TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|पूर्वार्ध|
अध्याय ४६ वा

स्कंध १० वा - अध्याय ४६ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


स्कंध १० वा - अध्याय ४६ वा
५४५
राया, यादवांत उद्धव वरिष्ठ । होता श्रेष्ठ भक्त श्रीकृष्णाचा ॥१॥
मबाबुद्धिमंत बृहस्पतिशिष्य । जिवलग मित्र श्रीहरीचा ॥२॥
हितगुज नित्य कथी त्या श्रीकृष्ण । एकदां धरुन हात त्याचा ॥३॥
नेऊनि एकांतीं बोलला तयासी । नंद-यशोदेची भेट घेईं ॥४॥
वियोगाचें त्यांच्या दूर करीं दु:ख । देऊनि संतोष तयांप्रति ॥५॥
वासुदेव म्हणे दु:ख पुनरपि । व्हावें न तयांसी म्हणे कृष्ण ॥६॥

५४६
उद्धवा, तैसाचि गोपींसी निरोप । कथूनियां दु:ख हरीं त्यांचें ॥१॥
अलौकिक त्यांचें मजवरी प्रेम । माझ्यास्तव प्राण रक्षिती त्या ॥२॥
पति-पुत्रांचाही त्याग मजसाठीं । केला ऐशा गोपी परम भक्त ॥३॥
यद्यपि गोकुळीं जड देह त्यांचे । पातल्या त्या एथें परी मनें ॥४॥
इह-परसौख्य त्यागूनि जे भक्त । सेविताती मज रक्षितों त्यां ॥५॥
देहभानही त्यां राहिलें नसेल । वासुदेव थोर म्हणे भाग्य ॥६॥

५४७
विरहानें माझ्या व्याकुळता त्यांसी । अन्य न कांहीचि हेतु तयां ॥१॥
धाडीन निरोप येईन सत्वरी । विश्वास अंतरीं, वदलों त्याचा ॥२॥
केवळ त्या शब्दें काळ कंठिताती । आत्मा मथुरेमाजी वसे त्यांचा ॥३॥
अथवा जळाल्या असत्या विरहें । प्रेम न वर्णवे त्यांचें मज ॥४॥
वासुदेव म्हणे धन्य धन्य गोपी । प्रिय जगजेठी जयां ऐसा ॥५॥

५४८
निवेदिती शुक जाणूनि कळवळा । निरोप घेतला उद्धवानें ॥१॥
बैसूनि स्यंदनीं पातला गोकुळीं । तया सायंकाळीं कृष्णाज्ञेनें ॥२॥
गोरज:कणांनीं आच्छादिला रथ । अपूर्व तें दृश्य तयावेळीं ॥३॥
ग्रामामाजी येतां पुष्ट जे वृषभ । करुनियां शब्द झुंज घेती ॥४॥
पीनपयोधरें धेनू होती नम्र । पाजण्या वत्सांस धांवताती ॥५॥
इतस्तत: वत्सें उडया मारिताती । पांवे वाजविती हर्षे गोप ॥६॥
वासुदेव म्हणे मधूनि मधूनि । हांका येती कानीं पंड्ये, तांबू ॥७॥

५४९
शुभ्रवर्ण वत्सें बागडत येती । शोभा अपूर्व ती वर्णवेना ॥१॥
सोड या वत्सासी, बांध बांध त्यासी । ऐसी गवळ्यांची धांवाधांव ॥२॥
नेईं ही चरवी, घेऊनि ती येईं । घरोघरीं होई हाचि शब्द ॥३॥
सकलांसी एक राम-कृष्णध्यास । रम्य वस्त्रें गोप-गोपी ल्याल्या ॥४॥
गोकुळींचे जन धार्मिक परम । कदा पूजेवीण वसतीचिना ॥५॥
अग्नि, सूर्य तेंवी ब्राह्मण, अतिथि । देव-पितरादि प्रिय तयां ॥६॥
वासुदेव म्हणे ऐसे ते पूजक । सदा गोकुळांत धर्मकृत्यें ॥७॥

५५०
घरोघरीं धूपदीप । उद्धवासी दिसले तेथ ॥१॥
तडागांत जागोजागी । पाही अंबुजें फुललीं ॥२॥
मकरंदप्रिय भृंग । करिती बहु गुंजारव ॥३॥
हंस, कारंडव पक्षी । मधुर शब्दें संचरती ॥४॥
वासुदेव म्हणे शोभा । पाहूनियां हर्ष अंगा ॥५॥

५५१
उद्धवागमनवार्ता ऐकूनियां । सामोरा ये तया नंदराजा ॥१॥
प्रत्यक्ष कृष्णचि वाटला तो त्यासी । धरी हृदयासी कृष्णासम ॥२॥
सत्कारुनि वाढी सुग्रास भोजन । प्रेमें बैसवून मृद्वासनीं ॥३॥
चेंपूनि चरण श्रम होतां दूर । बोलला मधुरशब्दें नंद ॥४॥
मित्र माझा क्षेम असे कीं वसुदेव । भोगितो कीं सौख्य पुत्रांसवें ॥५॥
दुष्कर्माचें फल लाभलें कंसासी । क्लेश यादवांसी दिधले बहु ॥६॥
वासुदेव म्हणे प्रश्न ऐसे नंद । करुनि गोविंद चित्तीं स्मरे ॥७॥

५५२
काढी कींरे आठवण । कदा उद्धवा, श्रीकृष्ण ॥१॥
मजसवें यशोदेची । तेंवी गोकुळबाळांची ॥२॥
गोप, गोपिका, गोकुळ । स्मरतो कांरे घननीळ ॥३॥
प्रिय धेनू, वृंदावन । आठवी कीं गोवर्धन ॥४॥
बाबा, एक कृष्णामुळें । सुखी गोकुळ राहिलें ॥५॥
सागें येईल तो कदा । आम्हां भेटाया उद्धवा ॥६॥
एकवार तरी त्याचें । मुख पहावेंसें वाटे ॥७॥
वासुदेव म्हणे नंद । क्रीडा आठवी समस्त ॥८॥

५५३
महापुरुषें त्या गिळिला वणवा । कौतुक उद्धवा, काय वर्णूं ॥१॥
भयंकर वृष्टि, अरिष्ट-अघादि । वधूनि, आम्हांसी संरक्षिलें ॥२॥
थोर त्याचीं कर्मे हास्य तें सलील । भाषण मंजुळ प्रेमदृष्टि ॥३॥
आठवतां होई निर्व्यापार स्थिति । कांहीं न सुचती व्यवसाय ॥४॥
निर्विष कालिंदी, पादचिन्हांकित । श्रेष्ठ गिरिराज गोवर्धन ॥५॥
विहारवनें तैं क्रीडास्थानें त्यांचीं । पाहूनियां स्थिति काय होई ॥६॥
वासुदेव म्हणे कृष्णरुपचित्त । होई म्हणे नंद एकाएकीं ॥७॥

५५४
निवेदिती मुनि आठवूनि ऐसे । गुण श्रीहरीचे अलौकिक ॥१॥
गहिंवरे नंद उमटे न शब्द । वावरलें चित्त यशोदेचें ॥२॥
पुत्रस्नेहें बहु व्याकुळ ती होई । अश्रुपूर येई नयनांतूनि ॥३॥
कृष्णस्मरणेंचि फुटे तिज पान्हा । भेतवींरे कान्हा म्हणे मज ॥४॥
पाहूनि तें प्रेम उद्धव हर्षित । म्हणे या जगांत धन्य तुम्हीं ॥५॥
अलौकिक असे भक्ति हे तुमची । एकमेव जगीं अतुलनीय ॥६॥
वासुदेव म्हणे सांत्वन उद्धव । करी तो केशव स्मरुनियां ॥७॥

५५६
म्हणे नंदा, राम-कृष्ण । त्रैलोक्याचे स्वामी जाण ॥१॥
सर्वव्यापी हे केवळ । उपाधीनें दृग्गोचर ॥२॥
करुनियां चित्तशुद्धि । स्मरेल जो यांसी अंतीं ॥३॥
त्याच्या वासना विनष्ट - । होती, पावे ब्रह्मरुप ॥४॥
नंदा, यशोदे, हरीची । भक्ति जडली तुम्हांसी ॥५॥
गाऊं माहात्म्य तुमचें । कळेनाचि मज कैसें ॥६॥
येऊनियां तो श्रीहरी । आतां गोकुळीं सत्वरी ॥७॥
पुरवील मनोरथ । वचन करील तो सत्य ॥८॥
वासुदेव म्हणे भक्त । हरिरुप होती श्रेष्ठ ॥९॥

५५७
वियोगानें दु:खी होऊं नका ऐसे । सन्निधचि असे सदा कृष्ण ॥१॥
सर्वांतर्यामी तो प्रगटे भक्तीनें । ज्यापरी घर्षणें काष्ठीं अग्नि ॥२॥
प्रिय-अप्रियही नसे तया कांहीं । अधम त्या नाहीं, उत्तमही ॥३॥
माता, पिता, भार्या, ऐसे स्नेहपाश । नसती तयास कदाकाळीं ॥४॥
असूनि तो अज भक्तरक्षणार्थ । जन्म सत्वादिक गुणें घेई ॥५॥
असूनि निर्गुण स्थित्युद्भवकारी । गुणांतें स्वीकारी लीलेस्तव ॥६॥
वासुदेव म्हणे उद्धवाची वाणी । घेऊनियां ध्यानीं स्थिर व्हावें ॥७॥

५५८
आपुल्याभोंवतीं करितां भ्रमण । भ्रमतां आपण, जग भ्रमे ॥१॥
तेंवी कर्मासक्त अहंकारें भ्रमें । कर्माधीन म्हणे आत्म्यालागीं ॥२॥
परी तो जाणावा केवळ भासचि । पुत्र कृष्ण ऐसी भ्रांति तेंवी ॥३॥
माता, पिता, पुत्र एक तो सर्वांसी । स्थिरचर तोचि सकल एक ॥४॥
वासुदेव म्हणे हरिमय विश्व । कथितो उद्धव नंदाप्रति ॥५॥

५५९
ऐशा गोष्टी होतां अरुणोदय होई । उजळिती गोपी उठूनि दीप ॥१॥
सडासंमार्जनें रांगोळ्या काढिती । दधिमंथनासी प्रवर्तल्या ॥२॥
कृष्णगीतें तदा गाती आनंदानें । मंथनध्वनि दे साथ तयां ॥३॥
कोंडूनि तो ध्वनि भिडला स्वर्गास । तेणें पापमुक्त सकल दिशा ॥४॥
उदयाद्रीवरी भानु विरजला । गोपींनीं पाहिला कनकरथ ॥५॥
क्रोधाविष्ट तदा होऊनि अक्रूर । आला काय क्रूर म्हणती पुन्हां ॥६॥
वासुदेव म्हणे क्रोधावेशें गोपी । बहु धिक्कारिती अक्रूरातें ॥७॥

५६०
कासयासी दुष्ट पातला तो एथें । नेलें मथुरेतें कृष्णाप्रति ॥१॥
धन्याचें आपुल्या केलें पूर्व कार्य । आरंभी उत्तरकार्य आतां ॥२॥
मांसाचे आमुच्या पिंड द्यावयासी । नेईल आम्हांसी दुष्ट आतां ॥३॥
वैतागानें ऐसी निंदा अक्रूराची । करिती जों तोंचि उद्धव दिसे ॥४॥
वासुदेव म्हणे यमुनेवरुनि । स्नान आटोपूनि पातला तो ॥५॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2019-12-28T04:54:20.3030000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

काम IV.

RANDOM WORD

Did you know?

समापत्ती हे काय आहे?
Category : Hindu - Philosophy
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.