मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|पूर्वार्ध|
अध्याय ३५ वा

स्कंध १० वा - अध्याय ३५ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


४१२
शुक निवेदिती स्थिति । केंवी तन्मय गोपींची ॥१॥
वनीं जातांचि श्रीकृष्ण । गोपींलागीं न पडे चैन ॥२॥
गृहीं येईतों तयाचे । गुण गाती अत्यानंदें ॥३॥
म्हणती यदा यदा कृष्ण । स्कंधीं कपोल ठेऊन ॥४॥
भ्रकुटि करुनियां वक्र । करी मुरलीचा रव ॥५॥
छिद्रांवरी फिरवी बोटें । तदा देहभान जातें ॥६॥
देवस्त्रियाही विमानीं । जाती बेभान होऊनि ॥७॥
वासुदेव म्हणे गोपी । आमुचा पाड न बोलती ॥८॥

४१३
सर्वचि आमुतें प्रिय श्रीकृष्णाचें । दंतपंक्ति शोभे मुक्तावली ॥१॥
वर्णवे न वक्षस्थलाची ते शोभा । स्वभाव लक्ष्मीचा स्थिर होई ॥२॥
विरहिणी आम्ही पाहूनि संत्रस्त । मुरलीचा नाद करी वाटे ॥३॥
पशु-पक्षीही त्या नादें स्वस्थ होती । मुखांतील मुखीं धरुनि ग्रास ॥४॥
अज्ञही पशूंची अवस्था हे जरी । दोष आम्हां तरी काय असे ॥५॥
मस्तकीं तैसींचि बाहूवरी यदा । बांधी मोरपिसां पिवडी अंगीं - ॥६॥
लावूनियां, रामासवें गोपबाळ । घेऊनि धेनूंस बाही कृष्ण ॥७॥
वासुदेव म्हणे कथिती तदा गोपी । अवस्था नद्यांची आम्हांसम ॥८॥

४१४
कृष्णचरणधूलिलाभ । होवो वाटे सरितांस ॥१॥
स्थिर आम्हांसम होती । गति स्तब्ध प्रवाहाची ॥२॥
आलिंगनार्थ आमुचें । कर कंपित हे जैसे ॥३॥
तेंवी तयांचे तरंग । चरणीं धांवती सवेग ॥४॥
स्थिर लोचनींचें पाणी । होई कृष्णासी पाहूनि ॥५॥
तेंवी सरिताही स्थिर । पाहूनियां तें सौंदर्य ॥६॥
सरितांची ऐशी स्थिति । मग आम्हीं काय गोपी ॥७॥
वासुदेव म्हणे ऐशा । विरहभाव त्या गोपींचा ॥८॥

४१५
परमात्मारुप जाणूनि न कोणी । बोलल्या वर्णनीं श्रीविष्णूच्या - ॥१॥
रंगती जैं देव, तैसेचि हे गोप । एथेंही तैसीच स्थिर लक्ष्मी ॥२॥
भक्तांत:करणीं प्रगटतां ईश । जेंवी रोमांचित देह त्यांचा ॥३॥
तैसेंचि लोचनीं वाहूं लागे पाणी । तेचि स्थिति वनीं मुरलीनादें ॥४॥
मुरलीचा ध्वनि ऐकूनियां वृक्ष । होती रोमांचित मद वाहे ॥५॥
वासुदेव म्हणे परोपरी गोपी । कृष्णासी वर्णिती अत्यानंदें ॥६॥

४१६
सख्यांनो, तिलक किति शोभे लल्लाटींचा ॥
वनमालागंधें वेड लागे तया भृंगां ॥१॥
उच्चस्वरें गुंजारव करुनि नाचती ॥
लपवावें वेड हेंही भान न वेडयांसी ॥२॥
गुंजारवें आनंदित होऊनि त्या कृष्ण ॥
उच्चस्वरें काढूं लागे मुरलीचा स्वन ॥३॥
हंस सरोवरीं तेणें मोहूनियां जाती ॥
सन्निध येऊनि हर्षे नयन झांकिती ॥४॥
समाधिनिमग्न योगी वाटती ते तदा ॥
वासुदेव म्हणे हर्ष ऐकूनि हें चित्ता ॥५॥

४१७
सख्यांनो, मेघही ऐसी ऐकूनि मुरली ॥
त्यागूनि आपुला ध्वनि मधु रव करी ॥१॥
गोवर्धनावरी राम-कृष्ण जनोद्धारा ॥
वाजविती पांवा तयां विरोध न व्हावा ॥२॥
तेंवी गर्जतां आपणां चुकेल तो लाभ ॥
कोण ऐकवील ऐसा मुरलीचा नाद ॥३॥
यास्तव होऊनि शांत करी पुष्पवृष्टि ॥
वासुदेव म्हणे ऐसी स्थिति त्या मेघांची ॥४॥

४१८
पतिव्रते यशोदेग, तुझा कान्हा । कुशल हा आम्हां वाटे बहु ॥१॥
सूर्यबिंबासम आरक्त तेजस्वी । ऐशा अधरोष्ठीं मुरली धरी ॥२॥
आलाप ते ब्रह्मा-शिवही ऐकूनि । संतोषूनि मनीं डोलताती ॥३॥
परी समजे न कांहींच तयांतें । स्वयंप्रेरणेचें प्रभुगान ॥४॥
सख्यांनो, धेनूंच्या खुरांनीं जे त्रस्त । भूमीसी त्या तोष द्यावयासी ॥५॥
ध्वज कमलादि चिन्हयुक्त पादें । मंद मंद चाले कृष्ण यदा - ॥६॥
तदा तें विलाससंयुक्त पाहणें । बेभान आम्हांतें कामें करी ॥७॥
वासुदेव म्हणे गोपी जड मूढ । पाहूनि तें रुप होती प्रेमें ॥८॥

४१९
वनमालाधारी ओढूनियां मणि । धेनूंप्रति गणी मित्रांसवें ॥१॥
अत्यानंदें वेणु वाजवी तो यदा । तदा मृगंवृंदां मोह पडे ॥२॥
सभोंवतीं त्याच्या राहूनि तटस्थ । त्या गुणसिंधूस अवलोकिती ॥३॥
भाग्यवती अये यशोदे, हा कान्हा । येई जैं सदना वनांतूनि ॥४॥
वायुही तैं होई मंद सुगंधित । सेविती गंधर्व वाद्यगानें ॥५॥
वासुदेव म्हणे देवही स्वर्गांत । कृष्णस्तवनांत दंग होती ॥६॥

४२०
येशोदे, पहा हा येई इकडेचि । जाणूनि आमुची दु:खावस्था ॥१॥
गोकुळ-गाईंचा कृष्ण हितकर्ता । यास्तव पर्वता तोली करीं ॥२॥
मुरलीच्या नादें येई वनांतूचि । ब्रह्ययादीही मनीं वंदिती तैं ॥३॥
बोलती जोखं ऐसें तोंचि येई कृष्ण । तयासी पाहून वदल्या गोपी ॥४॥
कर्णकुंडलांनीं कांतिमंत मुख । म्लानही आम्हांस मोद देई ॥५॥
श्रांत जीवा जेंवी सौख्य देई चंद्र । विरहाग्निदग्ध आम्हांप्रति ॥६॥
सुख द्यावया हा इकडेचि येई । कृष्णमय पाहीं गोपी ऐशा ॥७॥
वासुदेव म्हणे हरिरंगीं दंग । त्याचा भवभंग होत असे ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP