मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र| अध्याय ॥५४॥ श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र ग्रंथानुक्रम विषयानुक्रमणिका कृताञ्जलिः प्रस्तावना सारस्वतांचें मूळ श्रीगुरुपरम्परा अध्याय ॥१॥ अध्याय ॥२॥ अध्याय ॥३॥ अध्याय ॥४॥ अध्याय ॥५॥ अध्याय ॥६॥ अध्याय ॥७॥ अध्याय ॥८॥ अध्याय ॥९॥ अध्याय ॥१०॥ अध्याय ॥११॥ अध्याय ॥१२॥ अध्याय ॥१३॥ अध्याय ॥१४॥ अध्याय ॥१५॥ अध्याय ॥१६॥ अध्याय ॥१७॥ अध्याय ॥१८॥ अध्याय ॥१९॥ अध्याय ॥२०॥ अध्याय ॥२१॥ अध्याय ॥२२॥ अध्याय ॥२३॥ अध्याय ॥२४॥ अध्याय ॥२५॥ अध्याय ॥२६॥ अध्याय ॥२७॥ अध्याय ॥२८॥ अध्याय ॥२९॥ अध्याय ॥३०॥ अध्याय ॥३१॥ अध्याय ॥३२॥ अध्याय ॥३३॥ अध्याय ॥३४॥ अध्याय ॥३५॥ अध्याय ॥३६॥ अध्याय ॥३७॥ अध्याय ॥३८॥ अध्याय ॥३९॥ अध्याय ॥४०॥ अध्याय ॥४१॥ अध्याय ॥४२॥ अध्याय ॥४३॥ अध्याय ॥४४॥ अध्याय ॥४५॥ अध्याय ॥४६॥ अध्याय ॥४७॥ अध्याय ॥४८॥ अध्याय ॥४९॥ अध्याय ॥५०॥ अध्याय ॥५१॥ अध्याय ॥५२॥ अध्याय ॥५३॥ अध्याय ॥५४॥ अध्याय ॥५५॥ अध्याय ॥५६॥ अध्याय ॥५७॥ अध्याय ॥५८॥ अध्याय ॥५९॥ अध्याय ॥६०॥ अध्याय ॥६१॥ अध्याय ॥६२॥ अध्याय ॥६३॥ आरती श्री सद्गुरुंची मंगल पद चित्रारपुरगुरुपरम्परावन्दनम् श्रीशंकरनारायणगीतम् शरणाष्टकम् आरती श्रीगुरुपरंपरेची श्रीमत् पांडुरंगाश्रम स्वामींजी आरती सद्गुरुंची आरती चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥५४॥ सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय. Tags : chitrapurpothiचित्रापुरगुरुपरंपरापोथी अध्याय ॥५४॥ Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीमदानंदाश्रमगुरुभ्यो नमः ॥ श्रीभवानीशंकराय नमः ॥ॐ॥ जय जय देवा सद्गुरुराया । रक्षीं आम्हां बालकांसी या । नको उपेक्षूं बा सदया । ये ये धांवुनी दयाघना ॥१॥ तुज म्हणती पतितपावन । तरी कां न येसी धांवून । कवण उद्धरील तुजवांचोन । न दिसे अन्य मजलागीं ॥२॥ तुज सारे भक्त समान । न बघसी तूं त्यांचे गुण । हा सुज्ञ अथवा अज्ञ । नाहीं मानसीं तुज देवा ॥३॥ जेणें धरिला दृढ विश्वास । तोचि धरी तुझी कांस । नच होय चित्तीं उदास । कधीं काळीं तो पाहीं ॥४॥ ऐसियालागीं करिसी रक्षण । यांत नाहीं नवल जाण । परी असे जो भक्तिहीन । त्यासिही रक्षिसी तूं देवा ॥५॥ ऐसा तूं माझा सद्गुरुनाथ । किती पाहसी माझा अंत । आतां तरी धांव त्वरित । करीं समाप्त ग्रंथ हा ॥६॥ तुझ्या इच्छेवांचुनी स्फूर्ति । न येई सर्वथा माझ्या चित्तीं । तेवींच अजुनी ग्रंथसमाप्ति । न होय देवा गुरुराया ॥७॥ 'मी लिहितों' ऐसा अभिमान । धरोनि मनीं लिहितां जाण । तरी ना होय लिहिणें हातून । न सुचे अणुमात्र निश्चयेंसीं ॥८॥ जेव्हां इच्छा होईल तुजसी । तेव्हां लिहिणें होय सहजेंसीं । ऐसा अनुभव येई मजसी । घडिघडी देवा गुरुराया ॥९॥ तुझ्या इच्छेवीण कार्य। कवणही असो तें न होय । यामाजीं श्रोते हो संशय । नका घेऊं अणुमात्र ॥१०॥ सद्गुरुमहिमा असे अपार । लिहाया मेदिनी न पुरे साचार । आणिक त्यांचे सद्गुण थोर । हेही वर्णितां न येती ॥११॥ असो आतां श्रोते हो सज्जन । ऐका आणिक त्यांचे सद्गुण । आनंदाश्रमस्वामी कृपाघन । यांचे वर्णन पुनरपि ॥१२॥ पुनःपुन्हां काय सांगावें । सगुण सकलांसी असती ठावे । तरीही अणुमात्र येथें वर्णावे । ऐसी इच्छा उद्भवली ॥१३॥ परम शांत त्यांची वृत्ति । परमार्थीं अत्यंत प्रीति । काय सांगूं वक्तृत्वशक्ति । परमाश्चर्य होय जनां ॥१४॥ स्वधर्मासी धरोनि वेदान्त । युक्तीनें सांगती निश्चित । प्रवचन देती रुचिकर अत्यंत । आकर्षिती जनांसी परमार्थीं ॥१५॥ चित्तीं नाहीं धनाची आस । म्हणोनि सारे समान त्यांस । गरीब श्रीमंत भेद ना खास । करिती रक्षण सकलांचें ॥१६॥ जेथें पाचारिती भक्त । तेथें प्रेमें जाती त्वरित । करावें आपुल्या भक्तांचें हित । हेंचि मानसीं तयांच्या ॥१७॥ भक्तहितावांचुनी आणिक । काजचि नसे त्यांसी देख । पहा कैसें सांगूं सकळिक । लक्ष लावा इकडेचि ॥१८॥ साक्षात् अवतारचि ते जाणा । आधींच त्यांच्या कळल्या खुणा । मागील अध्यायीं बहुत ठिकाणा । कथिलें असे विस्तारें ॥१९॥ तरीही आणिक बोलूं किंचित । अवतारिक स्वामी आमुचे निश्र्चित । कैसें तें ऐका एकाग्र चित्त । करोनि सज्जन श्रोते हो ॥२०॥ किती शांत हृदय त्यांचें । त्यापरी शांत शब्दही मुखींचे । एकही शब्द व्यर्थ न वचे । ऐशी अमोघ वाणी त्यांची हो ॥२१॥ बालपणापासोनि तीव्र वैराग्य । पांचही विषयांचा केला त्याग । प्राप्त असतां नाना भोग । उबग मानसीं ये त्यांच्या ॥२२॥ देह रक्षण करण्याइतुके । विषय भोगावे लागती निके । म्हणोनि तितुकेचि भोगूनि कौतुकें । करिती रक्षण देहाचें ॥२३॥ अकरा वरुषांचें असतां बाळ । लागली मनासी बहुत तळमळ । कधीं येईल सुकाळ । परमार्थाचा मजलागीं ॥२४॥ जग हें असे अशाश्वत । ऐसें मानसीं धरी सतत । जें सत्य असे तें मजप्रत । प्राप्त व्हावें सत्वरी ॥२५॥ नको मजला प्रपंच दुःखद । करावा परमार्थचि सुखद । पावावें निजात्म-सुखपद । सद्गुरुकृपेंचि निर्धारें ॥२६॥ प्रपंचामाजीं राहतां आपण । परमार्थ करणें परम कठिण । नाना विघ्नें येती धांवून । मग कैंचा होय परमार्थ ॥२७॥म्हणोनि घेतां संन्यास आपण । परमार्थ लाभे न लगतां क्षण । होईल जनांचेही कल्याण । सहजचि नं जाणा या हस्तें ॥२८॥ परी घ्यावया संन्यास मजला । मायबाप निश्र्चयें ये वेळां । आज्ञा न देती समक्ष आपुल्या । नाहीं संशय यामाजीं ॥२९॥ म्हणोनि सदा करिती विचार । सुख नाहीं प्रपंचीं अणुमात्र । हृदयीं धरिली मूर्ति सुंदर । पांडुरंगाश्रम - सद्गुरूंची ॥३०॥ आणि प्रार्थिती रात्रंदिन । निजमानसीं स्वामींसी आपण । म्हणती प्रभो तुजवांचोन । कवण करील उद्धार मम ॥३१॥ नको लोटूं प्रपंचामाजीं । तूंचि रक्षावें मजला गुरुजी । पार घालिता यांतुनी आजि । तुजवीण सर्वथा ना जगतीं ॥३२॥ यापरी करुणा भाकिती अंतरीं । करिती बाह्यात्कारें भूवरी । व्यवहार चोख, ब्रह्मचारी । स्वधर्मापरी ते समयीं ॥३३॥ ऐसें असतां आला योग । स्वामी पांडुरंगाश्रम मग । यांनीं दाविला परमार्थमार्ग । केला शिष्यस्वीकार झणीं ॥३४॥ भुकेल्यासी मिळतां अन्न । सहजचि तृप्त होई मन । तृषाक्रांतासी मिळतां जीवन । सहजचि आनंद हो तया ॥३५॥ तैसें आमुच्या सद्गुरुराया । आधींच तहान होती तया । कीं संन्यास घ्यावा स्वामीकडूनियां । हीचि चिंता होती पैं ॥३६॥ तेवींच शिष्यस्वीकारास्तव । अवश्य म्हणोनि करुणार्णव । अनुमान न करितां घेती धांव । गुरुआज्ञेपरी तत्काळ ॥३७॥ आणि घेउनी संन्यासाश्रम । पावले निजात्मज्ञान उत्तम । जनांसीही मार्ग सुगम । दाविला आपुला प्रेमानें ॥३८॥ त्रयोदश वरुषांपासून । बहुत कष्ट सोशिले आपण । कोणते कष्ट करूं कथन । अणुमात्र येथें आतां हो ॥३९॥ नाहीं वेळीं अन्नपान । मित आहार एक वेळ भोजन । तेरा वरुषांचे बाळ असोन । कैसे सोशिले कष्ट पहा ॥४०॥ मायबाप बंधु बहीण । यांचा मोह सारा सोडोन । कैसे राहिले मठांत जावोन । केवळ जगाच्या कल्याणा ॥४१॥ हरएक प्राणी विषयांमाजीं । लाडू करंज्या पुरी भाजी । यांतचि रमविती वृत्ति सहजीं । सदा सर्वदा आपुली हो ॥४२॥ हें सारे सोडुनी जगीं । स्वामी लागले परमार्थमार्गीं । आणि पांडुरंगाश्रम सद्गुरु वेगीं । धरिला हृदयीं अखंड तो ॥४३॥ कैंचा सद्गुरु कैंचा देव । मी माझें यांतचि गर्क सर्व । परी आपुली माउली अपूर्व । अवतरली आम्हांसी ताराया ॥४४॥ जगामाजीं अनेक जीव । तळमळती धरुनी देहोहं - भाव । म्हणोनि आली देवासी कणव । धांवली झडकरी भूतळीं ती ॥४५॥ आणि आपुली दाविली वाट । स्वधर्माची असे जी नीट । तेथूनि जातां पोंचती थेट । निजस्वरूपासी हो जाणा ॥४६॥ स्वधर्मकर्म सोडूनि आन । करूं जातां नाना साधन । खालीं पडतील घसरून । नरकामाजीं निश्र्चयेंसीं ॥४७॥ संसार हाचि नरक घोर । तो ओलांडिल्यावांचुनी साचार । पावतील केमा पैलतीर । मोक्ष त्यावीण न मिळे पहा ॥४८॥ कैसें तें ऐका सावधान । संसाररूप नदी जाण । ही तरोनि जावया आपण । काय करावें हें ऐका ॥४९॥ संसारनदीमाजीं आपण । स्वधर्मरूप सेतु बांधोन । जावें सत्वर त्यावरोन । पोंचे मग तो पैलतीरा ॥५०॥ चित्तशुद्धि हेंच जाणा । पैलतीर असे आपणा । मग ध्यानादि मार्ग सज्जना । परम सुलभ होत असे ॥५१॥ तेव्हां ध्यानादि मार्ग क्रमोनी । जाय आपुल्या सत्सुखस्थानीं । त्यामुळें स्वधर्म श्रेष्ठ म्हणोनी । सांगती ज्ञानी स्वानुभवें ॥५२॥ पहा कैसें सांगूं सकल । तुम्ही सावध होऊनी बैसाल । ऐशी आशा धरोनि समूळ । कथूं आतां परिसा हो ॥५३॥ 'देह मी' हेंचि एक पाप । हीचि संसारनदी भरली अमूप । ती तरावया स्वधर्मरूप । सेतु बांधावा मानवांनीं ॥५४॥ जप तप पूजा पारायणें । नाना सत्कर्में करितां येणें । पापें नासोनि जाती त्वरेनें । नाहीं संशय यामाजीं ॥५५॥ जप - पूजादि नाना सत्कर्में । हींचि येथे दगड माती नेमें । करितां करितां स्वधर्मनामें । सेतु सिद्ध होय खरा ॥५६॥ स्वधर्मानें आपण वर्तणें । हेंचि त्या वाटेनें जाणें । मग सहजचि घडे लंघणें । पापाची नदी पहा हो ॥५७॥ पापनदी ओलांडुनी जातां । चित्तशुद्धि तीर लागे हाता । मग ध्यानादि मार्ग सांपडे तत्त्वतां । निजस्वरूपाचा तत्काळ ॥५८॥ ध्यानादिमार्ग सांपडल्यावरी । उशीर न लागे निर्धारीं । यामाजीं संशय अंतरीं । न धरावा अणुमात्र कोणींही ॥५९॥ 'मी ब्रह्म' ऐसें अनुसंधान । हाचि ध्यानादि मार्ग पूर्ण । दृढ होतां सहजचि पूर्ण । ज्ञान परिपूर्ण होय पहा ॥६०॥ स्वधर्मकर्म केल्यावांचुनी । ध्यानादि ना घडे त्याच्या हातुनी । ध्यानादि मार्ग मिळतांक्षणीं । निजस्वरूपासी पोंचे तो॥६१॥ म्हणोनि स्वधर्म करावा आधीं । तेवींच प्रार्थिलें परमावधीं । आमुच्या पूर्वजीं महाबळेश्वरपदीं । कळवळोनि बहुवस ॥६२॥ कीं आम्हांस सद्गुरु लाभावे । ऐसें प्रार्थिले जीवें भावें । तेव्हां अवतरोनि सदाशिवें । वाढविली गुरुपरंपरा ॥६३॥ एवं स्वधर्मराज्य भूवरी । परमेश्वर अवतरोनि वरिवरी । चालवीत आला आजवरी । जगदोद्धारास्तव जाणा ॥६४॥ स्वधर्म शिकविती जनांलागुनी । त्यामुळे 'धर्मगुरु' म्हणती त्यांसी जनीं । स्वधर्मराज्य चालविलें त्यांनीं । म्हणतां दोष ना कांहीं ॥६५॥ 'स्वधर्म' याचे स्पष्टीकरण । आणिक थोडें करूं आपण । नातरी संशय श्रोत्यांलागून । येईल वरील वाक्यानें ॥६६॥ कीं सत्कर्में हीचि दगडमाती । घालुनी सेतु बांधावा निश्चितीं । ऐसें बरी कथिले त्यावरती । प्रश्न उद्भवेल श्रोत्यांसी ॥६७॥ सत्कर्में कैसेनि स्वधर्म होय । तरी उत्तर त्याचें सांगूं निर्भय । फेडूं सारे आतां संशय । ऐका सावध होवोनि ॥६८॥ जपपूजादि हें कर्म । ब्राह्मणें करावें हा नेम । ऐसा शास्त्रींच कथिला हा धर्म । नाहीं ख्रिश्चन यवनांसी ॥६९॥ त्यांचा धर्म जैसा असे । तैसेंच त्यांनीं वर्तावें आपैसें । आमुच्या धर्मापरी आम्ही साहसें । वागतां होई कल्याण ॥७०॥ मागें कथिलेंचि असे येविषीं । आणिक विस्तार कासयासी । एवं सर्व कर्मांगें आपैसीं ॥ असती स्वधर्माचें अंग पहा ॥७१॥ स्नान संध्या अनुष्ठानादि । नित्यकर्में करावीं पदोपदीं । पूजा उत्सव पालखी कधीं कधीं । धर्मकृत्येंचि हीं सारीं ॥७२॥ एवं धार्मिक कवणही कार्य । स्वधर्माचेंचि अंग होय । त्यांत न धरावा संशय । श्रोते हो तुम्हीं अणुमात्र ॥७३॥ असो एवं स्वधर्मराज्य । चालविण्यायोग्य सद्गुरुराज । तेचि हें॥७४॥ आपण करुनी स्वधर्मपालन । शिकविताति आम्हांलागून । देती आम्हां नियम घालून । स्वधर्माचे ते जाणा ॥७५॥ 'यथा राजा तथा प्रजा'। याचा अर्थ काय तो समजा । आपण नियम पाळुनी राजा । जनांसी आज्ञा करीतसे ॥७६॥ येथें 'नियम' जयासी बोलती । तेथें तयासी 'कायदा' म्हणती । त्यापरी राजा वागे निश्चितीं । व्यवहारामाजीं सर्वदा ॥७७॥ 'खून दंगा चोरीचा धंदा । करूं नये' ऐसा कायदा । केला रायें आणिक तो कदा । न करी आपणही गुन्हा पैं ॥७८॥ तैसें येथे आमुच्या गुरुरायें । नियम घातला अधर्म करूं नये । आपणही वतें तैसेंच पाहें । हें आहे विदित सकलांसी ॥७९॥ सरकारा जनांनीं द्यावा कर । हा जगीं जैसा असे निर्धार । त्यापरी येथें सारस्वतीं समग्र । द्यावी वर्गणी मठासी ॥८०॥ आतां प्रश्न कराल थोर । सरकारा सकलही न देती कर । ज्यासी असे शेतादि घर । तेचि कर भरती हो ॥८१॥ त्याचें उत्तर ऐका आतां । येथेंही त्यापरीच देती तत्त्वतां । शेतादि येईल ज्याचे हाता । तोचि येथही देत असे ॥८२॥ प्रत्येकासी मिळे जें उत्पन्न । जमीन व्यापार नोकरी करोन । तें श्रीगुरुकृपेवीण । न मिळे कवणा कांहींएक ॥८३॥ त्यांचेंच हें सारें वैभव । श्रीगुरुमहाराज यांचें अपूर्व । तोचि दाता त्राता सर्व । आम्हां भक्तां निश्चयेंसीं ॥८४॥ राजा करी प्रजेचे पालन । तैसे सद्गुरु पाळिती आम्हांलागून । कृपें करिती इहपर कल्याण । म्हणूनि वर्गणी देणें हें इष्ट ॥८५॥ आणिक ऐका सविस्तर । भक्तिप्रेम हेंचि थोर । जमीन आमुची साचार । म्हणोनि वर्गणी द्यावी पैं ॥८६॥ भक्तिप्रेम दृढ व्हावया । वर्गणी द्यावी सद्गुरुराया । तया पुण्येंकरोनियां । भक्तिप्रेम दृढ होय ॥८७॥ पुण्य अपार झालियावरी । चित्त शुद्ध होय झडकरी । तेव्हां शुद्ध भक्ति उपजे अंतरीं । निष्काम प्रेमही लाभतसे ॥८८॥ मग होत असे आत्मज्ञान । यामाजीं नाहीं अनुमान । म्हणोनि भजावें मठासी आपण । द्यावी वर्गणी प्रेमानें ॥८९॥ जनांच्या संरक्षणाकरितां सरकार । घेतसे जनांकडोनि कर । तैसें येथे मठामाझार । वर्गणी द्यावी लागे पैं ॥९०॥ वर्गणी देतां होय कल्याण । आपुलेंच खरें निश्चयें पूर्ण । न घेती स्वामी आपण । कवडीही त्यांतील निर्धारें ॥९१॥ तेवीं वर्गणी न देती त्यांसी । जुलूम न करिती द्यावीच ऐशी । अथवा न कोपती मानसीं । कल्याणचि इच्छिती जनांचे ॥९२॥ येथ करितील कुणीही प्रश्न । काय होय आमुचें कल्याण । तरी करोनि चित्त सावधान । अवधारा उत्तर याचें हो ॥९३॥ अमित कार्यें मठामाजीं । होत असती पहा सहजीं । तीं कासया करिती आजि । केवल जनांच्या कल्याणा ॥९४॥ लघु-महारुद्रादिअभिषेक । नवचंड्यादि हवनें अनेक । नानाविध उत्सव सुरेख । करिती अगणित सत्कर्में ॥९५॥ऐशीं अनंत कार्य समस्त । होती लोककल्याणार्थ । त्यासी लागे पैसा बहुत । कैसें करावें ते समयीं ॥९६॥ जरी ना दिधली वर्गणी आम्हीं । खर्च न उरे ऐशिया कामीं । म्हणाल पूर्वजें सोडिली भूमी । तया खर्चालागीं पैं ॥९७॥ जमीन सोडिली हें खचित । परी ते वेळीं जिन्नस बहुत । सवंग होते अत्यंत । विदित असे हें सकळांसी ॥९८॥ आतां वाढली महागाई बहुत । खर्च भागेल कैसा यांत । कार्यं करिती साङ्ग यथार्थ । न देतांही वर्गणी ॥९९॥ एवं जनांच्या कल्याणाकरितां । सकल कार्यें होती तत्त्वतां । जनांचे कल्याण काय तें आतां । सांगूं परिमा प्रेमळ हो ॥१००॥ जगामाजीं कष्ट अनेक । येती एकावरी एक । हें आम्हां दिमतमे चोख । सांगावें न लगे कवणासी ॥१०१॥ मठामाजीं पुण्यकर्में । घडती म्हणोनि जनांच्या नामें । श्री पार घालितो बहु प्रेमें । भवानीशंकर जनांसी ॥१०२॥ ऐशिया पुण्यप्रभावें खचित । कष्ट जनांचे हरती समस्त । असत्य नव्हे सांगतों यथार्थ । सत्य सत्य त्रिवाचा ॥१०३॥ देवासी करितां उत्सव थोर । आणि अभिषेक करितां निरंतर । यांत पुण्य काय सांगा सत्वर । ऐसें म्हणाल श्रोते हो ॥१०४॥ तरी ऐका उत्तर त्याचें । स्फुरविती जें सद्गुरु आमुचे । तेंचि बोलूं अणुमात्र साचें । उशीर न करितां आतां हो ॥१०५॥ देवासी न लगे कांहीं एक । तोचि कर्ता सर्वांचा देग । त्यासी काय देऊं आणिक । त्याचेंच त्याला देणें हें ॥१०६॥ आपुल्यासाठींच आपण करणें । कांहीं नाहीं त्यासी उणें । प्रेमासाठींच देणें घेणें । व्यवहारांतही ऐसेंचि ॥१०७॥ एकमेकां जेवावयासी । पाचारिती प्रेमासरशीं । अहेरादि करिती बहुवसीं । प्रेमास्तवचि प्रघात पहा ॥१०८॥ नातरी काय उणें म्हणोनि । जेवण अहेर आदिकरोनि । करिती उल्हासें सर्वत्र धरणीं । कीं प्रेमेंचि एकमेकां ॥१०९॥ सर्व करणें प्रेमासाठीं । कीं एकमेकांची प्रीति मोठी । नं न समावे आपुल्या पोटीं । तेणेंच प्रघात पडला हा ॥११०॥ देणें घेणें होतां सहज । आठव होय त्यांचा रोज । तेणेंच पडला प्रघात आज । जगीं नानाविध पहा तो ॥१११॥ तैसें येथ देवालागीं । नाना उपचार करिती जगीं । येणें प्रेम उद्भवे अंगीं । कैसें तें सांगूं आतां पैं ॥११२॥ बालका घालितां वस्त्रें भूषणें । बालक कांहीं त्यांसी नेणें । तरीही आम्ही परमप्रीतीनें । लेववुनी मानितों सुख सारें ॥११३॥ ऐसें कराया काय कारण । प्रेम हेंचि खचित न जाण । लेववितां वस्त्रें आभरण । अधिकचि वाढे प्रेम खरें ॥११४॥ बालका घालितां वस्त्रभूषण । का सुंदर दिसे त्याचें वदन । तेव्हां घेई लगबगें चुंबन । हें लक्षण प्रेमाचें ॥११५॥ तैसे देवासी नाना उपचार । करितां पालखी उत्सव सुंदर । प्रेम वाढतसे अपार । आमुचें जाणा न सकलांचें ॥११६॥ प्रेम वाढतां होय आठव । घडिघडी देवाचा आम्हां सदैव । असत्य नव्हे सर्वथैव । अनुभवसिद्ध सकलां हें ॥११७॥ चार दिवस गेलिया मठासी । आनंद होय बहुत मानसीं । मग येतां आपुल्या ग्रामासी । घडिघडी आठव होय तयां ॥११८॥ उत्सव पालखी मंत्रघोष । तेंचि दृश्य दिसे विशेष । सुंदर मूर्ति नयनीं प्रत्यक्ष । दिसे ऐसा भास होय ॥११९॥ तेणेंकरूनी प्रेम वाढे । प्रेमेंचि परमार्थलाभ घडे । मग सहजचि उद्धार पुढें । होय निर्धारें आमुचा हो ॥१२०॥ म्हणोनि ऐसे माना उत्सव । ठेविले पूर्वजांनीं सर्व । त्याची उन्नति करावी, भाव । ठेवुनी अंतरीं आपण ॥१२१॥ नूतन जरी न होय आम्हांस । पूर्वजीं ठेविले उत्सव बहुवस । त्यास्तवचि वर्गणी देतां दरमास । त्यांतचि तुष्टे प्रभुवर तो ॥१२२॥ असो आतां मागें जो घेतला । दृष्टांत तो तेथेंचि राहिला । सांगूं आतां तोचि भला । दृष्टांतासहित पूर्ण करूं ॥१२३॥ अहेरादि जगीं लोकां । करिती सकलही एकमेकां । ऐसें करितां आठव देखा । होय एकमेकां अंतरीं ॥१२४॥ कवणाही नाहीं येथे उणीवता । केवळ प्रेमासाठीं तत्त्वतां । तेणें आठव होय चित्ता । घडिघडी परस्परांत पहा ॥१२५॥ तैसी येथे उत्सवासाठीं । देतां वर्गणी उठाउठीं । देवही रक्षी आम्हां संकटीं । आठव चित्तीं धरोनियां ॥१२६॥ आम्हीं करितां त्याचें स्मरण । तोही आठवी आम्हांलागून । त्यासी होतां आठव जाण । अगणित पुण्य पहा तें ॥१२७॥ हाचि असे वरील संशय । देवासी अभिषेकादि करितां काय । पुण्यप्राप्ति तेणें होय । तरी ऐका आतां सावधान ॥१२८॥ ज्यासी आवडे जो जो विषय । तोचि देतां त्या सुख होय । शंकरासी अभिषेक प्रिय । हें विदित असे सकळांसी ॥१२९॥ आतां म्हणाल उत्सव कासया । तरी तेंही श्रीअसे प्रिय तया । त्यायोगें भक्तसमुदाया । आनंद फार होत असे ॥१३०॥ एवं देवालागीं असे जें प्रिय । तेंचि करितां पुण्य होय । पूर्वजीं केलें यामाजीं काय । तो हेतु सारा सांगितला ॥१३१॥ काय हेतु कथिला म्हणाल । तरी उत्सवादि करितां सकल । आठव होय घडिघडी विमल । हें कथिले असे आधींचि ॥१३२॥ आठवें वाढे प्रेम अमित । प्रेमें होय समाधान निश्र्चित । समाधानें होय प्राप्त । मोक्षपद मानवांसी ॥१३३॥ वरी कथिलें स्वधर्म श्रेष्ठ । हीचि मोक्षाची सुलभ वाट । म्हणोनि स्वधर्म - सत्कर्में करावीं चोखट । आम्हीं अज्ञ जनांनीं ॥१३४॥ दिवसभरी पोटासाठीं । कराव्या लागती नाना खटपटी । धर्मकर्में राहिलें पाठीं । उसंत न मिळे अणुमात्र ॥१३५॥ म्हणोनि देतां वर्गणी मठासी । तेथ सत्कर्में होताति बहुवसी । तेंचि पुण्य आपुल्या गांठीसी । येत सहजचि पहा हो ॥१३६॥ सकाम भजतां मिळे तें फल । निष्कामें होय मन हें निर्मल । मग ब्रह्मज्ञान प्राप्त होईल । सहजचि जाणा तुम्ही हो ॥१३७॥ म्हणोनि सद्गुरु आणि मठ । आम्हां अज्ञांसी दावाया वाट । स्वधर्माची केली सपाट । जावया सच्चित्सुखधामा ॥१३८॥ एवं स्वामी सद्गुरुराज । स्वधर्म-राज्याचे महाराज । आम्हां सारस्वतांचे आज । करिती रक्षण प्रेमानें ॥१३९॥ स्वधर्माऐसें राज्य आणिक । नसे जीवासी सुखदायक । त्या राज्यीं वास करितां सम्यक । निजात्मज्ञाना पावे तो ॥१४०॥ ज्या एका राज्यामाझारीं । सुखचि असे पहा निर्धारीं । कळूनि तेथे राहतां भारी । सुखचि होय तयासी ॥१४१॥ परी तेथें असावा सद्गुणी राजा । तरीच सुखासी पोंचेल प्रजा । नातरी जनांमाजीं समजा । धांगडधिंगा माजेल झणीं ॥१४२॥ तैसें येथें स्वधर्मराज्यावरी । सद्गुरुमहाराज नसले जरी । तरी यथेष्टाचरण होउनी भारी । समाधान न मिळेल कल्पांतीं ॥१४३॥ म्हणोनि स्वधर्मरूप राज्यावरी । गुरुमहाराज असावे निर्धारीं । तेणेंच गुरुपरंपरा आजवरी । वाढली जाणा सुंदर ती ॥१४४॥ परंपरा वाढविल्याकारणें । स्वधर्मरक्षण झालें येणें । परंपरा वाढली स्वधर्मरक्षणें । एवं अन्योन्याश्रयें आनंदचि ॥१४५॥ यापरी स्वधर्मराज्य हें थोर । त्यावरी बैसे श्रीसद्गुरुवर । राजवाडा हाचि मठ सुंदर। रहावयासी गुरुराया ॥१४६॥ एवं आमुचे सद्गुरुराज । आनंदाश्रम नवम आज । सकलही सोडुनी आपुलें काज । आले धांवुनी भूतळीं ॥१४७॥ तरी आम्हीं करावें काय । धरावे आधीं त्यांचे पाय । तरीच जन्म सफल होय । सत्य सत्य त्रिवाचा ॥१४८॥ आणि ऐसे सद्गुरुराज । आम्हां अज्ञांसी लाभले आज । पूर्वपुण्येंचि पहा सहज । ऐसें मनासी बोधावें ॥१४९॥ म्हणोनि ऐशी सद्गुरुमूर्ति । दीर्घायुषी होवो क्षितीं । ऐसें मागूं घडिघडी निश्र्चितीं । भवानीशंकर - संनिधीशीं ॥१५०॥ परमहंस - आनंदाश्रम । शिवानंदतीर्थ एकचि ब्रह्म । यांच्या कृपाप्रसादें चतुः पंचाशत्तम । अध्याय गुरुदासें संपविला ॥१५१॥ स्वस्ति श्रीचित्रापुर । गुरुपरंपराचरित्र सुंदर । ऐकतां पापें नासती थोर । चतुः पंचाशत्तमाध्याय रसाळ हा ॥१५२॥ अध्याय ५४॥ ओव्या १५२॥ ॐ॥ तत्सत्- श्रीसद्गुरुनाथचरणारविंदार्पणमस्तु ॥ ॥ इति चतुःपंचाशत्तमोऽध्यायः समाप्तः ॥ N/A References : N/A Last Updated : January 20, 2024 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP