मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|सप्ताह-अनुष्ठान|
विनायकाठायी दत्तसंचार

सप्ताह अनुष्ठान - विनायकाठायी दत्तसंचार

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


माझे ठायी आहे सदा तुमचा वास । माझे ह्र्दयास जाणीव हे ॥१॥
देह अनुभवी त्वदीय स्पर्शन । मन तव स्फ़ुरण जाणतसे ॥२॥
जीवासी उमजे देवा तुझा भाव । भजन वैभव ऐसे असे ॥३॥
माझ्या ठायी होय भजन साक्षात्कार । कळत उदार मजलागी ॥४॥
म्हणोनि विश्वासोनी तुजसी प्रार्थितो । मोचन मागतो निष्ठापूर्व ॥५॥
विनायक म्हणे संकल्प की असा । ह्रदयनिवासा दत्तदेवा ॥६॥
==
माझे ठायी तूझा वास म्हणोनियां । माझिये ह्र्दया तेजस्विता ॥१॥
देवा भावावरी मन माझे राहे । भूत भविष्य पाहे तव कृपे ॥२॥
सर्वज्ञता मला तूझ्या संस्पर्शाने । भासतसे जाणे तुझ्यायोगे ॥३॥
जेव्हा योगारुढ मन तुझ्या स्पर्शे । संपन्न होतसे अपूर्व की ॥४॥
तुझीया योगाचा अमृतस्पर्शाचा । अनुभव साचा मना येतो ॥५॥
संकटांत हात मज देई आतां । तारी भगवंता निजकृपे ॥६॥
निराश मी झालो असहाय बनलो । परम फ़सलो मनी आहे ॥७॥
तरी धांव त्वरे उशीर नको लावूं । कोणासी विनवूं तुजवीण ॥८॥
माझ्या अंतरीचे जाणसी सर्वज्ञा । तारी मज अज्ञा कृपाळूत्वे ॥९॥
विनायक म्हणे माझिया आशेचा । भंग न करी साचा दयामूर्ते ॥१०॥
धांवा
आशाळसूत मी साहाय्य मागतो । पदर पसरितो तुझ्यापुढे ॥१॥
क्षमा करी माझे अपराध नाथा । स्वामिजी समर्था प्रगटोनी ॥२॥
करी अंगिकार नको लोटूं दूर । जाणसी निर्धार माझा सखया ॥३॥
प्राण-विसाविया माझ्या जिवलगा । आतां लगबगां येई येथे ॥४॥
आजवरी कष्ट किती मी साहिले । जाणितो भले सर्वज्ञा तूं ॥५॥
आतां तरी कांही मज सुख द्याया । हेतु पुरवाया येई दत्ता ॥६॥
तुझ्या भजनाचा प्रभाव दावाया । मज फ़ळ द्याया उपासनेचे ॥७॥
सिद्ध प्रतिज्ञेसी येथ अविलंबेसी । मज तारायासी करी द्त्ता ॥८॥
वाट पाहतसे चाहूल ऐकतसे । दृष्टी लाविलीसे तुझ्या मार्गा ॥९॥
तरी आतां येई लवकरि नाथा । पुरवाया अर्था दत्ता माझ्या ॥१०॥
कल्पवृक्षा तूज सेविले आजवरी । त्याचे फ़ळ तरी देई आतां ॥११॥
तुझ्या स्थानासाठी तूझ्या सेवेसाठी । उपासनेसाठी प्रार्थितो मी ॥१२॥
भक्तिभावासाठी लोक संग्रहासी । मागतो विशेषी हेच नाथा ॥१३॥
तरी यावे आतां नाथ प्रगटोनी । कृपेते धरोनी अंतरांत ॥१४॥
विनायक म्हणे पाहूं किती वाट । मुळचा मी धीट नाही नाही ॥१५॥

N/A

References : N/A
Last Updated : February 03, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP