मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|पूर्वार्ध|
दशम स्कंधाचा (पूर्वार्ध) सारांश

दशम स्कंधाचा (पूर्वार्ध) सारांश

या स्कंधांत अध्याय ४९,मूळ श्लोक १९१३, त्यांवरील अभंग ५९७

दशम स्कंध हा भागवताचा गाभा आहे. श्रीकृष्णचरित्रानेंच तो भरलेला आहे. पूर्वार्ध आणि उत्तरार्ध या दोन दलांनीं हें अमृतबीज नटलेलें आहे. पूर्वार्धात वसुदेव-देवकीच्या विवाहांत ऐन वरातीच्या वेळीं कंस, देवकीचा वध करण्यास सिद्ध झाला. तेव्हां वसुदेवानें त्याला उपदेश केला; पण कंसाला स्वत:च्या मृत्यूचें भय वाटलें. शेवटीं देवकीचीं मुलें तुझ्या स्वाधीन करीन, असें वचन दिल्यामुळें कंस शांत झाला. ठरावाप्रमाणें सहा मुलें तुझ्या स्वाधीन करीन, असें वचन दिल्यामुळें कंस शांत झाला. ठरावाप्रमाणें सहा मुलें कंसानें मारलीं. सातवा गर्भ मायाबलानें आकर्षिला जाऊन तो रोहिणीचा पुत्र झाला. नंतर स्वत: भगवान्‍ आवतीर्ण झाले. वसुदेवानें तें लेंकरु गोकुळांत नंदाच्या घरीं ठेवलें; व यशोदेची कन्या बंदिशाळेत घेऊन आला. मायाबलानें ही ये जा सुलभ झाली. व ती कोणास कळली नाहीं. । देवकीला कन्या झाल्याचें कळतांच कंस बंदिशाळेंत आला. त्यानें ठार मारण्याकरितां त्या कन्येचे तंगडी धरली परंतु माहामायाच असल्यामुळें त्याच्या हातांतून ती निसटली. आकाशांत ती अष्टभुजादेवीच्या रुपानें चमकली व कंसास म्हणाली. “मूर्खा, तुझा वैरी जन्मास आला असून तो सुखांत आहे” तें ऐकून कंस आश्चर्यचकित झाला. पुढें मंत्र्यांच्या सल्ल्यानें कंसानें राज्यांतील सर्व तान्ह्या मुलांचा संहार करण्याचें ठरविलें. आतां कृष्णलीलांस सुरवात झाली. पूतनाप्राणहरण, शकटवध, तृणावर्तवध, बकासुरवध, अघवध, ब्रह्मदेवाचें गर्वहरण, धेनुकासुरवध, कालियामर्दन, प्रलंबवध, दावाग्निप्राशन, कात्यायनीव्रत, ऋषिपत्न्या, गोवर्धनोद्धार, नंदाची सुटका, वैकुंठदर्शन, रासलीला, गोपींचें अलौकिक प्रेम,आक्षेपनिरास, सुदर्शनाचें वृत्त, शंखचूड व अरिष्टासुरवध, धनुर्यागाची सिद्धता, केशीव्योमासुरवध, अक्रूराचें गोकुळांत गमन, गोपींची अवस्था, श्रीकृष्णाचें मथुरागमन, सुदामा, देवकी-वसुदेवांची भेट, उग्रसेनास राज्याभिषेक, उपनयन, विद्याभ्यास, गोकुळांत उद्धवागमन कुब्जामनोरथपूर्ति, अक्रूरास हस्तिनापुरांत पाठविणें, त्याचा धृतराष्ट्रास बोध व धृतराष्ट्राचें उत्तर, एवढा भाग पूर्वार्धात आला आहे.

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP