अध्याय १३ वा - श्लोक ५४ ते ५६

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


सत्यज्ञानानंतानंदमात्रैकरसमूर्तयः । अस्पृष्टभूरिमाहात्म्या अपि ह्युपनिषद्दृशाम् ॥५४॥

जैसा प्रभातीं उगवल्या तरणि । जळीं दर्पणीं कां मिडगणीं । स्वभासें प्रकटी मंडळश्रेणी । परि स्वयें दिनमणि साचार ॥५७०॥
तेवीं सत्यस्वरूप प्रभूच्या मूर्ति । चिन्मात्र ज्ञानाच्या आकृति । अंतरहित अनंत व्यक्ति । आनंद प्रचुर पृथकत्वें ॥७१॥
त्या सन्मात्र घृताचिया कणिका । थिजोनि भासल्या जरी अनेका । तरी चिन्मात्रैक रसात्मका । भेदकळंका नातळती ॥७२॥
अन्यमूर्तीचा प्रसंग । तेथ विजातीय तो स्थूळभग । सजातीय सूक्ष्म विभाग । स्वगत साङ्ग साक्षित्व ॥७३॥
या त्रिविध भेदा नातळतां । जे कां केवळ एकरसता । निर्वाण ब्रह्मचि तत्त्वतां । मूर्ति अनंता प्रभूच्या ॥७४॥
जें वस्तूचें वास्तव ज्ञान । त्यासि उपनिषद् हें अभिधान । तेचि जेहीं केले नयन । ब्रह्मनिर्वाण लक्षावया ॥५७५॥
तया उपनिषद्दृष्टिमंता । ज्याचा महिमा अगाध पहातां । लक्षा नयेचि जो तत्त्वतां । तो येरां प्राकृतां केवीं लक्षे ॥७६॥
जेथ उपनिषदाचे डोळे । होऊनि ठेले पैं आंधळे । तेथ स्थूळ दृष्टीचीं बुबुळें । कोण्या काळे स्पर्शती ॥७७॥
महिमा लक्षणा अव्यंग । नोहे उपनिषद्दृष्टीचा लाग । तया प्रभूच्या मूर्ति साङ्ग । काळादि पृथक सेविती ॥७८॥
पूज्य मूर्ति जैसे तरणि । पूजकां मूर्तिरूपा किरणीं । वेष्टित विधाता देखे धरणी । आश्चर्य नयनीं अकस्मात ॥७९॥

एवं सकृद्ददर्शाजः परब्रह्मात्मनोऽखिलान् । यस्य भासा सर्वमिदं विभाति सचराचरम् ॥५५॥

अकस्मात् एकाचि काळें । ब्रह्मयाचे आठही डोळे । पूर्वोक्त आश्चर्य देखते झाले । तें भूपाळें परिसिजे ॥५८०॥
वत्सें आणि वत्सपगण । भगवद्रूप अवघे जण । त्यांतें ब्रह्मात्मक देखोन । विस्मयापन्न जाहला ॥८१॥
तें परब्रह्म म्हणाल कैसें । ज्याच्या प्रकाशें विश्व भासे । साचें सूर्यें मृगजळ जैसें । लटिकें तैसें चराचर ॥८२॥
साचे दोर लटिके नाग । साचें कनक लटिके नग । तेवीं ब्रह्म मिथ्या जग । दृग्विभागा भासविलें ॥८३॥

ततोऽतिकुतुकोद्वृत्य स्तिमितैकादशेंद्रियः । तद्धाम्नाऽभूदजस्तूष्णीं पूर्देव्यन्तीव पुत्रिका ॥५६॥

ऐशा परब्रह्मात्मका मूर्ति । देखोनि ब्रह्मा मोहावर्तीं । भ्रमतां विवेक नुमजे मति । ते व्युत्पत्ति अवधारा ॥८४॥
त्यानंतरें अतिकौतुकें । परमाश्चर्यें विचार थके । दृङ्मातृकें बुद्धिविवेकें । पाहतां निकें विवरूनि ॥५८५॥
दृष्टि पाहतां पाहतां थकली । उपरतौनि मीलिन केली । तथापि फिरोनिही उघडिली । ते मुकली स्वज्ञाना ॥८६॥
बाहीर देखणे दिसती डोळे । टकटक पाहती गमती बुबुळें । परी तें देखणेंचि आंधळें । चाकाटलें आश्चर्यें ॥८७॥
मोट कवळूनि हंसपृष्ठीं । पुढती उठोनि उघडी दृष्टि । तंव न स्मरे गोचर सृष्टि । जाला परमेष्ठी तटस्थ ॥८८॥
अज्ञाननिशागर्भीं तेजःपुंजें । चर्मचित्रें दृग्दीपतेजें । भासती त्यातें संतोषकाजें । पाहोनि रंजे जीवसृष्टि ॥८९॥
तेथ प्रकटालिया चंडकिरण । मुद्दल दीपची प्रभाहीन । चर्मचित्रातें पुसे कोण । क्रीडाभान मग कैंचें ॥५९०॥
विक्षेपरजनीचिया गर्भा - । माजि विपरीत ज्ञानदीपप्रभा । राजस तामस । दृष्टिशोभा । करणलाभा उपयोगीं ॥९१॥
तेथ प्रकटले कोटि तरणि । मूर्तिमंत चक्रपाणि । धातृदीप विश्वाभिमानी । विपरीतज्ञानी निष्प्रभ ॥९२॥
उत्सर्ग विसरला निऋति । प्रजापतीसि न स्फुरे रति । उपेंद्राची थकली गति । तेणें सुरपती होय ग्रहण ॥९३॥
अग्नि निष्प्रभ लपनालयीं । नासत्यमुकुलीं जिघा विश्व उजळे । त्याचेनि अंध झाले डोळे । देखणें ठेलें स्मरणेंशीं ॥५९५॥
ब्रह्मांडघटींची मारुतगति । विश्वस्पर्शा जे सूचिती । तीसि मूर्च्छनेची प्राप्ति । स्पर्शज्ञप्ति उमजेना ॥९६॥
दिशागर्भींचा अवकाश । भरूनि कोंदला अनाहत घोष । ज्यामाजि शब्दाचे अशेष । ओघ विशेष सांठवती ॥९७॥
तेथ स्मृतीच्या शिथिल गुणें । नादा अधिष्ठिलें काठिण्यें । शब्दतरंगाचं विचरणें । अवघें तेणें खुंटलें ॥९८॥
उगमींच वाळोनि गेला झरा । तो केवी जोपी प्रवाहें नगरा । तेवी मनोमूर्च्छनेमाजि सारा । करणपसारा लोपला ॥९९॥
जेथूनि स्फुरे विषयानंद । निष्प्रभ तो जे मनचांद । तेव्हां मुकुलित करणवृंद । जेवीं कुमुद भगोदयीं ॥६००॥
एकादशेंद्रियें स्तिमित । जाला विरिंचि तटस्थ । जागृदवस्थाही विस्मृत । भ्रमोपहत स्वाज्ञानें ॥१॥
तेणें गोगोचरां जाला अस्त । स्मृतीही नुपलभे प्रशस्त । पडलें विचारा ताटस्थ्य । स्वास्थ्य अस्वास्थ्य स्फुरेना ॥२॥
पाहतां पुरुषोत्तमाच्या धामा । ऐसा तटस्थ ठेला ब्रह्मा । शुकादिकीं त्या दिधली उपमा । श्रोत्यां सत्तमां तें कथितों ॥३॥
व्रजपुरीची अधिष्ठात्री । कृष्णनामका स्वधामगात्री । देवता स्वर्चित त्रिजगतीं । तेव ब्रह्मा पुत्री काष्ठमय ॥४॥
व्रजपुरीचे देवतेसमीप । चतुर्मुख पुतळी कृत्रिमरूप । लिखित किंवा जैसें लेप । भासे अल्प अचेष्ट ॥६०५॥
ऐसा उगाचि चाकाटला । आश्चर्यें विस्मयापन्न ठेला । देखोनि मोहावर्ती पडला । प्रभू कळवळिला जनकत्वें ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : April 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP