मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|पूर्वार्ध|
अध्याय ३८ वा

स्कंध १० वा - अध्याय ३८ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


४४२
निवेदिती शुक राया, परीक्षिता । बुद्धिमंत होता अक्रूर तो ॥१॥
कंसआज्ञा होतां सदनीं पातला । अन्य दिनीं झाला गमना सिद्ध ॥२॥
भक्तकाजकल्पद्रुम श्रीहरीचें । प्रेम तया होतें आत्यंतिक ॥३॥
कृष्णभेटीचेचि विचार अंतरी । मार्गामाजी करी चित्त त्याचें ॥४॥
म्हणे काय पुण्य जाहलें म्हणूनि । ऐसी हे चालूनि संधि येई ॥५॥
चिंतितों मी सदा अंतरी विषय । दुर्लभचि वेद शूद्राप्रति ॥६॥
तैसेंचि दर्शन मज हें दुर्लभ । असावें, हा लाभ परी केंवी ॥७॥
वासुदेव म्हणे प्रवाहपतित । काष्ठेंही परतीर गांठिती कीं ॥८॥

४४३
कर्मासम कालप्रवाह जीवासी । ओढी सर्वदाचि परी भाग्यें ॥१॥
प्रवाहपतित काष्ठांसम कोणी । जाती उद्धरुनि पैलतीरीं ॥२॥
असो, तें कांहींही परी अद्य भाग्य । उदेलें गोविंद भेट तेणें ॥३॥
क्षीणपाप अद्य जाहलों मी सत्य । योगीही ध्यानांत मग्न ज्याच्या - ॥४॥
चरणांबुजें तीं प्रत्यक्ष मी अद्य । वंदीन नि:शंक होऊनियां ॥५॥
वासुदेव म्हणे आनंदित चित्तें । गोकुळपथातें क्रमी भक्त ॥६॥

४४४
अनुग्रह म्हणे कंसाचा मजवरी । दिसेल श्रीहरी तेणें अद्य ॥१॥
चरण तयाचे भवार्णवीं नौका । सेवील जो त्याचा भवच्छेद ॥२॥
भक्तउद्धारार्थ याचा अवतार । गेले थोर थोर शरण यातें ॥३॥
ब्रह्मा शिवही त्या अर्चिती पदांतें । कमला सेविते नित्य हेचि ॥४॥
उपासिती हेचि भक्त मुनिराज । परम कारूणिक मेघ:शाम ॥५॥
गोपबाळांसवें धेनू चारी वनीं । दयालुत्व जनीं सिद्ध तेणें ॥६॥
प्रेमावीण कांहीं नलगे जयासी । मज त्या हरीची प्राप्ति अद्य ॥७॥
गोपीपयोधरकुंकुमार्चित ते । चरण दृष्टीतें अद्य माझ्या ॥८॥
वासुदेव म्हणे अक्रूर आनंदें । म्हणे भाग्य माझें उदया आलें ॥९॥

४४५
निविदिती शुक चिंतितां यापरी । सुचिन्हें त्या झालीं मार्गामाजी ॥१॥
पाहूनि तीं रति वाढली अधिक । कल्पनातरंग उठती बहु ॥२॥
सव्यगामी मज सुचवी हरिण । होईल दर्शन निश्चयानें ॥३॥
मनोहर रुप असेल तें किती । कोमल ते कांति कपोलांची ॥४॥
सुहास्यतें आस्य नासिका सरळ । बहु शोभतील नयनांबुजे ॥५॥
कुरळ्या कुंतलें खुलेल वदन । होतील नयन कृतार्थ हे ॥६॥
कर्तृत्व-भोक्तृत्वादिक गुणयुक्त । दिसेल तो मज भगवान ॥७॥
वासुदेव म्हणे जनांसम भासे । अलिप्तचि असे हरी परी ॥८॥

४४६
अज्ञानजन्य हे अहंकारादिक । भेद न तयास शिवती कदा ॥१॥
माया सर्वकाल तयाच्या आधीन । अलिप्त राहून वरी तिज ॥२॥
तेणें गोपींसवें क्रीडतोसें भासे । चरित्रें पातकें भस्म होती ॥३॥
वाणी जे तयातें वर्णी तेचि धन्य । तल्लिन होऊन गुण गातां ॥४॥
मधुरही वाणी ईश्वरविन्मुख । अलंकार स्पष्ट प्रेतासी ते ॥५॥
शास्त्रोक्त मर्यादा पाळिती तयांच्या । उद्धारार्थ ऐसा अवतार हा ॥६॥
दुर्जनसंहार सुजनसांभाळ । हेतु एकमात्र भगवंताचा ॥७॥
वासुदेव म्हणे ऐसें तें दर्शन । होणार म्हणून भक्त हर्षे ॥

४४७
सभाग्याचें मुख पाहिलें मी अद्य । अपूर्व हा लाभ तेणें मज ॥१॥
सज्जनविश्राम निरुपम रुप । लक्ष्मीचा कांत सुजनां गति ॥२॥
पाहीन तो अद्य साक्षान्नारायण । ध्याती योगीजन नित्य जया ॥३॥
दिसतांचि मज दुरुनि ते मूर्ति । रथाखालीं उडी घेईन मी ॥४॥
लोळेन तयाच्या चरणीं आनंदें । सार्थक जन्माचें तेणें मम ॥५॥
गोपही ते देव वंदीन तयांही । शंका न लवही धरुनि मनीं ॥६॥
कृपाकर माझ्या मस्तकीं ते देव । ठेवितील काय वंदितां त्यां ॥७॥
वासुदेव म्हणे नव्हती ते शंका । आशीर्वादइच्छामात्र पूर्ण ॥८॥

४४८
कृपाकर त्याचा भक्तांसी आधार । काल-व्याल भयनिवारक ॥१॥
इंद्र, बळीही ते त्रैलोक्याचे स्वामी । जाहले पुजूनि तयासीच ॥२॥
त्याच्याचि स्पर्शानें गोपिकांचे श्रम । विनष्ट होऊन सौख्य तयां ॥३॥
दूत मी कंसाचा यास्तव श्रीहरि । मानील न वैरी मजलागीं ॥४॥
आंतरिक भाव जाणूनि तो मम । कृष्णभगवान सर्वसाक्षी ॥५॥
जोडूनियां कर वंदितां मी तया । येऊनियां दया करिल स्मित ॥६॥
होईन मी तदा आनंदित मनीं । जातील जळूनि सकळ पापें ॥७॥
वासुदेव म्हणे ऐसी कृपादृष्टि । लाभेल तयासी भय काय ॥८॥

४४९
आप्त-मित्रही मी नंदतनयाचा । मानितों देवता तोचि माझी ॥१॥
यास्तव भेटतां आलिंगील मज । होईल पवित्र तेणें देह ॥२॥
कर्मबंधच्छेद होईल तत्काळ । चरणांबुजीं स्थिर करिन दृष्टि ॥३॥
मग पृष्ठीं माझ्या फिरवूनि हस्त । म्हणेल आलास कोठूनि तूं ॥४॥
शब्द ते मजसी करितील धन्य । हरिप्रिय जे न व्यर्थचि ते ॥५॥
वासुदेव म्हणे ईश्वराचें प्रेम । लाभे त्याचें पुण्य वर्णवेना ॥६॥

४५०
शत्रु-मित्र कृष्णा कोणीही नसेचि । शत्रु त्या लेखिती विषयलोभें ॥१॥
इच्छेसम देई फल कल्पवृक्ष । तेंवी पाही त्यास तैसा कृष्ण ॥२॥
भेटूनियां कृष्णा रामातेंही मग । भेटेन, तो मज आलिंगूनि - ॥३॥
धरुनियां कर, नेईल गृहांत । करील आतिथ्य प्रेमभावें ॥४॥
सभोंवतीं माझ्या जमतील सर्व । पुशील केशव कंसवृत्त ॥५॥
वासुदेव म्हणे अक्रूर अंतरीं । मार्गांत यापरी चिंतीतसे ॥६॥

४५१
राया, श्वफल्काचा पुत्र । चिंती यापरी अक्रूर ॥१॥
विचारें या ऐसा मग्न । नव्हतें मार्गाचेंही भान ॥२॥
सायंकाळीं त्याचा रथ । येई गोकुळासन्निध ॥३॥
पद्मयवांकुशचिन्हें - । दिसली मंडित पुलिनें ॥४॥
पाउलें तीं अवलोकून । गेला सद्‍गद होऊन ॥५॥
अंगीं ठाकले रोमांच । अश्रुपुर लोचनांस ॥६॥
उडी टाकी रथाखालीं । घेई लोळण त्या स्थळीं ॥७॥
वासुदेव म्हणे भाव । हाचि भक्ताचा स्वभाव ॥८॥

४५२
शिव-ब्रह्ययासीही दुर्लभ ते रज । नि:सीम भक्तास प्राप्त होती ॥१॥
अक्रूराच्या चित्तीं अलौकिक प्रेम । तेणेंचि हे जाण संधि तया ॥२॥
कंसआज्ञा तया जाहल्यापासूनि । उतावीळ मनीं होता चित्तीं ॥३॥
सुचलें न कांहीं तया कृष्णावीण । सार्थक जन्मून हेंचि जनीं ॥४॥
पुढती बैसूनि रथामाजी भक्त । येई गोकुळांत अत्यानंदें ॥५॥
गोठ्यांतचि कृष्ण बलराम उभे । दिसले तयातें समीप येतां ॥६॥
पीतपीतांबर नेसला श्रीकृष्ण । तेंवी बलराम नीलवस्त्र ॥७॥
शरदांबुजेंचि नयन तयांचे । किशोरावस्था ते उभयांप्रति ॥८॥
गौर-शाम अंगकांति ते सुंदर । चिन्हें चरणांवर ध्वजादिक ॥९॥
वासुदेव म्हणे औदार्यहि गुण । दिसती खुलून दर्शनेंचि ॥१०॥

४५३
वनमाला तेंवी रत्नमाला कंठीं । सुस्नात सर्वांगीं उटी गंध ॥१॥
आदिपुरुषांच्या अंगीं बाळलेणीं । अलौकिक जनीं शोभा तयां ॥२॥
पाच-रजताचे पर्वत भासती । नील-शुभ्रकांति सालंकृत ॥३॥
सकलहि दिशा प्रकाशल्या तेजें । रुप तें पाहिलें अक्रूरानें ॥४॥
रुद्धकंठें घेई उडी रथाखालीं । दंडवंत घाली प्रणाम त्यां ॥५॥
आनंद तयाचा मावेन गगनीं । प्रेमाश्रु लोचनीं वाहताती ॥६॥
रुद्धकंठे त्याचा उमटेन शब्द । हेतु अंतरांत असूनि बहु ॥७॥
वासुदेव म्हणे जाणिलें हरीनें । सहेतुक कंसें धाडिलें त्या ॥८॥

४५४
कंसवधाचें सामर्थ्य । अक्रूराच्या प्रत्ययास ॥१॥
येवोनि तो होवो इष्ट । पुढती करी यास्तव हस्त ॥२॥
चक्रमुद्रांकित हस्तें । प्रेमे आलिंगिलें त्यातें ॥३॥
पुढती बलरामातेंही । श्रेष्ठ यादव तो वंदी ॥४॥
आलिंगूनि धरुनि हस्त । राम नेई त्या गृहांत ॥५॥
प्रेमें करुनि कुशल प्रश्न । राम देई त्या आसन ॥६।
वासुदेव म्हणे पूजा । करिती अक्रूराची तदा ॥७॥

४५५
अर्पूनियां धेनु आदरें तयास । श्रमनिरासार्थ चरण चुरी ॥१॥
षड्रसअन्नें त्या, करुनियां तृप्त । तांबुल, सुगंध अर्पी प्रेमें ॥२॥
पुढती होऊनि स्वस्थ तो बैसतां । नंद पुशी ऐका तया काय ॥३॥
वासुदेव म्हणे नंदाची ते वाणी । ऐकतांचि ध्यानीं सकल येई ॥४॥

४५६
क्षेम असे कीं अक्रूरा । विचारुं वा हें कासया ॥१॥
असतां कंस तो जिवंत । केंवी तुम्हां सौख्यलाभ ॥२॥
खाटिकाच्या गृहीं अजा । तेंवी तुमची अवस्था ॥३॥
स्वार्थास्तव भगिनीचीं । अपत्यें जो दुष्ट वधी ॥४॥
तया दुष्टालागीं दया । येईअ कोणाची कासया ॥५॥
ऐकूनि हे नंदवाणी । तोष अक्रूराच्या मनीं ॥६॥
श्रमपरिहार त्याचा । होई ऐकूनि ते वाचा ॥७॥
वासुदेव म्हणे दु:ख । जाणल्यानें शांत चित्त ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP