मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|सप्ताह-अनुष्ठान|
दत्ताधीनता

सप्ताह अनुष्ठान - दत्ताधीनता

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


गुरुवार ता. १५-५-१९३०

दत्त बोलवीतो तैसा मी बोलतो । दत्त वागवीतो वागे तैसा ॥१॥
दत्त करवीतो तैसे मी करितो । दत्त इच्छे होतो व्यवहारी ॥२॥
दत्त मानवितो तैसे मी मानितो । सकल पहातो दत्तदृष्टी ॥३॥
काम क्रोध माझे दत्ताचे आधीन । माझे अवलंबन द्त्त जाणा ॥४॥
ज्ञान की अज्ञान सर्व माझे दत्त । झालो असे द्त्त दत्तालागी ॥५॥
आंत बाहेरी तो भरोनी रहातो । चेष्टा करवीतो निज इच्छे ॥६॥
हांसतो रडतो किंवा ओरडतो । चिह्ने मी करितो त्याच्या इच्छे ॥७॥
इंद्रियांचे ज्ञान त्याचेच आधीन । मनाचे मनन तदधीन ॥८॥
बुद्धिचे स्फ़ुरण चित्ताचे चेतन । सर्व दयाघन दत्त करी ॥९॥
ह्र्दयस्पंदन अंत:करणबोधन । जीविंचे जीवन दत्त जाणा ॥१०॥
दत्त ऐकवीतो दत्त पहावीतो । स्पर्श समजतो दत्तकृपे ॥११॥
विवेक जो माझा पूर्ण दत्तमय । सकल दत्त होय माझे ठायी ॥१२॥
शहाणपण किंवा माझा वेडेपणा । सकळ भावपणा दत्तापाशी ॥१३॥
विनायक म्हणे मज पछाडिले । दत्तनाथे भले करुं काय ॥१४॥

’भूत अंगी संचरले । दत्तरुप माझ्या भले’
भूत अंगी संचरले । दत्तरुप माझ्या भले ॥१॥
मज भान कांही नाही । त्याची इच्छा सर्व पाही ॥२॥
इच्छेसम वागवीतो । हंसवीतो रडवीतो ॥३॥
शहाणपण करवीतो । वेडेपण दाखवीतो ॥४॥
सूज्ञ किंवा मी अज्ञान । काय ठावे मज लागून ॥५॥
तेणे मज बहु मारिले । माझे काही नाही उरले ॥६॥
चमत्कार दाखवीतो । मजलागी खेळवीतो ॥७॥
अकस्मात उपजवी । नवलाई नवीनवी ॥८॥
तेणे माझा रंग फ़िरतो । कोण इंगित जाणतो ॥९॥
मजठायी भगवान । कवणा हे असे ज्ञान ॥१०॥
प्राकृत मज समजती । मी तो नाही देहावरती ॥११॥
हंसणे किंवा माझे रडणे । किंवा कोणासी कोपणे ॥१२॥
तैसा माझा स्पष्ट काम । किंवा लोभ जो परम ॥१३॥
सकळ त्याचेच विन्दान । राहिलो मी ग्रस्त होऊन ॥१४॥
जीव माझा त्याचे ठायी । तो भरला माझ्या ह्र्दयी ॥१५॥
मनबुद्धि अहंकार । ग्रस्त केली तेणे साचार ॥१६॥
माझी सत्ता उरलि नाही । मज दत्तस्थिती पाही ॥१७॥
जो का भक्त प्रिय त्यासी । करी त्याची गति ऐशी ॥१८॥
ग्रस्त करोनी ठेवितो । निज इच्छे वागवीतो ॥१९॥
विनायक सत्य बोले । दत्तस्वरुपांत डोले ॥२०॥

दत्ताधीनता
माझिया कर्माचा जेवढा की भोग । तेवढी तो जाग ठेवी माझी ॥१॥
कर्म क्षयास्तव सुखदु:ख देहा । म्हणोनि संदेहा पाडीयेले ॥२॥
क्षणभरी जागा सुखदु:ख भोगी । ठेवी मजलागी देहावरी ॥३॥
क्षण एक जागा क्षण एक ग्रस्त । ऐसा तो ठेवीत मजलागी ॥४॥
नूतन जे कर्म माझे हाती घडे । त्याचे फ़ळ जोडे त्याजलागी ॥५॥
माझिया देहाची सत्ता हिरावोनी । राहिला बैसोनी माझ्या देही ॥६॥
म्हणोनि सर्व कर्म, तदर्पण होय । जाणा नि:संशय सत्य वच ॥७॥
पुर्वील भोगवीतो, पुढील स्वये घेतो । मोकळा करितो मजलागी ॥८॥
म्हणोनिया देहे जे जे काही घडत । घडोनि ते येत त्याच्या इच्छे ॥९॥
कामक्रोधादिक सकळ त्याचेच । माझे कांही साच उरो नेदी ॥१०॥
ऐसा माझे ठायी भरोनी राहिला । जीव बद्ध केला निजठायी ॥११॥
आतां सर्व सत्ता त्याचीच जाणावी । काय मी बोलावी स्थिती माझी ॥१२॥
विनायक म्हणे सत्य मी बोलतो । देव बोलवीतो माझे वाचे ॥१३॥

भूत अंगी संचरले । दत्तरुप माझ्या भले
महद्भूते मज जाणा झपाटिले । व्यवधान सुटले माझे जाणा ॥१॥
सकळ व्यवहार दत्त संपादितो । सत्तेत ठेवीतो अपुल्या मज ॥२॥
जैसा झोपसुरा अर्धवट जागा । करितसे त्रागा वेडयासम ॥३॥
तैशी माझी स्थिति होत व्यवहारी । मी तो भानावरी नाही नाही ॥४॥
पिशाचग्रस्त मी, माझी पिशाचवृत्ती । माझ्याठायी सुस्ती थोर असे ॥५॥
पिशाचासारिखा माझा व्यवहार । आचारविचार पैशाच की ॥६॥
कधी मज भान, दत्त मी निर्धार । कधी मी पामर नरदेही ॥७॥
कधी बोले ज्ञान कधी दावी अज्ञान । ज्ञान आणि अज्ञान दत्तइच्छा ॥८॥
जेथे  नाही माझी काही उरलि सत्ता । तेथे अप्रमत्तता सर्वची की ॥६९॥
विनायक म्हणे मत्त अप्रमत्त । सकळ माझा दत्त जाणतसे ॥१०॥
सप्ताहसमाप्ति

N/A

References : N/A
Last Updated : February 03, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP