अध्याय १३ वा - आरंभ

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


श्रीकृष्णपरमात्मने नमः ।
गोविंदसद्गुरु मायाहरणा । मायाश्रया मायाभरणा । मायावरणनिवारणा । मायातीता तुज नमो ॥१॥
गोशब्दार्थें वाच्य वेद । तदभिज्ञ तूं वेदविद । अभिन्न गोगोप्ता गोविंद । भेदाभेद विवर्जित ॥२॥
तवावलोकनें माया । ज्ञानाज्ञानें आणी उदया । तदविकृता पुरुषद्वया । सोडवावया समर्थ तूं ॥३॥
वाक्यार्थमानें वेदोत्तमांगें । जैं माया उमाणूनि पहाणें लागे । तैं शब्दापुरती तरी जागे । भिन्न मार्गें म्हणों कां ॥४॥
तरी शब्दासकट माया उडे । उडोनि गेली कोणीकडे । ऐसें पाहतां निजनिवाडें । तंव तुजमाजि बुडे भेदेंसी ॥५॥
म्हणोनि अमायिकासमायिकां । नमो स्वानंदसुखदायका । मायाभिमानियां मायिकां । विमोहकां निर्मोहा ॥६॥
माया पसरूनि ओसरीसि । हेही क्रिया स्पर्शो नेदेसी । ऐसा कांहींच तूं होसी । नहोनि होसी अवघें तूं ॥७॥
तुज नेणतां अवघें करणें । तुवां वेधितां नुरती करणें । नुमजे करणें कां न करणें । ऐसें करणें तव वेधें ॥८॥
नेणती वेधें चाळवीजती । ऐशा अनेक व्युत्पत्ति । परी जाणती जाणिवेपासूनि मुक्ति । ऐशी ख्याति पैं तुझी ॥९॥
तुझेनि बोधें होय वेडें । कीं ते वेडीव बाहेर पडे । यया अनुमजाचीं कवाडें । लावूनि बापुडें जग वागे ॥१०॥
माया झालीच नाहीं मुळीं । ते तुज कैसेनि आकळी । या लागीं तूं स्वबोधशाली । निष्कामलेकिकंदर्पु ॥११॥
निरावलंबी नाकळे मन । म्हणोनि करिती लयलक्षध्यान । ते भ्रमाक्त अंध अज्ञान । भ्रमें आडरान वरपडले ॥१२॥
कायिकां तवपादभजनावलंब । नामामृताचा वाचेसी लाभ । अवस्थामात्रीं सप्रेम कोंभ । मानसीं बिंब ध्यानाचें ॥१३॥
यया साधनीं एकनिष्ठ । तयासी कायसे साधनकष्ट । उभयतां परस्परें प्रविष्ट । दृष्टादृष्ट सुख भोगी ॥१४॥
येणें समाधि न पवे मन । ते ते समाधिच म्हणजे शून्य । वेदशास्त्रादि जें जें प्रमाण । अप्रमाण अवघें तें ॥१५॥
म्हणोनि ऐसिये असंभावनें । शुद्ध साधकीं नातळणें । येर मायिकजनपेखणें । इयें लक्षणें त्यां जोगीं ॥१६॥
म्हणोनि कल्पद्रुमाचे साइ । मज बैसतां दुर्लभ कायी । मना सिद्धीची नवाई । सद्गुरुपायीं पूर्णत्वें ॥१७॥
तंव सद्गुरु म्हणती स्तवन पुरे । तुझीं ऐकोनि प्रेमोत्तरें । पूर्ण कृपेचें भरतें भरे । तें नावरे मर्यादे ॥१८॥
वत्सापरी चाटूं तुज । कीं पाखीं कवळूं जेंवी अंडज । कीं कृपापांगीं कमठओज । मुखांभोज निरखितां ॥१९॥
ऐसें म्हणतां नेत्रवाटीं । आनंदाश्रु करिती दाटी । कृपामृताचें भरतें पोटीं । तें नयनपाटीं लोटलें ॥२०॥
पुलकरोमांच कंप स्वेद । बाह्य वसनीं तरंगे विशद । सात्त्विकां बुद्धि अमर्याद । भरतां शब्द बुजाला ॥२१॥
स्फुंदनाचे कल्लोळ दाट । सद्गद गर्जे तेणें कंठ । ऐसे सात्त्विक भाव आठ । झाले प्रकट कारुण्यें ॥२२॥
तंव येरीकडे ही तेचि दशा । पात्र होतां कृपापीयूषा । ज्ञप्ति विरोनि बुजाला घसा । मार्गश्वासा न फुटेची ॥२३॥
चरणकमळीं मौळ लोळे । नेत्र स्रवती आनंदजळें । ऐक्यसुखाचेनि मेळें । मिठी नुखळे मागुतीं ॥२४॥
तया सात्त्विकाचेनि मिसें । पूर्ण कृपेच्या वोरसें । मूस ओतिली स्वानंदरसें । ग्रंथार्थ दशे उमटावया ॥२५॥
मग ते जिरवूनि अवस्था कृपेनें अवघ्राण करूनि माथां । सावध म्हणे रे वत्सा आतां । आरब्धग्रंथा वाखाणीं ॥२६॥
दशमामाजी त्रयोदश । वत्सहरणकथा रहस्य । निर्मळ श्रोत्यांचें मानस । तेथें प्रवेश त्या करीं ॥२७॥
करूनि अघाचें विमोक्षण । वत्सें वत्सपां सहित कृष्ण । सरोवरपुलिनीं करितां भोजन । वत्सहरण करी विधि ॥२८॥
वत्सें आणि वत्सपगण । स्वमाया पसरूनि हरी द्रुहिण । ऐसें जाणोनि श्रीकृष्ण । झाला आपण अवघेंचि ॥२९॥
वत्सें वत्सप सलंकृत । कृष्नचि होऊनि अब्दपर्यंत । व्रजीं विचरला पूर्ववत । केला मोहित विरंचि ॥३०॥
इतुकी कथा त्रयोदशीं वाखाणिजे आज्ञेसरिसी । ऐसें म्हणतां पादस्पर्शीं । निजमानसीं लवलाहें ॥३१॥
लाहोनि आज्ञेचा आधार । जैसा चापींचा सुटे शर । प्रमेयगगनीं करी संचार । तेंवी सत्वर दयार्णव ॥३२॥
पांचवे वर्षीं अघ मर्दिला । सहावे वर्षीं व्रजीं कथिला । ऐकोनि नृपा विस्मय झाला । प्रश्न केला तच्छ्रवणीं ॥३३॥
त्या प्रश्नाचें प्रत्युत्तर । वक्ता श्रीशुक योगींद्र । श्रोतीं होऊनि पंक्तिकार । अतिसादर सेवावें ॥३४॥
दयार्णवाची इतुकी विनंती । कृष्णप्रेमा लाहोनि श्रोतीं । विषयीं उपजोनि विकृति । कैवल्यसंपत्ति साधावी ॥३५॥

N/A

References : N/A
Last Updated : April 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP