मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|सप्ताह-अनुष्ठान|
धर्मविस्तारार्थ प्रार्थना

सप्ताह अनुष्ठान - धर्मविस्तारार्थ प्रार्थना

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


उदय धर्माचा तुझे कृपे व्हावा । अधर्म नासावा मुळीहुनी ॥१॥
संकटांचा नाश करी भगवंता । आम्हांसी स्वस्थता देई जगी ॥२॥
स्वातंत्र्याने आम्ही तुजला भजावे । पारतन्त्र्य नसावे भजकांसी ॥३॥
आम्हांलागी चिंता कसली नसावी । हौस उपजावी मनालागी ॥४॥
उल्हासाने व्हावे त्वदीय भजन । अंतर रंगोन जावे त्यात ॥५॥
सकळ सिद्धीचे आम्हांसि साम्राज्य । द्यावे रामराज्य आम्हांलागी ॥६॥
आमुचा तूं राजा आम्ही तुझी प्रजा । भजनाचा गाजा करुं आम्ही ॥७॥
आम्हालागी शास्ता तूंच दंडधारी । दुजा नरहरी कोणी नसो ॥८॥
तुझीया आज्ञेत देवा आम्ही वागूं । तूझ्यासाठी जागूं दृढ बुद्धी ॥९॥
तुझीया कृपेने राज्य भजनाचे । प्राप्त व्हावे साचे आम्हांलागी ॥१०॥
धरोनियां शिस्त राखूं तुझा दंड । इमाने उदंड जागूं आम्ही ॥११॥
तुझ्यासाठी धन वेच थोर करुं । तुझे वचन धरुं गुरुराया ॥१२॥
जीविंचा तूं जीव प्राणाचा तूं प्राण । मूर्त प्रियपण तूंच भक्ता ॥१३॥
आत्माराम तूंच आमुचा वाली तूंच । सकळ बा तूंच आम्हालागी ॥१४॥
अंतर्बाह्य तूझा आम्हां सहवास । घडवावा खास कृपाळूत्वे ॥१५॥
तुझ्या नामे आम्ही दत्तचि बनावे । तुझिया वैभवे सुसंपन्न ॥१६॥
सकल सत्ताधारी आम्हाते करावे । धर्माते स्थापावे गुरुराया ॥१७॥
विनायक म्हण रामराज्य करी । भजाया श्रीहरी तूजलागी ॥१८॥

N/A

References : N/A
Last Updated : February 03, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP