मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|पूर्वार्ध|
अध्याय ४ था

स्कंध १० वा - अध्याय ४ था

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


३९
होतां यापरी व्यवस्था । येई जागृति रक्षकां ॥१॥
वृत्त कंसासी कथिलें । बाळ अष्टम जन्मलें ॥२॥
गर्भ मृत्यु तो अष्टम । ऐसा निश्चय करुन ॥३॥
मार्गप्रतीक्षाचि करी । वृत्त तोंचि कानावरी ॥४॥
उठला त्यागूनि शय्येतें । येई प्रसूतिगृहातें ॥५॥
अपरात्रीं तो बेभान । सांवरील केश कोण ॥६॥
वासुदेव म्हणे दक्ष । स्वार्थ साधावया दुष्ट ॥७॥

४०
भयभीत तदा जाहली देवकी । आर्तशब्दें प्रार्थी कंसालागीं ॥१॥
दादा, पुत्र न हा कन्याचि जाहली । स्नुषा हे शोभली तुजसी वाटे ॥२॥
बाल-स्त्रीवध न योग्य तुज वीरा । वधिलेंसी पुत्रां बहुत माझ्या ॥३॥
दुर्दैव तें, परी आतां भगिनीसी । भीक या कन्येची घालीं बंधो ॥४॥
बोलूनियां ऐसें कन्येतें पोटाशीं । धरिलें, कंसासी परि न दया ॥५॥
वासुदेव म्हणे प्राणसंरक्षण । अन्य कांहीचि न इच्छी खल ॥६॥

४१
माया-ममता ते विलयासी गेली । धरुनि ओढिली चरणीं कन्या ॥१॥
स्नानशिळेवरी आपटावी ऐसा । हेतु त्या दुष्टाच्या मनीं होता ॥२॥
यास्तव सत्वरी येई तो अंगणीं । गेली निसटूनि वरचेवरी ॥३॥
सखेदाश्चर्ये जों पाही तिज कंस । दिसती तों अष्टभुजा तिज ॥४॥
चाप, खड्ग, शंख, चक्र, गदाआदि । आयुधें तिजसी भूषविती ॥५॥
सुंदर वसन, अमोलालंकार । उटी सर्वांगास चंदनाची ॥६॥
कंठीं पुष्पमाला, स्तविती जियेसी । नाग किन्नरादि ऐसी देवी ॥७॥
वासुदेव म्हणे बोलली जें अंबा । होऊनियां ऐका स्थिरचित्त ॥८॥

४२
मूढा, वधूनि मजसी । काय तव हेतुसिद्धि ॥१॥
शत्रु जन्मलासे तव । सांप्रत तो सुरक्षित ॥२॥
आतां अन्य बालकांसी । वधूनि लाभ न तुजसी ॥३॥
ऐसें बोलूनियां देवी । अंतर्धान पावे नभीं ॥४॥
वाराणस्यादिक क्षेत्रीं । विविध नामें ती पावली ॥५॥
वासुदेव म्हणे आतां । पश्चात्ताप होई कंसा ॥६॥

४३
नभोवाणीनेंही कळतां भविष्य । होणारें कांहींच न टळे जनीं ॥१॥
वसुदेवासवें व्यर्थ देवकीतें । छळियेलें ऐसें वाटे कंसा ॥२॥
व्यर्थ बालकांसी वधियेलें हाय । लाभ तरी काय तेणें झाला ॥३॥
आतां कासयासी यांतें बंदिवास । चिंतूनियां मुक्त करी तयां ॥४॥
वासुदेव म्हणे नम्रपणें कंस । वदे उभयांस ऐका काय ॥५॥

४४
वसुदेवा, ताई, दुष्ट मी चांडाळ । महापापी खल राक्षसचि ॥१॥
प्राणरक्षणार्थ वधिले बालक । नि:संशय निंद्य घडलें कर्म ॥२॥
आप्त, मित्र, बंधु, स्वार्थानें त्यागिले । अपराध केले घोर बहु ॥३॥
लाभेल कोणता नरक न जाणें । दु:ख न करणें आतां ताई ॥४॥
प्रारब्धीं होतें तें घडूनियां आलें । पाठीसी लागलें दु:ख जीवा ॥५॥
घट नष्ट होतां मृत्तिका न नासे । अमरत्व तैसें आत्म्यालागीं ॥६॥
वासुदेव म्हणे संकटीं दुष्टास । आठवे वेदान्त सर्वदाचि ॥७॥

४५
अज्ञानें देहचि आत्मा हें मानितां । प्रारब्धाधीनता न चुके परी ॥१॥
उभयप्रारब्धीं होतें तेंचि झालें । शोकासी त्यागिलें पाहिजेच ॥२॥
प्रायश्चित्त शास्त्रीं कथिलें अज्ञासी । वधील कोणासी कोण केंवी ॥३॥
परी पुत्रवध केला मीचि ऐसें । वाटतां तुम्हांतें क्षमा करा ॥४॥
वासुदेव म्हणे वेदान्त अंतरीं । ठसेल हा तरी न्य़ून काय ॥५॥

४६
बोलूनियां ऐसें उभयांचे पद । धरुनियां घट्ट बंदी कंस ॥१॥
अंबावचनें हीं निर्दोष मानूनि । बंधमुक्त झणीं करी तयां ॥२॥
सत्यचि हा पश्चात्तापदग्ध ऐसें । वाटे देवकीतें म्हणूनि क्षमी ॥३॥
प्रगट हरीची लीला ही पाहूनि । हांसे तया क्षणीं वसुदेव ॥४॥
म्हणे कंसा, सत्य सत्य हें अज्ञान । कोणाप्रति कोण वधी केंवी ॥५॥
असो, ऐशापरी बोलूनियां कंस । घेऊनि आज्ञेस निघूनि गेला ॥६॥
वासुदेव म्हणे अपराधक्षण । जाणावा कठिण पुढती बहु ॥७॥

४७
राजसभेमाजी मंत्र्यांलागीं कंस । निवेदी हें वृत्त अन्य दिनीं ॥१॥
देवद्वेष्टे दुष्ट ऐकूनि तें सर्व । योजिती अपूर्व मार्ग घोर ॥२॥
स्तनंधय बाळें राज्यामाजी जीं जीं । वधावें तयासी प्रयत्नानें ॥३॥
युद्धामाजी देव झाले पराभूत । वस्त्रांचेंही त्यांस नव्हतें भान ॥४॥
ऐसे भ्याड काय करितील आम्हां । शिव-विष्णुही न साह्य देवां ॥५॥
विष्णु तो व्यापक, वनवासी शिव । लवही न भय त्यांचें आम्हां ॥६॥
वासुदेव म्हणे इंद्रही तैसाचि । भय न आम्हांसी म्हणती दैत्य ॥७॥

४८
ब्रह्मा केवळ तपस्वी । जरी आपुला तो वैरी ॥१॥
सावधान असणें योग्य । कुपथ्यानें जेंवी रोग ॥२॥
स्वैर इंद्रियें ज्यापरी । अनावर होती पुरीं ॥३॥
अथवा सांपडतां संधि । शत्रु न सोडी कदापि ॥४॥
तैसे देव हे प्रबल । होतां कठिण होइल ॥५॥
यास्तवचि निर्मूलन । करणें योग्य हें जाणून ॥६॥
आम्हां द्यावी आज्ञा कांहीं । दास आम्हीं तुझे पाहीं ॥७॥
वासुदेव म्हणे मंत्री । ऐसी देती कंसा स्फूर्ति ॥८॥

४९
दुष्ट ते अन्यही कथिती कंसातें । आधार देवांतें म्हणती विष्णु ॥१॥
सनातनधर्मी वास्तव्य तयाचें । वेद, विप्र, त्याचें मूळ असे ॥२॥
धेनु, तप, यज्ञ, मूळ तें धर्माचें । स्वरुप विष्णूचें शांति, दया ॥३॥
शिव-ब्रहम्यादिकां एक तो आधार । दैत्यांचा संहार तोचि करी ॥४॥
वेद-वेदवेत्तेविप्र-धेनुवध । करितां विनाश शक्य त्याचा ॥५॥
वासुदेव म्हणे आज्ञा होतां सर्व । करुं आम्हीं कार्य म्हणती मंत्री ॥६॥

५०
शुक रायाप्रति बोलले त्यापरी । मंत्रीवचन करी मान्य कंस ॥१॥
विप्रहिंसेस्तव मायावी राक्षस । संचार सर्वत्र करिती तेणें ॥२॥
केवळ न मृत्यु, विप्र साधुछळें । परी नाश पावे सकलैश्वर्य ॥३॥
आयुष्य, संपत्ति, यश, आशीर्वाद । सकल विनष्ट होई तेणें ॥४॥
परी क्रोधावेशें धेनु-विप्रछळ । आरंभिती क्रूर रजोगुणें ॥५॥
वासुदेव म्हणे होणार्‍यासारिखी । लाभतसे बुद्धि मानवातें ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP