मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|पूर्वार्ध|
अध्याय २८ वा

स्कंध १० वा - अध्याय २८ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


३२०
निवेदिती शुक राया, पातली एकदां हरिदिनी ॥१॥
अन्यदिनीं कलामात्रचि द्वादशी । घाई आन्हिकाची तयामुळें ॥२॥
यास्तव नंदानें अरुणोदयाचे - । पूर्वींचि, स्नानातें योजियेलें ॥३॥
कालिंदीच्या डोहीं मारितांचि बुडी । दूत तया बांधी वरुणाचा ॥४॥
असुर तो गेला घेऊनि नंदासी । इकडे गोपांसी चिंता बहु ॥५॥
वासुदेव म्हणे शोकाकुल गोप । येऊनि कृष्णास कथिती सर्व ॥६॥

३२१
सर्वसाक्षी तैं केशव । देई गोपांसी अभय ॥१॥
जाणूनियां सर्व वृत्त । गेला वरूणलोकास ॥२॥
पाहूनि त्या वरुण हर्षे । प्रेमें पूजी तो कृष्णातें ॥३॥
बोले नम्रभावें अद्य । कृष्णा, जाहलों कृतार्थ ॥४॥
रत्नाकराचा मी पति । परी सत्यलाभ आजि ॥५॥
सेविती जे त्वच्चरण । तयां जन्म न मरण ॥६॥
वासुदेव म्हणे तदा । वरुण स्तवितो अच्युता ॥७॥

३२२
ब्रह्मांडनायका, लेशही मायेचा । स्पर्शही न कदा करी तुज ॥१॥
ऐश्वर्यसंपन्न नियंता तूं जीवां । सेवकद्वारा हा अपराध ॥२॥
भक्तीसवें जरी कर्तव्याचें ज्ञान । असतें तरी न घडतें ऐसें ॥३॥
देवा, यास्तव तूं क्षमावें मजसी । घेऊनि नंदासी जाईं सौख्यें ॥४॥
पितृवत्सला, तूं जाणसी सकळ । होऊनि सदय क्षमा करीं ॥५॥
वासुदेव म्हणे ज्ञात्याचा व्यवहार । यशस्वी साचार नम्रतेनें ॥६॥

३२३
निवेदिती शुक राया, ऐशापरी । जलदेव करी स्तवन बहु ॥१॥
ऐकूनि संतुष्ट होऊनि श्रीकृष्ण । पित्यासी घेऊन त्वरित जाई ॥२॥
पाहूनि उभयां गोपाळ हर्षित । निवेदी त्यां नंद सकल वृत्त ॥३॥
ऐश्वर्यसंपन्न वरुणाची भक्ति । ऐकूनि गोपांसी कृष्णप्रेम ॥४॥
अतुल शक्ति तैं ठसली अंतरीं । गोवर्धनधारी म्हणती देव ॥५॥
दावील हा आम्हां वैकुंठही ऐसें । इच्छिती मनीं तें कळलें कृष्णा ॥६॥
वासुदेव म्हणे जाणूनि तें कृष्ण । म्हणे आत्मज्ञान न रुचे कोणा ॥७॥

३२४
अहो, भाग्य त्या गोपांचें । ब्रह्मा दावी कृष्ण त्यांतें ॥१॥
ज्ञानमय तें शाश्वत । सदा शून्यपरिच्छेद ॥२॥
स्वयंप्रकाश तें स्थान । पाहताती योगीजन ॥३॥
ब्रह्मर्‍हदमग्न गोप । होतां जाहले कृतार्थ ॥४॥
पुढती वैकुंठ दाविलें । अक्रूरेंही जें पाहिलें ॥५॥
दिसला वैकुंठीं श्रीकृष्ण । वेद करिताती स्तवन ॥६॥
पाहूनि ते भक्तिदंग । होती गोप अंतरांत ॥७॥
पुढती गोपां पूर्वस्थिति । नवल वाटे तयां चित्तीं ॥८॥
वासुदेवा म्हणे हरी । अतर्क्य ही लीला करी ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : December 18, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP