप्त करी भक्तांसी भाविक । भक्त इच्छेनरूप रंग आकार सम्यक । घेऊ सगुण रूपांत ॥३०॥
सर्वज्ञ सर्वशक्तीमान परमात्मा साकार । व्यापी सर्व चराचर । म्हणा त्यामी श्री भवानीशंकर । अथवा श्री दुर्गापरमेश्वरी ॥३१॥
भक्ताच्या भक्ती भावापरी । पाहोने प्रभु सगुणरूपे सत्वरी । भवार्णवी भक्तासी तारी । तृप्त करुनी भक्ता मानसी ॥३२॥
चित्रापूर सारस्वत गुरुंनी परिपूर्ण । दाविला जो मानव धर्म उत्तम । त्याचे करुनी जीवनी आचरण । जगूया आपण समत्वभावे ॥३३॥
आता कथिते चरित्र । श्री परिज्ञानाश्रमांचे परम पवित्र । त्या काळच्या प्राप्त स्थितीचे चित्र । पाहा सज्जनांनो एकाग्रतेने ॥३४॥
समाजात माजली दुफळी । ती हळूहळू वृद्धिंगत जाहली । निराशा सर्वत्र उमटली । अशक्य जाहले सुसूत्रीकरण ॥३५॥
स्वामी जाहले दुःखी अंतर्यामी । पाहता गर्ववेष्टित मानव निकामी । बहुसंख्य जाहले स्वार्थी वित्तप्रेमी । डळमळला विश्वास गुरुंवरी ॥३६॥
पंधरा जून एक्याण्णव रोजी । खार मठांत वदती स्वामीजी । आपुल्या आशीर्वचनामाजी ॥३६॥
पंधरा जून एक्याण्णव रोजी । खार मठांत वदती स्वामीजी । आपुल्या आशीर्वचनामाजी । उपस्थित भक्तजनांसी ॥३७॥
‘आमुच्या कारणे जरी माजली दुफळी । समाज एकतेची घडी विस्कटली । तरी आम्ही तयार या वेळी । विदेही होण्या सत्वरी ॥३८॥
सदेह शक्य तितुके मार्गक्रमण । अध्यात्मांत जाहले पूर्ण । कां सांभाळावा देह विनाकारण । चिंतिती मनी श्री परिज्ञानाश्रम ॥३९॥
महानिर्वाणही नच जावे व्यर्थ । कळावा जनांसी जीवनार्थ । ज्ञात व्हावी सद्गुरु महिमा सार्थ । यास्तव केला नियम मनी ॥४०॥
लागता माणिक मर्कटाच्या हाती । पाषाण समजूनी त्यजे निश्चिती । अमूल्य रत्नाचे मूल्य चित्ती । मर्कटासी न कळे ॥४१॥
सद्गुरु होता कष्टी । देवही नच तारी संकटी । जगान्तरी केवळ भक्त प्रेमापोटी । जन्म घेई विश्वंभर सद्गुरु ॥४२॥
कळावे आम्हा सद्गुरु मोल । समाज सुसूत्रीकरण व्हावे सखोल । शाश्वत ज्ञानाची जिज्ञामा अमोल । जाणवावी चित्रापूर सारस्वतांसी ॥४३॥
याम्तव केला एकवार इशारा । संपवा मतभेदाचा पसारा । समाज एकत्र येऊ द्या सारा । आम्ही असू इच्छामरणी ॥४४॥
ऐकता स्तब्ध जाहले भक्त । व्यथित जाहले चित्तात । प्रार्थिले भक्तांनी गुरुचरणांत । सोडूनी न जावे आम्हासी ॥४५॥
कंठ दाटला भक्तांचा क्षणात । अश्रू दाटले नयनात । चिंतेने वेढीले भक्त हदयात । ऐकूनी सद्गुरुवचन ॥४६॥
देऊनी आपुल्या भक्तांसी धीर । स्वामी राहिले मनी खंबीर । वदती कांही भाविकांसी स्वामी सत्त्वधीर । त्या समयी ते परिसावे ॥४७॥
आमच्या मनाजोगा शिष्य जरी हवा । सुयोग्य गुरुपरंपरापीठासी बरवा । जरी सर्वार्थ परिपूर्ण सद्गुरु हवा । करावी प्रार्थना श्री भवानीशंकरासी ॥४८॥
तदनंतर राहूनी कार्ल्यात । प्रयाण केले स्वामींनी बेंगळूरात । राहिले नायंपल्ली भालचंद्र गृहात । काही काळवरी ॥४९॥
काही दिवसाउपरान्त । आले स्वामी गोमंतकात । श्री मंगेश-शांतादुर्गा दर्शनार्थ । गेले मंदिरांतरी ॥५०॥
श्री परिव्राजकाचार्य पूज्य मठाधिपती । स्वामी श्री सच्चिदानंद सरस्वती । श्री स्वामी परिज्ञानाश्रमांस आमंत्रिती । स्वप्रतिनिधी धाडूनी ॥५१॥
स्वीकारूनी कवळे मठाधीशांचे आमंत्रण । स्वामी भक्तासंगे गेले मठालागोन । दोन्ही तेजःपुंज परिपूर्ण । भेटले एकमेकांसी प्रेमभरे ॥५२॥
तेथूनी आले स्वामी चित्रापुरात । सकल समाधी दर्शनार्थ । क्षणैक राहिले स्तब्ध पाहात । स्वामी आनंदाश्रम समाधी सन्मुख ॥५३॥
कांही क्षण निश्चल राहूनी । पाहिले समाधीस मनसोक्त नयनीं । वाहती विमलांबुधारा चक्षूंतूनी ॥ कंठ भरिला गुरुस्मरणे ॥५४॥
शीघ्र पुसुनी ती आसवे । निघाले परतण्यासी बरवे । घेती दर्शन भक्तीभावे । कांही भक्त स्वामी परिज्ञानाश्रमांचे ॥५४॥
तदनंतर येऊनी कार्ल्यात । निवास केला ज्ञानानंद आश्रमांत । वदती कांही उपस्थितांसी तेथ । हातीचे घड्याळ पाहूनी ॥९६॥
माझ्या या घड्याळात । दिसे मज शून्य फक्त । काही नच दिसे येथ । या समयासी मजसी ॥५७॥
ज्ञानियांची भाषा सूचक । विलीन करितो काया सात्त्विक । शीघ्र मिसळेन अनंतात व्यापक । ऐशापरी सूचविले भक्तांसी ॥५८॥
तशीच एक दूजी घटना । कथिते आता भाविक भक्तांना । स्वामी बैसले आश्रमी असताना । घडली जी त्या समयी ॥५९॥
प्रबुद्ध प्रशांत श्री परिज्ञानाश्रम । करिती सर्वांवरी बहु प्रेम । निसर्ग पशुपक्षी मानवावरी प्रेम । करिती समत्वभावे जीवनी ॥६०॥
मृतिकेत लोळूनी पूर्णपणे । झेपावले स्वामींपाशी लडिवाळपणे । पाळीव श्वान त्यांचे प्रेमाने । चाटू लागले कर्णानजिक ॥६१॥
म्हणती आश्रमवासियांसी । श्री परिज्ञानाश्रम त्या समयासी । नच मारावे या श्वानासी । दिधला उत्तम संदेश मज त्याने ॥६२॥
सांगे श्वान माझिया कर्णी । मृतिकेत लोळूनी आलो मी प्राणी । आला सुयोग्य समय देण्या मिसळुनी । मृतिकेत मृण्मय काया ॥६३॥
बोलावूनी नंतर कंत्राटदारासी । वदती श्री परिज्ञानाश्रम त्यासी । समाधीस्तव जागा सोडावी या स्थानासी । भविष्यकाळ अनुरोधूनी ॥६४॥
देवी मूर्तीपेक्षा उंच जास्त । नसावा कधी चौथरा समस्त । देवी प्रतिष्ठापना स्थान दावूनी प्रशस्त । वदले स्वामी परिज्ञानाश्रम ॥६५॥
राहुनी दोन दिन ज्ञानानंद आश्रमात । निघाले स्वामी पुण्यात । पुण्याहूनी थेट बेंगळूरात । निवासार्थ भक्तगृही ॥६६॥
निवास असता बेंगळूरात । बैसले तासवरी प्रशांतावस्थेत । स्वामी आनंदाश्रमांच्या पवित्र कक्षेत । सद्गुरु आसनासमोरी ॥६७॥
एकोणतीस ऑगस्ट एक्याण्णव दिनी। उच्च स्वरें ॐकार उच्चारुनी। पहाटे सात वाजता स्वामींनी । केली काया अनंती लीन ॥६८॥
करण्यापूर्वी महानिर्वाण । केली हृदय दुखावल्याची खूण । धाविन्नले वैद्य परिपूर्ण । सदुरु इच्छे समोरी ॥६९॥
दुःखी जाहले भक्त सकळ । अंतर्यामी स्मरूनी सदुरु प्रेमळ । माजली भक्त मनिं खळबळ । येता निरोप मुंबईत ॥७०॥
पोरकी जाहली चित्रापूर सारस्वत जात । सद्गुरु मायबापाविण समस्त । भवनागरी मार्गदर्शनार्थ । नच राहिला सद्गुरु स्वज्ञातीमाजी ॥७१॥
सहस्त्रावधी आला जनममुदाय । घेण्यासी अंतिम दर्शन पुण्यमय । पाहता सद्गुरुमूर्ती चिन्मय । नेत्र पाणावले भक्तांचे ॥७२॥
आणिता काया खार मठात । बेंगळूरापासूनी विमानात । जन आले दर्शनार्थ । रात्री असंख्य गृहागृहातूनी ॥७३॥
दुजे दिनी कार्ला ज्ञानानंद आश्रमात । नेली पवित्र काया पद्मासनस्थ । बैसवुनी काया आश्रमात । केले स्नानादी सर्व विधी ॥७४॥
समाधीस्तव जागा खोदूनी । बैसविली काया समाधी स्थानी । वाहिली श्रद्धांजली भक्तांनी । तुळस बेलपत्र पुष्पे अर्पूनी ॥७५॥
लवण कर्पूर आच्छादूनी समस्त । नवग्रह अंगठी घालूनी अंगुलीत । रुद्राक्ष घातले कंठात । स्वामी परिज्ञानाश्रमांच्या ॥७६॥
शंखाने करुनी खूण शिरात । बैसविला शाळिग्राम गंधवेष्टीत तेथ । करुनी विधियुक्त मंत्रोच्चारण समस्त । दाविली कर्पूर व पंचारती ॥७७॥
संपूर्ण केला विधी महत्त्वपूर्ण । भक्तांचा कंठ आला दाटून । दुःखाश्रू वाहती नेत्रांतून । वेष्टिता काया मृतिकेने ॥७८॥
केली गुप्तरूपे देवांनी पुष्पवृष्टी । दिङ्मूढ जाहली पुनित सृष्टी । करुनी कायेवरी पर्जन्यवृष्टी । वरुण देवाने वाहिली श्रद्धांजली ॥७९॥
पर्जन्यवृष्टी संपता सत्वर । धावूनी आला गगनी दिनकर । स्पर्शिले सूर्यरश्मींनी चरण दृढतर । स्तंभित जाहली वसुंधरा ॥८०॥
दर्शन भक्तांनी घेतल्यावरी । मृतिका घालूनी चोहोबाजूंनी सत्वरी । स्थापिले मृतिका लिंग त्यावरी । सद्गुरु नामघोष करूनी ॥८१॥
समाधी घेता सद्गुरूंनी साकार । पडली वैचारिक द्वंद्वावरी कुठार । करु लागले जन जागरुकतेने विचार । समाजातील दुफळीविषयी ॥८२॥
खुंटले वादी-प्रतिवाद्यांचे मतभेद । मूक जाहले गहन वाद । प्रेमे दिला जनांनी प्रतिसाद । कार्यकर्त्या भक्तगणांसी ॥८३॥
ध्यान मंदिर स्थापना कार्य घेई वेग । आला देवी प्रतिष्ठापना सुयोग । शिवलिंग प्राणप्रतिष्ठा संयोग । आला स्वामींच्या समाधीवरी ॥८४॥
चोवीस फेब्रुवारी-ब्याण्णवपासूनी । सर्व विधी करण्या मुंबईतूनी । जमले वैदिक विविध स्थळांतूनी । कार्ला आश्रमामाजी ॥८५॥
स्वयंसेवक उत्साहपूर्ण । पोहोचले करण्या व्यवस्थापन । आहार निवासाची व्यवस्था संपूर्ण । जाहली यथोचित कार्ल्यात ॥८६॥
सहस्त्रावधी जन आले आश्रमात । बालक तरुण वृद्ध समस्त । नच पडली त्रुटी किंचित । कुठल्याही व्यवस्थेमाजी ॥८७॥
वास्तुशांति नवग्रह याग । राक्षोघ्न आवाहन याग । देवी प्रतिष्ठापना याग । तसेची शतचंडी यज्ञ ॥८८॥
श्री दुर्गापरमेश्वरी मूर्ती नेऊनी । श्री एकवीरा मंदिर पायथ्याशी भक्तांनी । वाजत गाजत नाचत मिरवूनी । आणिली विजयोल्हासे ॥८९॥
फाल्गुन शुद्ध पंचमीसी । भृगुवासर अंगिरा संवत्सरासी । प्रतिष्ठापिले श्री दुर्गापरमेश्वरीसी । ध्यान मंदिरी कार्ला ग्रामी ॥९०॥
शिवलिंग प्रतिष्ठापना सोहळा । जाहला तीन मार्च ब्याण्णवला । फाल्गुन शुद्ध दशमीला । शिलेचे शिवलिंग प्रतिष्ठापिले ॥९९॥
अहोरात्र श्रमूनी स्वयंसेवकांनी । मृतिका लिंग अलगद उचलूनी । मृतिका हस्ते बाजूस सारूनी । केले भव्य छिद्र दर्शनास्तव ॥९२॥
स्वामींचे शिर दिसेस्तोवरी । बाजूस सारली मृतिका सारी । स्वयंसेवक जाहले थक्क अंतरी । पाहूनी सतेज मस्तक सद्गुरुंचे ॥९३॥
भक्तांनी घेतले दर्शन । अहाहा! काय ते आश्चर्य महान । ऐका जनहो अद्वितीय महिमान । स्वामी परिज्ञानाश्रमांचे ॥९४॥
गुरु मूर्तीचे शिर केसांसहित । बैसविले त्याची स्थितीत । लवण, तुळस, बेल, पुष्पे टवटवीत । देखियले भाविकांनी ॥९५॥
वृक्षापासूनी करिता अलिप्त । पुष्पे, पत्रे सुकती त्वरित । पाहतो हे नैसर्गिक सत्य जगात । सर्व जन नित्यासी ॥९६॥
दीड वरुषे राहिली भूमी भितरी । सर्व तुळसी पुष्पे तजेल सारी । दावी अद्वितीय चमत्कार जगान्तरी । दिव्य स्वरूप श्री स्वामींचे ॥९७॥
नच मिळाला पुष्पांसी प्रकाश । अथवा जलप्रवाह विशेष । नच जाहला पवनाचा स्पर्श । अठरा मासावरी त्यांसी ॥९८॥
पुष्प पत्रांदिकांस संजीवनी प्राप्ती । देई गुरुत्वाकर्षण शक्ती । करिता सद्गुरुचरणी भक्ती । होई अमृतानुभव प्राप्त ॥९९॥
स्वामींचे सामर्थ्य असामान्य । पत्र सुमनांनी दर्शविले पूर्ण । नच करावा याविषयी अनुमान । भाविकांनी चित्तांतरी ॥१००॥
भक्तांनी घेता समाधी दर्शन । जाहला लिंग प्राणप्रतिष्ठा विधी महान । सुवर्ण तार एक दीर्घ परिपूर्ण । सोडिली स्वामींच्या शिरावरी ॥१०१॥
शिवलिंग, शाळिग्राम । श्री भवानीशंकर मूर्ती परम । घेऊनी प्रदक्षिणेचा नेम । केला भक्तीने तीन कार्यकर्त्यांनी ॥१०२॥
मग जाहला नवग्रह होम । उत्सवाची सांगता परम । तीर्थप्रसादा ग्रहण करुनी आम । परतले भक्त स्वगृही ॥१०३॥
देवी प्रतिष्ठापने उपरान्त । पूजा चाले नित्य कार्ल्यात । देवी अन्समाधी पूजा विधीयुक्त । करिती वैदिक प्रेमे ॥१०४॥
सुप्रभात ते रात्रीपर्यंत । सांजसकाळी सेवा होई नियमित । श्री देवीस करिती अलंकृत । विविध पृष्प वस्त्रादी अलंकारे ॥१०५॥
चालती सर्व पूजादी व्यवस्थित । तरी गुरुंच्या सदेह अनुपस्थितीत । भासे सर्वही अळणी खचित । जैसा लवणाविण आहार ॥१०६॥
सदेह जरी नसती उपस्थित । चैतन्य रूपे गुरु असती तेथ । गुरुकृपेची होती कार्ये समस्त । यथासांग ध्यान मंदिरी ॥१०७॥
श्रीमत् शंकराचार्यांनी सुरेख । लिहीले काव्य 'उपदेश पंचक’ । तृप्त होती अध्यात्म साधक । श्रवण पठणाने ॥१०८॥
उपदेश पंचक भाषा गीर्वाण । त्यापरीच ज्ञानदायक परिपूर्ण । 'विचित्र पंचक' नाम काव्य महान । रचिले स्वामी परिज्ञानाश्रमांनी ॥१०९॥
पंच श्र्लोकयुक्त हे काव्य । दावी स्वामींचे अंतरंग संभाव्य । भासे आनंददायी सुश्राव्य । करिता श्रवण पठण ॥११०॥
वैचित्र्यमय या विश्वात पूर्ण । नकळे स्वामींचे अगम्य वर्तन । अथवा त्यांचे अंतरंग प्रेमपूर्ण । त्यावरी सूचकतेने टाका प्रकाश ॥१११॥
प्रत्येकाच्या योग्यतेनुसार जीवनात । करील हे काव्य मार्गदर्शन अंतरात । कळेल अध्यात्म साधकासी गूढार्थ । स्वानुभवासहित गुरुकृपे ॥११२॥
सद्गुरु लिखित हे काव्य अमोल । नच जाईल कदापि फोल । स्मरता सद्गुरुरचित शब्दबोल । लाभ निश्चित होई भक्तासी ॥११३॥
इतुके कथूनी चरित्र निरुपण । गुरुपरंपरेसी वंदूया भावपूर्ण । करावे आम्हा मार्गदर्शन । येऊनी सद्गुरुरूपे आम्हासी ॥११४॥
अपराध केले आम्ही अनंत । न जाणिले सद्गुरु रूप महंत । सद्गुरु हाची परमात्मा अनंत । विसरलो आम्ही संपूर्ण ॥११५॥
परंपरा नव्हे केवळ अनुशासन । चाले जी वर्षानुवर्षें परिपूर्ण । अक्षय सुखाचा हा स्रोत संपूर्ण । वाही भक्त हृदयांतूनी ॥११६॥
श्री भवानीशंकरा करुणाकरा । अनंत व्यापक विश्वंभरा । सद्गुरुरूपे आम्हा तारा । अनन्य अपराध पोटी घालूनी ॥११७॥
गुरुदेवा तुम्ही ज्ञानसागर । आनंद शांतीचा झरा अमर । तुम्हाविण तरण्या भवसागर । आम्ही असमर्थ सर्वदा ॥११८॥
शीघ्र सद्गुरु रूपे येवोनी । तारावे चित्रापूर सारस्वतां जीवनी । समाज मतैक्य साधूनी । कृपा करावी आम्हावरी ॥११९॥
मनुष्यात मुमुक्षुत्व देऊन । जिज्ञासा विवेक उपजवूनी । शाश्वत सुखाप्रति नेऊनी । शिकवा आम्हा मानवता धर्म ॥१२०॥
हे गुरुचरित्र श्रवण पठण । करितील जे भक्त विश्वासपूर्ण । त्यांचे मनोइच्छित पुरवूनी । करावे त्यांसी गुरुकृपापात्र ॥१२१॥
इतुके लिहूनी गुरुचरित्र । अर्पिते त्रयोषष्टदशाध्याय पवित्र । श्री चित्रापूर गुरुपरंपरा चरणी समर्थ । उषा रवींद्र बिजूर भक्तीभावे ॥१२२॥
अध्याय ॥६३॥
ओंव्या १२२॥
ॐ तत्सत्-श्रीसदुरुनाथचरणारविंदार्पणमस्तु ॥
॥ इति त्रयोषष्टद‌शाध्यायः समाप्तः ॥
तत्सत्
शांतिः शांतिः शांतिः

***
इति श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्रं समाप्तम् ।

N/A

References : N/A
Last Updated : January 23, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP