मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|पूर्वार्ध|
अध्याय ३० वा

स्कंध १० वा - अध्याय ३० वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य

३५१
राजा, सैरावैरा धांवल्या तैं गोपी । शोधाया कृष्णासी यमुनातीरीं ॥१॥
करिती गजातें शोधिती त्यापरी । अवस्था जाहली गोपिकांची ॥२॥
कृष्णाविण तयां कांहींचि दिसेना । आठविती नाना चेष्टा त्याच्या ॥३॥
मंदगति, मंदहास्य, नर्मवाणी । कटाक्ष ते ध्यानीं आणिताती ॥४॥
बाल्यादारभ्य त्या क्रीडाही सकळ । आठवती खेळ सर्व त्याचे ॥५॥
स्वयेंचि आपण मानूनियां कृष्ण । दाविती करुन चेष्टा त्याच्या ॥६॥
स्थावर जंगम जें जें भेटे तया । नयनीं दाखवा म्हणती कृष्ण ॥७॥
वासुदेव म्हणे पाहिला कां कृष्ण । सांगा हो येऊन म्हणती कोणी ॥८॥

३५२
अश्ववृक्षहो, हिंडतां या वनीं । पाहिला कां कोणी कृष्ण सांगा ॥१॥
प्रेमकटाक्षें तैं सलिल हास्यानें । चोरियेलीं मनें आमुचीं तेणें ॥२॥
उंचदृष्टीनें तो लपला कीं कोठें । पाहूनि आम्हांतें निवेदाहो ॥३॥
अशोक-पुत्रागा, सुवर्णचंपका । उपकारें तुमचा झिजला देह ॥४॥
यास्तव केवळ स्मितहास्यें दर्प । हरी जो तत्काळ मानिनींचा ॥५॥

प्राणप्रिय कोठें गेला आमुचा तें । कथूनि आमुतें धीर द्यावा ॥६॥
वासुदेव म्हणे भेटेल तयासी । प्रार्थिताती गोपी परिसा प्रेमें ॥७॥

३५३
गोविंदपादारविंदप्रिये, हे तुलसी ।
प्रेम तुझ्यावरी बहु करी जगजेठी ॥१॥
धारण करी त्वन्माला तदा भृंगवृंदा
हांकण्याचें भान तेंही राहीन गोविंदा ॥२॥
ऐसा प्रियकर तुझा श्रेष्ठ हा यादव ।
कोठें गेला तें तुलसी पाहिलेंसी काय ॥३॥
जाई जुई हे मालती, पुष्पें वेंचितांना ।
अनुराग उपजला स्पर्शे काय मना ॥४॥
सांगाल तें तरी, त्याचा शोध आम्हां लागे ।
खूण कांही कथितां शोधूं तया त्याचिमार्गे ॥५॥
आम्र, असना, पनस तेंवी कोविदार ।
बिल्व, बकुल, कदंब तेंवी हे प्रियाल ॥६॥
सदय होऊनि आम्हां यमुनेच्या तीरीं
पाहिलाति काय कोणी कथावें श्रीहरी ॥७॥
वासुदेव म्हणे गोपी पुशिती मृगीतें ।
सखे, सांग कृष्णालागीं पाहिलें कां कोठें ॥८॥

३५४
धरणीदेवीतें प्रार्थिताती गोपी । रोमांच ठाकती अंगी तुझ्या ॥१॥
त्रिविक्रम किंवा वराहचरण - । स्पर्शे, हें कथन करीं काय ॥२॥
अथवा श्रीकृष्ण चरणस्पर्शानें । रोमांचित झालें अंग तव ॥३॥
असो, तें कांहींही परी कोठें बाई । पाहिलासी काई कृष्ण सांगें ॥४॥
ललनालिंगनें कुंकुमसंयुक्त । कुंदपुष्पगंध सुटला पहा ॥५॥
फलवृक्षांनो, कां वांकताती सांगा । कृष्णाचिया मार्गा नमितां काय ॥६॥
अंबुज जयाच्या सव्य करामाजी । प्रियतमेस्कंधीं अन्य कर ॥७॥
ऐसा कृष्ण घेई नमस्कार वाटे । कथिती वृक्षांतें खूण गोपी ॥८॥
वासुदेव म्हणे त्यांच्या मागोमाग । धांवताती भृंग तुलसीगंधें ॥९॥

३५५
निवेदिती शुक राया, इतुक्यांत । पाहूनि लतांस म्हणती गोपी ॥१॥
अहो, आलिंगिती वृक्षां या वल्लरी । रोमांचित झालीं अंगें यांचीं ॥२॥
श्रीरंगदर्शन जाहलेम यां वाटे । पुसा कृष्ण कोठें दिसला तयां ॥३॥
निवेदिती शुक राया, यापुढती । कृष्णमय गोपी करिती लीला ॥४॥
आश्चर्यचि वाटे ऐकूनि तें आम्हां । वंदी त्या गोपींना वासुदेव ॥५॥

३५६
राया, पूतनाचि स्वयें होई कोणी । कोणी स्तनपानीं दंग होई ॥१॥
शकटासुरातें कोणी मारी लत्ता । तृणावर्तचेष्टा करी कोणी ॥२॥
होऊनियां बाल कोणी रांगूं लागे । कृष्ण-बलरामाचें रुप घेती ॥३॥
कोणी होती गोप, वत्सासुर कोणी । बक होती कोणी वधिती तया ॥४॥
वाजवितां कोणी मुरली क्षणांत । धांव घेती गोप तदा अन्य ॥५॥
टाकूनियां हस्त अन्येचिया स्कंधीं । म्हणे एक गोपी कृष्णचि मी ॥६॥
एक म्हणे एथें भिऊं नका कोणी । गोवर्धन क्षणीं उचलीन हा ॥७॥
वासुदेव म्हणे रुंदावूनि वस्त्र । उचलिती श्रेष्ठ गिरीसम ॥८॥

३५७
इतुक्यांत एक अन्येच्या मस्तकीं । चढूनि आज्ञापी कालिया, जा ॥१॥
दुर्जनवधार्थ अवतार माझा । एक ती गोपिका गिळि अग्नि ॥२॥
यशोदाचि एक होऊनि कृष्णासी । बांधितीजाहली उखळाप्रति ॥३॥
जाहली जे कृष्ण तदा रडूं लागे । कृष्णमय ऐसें कर्म त्यांचें ॥४॥
वृक्षवल्लरीतें प्रिय कृष्णवृत्त । पुशिती त्या आर्त होऊनियां ॥५॥
वासुदेव म्हणे दीर्घकाल ऐसा । शोध न कृष्णाचा लागे तयां ॥६॥

३५८
इतुक्यांत एकास्थळीं कृष्णपादचिन्हें ॥
पाहूनि गर्जल्या बहु आनंदित मनें ॥१॥
ध्वज, वज्र अंकुशादि लक्षणें पाहून ॥
शोधीत शोधीत जाती मार्ग तो लंघून ॥२॥
तोंचि तयां पाऊलीं त्या दिसे अन्यपाद ॥
अंतरीं चिंतूनि तदा जाहल्या शंकित ॥३॥
अहो, या स्त्रियेनें नेलें दूर गोविंदासी ॥
संशय लवही आतां राही न आम्हांसी ॥४॥
ब्रह्मादिकही चरण इच्छिती हे नित्य ॥
धूळ मस्तकीं हे घेऊं तेणें कृष्णभेट ॥५॥
वासुदेव म्हणे ‘स्वार्थी गोपी ती’ म्हणती ॥
क्रोध अंतरीं तियेचा येई तयांप्रति ॥६॥

३५९
पुढती न अन्य पाउलें दिसती । तदा चिंतिताती मनामाजी ॥१॥
दूर्वांकुर तिच्या पाईं न टोंचावे । यास्तव घेतलें स्कंधीं वाटे ॥२॥
अर्धचि पाउलें उमटलीं एथें । पुष्पें तोडण्यातें उंच झाला ॥३॥
पुष्पसंचय हा, पहा हीं पाउलें । ललनेंचीं, आलें ध्यानीं काय ? ॥४॥
कृष्णानें या स्थानीं घातलीगे वेणी । केश विंचरुनिललनेची त्या ॥५॥
वासुदेव म्हणे रायाप्रति शुक । निवेदिती वृत्त पुढती ऐका ॥६॥

३६०
महामुनि रायालागीं निवेदिती । आत्मक्रीडेमाजी रत कृष्ण ॥१॥
अनवश्यक त्या इंद्रियलालसा । लोकसंग्रहाचा एक हेतु ॥२॥
कामुकांचें दैन्य, स्त्रियांचा मत्सर । दाखवाया खेळ करी प्रभु ॥३॥
गोपीप्रति एका घेऊनि यास्तव । रमला माधव वनामाजी ॥४॥
सैरावरा गोपी शोधिती तयासी । वासुदेव त्यांसी शरण जाई ॥५॥

३६१
इकडे ती गोपी प्रिय मीचि एक । ऐसा धरी दर्प मनामाजी ॥१॥
दर्पे त्या कृष्णासी बोलली सुंदरी । घेईं स्कंधावरी श्रांत झालें ॥२॥
प्राणवल्लभा, न चालवे या वनीं । वचन ऐकूनि हांसे कृष्ण ॥३॥
स्कंधावरी बैसें निवेदूनि ऐसें । तत्कालचि बैसे खालतीं तो ॥४॥
उद्युक्त ती होतां बैसाया क्षणांत । झाला वनीं गुप्त वनमाळी ॥५॥
वासुदेव म्हणे पाहूनि तें गोपी । तळमळे चित्तीं मत्स्यासम ॥६॥

३६२
अनुतापें बाहे नाथा, प्रियकरा । दर्शन दासीला त्वरित देईं ॥१॥
व्याकुळ हे प्राण देवा, तुझ्यावीण । क्षण युगासम भासतसे ॥२॥
कृष्णा, कृष्णा, ऐसें म्हणूनि त्या शोधी । सन्निध तैं गोपी प्राप्त झाल्या ॥
निवेदिलें तयां वृत्त तैं गोपीनें । हानि मूढत्वानें जाहली हे ॥४॥
ऐकूनि सर्वांसी वाटलें नवल । शोधिती सकळ पुढती तया ॥५॥
घनगर्द वन लागेतों शोधिती । अंतीं वाळवंटीं येती दु:खें ॥६॥
वासुदेव म्हणे कृष्णलीला गात । होऊनि निराश बसल्या तेथें ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP