मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|पूर्वार्ध|
अध्याय २२ वा

स्कंध १० वा - अध्याय २२ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


२६४
निवेदिती शुक राया, परीक्षिता । पतित्वें कृष्णाचा लाभ घडो ॥१॥
यास्तव गोपींचें कात्यायनी व्रत । निवेदितों ऐक प्रेमें आतां ॥२॥
मार्गशीर्षमासीं लागतां हेमंत । हविष्यान्न नित्य भक्षिती त्या ॥३॥
अरुणोदयासी यमुनेचें स्नान । प्रतिमापूजन देवतेचें ॥४॥
वालुकामय ती देवी कात्यायनी । आनंदें पूजूनि उपचारें ॥५॥
दध्योदनबलि अर्पूनियां नित्य । प्रार्थिती तियेस पति दे कृष्ण ॥६॥
वासुदेव म्हणे उत्साह तयांचा । वर्णूं तरी कैसा वैखरीनें ॥७॥

२६४
चतुर्थ प्रहरीं उठूनि सत्वरी । वाहती त्या नारी एकमेकी ॥१॥
एकत्र होऊनि सर्वही त्या प्रेमें । परस्पर मोदें धरिती हस्त ॥२॥
उच्चस्वरें गात गात कृष्णगीतें । यमुनातीरातें प्राप्त होती ॥३॥
ऐशा कृष्णावरी होऊनि आसक्त । मास एक व्रत आचरिती ॥४॥
वासुदेव म्हणे तीरावरी ऐशा । एका दिनीं जातां नवल होई ॥५॥

२६६
भक्तकाजकल्पद्रुम वनमाळी । जाणूनि अंतरीं गोपीहेतु ॥१॥
मित्रांसवें येऊनियां तयास्थळीं । कौतुकचि करी परिसा काय ॥२॥
नित्यासम गोपी यमुनातीरासी । ठेवूनि वस्त्रांसी गीतें गात - ॥३॥
जलविहारार्थ जाती उदकांत । नेई जगन्नाथ वस्त्रें त्यांचीं ॥४॥
सत्वरी कदंबीं जाऊनि बैसला । हास्य गोपबाळां तदा येई ॥५॥
वासुदेव म्हणे हांसूनि तैं कृष्ण । बोलला वचन गोपींप्रति ॥६॥

२६७
गोपिकांनो, वस्त्रें पहा हीं तुमचीं । न्यावीं ज्यांचीं त्यांचीं शोधूनियां ॥
हवीं तरी न्यावीं येऊनि या स्थानीं । सुंदरींनो, हें मी वदतों सत्य ॥२॥
नव्हेचि हे थट्टा प्रसंगही न हा । जाहलांती श्रांता व्रतें तुम्हीं ॥३॥
कदाही मी थट्टा न करीं कोणाची । गोप हे जाणती पुसा तयां ॥४॥
यास्तव येऊनि एकेकीनें किंवा । घेऊनि जा वस्त्रां अवघ्याजणीं ॥५॥
वासुदेव म्हणे कौतुक हरीचें । काय सामान्यातें गूढ कळे ॥६॥

२६८
नवलकारी तो पाहूनि विनोद । हर्श अंतरांत गोपिकांच्या ॥१॥
एकमेकींसी त्या पाहूनि लज्जेनें । हांसूनि वदनें करिती खालीं ॥२॥
भाषणें हरीच्या अधिकचि प्रेमे । चित्तीं उपजून चकित होती ॥३॥
आकंठ उदकीं होऊनियां अंतीं । स्वस्थ जळामाजी राहियेल्या ॥४॥
वासुदेव म्हणे पुढती कृष्णासी । प्रेमें विनविती नम्रभावें ॥५॥

२६९
कृष्णा, हें उचित नसे तव कर्म । प्रिय पुत्र जाण नंदाचा तूं ॥१॥
अनाचार ऐसा शोभेना तुजसी । तुज वाखाणिती सकल गोप ॥२॥
निर्भर्त्सना तव होईल या कर्मे । यास्तव दे वस्त्रें आमुचीं कृष्णा ॥३॥
कांकडूनि गेले देहही थंडीनें । मेघ:श्यामा जाणें दासी आम्हां ॥४॥
करिसील आज्ञा तेचि आम्हां मान्य । परी दे आणून वस्त्रें आधीं ॥५॥
नाहींतरी कथूं नंदराजाप्रति । कळेना तुजसी ऐसें नसे ॥६॥
धर्माधर्म सर्व जाणूनियां ऐसे । निंद्य कर्म कैसें करिसी कृष्णा ॥७॥
वासुदेव म्हणे ऐकूनि तें कृष्ण । बोलला हांसून गोपींप्रति ॥८॥

२७०
सुंदरींनो, तुम्हां मान्य जरी आज्ञा । येऊनि या स्थाना वस्त्रें न्यावीं ॥१॥
कृष्णमुखांतूनि निघतांचि शब्द । शैत्यें देह कंप पावे ज्यांचा ॥२॥
गुह्यांग त्या दोन्ही करांनीं झांकूनि । येती उदकांतूनि तीरावरी ॥३॥
ईशाज्ञा प्रमाण मानूनियां चित्तीं । युक्तायुक्ततेची त्यजिली चिंता ॥४॥
मुग्ध गोपींचें तें पाहूनियां प्रेम । जाहला प्रसन्न विश्वकंद ॥५॥
वासुदेव म्हणे कृपेचे कटाक्ष । फेंकूनि गोपींस अवलोकी तो ॥६॥

२७१
नवयौवनाचा पाहूनि उगम । बोलला हांसून कृष्ण तयां ॥१॥
कदंबशाखेसी ठेविलीं हीं वस्त्रें । गोपींनो, तुमचें चुकतें कर्म ॥२॥
व्रतस्थ असूनि विवस्त्र उदकीं । गेल्यानें, क्षोभती जलदेवता ॥३॥
तेणें व्रतभंग जाहला म्हणूनि । मस्तकीं जोडूनि दोन्ही हस्त ॥४॥
वंदूनियां करा निष्कृति पापाची । वस्त्रें घ्या पुढती आपुलालीं ॥५॥
वासुदेव म्हणे व्रतभंगदोष । टाळण्या प्रभूस वंदिती त्या ॥६॥

२७२
पाहूनि ते शुद्ध प्रेम । वस्त्रें अर्पी तयां कृष्ण ॥१॥
मुनि बोलती नृपाळा । हर्ष अंतरीं गोपाळा ॥२॥
ऐसी करितांही थट्टा । रोप लवही न चित्ता ॥३॥
दोषबुद्धिही न त्यांसी । अथवा अपकारबुद्धि ॥४॥
कृष्णकरींचें खेळणें । होऊनियां करिती कर्मे ॥५॥
राया, ईशपदीं प्रेम । ऐसें असावें नि:सीम ॥६॥
वासुदेव म्हणे भक्ति । न धरी भेदभाव पोटीं ॥७॥

२७३
घेऊनियां वस्त्रें नेसल्या त्या परी । स्थिर कृष्णावरी दृष्टि त्यांची ॥१॥
तन्मय होऊनि लज्जायुक्त हास्य । करिती सलील सकल प्रेमें ॥२॥
चित्रासम तेथें जाहल्या तटस्थ । भान अंतरांत नुरलें कांहीं ॥३॥
जाणूनियां हेतु बोलला श्रीकृष्ण । अबलांनो, धन्य तुम्हीं झालां ॥४॥
बव्हंशीं सेवेचा हेतु जाणा सिद्ध । कामना मनांत धरिली माझी ॥५॥
कामना अंतरीं जयांप्रति माझी । राही न आसक्ति विषयांची त्यां ॥६॥
पेरितां नुगवे जेंवी दग्धबीज । कामना मदर्थ तेंवी होई ॥७॥
वासुदेव म्हणे विषयासमान । नव्हे कृष्णप्रेम बंधकारी ॥८॥

२७४
कृष्ण म्हणे गोपिकांसी । जाणा मनीं हेतुसिद्धि ॥१॥
आतां गोकुळीं सुखानें । करा आपुलालीं कर्मे ॥२॥
क्रीडाहेतु धरुनि चित्तीं । ऐसें व्रत पाळिलेंती ॥३॥
तया पुण्यें शरत्काल । येतां विलास भोगाल ॥४॥
वासुदेव म्हणे ऐसें । वचन कृष्णाचें गोपींतें ॥५॥

२७५
राया, ऐसा आशीर्वाद घेऊनियां । सदनीं जावया सिद्ध गोपी ॥१॥
त्यागूनि कृष्णासी परी जाववेना । श्रीकृष्णचिंतना करिती मनीं ॥२॥
ऐसें तच्चिंतन करीत कष्टानें । गांठिती सदनें आपुलाली ॥३॥
इकडे श्रीकृष्ण गोपांसवें गाई । चरावया जाई यमुनातीरीं ॥४॥
गर्द झाडीमाजी जातां अपराण्हीं । घ्यावया विश्रांति छायेमाजी ॥५॥
बैसतां श्रीकृष्ण म्हणे गोपांप्रति । वासुदेव तेंचि कथितो ऐका ॥६॥

२७६
स्तोक्‍कृष्णा, अंशो, श्रीदामन्‍, सुबला । अर्जुना, विशाला, हे ऋषभा ॥
वरुथपा, देवप्रस्था, हे तेजस्व्या । भाग्ययुक्त वृक्षां अवलोकावें ॥२॥
विस्तारले पहा केंवी छत्रासम । उपकारमग्न सर्वदा हे ॥३॥
शीतातप सर्व स्वयें हे भोगिती । पीडा निवारिती सकलांची ॥४॥
सकलांच्या सुखास्तव यांचा जन्म । जाणा हे सज्जन वृक्ष श्रेष्ठ ॥५॥
याचकांसी नित्य करिती संतुष्ट । पत्रादि सर्वांग इतरां देती ॥६॥
मित्रहो, ऐसेंचि तन मन धन । जनांचें कल्याण करो सदा ॥७॥
यमुनेवरी ते जातां गोपबाळ । म्हणती क्षुधाकुल झालों आम्हीं ॥८॥
वासुदेव म्हणे बोलूनियां ऐसें । यमुनातीरातें जाई कृष्ण ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : December 18, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP