मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|पूर्वार्ध|
अध्याय १९ वा

स्कंध १० वा - अध्याय १९ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


२३६
महामुनिराज शुक । म्हणती प्रलंबाचा वध - ॥१॥
होतां, गोप क्रीडेमाजी । अत्यानंदें दंग होती ॥२॥
खेळ खेळतां अनेक । धेनु होती दृष्टिआड ॥३॥
एका वनांतूनि अन्य - । वनीं जाती पाहूनि तृण ॥४॥
ऐशा हिंडत हिंडत । येती मोळ तृण जेथ ॥५॥
उंच उंच तें वाढलें । ग्रीष्मकालें शुष्क झालें ॥६॥
धेनू जाहल्या तृषार्त । तयां शोधिताती गोप ॥७॥
वासुदेव म्हणे गोप । म्हणती क्रीडा ही अनिष्ट ॥८॥

२३७
मानूनियां पश्चात्ताप मनामाजी । सकळ शोधिती धेनू गोप ॥१॥
पादचिन्हें तेंवी तृण जें भक्षित । पाहूनियां शोध घेती त्यांचा ॥२॥
राम-कृष्ण मात्र निश्चिंतचि होते । शब्द तैं गोपांतें धेनूंचा ये ॥३॥
हंबा ! हंबा ! ऐसें ऐकूनियां शब्द । धांवूनियां गोप तिकडे जाती ॥४॥
वळविल्या धेनू गोपांनीं सकल । हांका त्यां घननीळ मारी तदा ॥५॥
सांवळ्ये, पोंवळ्ये, ऐशा कृष्ण हांका । वासुदेव चित्ता हर्ष बहु ॥६॥

२३८
ऐकूनि त्या हांका जणुं ओचि देती । धेनू धांव घेती सकळ हर्षे ॥१॥
हंबारत येती कृष्णाच्या जवळी । वेळ तदा आली कठिण एक ॥२॥
दुर्दैवें पेटला वनांत वणवा । वायु साह्य झाला तया बहु ॥३॥
अंतीं उग्ररुप जाहलें तयाचें । ग्रासितों धेनूंतें ऐसे वाटे ॥४॥
प्रार्थिती तैं गोप कृष्णा, आम्हां रक्षीं । अतर्क्यचि शक्ति असे तव ॥५॥
राम-कृष्णा, आम्हां आधार तुम्हींचि । भक्षील आम्हांसी अग्नि आतां ॥६॥
वासुदेव म्हणे दावानल भव । जाणूनि माधवस्मरण योग्य ॥७॥

२३९
परीक्षितीलागीं शुक । म्हणती भयाकुल गोप ॥१॥
पाहूनियां तयां कृष्ण । देई अभय वचन ॥२॥
म्हणे निर्भय होऊनि । झांका डोळे सकलांनीं ॥३॥
करिती गोपबाळ तैसें । वाढे कृष्ण विश्वरुपें ॥४॥
गिळूनियां तो दावाग्नि । अवघे श्रम निवारुनि ॥५॥
भांडीरक वटाखालीं । आणी सकलां वनमाळी ॥६॥
नेत्र उघडितां गोप । अवलोकिती तें कौतुक ॥७॥
वासुदेव म्हणे तदा । नवल गोपांचियां चित्ता ॥८॥

२४०
प्रत्यक्ष ईश्वर मानिती ते कृष्णा । करिती स्तवना प्रेमभावें ॥१॥
रामही कृष्णाची करी बहु स्तुति । आधार गोपांसी म्हणे तूंचि ॥२॥
सायंकाळीं कृष्ण मुरलीच्या नादें । आला गोकुळांतें गोपांसवें ॥३॥
वियोगें तयांच्या क्षणही ज्यां वर्ष । जाहल्या हर्षित ऐशा गोपी ॥४॥
वासुदेव म्हणे यशोदा रोहिणी । उतावीळ मनीं दर्शनार्थ ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 18, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP