मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|पूर्वार्ध|
अध्याय २१ वा

स्कंध १० वा - अध्याय २१ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


२५३
भक्तशिरोमणि मुनि । कथिती नृपाळालागूनि ॥१॥
सारिताप्रवाह निर्मल । वायु वाहतो शीतल ॥२॥
कमलगंधसुवासित । कृष्ण येई तैं वनांत ॥३॥
भृंग-द्विजांच्या कूजनें । निनादलीं सकल स्थानें ॥४॥
सरोवरें, गिरि, नद्या । भृंगनादें निनादल्या ॥५॥
ऐशा रमणीय स्थानीं । मुरलीनाद येई कानीं ॥६॥
मोहक तो वेणुनाद । हरी युवतींचें चित्त ॥७॥
वासुदेव म्हणे गोपी । कृष्णालागीं प्रशंसिती ॥८॥

२५४
मयूर पिच्छांचा टोप शोभला मस्तकीं ।
कर्णिकारपुष्पें कर्णी बहु शोभा देती ॥१॥
भरजरी पीतांबर कंठी वैजयंती ।
स्तवन करिती गोपबाळ सभोंवतीं ॥२॥
मोहक मुरली शोभे वदनचंद्रांत ।
रम्य वृंदावनीं कृष्ण फिरे वाजवीत ॥३॥
ऐसी शामसुंदर ती मूर्ति चिंतूनियां ॥४॥
कामविव्हल युवती होती मोहूनियां ॥४॥
कृष्णलीला वर्णवेना तदा गोपिकांतें ।
प्रेमें आलिंगिती मनीं आठवूनि त्यातें ॥५॥
वासुदेव म्हणे ऐशा मोहित त्या गोपी ।
धन्यता मानूनि गोष्टी त्याचि बोलताती ॥६॥

२५५
कटाक्ष प्रेमाचे हिंडे फेकित श्रीहरी ।
वृंदावनीं धेनूसंगें हिंडे रामासवें ।
एकदां तरी जन्मूनि रुप तें पहावें ॥२॥
ऐसें बोलताती कोणी गोपिका त्या अन्य ।
मुग्ध होऊनी बोलती काय घ्या ऐकून ॥३॥
नील पीत अंबरीं ते पल्लव रुळती ।
मोरपिच्छें पुष्पगुच्छ माळ कमळांची ॥४॥
ऐसे राम-कृष्ण यदा वाजविती पांवा ।
रंगभूमिस्थित नटासम शोभा तयां ॥५॥
वासुदेव म्हणे गोपी अन्यही मोहित ।
होऊनियां ऐका काय बोलती ते शब्द ॥६॥

२५६
मुरलीचें काय वर्णावें या भाग्य । प्राशी अधरामृत गोविंदाचें ॥१॥
मान हा गोपींचा हरिला तियेनें । परितृप्त पानें होई स्वयें ॥२॥
उच्छिष्ट तियेचें राखी सकलांसी । धन्य धन्य जगीं वेणुवंश ॥३॥
निजवंशामाजी झाले महाभक्त । ऐकूनियां तोष सज्जनांसी ॥४॥
रोमांच ठाकती अंगावरी त्यांच्या । नेत्रीं प्रेमाश्रूंचा पूर लोटे ॥५॥
तेंवी वेणु, वेणुमाता त्या सरिता । होती रोमांचिता कमळें तीच ॥६॥
वासुदेव म्हणे मधुधारावृक्षीं । जाणा प्रेमाश्रूचि पूर्वजांचे ॥७॥

२५७
कोणी म्हणताती कृष्णपाद चिन्हें । लाजविती वनें स्वर्गातेंही ॥१॥
मत्त मयूर हे मानूनि हा मेघ । मुरलीचा नाद मेघध्वनि ॥२॥
अत्यानंदें कृष्णासन्निध येऊनि । नृत्यांत रंगूनि दंग होती ॥३॥
नृत्य पहाया तैं मुरलीचा नाद । ऐकावया मृग धांव घेती ॥४॥
चित्रासम स्तब्ध होऊनि ऐकती । शोभा ही न स्वर्गी निश्चयानें ॥५॥
वासुदेव म्हणे भावना कोमल । पाहूनि निर्मल भाव कळे ॥६॥

२५८
म्हणताती कोणी मैत्रिणींनो, पहा । धन्यचि मृगी या निश्चयानें ॥१॥
मृगांसवें कृष्ण न्हाहाळिती । सत्कार करिती ऐसा त्याचा ॥२॥
सहजही आम्हीं पाहतां कृष्णासी । आमुच्या पतींसी क्रोध येई ॥३॥
वासुदेव म्हणे गोपींचा हा भाव । मानवी स्वभाव सुचवी स्पष्ट ॥४॥

२५९
बोलताती कोणी सख्यांनों, हें रुप । तेंवी शील, नाद मुरलीचाही ॥१॥
ऐकूनि न व्हाव्या देवांगना लुब्ध । परि विमानस्थ पहा तयां ॥२॥
पतीअंकीं बैसूनियां वेणुनादें । तेंवी या स्वरुपें गलित वस्त्र ॥३॥
कबरींतूनि तैं वर्षाव सुमांचा । वेडावल्या ऐशा देवांगना ॥४॥
देवस्त्रियाही त्या मोहित यापरी । अहो, आम्हीं तरी मानवीचि ॥५॥
वासुदेव म्हणे मुरलीनादाचें । महत्व ऐका जें कथिती गोपी ॥६॥

२६०
ऐकूनियां मुरलीनाद । धेनू होऊनि मोहित ॥१॥
टकमकां अवलोकिती । कृष्णमुखचंद्राप्रति ॥२॥
उभ्या राहती तटस्थ । भान तयांसी न उरेच ॥३॥
तान्हीं वत्सेंही पितांना । यदा ऐकताती ताना ॥४॥
तदा मुखांतील घोंत । राही तयांच्या तैसाच ॥५॥
स्तब्ध होतांचि तो गळे । प्राशनाचें भान नुरे ॥६॥
वासुदेव म्हणे धन्य । वत्सांचाही तया जन्म ॥७॥

२६१
मातेसी आपुल्या म्हणे एक गोपी । ध्यानमग्न ऋषी दिसती पक्षी ॥१॥
निरपेक्ष अध्ययनें लाभ जनीं । रंगती जैं मुनि कृष्णप्रेमें ॥२॥
तैसेचि हे पक्षी होऊनि निरिच्छ । पहा होती दंग मुरलीनादें ॥३॥
कोणी म्हणे बाइ, वासरीच्या । नद्यांतेंही बाधे कामपीडा ॥४॥
क्षणीं स्थिर, क्षणीं आवर्तनसंयुक्त । उपायनें देत अंबुजांचीं ॥५॥
तरंगकरांनीं भेटाया धांवती । आलिंगना होती उतावीळ ॥६॥
वासुदेव म्हणे छाया करी मेघ । कृष्णावरी धरुनियां ॥७॥

२६२
म्हणती कोणी या भिल्लिणी । धन्य जाहल्या जन्मूनि ॥१॥
कृष्णपदारविंदांची । उटी रक्तकेशराची ॥२॥
लाभे तृणद्वारा यांसी । लाविती त्या वदनीं, बक्षीं ॥३॥
असो धिक्कार आम्हांतें । लाभ नसे तो दुर्दैवें ॥४॥
धन्य गोवर्धनगिरि । नित्य कृष्णसेवा करी ॥५॥
पादस्पर्शे रोमांचित । तृण अर्पी तें धेनूंस ॥६॥
वासुदेव म्हणे गोपी । गाती मुरलीची ख्याती ॥७॥

२६३
दुग्धदोहनसमयीं धेनूंच्या चरणीं ।
बांधिती ते भाले मस्तकासी गुंडाळूनि ॥१॥
खोडकर धेनूंस्तव करिती जे पाश ।
स्कंधावरी गोपांसम ऐसे ते बालक ॥२॥
वाजवीत वेणु डौलें चालताती यदा ।
वृक्षलतांच्याही येती रोमांच तैं अंगा ॥३॥
वासुदेव म्हणे ऐशा वर्णनांत गोपी ।
सर्वकाल दंग ऐसें शुक निवेदिती ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 18, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP