अध्याय १३ वा - श्लोक १२ ते १५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


भारतैवं वत्सपेषु भुंजानेष्वच्युतात्मसु । वत्सास्त्वंतर्वने दूरं विविशुस्तृणलोभितः ॥१२॥

केवळ अच्युत आत्मा ज्याचा । ऐसा समुदाय वत्सपांचा । जेवीत असतां अंतरायाचा । झाला साचा प्रारंभ ॥२२०॥
वत्सें भुलोनि वनांतरीं । तृणार्त भरलीं दुरीच्या दुरी । तेणें वत्सपांतरीं । शंका उभारीं भयातें ॥२१॥

तान्दृष्ट्वा भयसंत्रस्तानूचे कृष्णोऽस्य भीभयम् । मित्राण्याशान्मा विरमतेहानेष्ये वत्सकानहम् ॥१३॥

भयें त्रासले जाणोनि सखे । त्यांसि श्रीकृष्ण बोले मुखें । तुम्हीं जेवावें स्वानंदसुखें । मी वत्सकें आणितों ॥२२॥
भोजनक्रीडेचा मांडला रस । दुश्चित होऊनि किजे विरस । वत्सें आणितों माना तोष । अर्धनिमेष न भरतां ॥२३॥
दूरी जातां वत्समेळ । कां पां भयें त्रासले सकळ । तरी एथींचा अर्थविवळ । श्रोते कुशल परिसोत ॥२४॥
अघबकादि अनेक जंत । वनीं वत्सपां असतां विदित । दूरी जातां हरि विरहित । तेही भयभीत संवगडे ॥२२५॥
तें जाणोनि अंतर्वेत्ता । भवभयाचा ग्रासभर्ता । भयासीही जो भयकर्ता । तो निज भक्तां आश्वासी ॥२६॥
जितुकीं भयाचीं कारणें । तितुकीं पळती कृष्णस्मरणें । प्रत्यक्ष तेणें स्वभक्तरमणें । अभय ओपणें संवगडियां ॥२७॥
भयाचीं कारणें म्हणाल कोण । तरी कामक्रोधादि जे दुर्गुण । भेदा निरसी जैं कृष्णस्मरण । निर्भय पूर्ण तैं विश्वा ॥२८॥
मुळींच्या श्लोकीं तृतीयचरणीं । अधिक अक्षरें बादरायणि । बोलिला ते आर्षवाणी । दूषण कोणीं न मानावें ॥२९॥

इत्युक्त्वाऽरिदरीकुंजगह्वरेप्वात्मवत्सकान् । विचिन्वन् भगवान्कृष्णः सपाणिकवलो ययौ ॥१४॥

शंका सांडूनि निश्चळ । निर्भय जेवा तुम्ही सकळ । मी आणितों वत्समेळ । म्हणोनि गोपाळ उठिला ॥२३०॥
ऐसें बोलोनि चक्रपाणि । दध्यन्नकवळें सहित पाणी । जाता झाला गिरिकाननीं । वत्सश्रेणि हुडकित ॥३१॥
दरे दरकुट्या अवघड विपिनें । दुर्गम विवरें गुहा गहनें । लतापिहितें निगूढ स्थानें । दुर्घट वनें हुडकीतसे ॥३२॥
श्रीकृष्नें जो अघासुर । मर्दूनि केला तदुद्धार । अनेक उत्साहकरितां अमर । तो ऐकोनि गजर विधाता ॥३३॥
आश्चर्य मानूनि पातला गगनीं । अद्भुत श्रीकृष्णाची करणी । ईश्वरी महिमा पाहोनि । विस्मय पावोनि राहिला ॥३४॥
तंव श्रीकृष्ण वत्सें गिंवसी । वत्सप गुंतले भोजनासी । पाहोनि ऐशिये संधीसी । माया वैधसी मांडिली ॥२३५॥

अंभोजन्मजनिस्तदंतरगतो मायार्भकस्येशितुर्द्रष्टुं मंजुमहित्वमन्यदपि तद्वत्सानितो वत्सपान् ।
नीत्वाऽन्यत्र कुरूद्वहांतरदधात्खेवऽस्थितो यः पुरा दृष्ट्वाऽधासुरमोक्षणं प्रभवतः प्राप्तः परं विस्मयम् ॥१५॥

अंभापासूनि जन्म पद्मा । पद्मापासूनि जन्मला ब्रह्मा । अंभोजन्मजनि या नामा । ऐशी गरिमा श्लोकोक्त ॥३६॥
तये संधीसी तो विरिंचि । मायामनुष्यअर्भकांची । बुंथी घेतली त्या कृष्णाची । आणिकी महिमा पहावया ॥३७॥
चरतां वत्सें हरिलीं वेगें । गोवळ हरिले कृष्णामागें । स्वधामा नेलीं मायायोगें । होऊनि निजांगें अदृश्य ॥३८॥
ज्यापासूनि आपुला प्रभव । त्या कृष्णाचें हें विभव । अघासुरमोक्षादि लाघव । पाहोनि सर्व विस्मित ॥३९॥
पूर्वींच गगनगर्भीं ब्रह्मा । अघमोक्षादि कृष्णमहिमा । पाहोनि पुढती धरिला प्रेमा । हरीची गरिमा पहावया ॥२४०॥
वत्सें वत्सपवर्ग नेला । स्वयें अदृश्य होऊनि ठेला । शुकें हा वृत्तांत नृपा कथिला । पुढती केला सन्मुख ॥४१॥

N/A

References : N/A
Last Updated : April 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP