मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|पूर्वार्ध|
अध्याय ३१ वा

स्कंध १० वा - अध्याय ३१ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


३६३
राया, दर्शनार्थ यापरी प्रार्थना । करिती ललना वाळवंटीं ॥१॥
प्राणप्रिया, तुझा जन्म गोकुळांत । यास्तव उत्कर्ष गोकुळाचा ॥२॥
लक्ष्मीपति तूं यास्तव लक्ष्मीही । पातली या ठाईं आनंदानें ॥३॥
यापरी सकल आनंदित ऐसे । आम्हीं मात्र एथें दु:खभागी ॥४॥
वांचवूनि जीव कसेतरी देवा । शोधितों या ठाया तुजसी प्रेमें ॥५॥
देऊनि दर्शन रक्षीं आम्हांप्रति । लाभो भक्ति तेचि वासुदेवा ॥६॥

३६४
मदनमोहना, हे कृपासागरा । करुनियां त्वरा दर्शन दे ॥१॥
शरत्कालीन या कमलगर्भांची । तुच्छ जयां कांति कटाक्ष ते - ॥२॥
व्याकुळ आम्हांसी करिती केशवा । दर्शन माधवा, त्वरित देईं ॥३॥
विनामूल्य आम्हीं सेवेप्रति सिद्ध । असूनि कां क्रुद्ध होसी ऐसा ॥४॥
दर्शनावांचूनि गोविंदा, हे प्राण । जातील निघून निश्चयानें ॥५॥
दोष स्त्रीवधाचा येऊं नये माथीं । ऐसा योजीं मार्ग देवा ॥६॥
वासुदेव म्हणे दर्शनार्थ ऐसी । तळमळ त्यांसी लांगे बहु ॥७॥

३६५
देवा, बहुत संकटीं । संरक्षिलें तूं आम्हांसी ॥१॥
हरिलें कालियाचें विषं । गतप्राण केला अघ ॥२॥
प्रलयकालीन ते वृष्टि । होतां वणव्यांत हिंपुटी ॥३॥
रक्षिलेंसी लीलामात्रें । आतां रुसलासी कां रे ॥४॥
क्षुद्र मदनाच्या ज्वाला । दग्ध करिती या काला ॥५॥
नीचाकरीं ऐसा नाश । कां रे, आमुचा करितोस ॥६॥
वासुदेव म्हणे आर्त । ऐसे गोपींचे ते शब्द ॥७॥

३६६
नंद यशोदेचा तान्हा नव्हसी तूं देवा ॥
सर्वसाक्षी तूंचि तया वैकुंठींचा ठेवा ॥१॥
प्रत्यक्ष दर्शन कदा देतसे कीं देव ॥
ऐसें म्हणूं नको, प्रार्थी यदा ब्रह्मदेव - ॥२॥
तदा दुष्ट शासनासी सात्वत कुळांत ॥
अवतार घेऊनियां आलासी प्रत्यक्ष ॥३॥
तेंचि तुझें रुप प्रभो, दाखवीं आम्हांसी ॥
त्वरा करीं ये माधवा, भेट दे गोपींसी ॥४॥
वासुदेव म्हणे गोपी दर्शनलोलूप ॥
होऊनियां पहा केंवी जाहल्या तद्रूप ॥५॥

३६७
संसारभयानें भयाकुल आम्हीं । देवा, त्वच्चरणीं शरण असों ॥१॥
शरणागतांच्या रक्षका, हे नाथा । स्वीकार लक्ष्मीचा केला जेणें ॥२॥
अंबुज कर तो आमुच्या मस्तकीं । ठेवीं जगजेठी कृपा करीं ॥३॥
गोकुळनिवासीजनसंरक्षका । गर्वहीन भक्तां करिसी हास्यें ॥४॥
खचितचि आम्हीं चरणांच्या दासी । दाखवीं आम्हांसी मुखपद्म ॥५॥
वासुदेव म्हणे गोपी परोपरी । विनविती परी हरी न द्रवे ॥६॥

३६८
अनन्य भक्तांचीं निवारिती पापें । तींच पादपद्में देवा, तव ॥१॥
धेनुवत्सांचिया मागोमाग जाती । प्रिय पाउलें तीं लक्ष्मीप्रती ॥२॥
भाग्यें कालियाच्या मस्तकीं शोभलीं । ठेवीं वक्ष:स्थळीं तींच पद्में ॥३॥
देवा, पाउलांच्या स्पर्शे शांतिलाभ । होईल सहज आम्हांप्रति ॥४॥
वासुदेव म्हणे केवळ चरण । टाळितील जन्म-मरण त्यांचें ॥५॥

३६९
कमललोचना, तुझें भाषण मधुर ॥
आवडे ज्ञात्यांसी गूढ, गोड, मनोहर ॥१॥
मोहिलें आम्हांसी, तेणें अधरामृतासी - ॥
पाजूनि सावध करीं, प्रार्थना एकचि ॥२॥
केवळ लीलागानानें वांचले हे प्राण ।
नाहींतरी केधवांची जाते ते निघून ॥३॥
संकटनाशक तुझे गुण पापहारी ॥
केवळ श्रवणें सदा सर्व सौख्यकारी ॥४॥
निवेदिले गुण जेणें तेणें जीवदान - ॥
दिधलें, आम्हांसी होई निश्चय हा जाण ॥५॥
वासुदेव म्हणे गोपी होती उतावीळ ॥
दर्शन परी न तयां देई घननीळ ॥६॥

३७०
म्हणूं नको देवा, गुणचि गा, ऐसें । जेणें वांचले हे आमुचे प्राण ॥१॥
दर्शनाचें आतां न म्हणेंचि काज । अर्थाचा अनर्थ करुनियां ॥२॥
कपोलींचें हास्य, ते प्रेमकटाक्ष । तैसा ध्यानयोग्य संचार तो ॥३॥
हृदयस्पर्शी ते एकान्तविनोद । आठवूनि सर्व गूढभाव ॥४॥
तिळ तिळ चित्त तुटूनियां जाई । ये ! ये! भेट देईं देवा, आतां ॥५॥
वासुदेव म्हणे प्राणप्रियालागीं । गोपी वाहताती करुणावचें ॥६॥

३७१
प्राणनाथा, तुझ्या कोमल चरणीं । टोंचतील रानीं खडे कांटे ॥१॥
रात्रंदिन ऐसी काळजी आम्हांतें । कांहीं तुज त्याचें नसे परी ॥२॥
धेनूंसवें गृहीं येतां सायंकाळीं । दाविसी आपुली रम्य छवि ॥३॥
केश ते कुरळे गोरज:कणांनीं । मलिन दावूनि हरिसी चित्त ॥४॥
उद्दीपित ऐसा करुनियां काम । करिसी न पूर्ण कपटी ऐसा ॥५॥
रमारमणा, हे प्रार्थना पदासी । शोभेना तुजसी कपट ऐसें ॥६॥
यास्तव संकटनिवारक वंद्य । वक्ष:स्थळीं पाद ठेवीं तेचि ॥७॥
वासुदेव म्हणे हरीं कामबाधा । प्रार्थिती मुकुंदा ऐसें गोपी ॥८॥

३७२
अधरामृताची काय वर्णूं ख्याती । करी कामवृद्धि स्मरणेंही तें ॥१॥
दु:खपरिहार करी तें सहज । साम्राज्यही तुच्छ तयापुढें ॥२॥
अधरसुधा ते सेविते बासरी । आम्हांसी ते सरी नसे काय ॥३॥
देवा, सुस्वर त्या मुरलीचा हेवा । ऐसाचि करावा काय आम्हीं ॥४॥
वासुदेव म्हणे दर्शनउत्कंठा । जडेल हे चित्ता तरी धन्य ॥५॥

३७३
नंदनवना, तूं वनीं चारायासी गाई ।
जासी वियोगें त्या आम्हां बहु दु:ख होई ॥१॥
क्षणही वाटे तो आम्हां देवा, युगासम ।
सत्वरीचि होवो सायंकाळ इच्छी मन ॥२॥
धेनूंमागोमाग येतां पाहूनि तुजसी ।
पाहतचि बैसावेसें वाटतें आम्हांसी ॥३॥
नयनोन्मीलन होतां होई बहु खेद ।
चतुराननाचा तदा येई मनीं राग ॥४॥
कृष्णा, उत्कंठित ऐशा दर्शनार्थ आम्हीं ।
जाणूनीही किती काळ गेलासी त्यजूनि ॥५॥
अंत नको पाहूं आतां येईं रे माधवा ।
टाहो फोडिताती गोपी दु:ख वासुदेवा ॥६॥

३७४
अच्युता, गायनमोहित होऊनि । पातलों या रानीं अपरात्रीं ॥१॥
मुलें - बाळें, पति, आप्तही त्यजिले । काय हें नकळे तुजसी देवा ॥२॥
जाणूनिही हेतु कांरे प्रभो, ऐसा । स्वीकार आमुचा करिसीचि ना ॥
येतील ज्या अपरात्रींही स्वयेंचि । अव्हेरील त्यांसी अन्य कोण ॥४॥
वासुदेव म्हणे पूर्णकाम हरी । बापुडा त्या करी काम काय ॥५॥

३७५
नंदाआनंदवर्धना । तुझ्या मधुर भाषणा ॥१॥
तेंवी सुहास्यमुखातें । तैसें विशाल वक्षातें ॥२॥
प्रेमकटाक्षासी तुझ्या । पाहूनियां कामबाधा ॥३॥
तेणें उतावीळ आम्हीं । जगन्नाथा, घेईं ध्यानीं ॥४॥
भक्तजन पूर्णकामा । प्रभो, मंगलनिधाना ॥५॥
दु:खनिवारणकार्य । जाणूनियां घेईं धांव ॥६॥
योग्य उपाय योजूनि । सुखवीं सत्वरी येऊनि ॥७॥
वासुदेव म्हणे आर्त । मारिताती गोपी हांक ॥८॥

३७६
राया, उत्कंठित होऊनियां अंतीं । रुदनचि गोपी आरंभिती ॥१॥
सुकुमारा कृष्णा, आम्हांसी त्यागूनि । म्हणती काननीं केंवी जासी ॥२॥
कोमलचरणीं रुततील कांटे । रजनीची वाटे कठिण वेळ ॥३॥
बहुकाळ तुझे आठवूनि गुण । कंठिला परी न चैन आतां ॥४॥
सत्वरी तूं आतां भेटसी न जरी । समजे न तरी पुढती काय ॥५॥
यास्तव येऊनि दे आतां दर्शन । वांचवीं हे प्राण दयावंता ॥६॥
वासुदेव म्हणे दयाळु घननीळ । भक्तां सांभाळील निश्चय हा ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP