मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र|
अध्याय ॥४५॥

चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥४५॥

सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीमत्पांडुरंगाश्रमगुरुभ्यो नमः ॥ श्रीभवानीशंकराय ने नमः ॥ॐ॥
जय जय देवा सद्गुरो सदया । ठेवितों मस्तक या तव पायां । पार घालीं तूंचि गुरुराया । भवभयांतुनी मजलागीं ॥१॥
बाल्यावस्थेमाजीं सारें । खेळांतरीं आयुष्य हें सरे । तारुण्यांत विषयीं बुडोनी मरे । वृद्धापकाळीं कांहीं करवेना ॥२॥
करावया बैसलों जरी जप । तरी येई आधीं झोंप । नाना कल्पना येती खूप । तेव्हां कैंचा देव मला ॥३॥
बैसतां बोलत जनांच्या गोष्टी । होय आनंद बहुत पोटीं । परी देवा तुझी गोमटी । मूर्ति धराया उबग मना ॥४॥
एकांतवास कधींही नावडे । लोकांत वैसाया वृत्ति ओढे । हा कवण, तो कवण, इकडे तिकडे । बघाया धडपडे मन हें बा ॥५॥
जरी जाती मार्गीं जन । आपापुल्या कामालागून । तेव्हां बोलावितों यावें म्हणोन । अति आग्रहेंकरोनि ॥६॥
जरी त्यांनी यावयालागुन । सवड ना आतां, जातों म्हणोन । म्हणतां काकुळतीस येतों आपण । 'किंचित् येउनी जा तुम्ही' ॥७॥
इतुकें प्रार्थाया काय कारण । संसार गोड वाटे म्हणोन । परी तुजला जावया शरण । लाज वाटे मम जीवा ॥८॥
ऐसा मी विषयांध कृपाघना । विषयां भुलोनि नाडलों जाणा । म्हणोनि भोगीं नाना यातना । दुःख असमाधान सदा ॥९॥
आतां देवा तुजवांचोनि । कोण निवारण करील धरणीं । तूंचि एक सोडविता यांतुनी । म्हणोनि वाहतों तुजलागीं ॥१०॥
आतां धांवोनि येई त्वरेनें । होईल समाधान बा जेणें । तेंचि करोनि तारीं कृपेनें । सद्गुरुराया कृपाघना ॥११॥
अमो आतां श्रोते हो सज्जन । मागील अध्यायीं स्वामी कृपाघन । यांनीं केली आज्ञा जाण । शिष्यस्वीकारसिद्धतेसी ॥१२॥
तेव्हां करिती तेथील जन । सारी सिद्धता प्रेमेंकरोन । म्हणती 'आजिचा भन्म सुदिन' । स्वर्गींचे देवही, हो, पाहीं ॥१३॥
यावरी कवणाही येईल संशय । कीं ‘स्वर्गींचे देव म्हणती’ हें काय । लटिका बोलसी तूं हा विषय । दिसती कां ते आम्हांसी ॥१४॥
वृथा बडबड करिसी हा निश्र्चय । आतां कलियुगीं स्वर्ग तो काय । दिसती कां ते देव स्वर्गीय । कोणीं पाहिले वा ऐकिलें ॥१५॥
तरी ऐका याचे उत्तर । जरी ते न दिसती पृथ्वीवर । सत्पुरुषांचे असती ते किंकर । वाटे त्यां येथील नर धन्य ॥१६॥
"निजभक्तांची चरणधूळ । मस्तकी वंदी घननीळ । ऐसी वाणी असे प्रांजळ । वेदव्यासांची भागवतीं ॥१७॥
वैश्वदेव आणि यज्ञहोम । करिती जे का विप्रोत्तम । देव त्यांच्या घरीं परम । प्रेमें येती गुप्तरूपें ॥१८॥
पितृभक्त आणि गुरुभक्त । तेवींच पतिव्रता, स्त्रिया समस्त । यांच्या घरी येऊनि देव सतत । आशीर्वाद देत गुप्तरूपें ॥१९॥
स्वधर्माचरण, पंचमहायज्ञ । करितां देव ते प्रसन्न । होउनी करिती मनोरथ पूर्ण । ऐसी उक्ती गीतेमाजीं ॥२०॥
हरिगुरुभक्त निष्ठावंत । तयांसी दिव्य दृष्टि प्राप्त होत । त्या दिव्यदृष्टीनें तयांप्रत । अदृश्य देव दृश्य होती ॥२१॥
देवांचीं शरीरें वायुरूप । पिशाचादियोनीही तद्रूप । दिव्य आणि अदिव्य परमाणूंचीं, खूप । सुक्ष्म असती तीं जाणा ॥२२॥
सुक्ष्म म्हणजे दिव्यदृष्टि । ज्यांना हरिगुरुकृपें गोमटी । लाभलीसे ते संत सृष्टीं । पाहती देवादिकांना ॥२३॥
‘गुरु हा संतकुळींचा राजा' । ज्ञानदेववाणी ही उमजा । म्हणुनी देवादि गुरुपदाब्जा । वंदिती प्रेमेंकरोनि ॥२४॥’’
सत्पुरुषांचा संग ज्यांसी । त्यांची असे पुण्यराशी । तेवींच घडे सत्संग त्यांसी । नाहीं अनुमान यामाजीं ॥२५॥
सद्गुरुइतुका श्रेष्ठ देव । नसे त्रिभुवनीं सर्वथैव । बघतां सद्गुरूंचे वैभव । सुरवरां उल्हास निजमानसीं ॥२६॥
म्हणोनि सद्गुरुस्वामी आमुचे । करिती शिष्या, म्हणोनि साचे । देव सारे म्हणती वाचे । “धन्य दिवस हा भाग्याचा" ॥२७॥
आणिक म्हणती "स्वामींचे भक्त । काय त्यांची पुण्याई अमित । म्हणोनि भजती दिवसरात । सद्गुरुरायांलागीं ते ॥२८॥
ऐशा भक्तांपुढें आम्ही । काय कराया खावया पराक्रमी । मनुष्यजन्मचि श्रेष्ठ नामी । मिळे सत्संग सर्वदा’’ ॥२९॥
असो ऐसें देव जें बोलती । असत्य नव्हे सत्यचि निश्चितीं । मनुष्यचि पावे सद्गति। सत्संगतीनें हो जाणा ॥३०॥
मनुष्यजन्मा आलियावीण । न पावती आत्मज्ञाननैपुण्य । देवादि पशुही म्हणोन । देवही वांछिती मनुष्यजन्म ॥३१॥
म्हणोनि 'हा मनुष्यजन्म । दवडूं नका ऐसा उत्तम । जावया मोक्षाचा दरवाजा सुगम' । ऐसें बोलनी संत भले ॥३२॥
असो आतां शिरालीग्रामीं । जाऊनि घटना तेथोल आम्ही । पाहूं आनंदाश्रम नूतन स्वामी । प्रेमें मूर्ति सुंदर ती ॥३३॥
तेथें झाली सिद्धता सारी । एकत्रि चिंता उरली ते अवसरीं । नव्या स्वामींनी दंड स्वकरीं । नवीन आणावा कोठोनी ॥३४॥
अमुक ऐसा असावा दंड । तो त्वरेनें मिळाया होय अवघड । ऐनी सुब्रायभटजींसी अखंड । लागली चिंता तेधवां ॥३५॥
कुठें गवसेल ऐसें म्हणोन । विचार करितां भटजींनीं जाण । श्रीस्वामींसी झालें स्मरण । दंड असे एक पाकगृहीं ॥३६॥
आपुल्या संन्याससमयीं दोन । आणिले होते दंड जाण । एक ठेविला घट्ट बांधोन । चुलीवरती पाकगृहीं ॥३७॥
तैं सांगूं लागले कृपाघन । तेव्हां धांवती तेथील जन । मग काय त्यांनीं अपूर्व जाण । चमत्कार नयनीं देखिला ॥३८॥
जो बांधोनि ठेविला दंड घट्ट । कवणाही ना विदित ही गोष्ट । ते दिनीं जनांची पडतांचि दृष्ट । दोरा तुटला तत्काळ ॥३९॥
आणिक एक जातां घटिका । पडला असता निश्र्चयें देखा । कीं सिद्धचि होउनी बैमला निका । स्वामींसन्निधीं जावया ॥४०॥
यावरी कवणही करितील प्रश्न । यांत आश्र्चर्य आहे तें कवण । तरी ऐका आतां सावधान । सकल सज्जन श्रोते हो ॥४१॥
जो ठेविला होता तेथ दंड । आजवरी तैसाच राहिला अखंड । तेचि दिनीं तो दोरा जाड । तुटोनी गेला कैसा हो ॥४२॥
की सर्वांदेखत आतांच दोरा । तुटला हा चमत्कार नव्हे कां खरा । म्हणोनि ऐश । सद्गुरुवरा । कितीही वर्णितां पुरे ना ॥४३॥
सकळ कार्य तेचि करविती । निमित्तमात्र भक्त होती । त्यांसी अवघड नसे निश्चितीं । कवणही कार्य जाणा हो ॥४४॥
सर्वही सिद्धता क्षणेंचि होय । क्षणमात्रेंचि होय निश्चय । असाध्य कांहींही नसे त्यां गुरुवर्य - । स्वामीरायांलागीं हो ॥४५॥
सर्व जगचि त्यांचे हातीं । तेव्हां काय कराया न होय त्यांप्रती । उगीच आम्ही मंदमती । वाहतों अभिमान 'म्यां केलें ॥४६॥
असो ! सुब्रायभटजी आणि जन । पालखी नाना वाद्यें घेवोन । गोपालकृष्णदेवुळीं जाण । आनंदानें गेले हो ॥४७॥
तेथे बैसले जाउनी जन । घेउनी यावया शांतमूर्तींलागून । मातापित्यांसी करवुनी नमन । अहेरादि करविले ॥४८॥
मोह ममता परम कठिण । जाई पुत्र आपुल्यासी सोडून । म्हणोनि माता अश्रुसिंचन । करी नयनांतूनि पहा ॥४९॥
म्हणे मानसीं अरे बाळा । पुनरपि न मिळनी बोलायाला । कैसी राहूं सोडोनि तुजला । जगीं आतां मी पाहीं ॥५०॥
आजवरी तूं बाळ म्हणोनि । सांभाळिलें तुजलागोनि । आतां सर्व जगाचा तूं धनी । सर्वां रक्षिसी तूंचि बा ॥५१॥
बोलिलें आजवरी सलगीनें तुजप्रती । तूं देवचि ऐसें कळलें ना चित्तीं । अवतारीच तूं निश्चितीं । म्हणोनि नेती शिष्यपदा ॥५२॥
माझे अपराध अमित असोनि । बोलिल्यें कधींकधीं तुजलागोनि । तूं नसतांही निश्चयें दुर्गुणी । सहज स्वभावें बोलिल्यें ॥५३॥
आम्ही माता म्हणोनि बालकां । त्यांनीं अणुमात्र करितां चुका । शब्द लावितों त्यांसी निका । दुर्गुण नसतांही अंगीं पैं ॥५४॥
तेवींच मीं तुजला बाळा । दरडाविलें कितीक वेळां । परी तूं ना उलट मजला । बोलिलास कधींही निश्र्चयें ॥५५॥
तुझे गुण शांत बहुत । किती आठवूं मी हृदयांत । नच बोलवे बा आणिक मजप्रत । हृदय कांपत थरथर हें ॥५६॥
इतुकी योग्यता आली कोठोनि । हेंचि न कळे मजलागोनि । पूर्वसुकृत असे म्हणोनि । आलास उदरीं माझ्या या ॥५७॥
असो आतां माझ्या बाळा । सार्‍या सुखाचा निश्र्चयें आपुल्या । त्याग करिसी तूं ये वेळां । हेंचि वाटे दुःख मज ॥५८॥
आहार, निद्रा, विषय सारे । बालपणींच सोडिसी कैसा रे । आठवितां सर्व, दुःख नावरे । काय सांगू मम बाळा ॥५९॥
आतां देत्यें आशीर्वाद । रक्षण करीं तूं भक्तवृंद । दीर्घायुषी होऊनि आनंद । देईं सर्वांसी मम बाळा ॥६०॥
यापरी मानसीं बोलिली माता । शोक नावरे तिचिया चित्ता । मातेचें हृदय कैसें तें समस्तां । जियेसी अनुभव तियेसीच कळे ॥६१॥
परम प्रेमें विलोकी वदन । करी त्याचें घडी घडी स्मरण । आणि म्हणे बाळा तुज कोण । मातापिता बा पाहीं ॥६२॥
ऐसें बोलतां घळघळां नेत्रीं । अश्रु लोटले, पडले धरित्रीं । नावरे कांहीं केल्या सर्वत्रीं । वाटे तिजला दुःख बहु ॥६३॥
तैसेंच सार्‍या आप्तजनांमी । वाटे बहुत दुःख मानसीं । परी शांतमूर्तीच्या चित्तासी । ना खंत ना खेद ॥६४॥
पुढें करूं याचें विवरण । यांच्या चरित्रीं सारें कथन । आतां ऐका सावधान । पुढील वार्ता सप्रेमें ॥६५॥
तेथे एक असे प्रघात । शिष्य स्वीकाराआधीं त्याप्रत । आप्त सारे बोलावुनी नेत । घरोघरीं भोजनासी ॥६६॥
बहुविध पकान्नें रुचिकर । करूनि वाढिती प्रेमें सुंदर । ऐसा प्रघात समाजीं मनोहर । पडिला असे आमुच्या ॥६७॥
परी आतां शांतमूर्तीसी । न होय ऐसें करावयासी । अवचित घडलें कार्यासी । न मिळे अवकाश यां सर्वां ॥६८॥
म्हणोनि सकळांसी झाली हळहळ । मातापित्यासी अतिशय तळमळ । प्रीतीचे पदार्थ द्यावया वेळ । नाहीं म्हणोनि अति दुःख ॥६९॥
असो मग आले जे जन । बैसले देउळीं सारे येऊन । आली शांत मूर्ति गोमटी तेथून । सदनांतूनि तेधवां ॥७०॥
परम सुंदर गौरवर्ण । मुखकमल दैदीप्यमान । कोटी मन्मथ ओंवाळून । मुखावरोन टाकावे ॥७१॥
असो मग ते सकळ जन । पालखी सजवुनी आणिती जाण । तियेंत बैसविलें प्रेमेंकरोन । शांतमूर्तीसी तेधवां ॥७२॥
नाना वाद्यें घेउनी संगें । मिरवीत आणिलें बहुतचि रंगें । जन येती धांवुनी लगबगें । पाहाण्यास उत्सव त्या समयीं ॥७३॥
जो असे कार्यक्रम विधियुक्त । संन्याससमयीं विख्यात । केला सारा साजरा त्वरित । गुरु - आज्ञेपरी त्या समयीं ॥७४॥
मुख्य जो संन्यास - उपदेश जाण । तो पाहुनी मुहूर्त शुभ दिन । केलें कार्य आनंदेंकरोन । ऐका दिवस तो आतां ॥७५॥
शके अठराशें सदतीस । राक्षस संवत्सर वैशाख मास । वद्य अष्टमी द्वितीय प्रहरास । 'आश्रम' - संन्यास दिधला हो ॥७६॥
पाठवुनी तारा ग्रामोग्रामीं । गृहस्थ आले पहावया स्वामी । ते जन भाविक अंतर्यामीं । धरोनी पाहती ती मूर्ति ॥७७॥
झाला उत्सव परम थोर । पाहूनि संतोषले जन समग्र । म्हणती आमुचें भाग्य अपार । म्हणोनि लाभले गुरुवर हे ॥७८॥
धन्य धन्य ऐसा सुदिन । बघाया हवें विपुल पुण्य । साक्षात् लाभतां नारायण । काय उणें त्यां भक्तांसी ॥७९॥
मग सद्गुरु स्वामीराय । निजशिष्यासी ते समय । 'आनंदाश्रम' नामाभिधान सुखमय । देते जाहले प्रेमानें ॥८०॥
आणि घेउनी संगें शिष्य । गेले भवानीशंकरसंनिधीस । करोनि प्रार्थना बहुवस । ठेविला वरदहस्त शिरीं ॥८१॥
आणिक केला उपदेश थोर । बोलती प्रेमानें परमचतुर । म्हणती बाळा सांगतों विचार । घरीं स्वमनीं दिनरजनीं ॥८२॥
तूं इतुके दिवसवरी । होतासी मायबापांच्या घरीं । त्यांचा पुत्र होउनी निर्धारीं । राहिला होतास जाण पां ॥८३॥
आतां तुझीं माय - बाप - भगिनी । बंधु - चुलते आदिकरोनी । भवानीशंकर देवचि असुनी । तोचि रक्षील तुजलागीं ॥८४॥
ठेवुनी त्यावर विश्वास । दक्ष राहुनी करूनि साहस । तुझें कर्तव्यकर्म रजनी - दिवस । करीं प्रेमें निर्धारें ॥८५॥
तुझ्या मानसीं होय जो निश्चय । तो सहजचि योग्य होय । तो करावया न करीं संशय । नच फिरे, माघारां कदापि ॥८६॥
श्रीभवानीशंकरा स्मरोनि अंतरीं । सकलही कार्य प्रेमानें करीं । भिऊं नको तूं निर्धारीं । अणुमात्रही मम बाळा ॥८७॥
गरीब अथवा श्रीमंत कुणीही । मोठा अधिकारी पदवीधर त्याही । पक्षपात न धरितां पाहीं । समदृष्टि ती धरोनियां ॥८८॥
धर्मापरी करीं न्याय । त्यामाजीं न धरीं संशय । नाहीं तुजला कवणही भय । सत्यवचन हें आमुचें ॥८९॥
दक्षिणस्कंधीं भवानीशंकर । वामस्कंधीं आम्ही गुरुवर । मागें पुढें सकल - परंपरा थोर । असती साह्य तुजलागीं ॥९०॥
सिद्ध होउनी असती ते आपण । वर्तवावया तुजलागोन । कर्ते करविते तेचि जाण । म्हणोनि सर्वथा भिऊं नको ॥९१॥
धरितां सद्गुरुचरणीं विश्वास । तोचि पार घालील खास । तो जें करी तेंचि भक्तांस । हितकारक होत असे ॥१२॥
म्हणोनि काहीं येतां संकटें । ढुंकूं नयेच तयां वाटे । सद्गुरु एक आमुचे मोठे । असतां कैंचे भय आम्हां ॥९३॥
त्याच्या इच्छेपरी सकल होय । मग कैंचें भक्तांसी भय । कर्ता करविता तोचि चिन्मय । न चाले उपाय आमुचा ॥९४॥
परी जें असे आपुलें कार्य । 'कर्तव्य' म्हणोनि करावें निर्भय । यांत न करीं अणुमात्र संशय । सांगतों तुजला प्रेमानें ॥९५॥
देव - गुरुरायांसी स्मरोनी । आपुलें कर्तव्यकार्य करावें झणीं । यश द्यावया समर्थ कोणी । नसे त्रिभुवनीं त्यांविण ॥९६॥
सत्य एक हृदयीं धरोनी । करी कार्य कैंचेंही धरणीं । ऐसें करितां निश्चयें, स्वमनीं । कवण भय त्या मानवा ॥९७॥
नाहीं सत्यासी नाश कधींही । सत्यानें वागतां अंगीं सर्वही । सद्गुण येती निश्र्चयें लवलाहीं । हें खचितचि जाण तूं ॥९८॥
सद्गुणेंचि पावे आत्मज्ञान । जरी तो असे मंदमति कवण । तरी त्यासी तो कृपाघन । उद्धरीतसे निर्धारें ॥९९॥
जो जग हें मिथ्या पाहे । तोचि सत्यानें वागे निश्र्चयें । म्हणोनि आधीं बघावें, जग हें । सत्य नसे अणुमात्र ॥१००॥
नित्यानित्य होतां विवेक । विषयत्याग करीतसे देख । तेव्हां सत्यानें वर्ते निश्चयात्मक । नाहीं संशय यामाजीं ॥१०१॥
विषयचि सारे देखतां मिथ्या । कासया जाईल असत्यपंथा । जें जें पाही तें तें सत्यचि, तत्त्वतां । दिसे त्या कैसें तें सांगूं ॥१०२॥
समजा गारुडी आला एक । दावितो खेळ करोनि अनेक । रुपये पुष्पें आंबे सुरेख । करी बहुविध त्या समयीं ॥१०३॥
तेव्हां तेथील सारे विषय । मिथ्या समजुनी कवणही न घेय । लहान बालकें नाचती थयथय । तें घ्या हें घ्या म्हणती ते ॥१०४॥
तेव्हां त्यांसी मायबाप । समजावुनी सांगती खूप । तेव्हां हळू हळू त्यांचे स्वरूप । कळे जादूचा माल खोटा ॥१०५॥
तैसें अज्ञांसी सारें जग । सत्यचि भासे तेव्हां, काय मग । कैसा करवेल त्याचा त्याग । सत्य मिथ्या नच कळतां ॥१०६॥
म्हणोनी विषयचि गोड बहुत । धरिती ते त्यांवरीच प्रीत । नाना खटपटी करिती तेथ । त्यांच्याच प्राप्तीकारणें ॥१०७॥
विषयांमाजीं होतां गर्क । कांहीं न दिसे निश्चयात्मक । तेव्हां जगीं असत्यचि देख । घडे व्यवहार तयांचा ॥१०८॥
कवणा कांहीं न पुसतां आपण । करिती सदा यथेच्छाचरण । कीं सत्यचि वाटे तेंचि त्यांलागून । तेवींच वर्तती त्यापरी ते ॥१०९॥
तेणेंचि असत्य वर्तत भारी । नाना घडामोडी करिती बहुपरी । मग सत्यत्व त्यांच्या शरीरीं । येईल, कैसें तें सांगा ॥११०॥
म्हणोनि जग हें मिथ्या समजून । त्याग करावा न लागतां क्षण । सत्य तितुकें निजमनीं धरोन । वर्ततां ज्ञान ये हाता ॥१११॥
सत्य कळतां सहजचि त्याग । होय विषयसुखाचा, त्या मग । काय उणीवता तेव्हां सांग । आत्मज्ञाना ना तोटा ॥११२॥
म्हणोनि विषय मिथ्या समजुनी । सत्यानें वर्तत असतां, झणीं । त्वरेचि होय ब्रह्मज्ञानी । सारें जगचि ब्रह्मरूप ॥११३॥
न कळ जरी अद्वैत ज्ञान । सर्वांठायीं सत्यत्व धरोन । वागे जो नर आपण । तया तो सांभाळी भगवंत ॥११४॥
सत्य हें एकचि सन्मार्गदर्शक । त्याहुनी नाहीं साधन आणिक । तेणेंचि समाधान होय देख । निश्र्चयें पाहीं मम बाळा ॥११५॥
तुजला कवणही नाहीं भय । सकल मागील स्वामी सदय । भवानीशंकर देव चिन्मय । असती तव पाठीसी ॥११६॥
असो यापरी करोनी बोध । ठेवुनी मस्तकीं हस्त वरद । श्रीपांडुरंगाश्रमस्वामी प्रसिद्ध । घेती शिष्यामी प्रेमानें ॥११७॥
असो यापरी करोनियां उपदेश । संपविला संन्यासक्रमविशेष । एवं शिष्यस्वीकार होतां संतोष । झाला सर्व भक्तजनां ॥११८॥
तेथें मिळाले आपुले जे जन । त्यांसी झाला हर्ष पूर्ण । सारा समारंभ पाहोन । तेचि समयीं हो जाणा ॥११९॥
परी स्वामी पांडुरंगाश्रम । यांचें दुखणें बघोनि, जनां परम । दुःख जाहलें त्या सुखासम । सुखदुःख दोन्ही एकेचि वेळीं ॥१२०॥
एकीकडे झाला आनंद । दुज्या प्रकारें दुःख बहुविध । कीं पांडुरंगाश्रम सद्गुरुपाद । अंतरती आपुल्यास म्हणोनियां ॥१२१॥
अश्रुधारा वाहती नयनीं । सर्व जनांच्या प्रेमेंकरोनी । सद्गुरुमूर्तीच तैसी म्हणोनी । लागती भजनीं त्यांच्या हो ॥१२२॥
काय वर्णूं त्यांचा महिमा । वर्णूं जातां न मिळे उपमा । काय सांगूं श्रोते हो तुम्हां । सांगतां न ये कवणाही ॥१२३॥
असो सद्गुरुस्वामीराय । अशक्त क्षीण जाहले अतिशय । चिंताक्रांत श्री होती ते समय । भक्तजन बहुतचि ॥१२४॥
शिष्य स्वीकार झालियावरी । आठ दिवसां होतां सत्वरी । स्वामींचा आजार वाढला बहुपरी । भ्याले सारे भक्तजन ॥१२५॥
ज्येष्ठ शुद्ध द्वितीये दिवशीं । सोमवार प्रदोष - समयासी । शके अठराशें सदतिशीं । राक्षस संवत्सर होतें तैं ॥१२६॥
तये दिवशीं जाहले मुक्त । हाहा:कार उडाला जनांत । सद्गुण आठविती समस्त । श्रीसद्गुरुस्वामींचे ॥१२७॥
पसरली वार्ता न लागतां क्षण । जवळींचे जन येती धांवून । बघती मूर्ति प्रेमेंकरोन । श्रीस्वामींची त्या समयीं ॥१२८॥
बैंदर भटकळ मुर्डेश्वर । नजीक ग्रामींचे येती समग्र । थव्यांचे थवे भरले अपार । तासामाजींच तत्काल ॥१२९॥
म्हणती मानसीं सद्गुरुदेवा । तूं एक कृपेचा ठेवा । विसरूं कैसें करुणार्णवा । तुझे उपकार आम्ही बा ॥१३०॥
केला सकलांचा सांभाळ । देह झिजवुनी आपुला कोमळ । स्वधर्म शिकवुनी केलें प्रेमळ । जनांचें अंतःकरण तुवां ॥१३१॥
ऐने आठवुनी सद्गुण । अश्रु ढाळिती भक्तजन । पुढें ऐका सावधान । तुम्ही श्रोते सज्जन हो ॥१३२॥
मग श्रीस्वामीसद्गुरूंलागीं। पालखींत बैसवुनी वगीं । मिरविती सकलही मार्गीं । ग्रामाभोंवतीं ते समयीं ॥ १३३॥
निवाले रात्रीं प्रहर एकावरी । परतले ते तिसर्‍या प्रहरीं । मिरवित मिरवित नगरीं । मठामाजीं सावकाश ॥१३४॥
घरोघरीं आरत्या नारळ । देती भक्तजन प्रेमळ । म्हणोनी रात्र झाली विपुल । यात्रया पालखी मठासी ॥१३५॥
असो स्वामींची मिरवणूक । आली मठामाजीं देख । तोंवरी इकडे केली सकळिक । सिद्धता समाधी द्यावयासी ॥१३६॥
गणपती देवाच्या संनिधीं । दक्षिणभागीं खगुनी गुंफादी । बैसवावया गुरुमूर्ती त्यामधीं । केली सिद्धता वेगेंसी ॥१३७॥
मग सुंदर पवित्र ती मूर्ती । बैसविली पद्मासनें परमप्रीतीं । त्या गुंफेमाजीं निश्चिती । विधिपूर्वक करोनी ॥१३८॥
घालुनी कर्पूरादि सुगंध द्रव्य । मस्तकीं ठेविलें शालिग्रामादि सर्व । करूनी विधियुक्त विधानवैभव । दिधली समाधी त्या समयीं ॥१३९॥
ऐसी माउली सद्गुरुमूर्ति । जगीं राहिली सतत कीर्ति । काय वानूं कवण्या रीतीं । करूं वर्णन न कळे हो ॥१४०॥
असो आतां स्वामी यांची । जीवनयात्रा संपली साची । महिमा वर्णाया न पुरे आमुची । मति मंद असे ती ॥१४१॥
झिजविला सारा देह आपुला । केवल जनकल्याणा वाहिला । आणिक कांहीं नाहीं त्यांजला । करणें होतें जगामाजीं ॥१४२॥
कासया त्यांसी इतुके कष्ट । सांगा तुम्ही श्रोते हो श्रेष्ठ । जनकल्याणावांचुनी गोष्ट । नाहीं अन्य त्या स्थानीं ॥१४३॥
काय केलें जनकल्याण । ऐसा येईल जरी प्रश्न । तरी परिसा सावधान। उत्तर त्याचे श्रोते हो ॥१४४॥
मग कथिल्यापरी त्यांसी । कासया मठाचे बंधन परियेसीं । जनांचा उद्धार व्हावा ऐसी । इच्छा मानसीं हेंचि कीं ॥१४५॥
त्याचिकारणें जनांसी बोधिलें । कंठशोष करोनि शिणले । रात्रंदिन शरीर झिजविलें । नाना परीनें त्यांनीं हो ॥१४६॥
होतां रात्र तीनप्रहर । स्नानादि करिती स्वामी साचार । मग अनुष्ठान महाथोर । करिती दयाळ ते जाणा ॥१४७॥
यापरीच त्रिकाळ - स्नान । आणि करिती अनुष्ठान । ऐसें स्वधर्मापरी वर्तोनि आपण । सांगती अन्यांसी स्वधर्म ॥१४८॥
आपण करोनि दाविती । मग अन्यांसी उपदेश करिती । ब्रह्मज्ञानी ऐसेच असती । बोलती तैसें वर्तती ते ॥१४९॥
कासया त्यांसी अनुष्ठान । जे असती ब्रह्मज्ञानी पूर्ण । परी नाहीं त्यांसी अभिमान । म्हणोनि करिती स्वधर्म ॥१५०॥
शिक्षकासी नलगे शिकणें । अ, आ, इ, ई ऐसें म्हणणें । परी म्हणतो मुलांकारणें । घोकावें लागे दिनरजनीं ॥१५१॥
हा असे शिक्षक आपण । कासया घोकितो अ, आ, म्हणोन । ऐसें न बोलती त्यालागून । बुद्धिवंत निर्धारें ॥१५२॥
तद्वत् येथें श्रीस्वामींसी । नलगे अनुष्ठानादि परियेसीं । पूर्ण ज्ञानी ऐसियांसी । काय करणें हें सारें ॥१५३॥
त्यांसी नाहीं कर्तव्य कांहीं । ते अकर्ते अभोक्ते असती पाहीं । आम्हां अज्ञजनांसी सर्वही । अमुक कर्तव्य अमुकाचें ॥१५४॥
ज्यासी असे कर्तृत्वबुद्धि । त्यासीच लागली कर्तव्यव्याधि । हीचि एक थोर उपाधि । आम्हां अज्ञजनांलागीं ॥१५५॥
'कर्तव्य' ही व्याधि कैसी । तरी आतां सांगूं तुम्हांसी । सद्गुरुकृपेंचि मजसी । स्फुरेल जितुकें तितुकेंचि ॥१५६॥
कर्तव्यासी नाहीं तूट । मरे तोंवरी न सोडी पाठ । जरी मेलों तरी ही कटकट । न चुके निश्चयें अज्ञांसी ॥१५७॥
मेल्यावरी कर्तव्य आपुलें । वासनेमाजीं जाऊनि लपलें । मागुता जन्म घेई ते वेळे । कर्तव्यासहित ये जन्मा ॥१५८॥
ज्याची वासना ज्ञानें जळाली । त्याची कर्तव्यभावना मेली । ऐसी ही आमुची माउली । कर्तव्यरहित समजा हो ॥१५९॥
नाहीं त्यांसी अणुमात्र वासना । जळोनि खाक ज्ञानें, जाणा । मग कैंचें हो त्यां गुरुराणां । अमुक कर्तव्य आहे तें ॥१६०॥
म्हणोनि नाहीं विधि-निषेध । ते जें करिती तेंचि सुसिद्ध । हाचि त्यांचा विधि शुद्ध । न करिती जें तें निषेध तो ॥१६१॥
परी ते कदापिही आपण । न करिती अधर्माचरण । अधर्में वर्तले तरीही त्यांसी न । लागे पाप अणुमात्र ॥१६२॥
तेचि सकलां अधिष्ठान । त्यांसी कैंचें पाप पुण्य । प्रारब्धापरी त्यांचे वर्तन । घडे त्यांच्याकडुनी पैं ॥१६३॥
त्यांचा अवतार जनांकारण । काज नाहीं जगीं आन । ते जें करिती तेंचि आपण । उत्कृष्ट ऐसें जाणावें ॥१६४॥
त्यांच्या कार्यावरी आपण । शब्द न ठेवावा अणुमात्र जाण । तरीच होईल आमुचें कल्याण । आणिक साधन नलगे पैं ॥१६५॥
जनकल्याणावांचून दुजा । हेतु नाहीं आणिक समजा । ते जें करिती तें जनकाजा । स्वार्थ नाहीं त्यामाजीं ॥१६६॥
पहा कैसें सांगूं आतां । लावा इकडे आपुल्या चित्ता । स्फुरवील जें सद्गुरुमाता । तेंचि कथं हो तुम्हांतें ॥१६७॥
कथिती जनांसी स्वधर्म करा । कीं अज्ञांच्या चित्ता अन्य ना थारा । म्हणोनि बोधिती जन्म सारा । जनांस्तत्वचि निश्चयें ॥१६८॥
ऐके जरी कुणीही वचन । तरी सांगती त्यासी निक्षून । दाविती वरिवरी कोप दारुण । परी अंतरीं शांत सदा ॥१६९॥
क्षोभ दावाया काय कारण । निजभक्तांचे व्हावें कल्याण । एवं हेतु नसे अन्य । जनांचे हितचि इच्छिती ते ॥१७०॥
नानापरी करोनि बोधा । तीव्र करिती मतिमंदा । इतुका कासया त्यांसी धंदा । केवळ कल्याणा आमुच्या हो ॥१७१॥
साम - दान - भेद - दंड । चारी उपचार करुनी अखंड - । सुख दावाया इतुकी धडपड । करिती झिजवुनी निजदेहा ॥१७२॥
असो साम - दान - भेद - दंड । यांचा अर्थ करूं उघड । ऐका श्रोते हो तुम्ही सुखंड । परम प्रीतीनें आतां हो ॥१७३॥
'साम' म्हणिजे आपुला ऐसें । वर्तमान प्रेमानें सांगतसे । जरी ना ऐके तरी त्या साहसें । दानोपचार दाविती ॥१७४॥
'दान' म्हणिजे फलाशा दावुनी । बोध करिती प्रेमें ते झणीं । जरी ना ऐके हेंही ऐकुनी । भेदोपचार करिती ते ॥१७५॥
'भेद' म्हणिजे काय तें ऐका । अन्यांसी फुलवुनी फल देवूनि कां । भेद दावुनी करिती सारिखा । बोध तये समयीं हो ॥१७६॥
तरीही न ऐके जरी वचन । तेव्हां दंडचि करावा म्हणोन । क्रोध दाविती वरिवरी कठिण । निजभक्तांसी प्रेमानें ॥१७७॥
परी आम्ही अज्ञ जन । लक्ष न देतां आपण । आपुलेंचि अहित घेतों करोन । दुरभिमानेंकरोनियां ॥१७८॥
आणिक करूंक विस्तार सारा । सामदानादि यांचा बरा । देउनी आपुल्या चित्तासी थारा । प्रेमानें अवधारा तुम्ही हो ॥१७९॥
असे एक ब्राह्मणपुत्र । खोड्या करी अहोरात्र । त्यासी सांगे माय पवित्र । ऐक बाळा मम वचना ॥१८०॥
ऐसा होऊं नको उनाड । म्हणोनि बोधी बोलुनी गोड । हाचि सामोपचार उघड । सांगे वारंवार सदा ॥१८१॥
परी तो बाळ न ऐके वचन । अधिकचि करी अनर्थ दारुण । तेव्हां ती दुजा उपचार दान । हाचि करी ते समयीं ॥१८२॥
म्हणे बाळा जरी वचन । ऐकसी तरी तुजलागोन । देत्यें निश्चयें परम छान । वस्तु एक यापुढती ॥१८३॥
तेंही तो ना घे कर्णीं । ऐसें ती माय बघुनी नयनीं । भेद दावी पुत्रालागुनी । काय तो परिसा आतां पैं ॥१८४॥
म्हणे तो रामु कैसा धीट । आणि हुशार तुजहुनी श्रेष्ठ । त्यासी मिळाली ही नोट । बक्षीस दहा रुपयांची ॥१८५॥
तुजहुनी तो लहान असोनी । शहाणा झाला पाहें तूं नयनीं । या तोचि मज आवडे तुजहुनी । ऐसा भेद दावी ती ॥१८६॥
हाही करितां उपचार थोर । जरी न ऐके तिचा पुत्र । मग करी दंडचि साचार । शिक्षा अनिवारही करी ॥१८७॥
तरीही जरी न सोडी हट्ट । होय तो पुढती मतिभ्रष्ट । जगीं निंद्य होय तो दुष्ट । वर्णावें नलगे हें कांहीं ॥१८८॥
तैसें येथे सद्गुरुराज । सामोपचारें बोधिती सहज । स्वधर्म करणें तुझें काज । ऐसें बहुपरी सांगती ॥१८९॥
इतुकें बोधितां ना ऐके जरी । दानोपचारें सांगती निर्धारीं । स्वधर्मानें वर्तसी तरी । देव देईल विपुल सुख ॥१९०॥
संतति संपत्ति मिळे अपार । सकल सुख मिळे सत्वर । हेंही न ऐके वचन थोर । भेदोपचार करिती ते ॥१९१॥
कीं जो स्वधर्में वर्ते गृहस्थ । त्यावरी दाविती बहुत प्रीत । बघतां आम्हां अज्ञांसी दिसत । सद्गुरु करिती भेद बहु ॥१९२॥
म्हणतों आम्ही काय हें ऐसें । राग - द्वेष कराया असे । त्यासी बघतां मन उल्हासे । आमुच्याकडे दुर्लक्ष ॥१९३॥
ऐसें आम्ही म्हणतों अज्ञ । परी त्यांसी सारे समान । भक्तांनीं व्हावें सद्भक्त म्हणोन । भेद दाविती वरिवरी ॥१९४॥
एकावरी करितां प्रीती । दुज्यासी वाटे बहुत खंती । कीं स्वामी क्षोभले मजवरती । म्हणोनि कळवळे मानसीं ॥१९५॥
आणि करी गुरुआज्ञा - पालन । तेवींच भेद दाविती जाण । तेंही जरी ना ऐकू आपण । दंडोपचार करिताती ॥१९६॥
मठासी द्यावा लागे दंड । प्रायश्चित्त घे म्हणती उदंड । तेंही न ऐके तो प्रचंड । काय करतील त्यासी ते ॥१९७॥
तेव्हां सहजचि होईल हानि । हें नलगे सांगावें वचनीं । म्हणोनि कनवाळु सद्गुरु ते झणीं । बोधिती जनांसी बहुविध ॥१९८॥
याचिकारणें वरिवरी कोप । दाविती जनांच्या कल्याणा खूप । म्हणोनि जगीं मायबाप । तेचि आम्हांसी अज्ञजनां ॥१९९॥
यास्तव सद्गुरुस्वामींलागीं । दोष न द्यावा सर्वथा जगीं । दोषचि नसे त्यांच्या अंगीं । नाहीं संशय यामाजीं ॥२००॥
गुणदोषातीत माउली । कैसें तें ऐका येवेळीं । श्रीसद्गुरुचरणकमळीं । स्थिर होऊनि परिसा हो ॥२०१॥
सारें जगचि आत्मरूप । 'त्यावीण अन्य असे' हा जल्प। मग 'गुणदोष सुखदुःख' हा विलाप । ऐसियां कैसा सांगा हो ॥२०२॥
शुद्ध सात्त्विक वृत्ति ज्यांची । तेथें मलिनता येईल कैंची । म्हणोनि सारें जगचि । आत्मरूप दिसे तयां ॥२०३॥
आपुल्याहुनी वस्तू ना दुजी । तेथें गुणदोष कैसे सांगा जी । केवळ आनंद जगामाजीं । दिसे त्यांसी निर्धारें ॥२०४॥
जेथें असे द्वैतभेद । तेथें गुण दिसे द्विविध । गुण तेथें दोष हें सिद्ध । होय निश्र्चयें परियेसा ॥२०५॥
जेथें नसती गुणचि जाण । तेथें दोष येती कोठोन । एकचि असतां नामाभिधान । 'गुण-दोष' ऐसें कोण म्हणे ॥२०६॥
सारें दिसे ब्रह्मचि पूर्ण । मग कैंचे बघती 'दोष-गुण' । नाहीं त्यांसीं 'मी - तूंपण'। 'बरा-वाईट' नसे त्यांसी ॥२०७॥
म्हणोनि सद्गुरुस्वामींलागीं । गुणदोषचि न दिसती जगीं । तेवींच नसती त्यांच्या अंगीं । गुणदोष कांहीं पहा हो ॥२०८॥
ज्याच्या अंगीं असती गुणदोष । त्यासीच दिसती जगींही विशेष । ज्यासी कामीण झाली त्यास । पीतवर्ण दिसे सारें ॥२०९॥
तैसें आम्हां अज्ञजनांसी । गुण-दोष असती बहुवसीं । जगीं बघतां गुणी दोषी । जीव सारे हे दिसती ॥२१०॥
साधुपुरुषांलागीं पाहीं । गुणी दोषी न दिसे कांहीं । देवचि दिसे त्यांसी सर्वही । खचितचि जाणा निश्चयेंसीं ॥२११॥
आपुल्या मनापरी सारें जग हें । बघती सारे साधुसंत निश्र्चयें । त्यांची वृत्तीच ब्रह्मरूप होये । तसेंच भासे त्यां सर्व ॥२१२॥
मग कैंचे गुण - दोष । बाधतील सांगा तयांस । म्हणोनि गुण - दोषातीत ते खास । जगकल्याणा झटती ते ॥२१३॥
म्हणोनि आम्हीं त्यांचे दोष । बघूं नये सर्वथा लवलेश । ते जें करिती तें आमुच्या हितास । ऐसा विश्वास धरावा ॥२१४॥
एवं सद्गुरुस्वामिराय । त्यांचा महिमा अवर्णनीय । केवल जगाच्या उद्धारा होय । अवतार त्यांचा निश्चयें ॥२१५॥
म्हणोनि मठाचे बंधन । जनांस्तवचि सोशिती आपण । नातरी ते कासया येऊन । राहती सांगा मठामाजीं ॥२१६॥
श्रीपांडुरंगाश्रम अष्टम । झालें त्यांचें अवतारकार्य सुगम । दाविला जनांसी मार्ग उत्तम । सुलभ करोनि सकलांसी  ॥२१७॥
यापरी प्रेमेंकरोनि यांनीं । शके सत्राशें पंच्यायशींपासुनी । अठराशें सदतीसवरी धरणीं । स्वधर्मराज्य चालविलें ॥२१८॥
पुढील अध्यायीं विवरण । करूं सद्गुरुमहिमा पूर्ण । अवधारावें चित्त देऊन । श्रोते हो सज्जन प्रेमानें ॥२१९॥
आणिक नवम आश्रम थोर । आनंदाश्रम करुणासागर । स्वधर्मराज्य चालवितील चतुर । परम प्रीतीनें हो पहा ॥२२०॥
आनंदाश्रम परमहंस । शिवानंदतीर्थ पुण्यपुरुष । यांच्या कृपाप्रसादें पंचचत्वारिंश । अध्याय गुरुदासें संपविला ॥२२१॥
स्वस्ति श्रीचित्रापुर - । गुरुपरंपराचरित्र सुंदर । ऐकतां निरसे अज्ञान समग्र । पंचचत्वारिंशाध्याय रसाळ हा ॥२२२॥ अध्याय ४५ ॥
ओंव्या २२२ ॥
ॐ तत्सत्- श्रीमद्गुरुनाथचरणारविंदार्पणमस्तु ॥
॥ इति पंचचत्वारिंशोऽध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 20, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP