अध्याय १३ वा - श्लोक ११

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


बिभ्रद्वेणुं जठरपटयोः श्रृंगवेत्रे च कक्षे वामे पाणौ मसृणकवलं तत्फलान्यंगुलीषु ।
तिष्ठन्मध्ये स्वपरिसुहृदो हासयन्नर्मभिः स्वैः स्वर्गे लोके मिषति बुभुजे यज्ञभुग्वालकेलिः ॥११॥

तया आश्चर्याची हेचि थोरी । यज्ञभोक्ताही जो हरि । तो वत्सपांमाजीं भोजन करी । बालकांपरी हें नवल ॥७१॥
बालकापरी क्रीडा ज्याची । आळी पुरवी वत्सपांची । त्यांसी आपुले सिदोरीची । दावी रुचि रुचिकर ॥७२॥
आपुले सिदोरीचे ग्रास । द्यावयालागीं संवगडियांस । कैसा ठेवेला हृषीकेश । तो क्रीडावेष अवधारा ॥७३॥
श्याम राजीवलोचन । आजानुबाहु मृगांकवदन । प्रेमें पाहतां रुपती नयन । वेधे तनुमन त्रिजगाचें ॥७४॥
खद्योत रत्रें दीपादि दीप्ति । सूर्यापुढें लोपोनि जाती । तेवीं हरिप्रेमा जे आत्मरति । त्याहूनि आरुती भवस्निग्धें ॥१७५॥
स्वजन सुहृद वृत्ति क्षेत्र । कर्म धर्म पुत्र कलत्र । अर्थ स्वार्थ विषयमात्र । हे स्नेहविचित्रे भवभ्रांति ॥७६॥
शरीरमात्र मानिती आत्मा । त्या हा भवसुखाचा गोंवी प्रेमा । तेथ प्रकटल्या परमात्मा । मिथ्याभवभ्रमा कां भुलती ॥७७॥
एवं कृष्णीं तनु मन नयन । गुंतती यांचें नवल कोण । सप्रेम करितां कृष्णस्तवन । नाठवे भान भवाचें ॥७८॥
जठरवेष्टित तगटीपट । वेणु त्यामाजीं खोवूनि निट । वामभागींचें कक्षीपूट । तेथ धरी बळकट श्रृंग वेत्र ॥७९॥
सुस्निग्ध ध्यानाचा कवळ । वामहस्तीं घे गोपाळ । रुचिकर लोणचियांचा मेळ । धरी अंगुलसंधीसी ॥१८०॥
कमलकर्णिका श्रीकृष्णपीठ । भंवतीं पत्रें जैसीं प्रकट । तैसे संवगडे उपविष्ट । पंक्ति भूयिष्ठ हरिमुखा ॥८१॥
अवघे पाहती श्रीकृष्णमुख । कृष्ण अवघियां सन्मुख । परिहासवचनीं सकौतुक । उपजवी सुख संवगडियां ॥८२॥
कित्येक रहस्यपद्धति । अर्चा अध्वर तांत्रिक रीती । कथिल्या ईश्वरें पार्वती । ते ते प्रवृत्ति तच्छास्त्रीं ॥८३॥
तो हा लोकत्रयीं प्रकट । स्वयें क्रीडे कंबुकंठ । स्वैर म्हणोनि दूषिती श्रेष्ठ । वत्सप न नट तद्व्याजें ॥८४॥
पहात असतां स्वर्गवासी । निबिड विमानीं आकाशीं दिव्य फणी जे पातालवासी । देवपंक्तीसी ते असती ॥१८५॥
ऐसे समस्त सुरवर । गण गंधर्व यक्ष किन्नर । पाहत असतां आश्चर्यपर । सिद्ध मुनिवर वसु साध्य ॥८६॥
मृत्युलोकीं प्रकट जनीं । वत्सपेंशीं चक्रपाणि । जेवीं लेवूनि गवसणी । गोपशैशव नाट्याची ॥८७॥
तेथील जेवणाची परी । झाली त्रिजगाची उपकारी । ते तूं सविस्तर अवधारीं । कुरुधरित्री पालका ॥८८॥
ब्रह्मयासी अनुग्रहकर । स्वयें होऊनि वत्सें कुमार । झाला शेषासी रुचिकर । कृष्णावतार वर्णावया ॥८९॥
गडी पहाती कृष्णवदन । तंव करीं घेऊनि दध्योदन । माझे हस्तींचें कवळदान । मुख पसरून सेवा रे ॥१९०॥
त्वंपदाचे तुम्ही ग्रास । आधीं अर्पिले मज निःशेष । माझ्या तत्पदकवळें तोष । तुम्ही विशेष पावा रे ॥९१॥
ऐसें म्हणतां श्रीपाळ । मुखें पसरूनि तत्पर सकळ । मुखीं पडतां श्रीकृष्णकवळ । सुखसुकाळ सर्वांसी ॥९२॥
बोधसुस्निग्धदध्योदन । रुचिकर चतुष्टय साधन । लवण शाका नाहंलवण । तेणें जेवण बहुगोड ॥९३॥
शुद्धसत्त्वाचें ज्ञान आलें । सर्वज्ञतेसी तीक्ष्ण भलें । विनयलवणेंशीं रापलें । मुखीं घातलें श्रीकृष्णें ॥९४॥
कांहींच उरलें नाहीं आम्हां । काय अर्पावें पुरुषोत्तमा । तंव त्यां बोलिला सुदामा । म्हणे या वर्मा ऐका रे ॥१९५॥
आपुलें सर्वस्व अर्पिल्या हरि । उरली हरीची जे सिदोरी । ते आपुलीच अवघी खरी । हें अंतरीं समजा रे ॥९६॥
हरीसि वंचूनि कांहीं एक । कृष्ण कवळासी पसरी मुख । तोचि निराजिरा कामिक । दवडा निष्टंक एथूनि ॥९७॥
कृष्णकरीचा दध्योदन । झोंबोनि घ्यारे अवघेजण । तोचि करूनि कृष्णार्पण । मग संपूर्ण सुख भोगा ॥९८॥
ऐसें ऐकोनिया वचन । म्हणती भलारे भला धन्य । बरवी सांगितली खुण । सुखसंपन समस्त ॥९९॥
एक म्हणती आम्हीं दिनें । अर्पूनि ममतेचीं कदन्नें । घ्यावीं कृष्णाचीं सदन्नें । कोणा न माने हे गोडी ॥२००॥
हें ऐकोनि म्हणे हरि । आपुली सांभाळा सिदोरी । कांहीं नसतां माझे करीं । झोंबोनि भाकरी घ्या माझी ॥१॥
तंव ते जाळिया संभाळिती । नवविध सदन्नें देखती । म्हणती कृष्णा तुझी ख्याती । अन्नें नव्हतीं पाहिलीं हीं ॥२॥
ज्या अन्नाची देखोनि गोडी । बळेंचि कृष्ण घाली उडी । पाठीं लागे जेवीं बराडी । दगडीं लांकडीं प्रकटोनि ॥३॥
म्हणती कृष्णा तुझीच करणी । केलीं सदन्नें जाळियाभरणीं । तुझें अर्पूनि तुझ्या वदनीं । अंतःकरणीं सुख भोगूं ॥४॥
मग श्रवणामृताचे सप्रेमळ । कृष्णमुखीं घालिती कवळ । बाधे दध्योदन निर्मळ । अर्पी गोपाळ त्या वदनीं ॥२०५॥
एक कीर्तनरसाची गोडी । परस्परें रुचिकर गाढी । भोक्ता म्हणोनि कृष्णतोंडीं । लाविती गडी स्वानंदें ॥६॥
सर्व साक्षित्वाचा ग्रास । कृष्णें घालितां मानिती तोष । गिळूनि म्हणती हरि सारांश । तृप्तिमात्रचि एथींची ॥७॥
स्मरणसुखाची सुरस चवी । कृष्णा दावूनि कोणी गोवी । कोणी पादसेवन भावी । चवी चाखवी सप्रेमें ॥८॥
अर्चनरसाच्या परवडी । लाविती श्रीकृष्णासी गोडी । नमन नम्रता साकार तोंडीं । घालिती गडी मिष्टत्वें ॥९॥
एक दास्याच्या शिखरणी । उंच नीच दास्याचरणीं । कृष्णार्पणीं तोषिती ॥२१०॥
एक सख्यत्वें श्लाघेजती । आम्ही अभिन्नें कृष्णीं म्हणती । आमुची सिदोरी श्रीपति । अभेदस्थिति तूं भक्षीं ॥११॥
आत्मनिवेदन एकवाट । होऊनि म्हणती तुजसकट । जेऊनि धालें आमुचें पोट । हरले कष्ट भेदाचे ॥१२॥
एकाकडे कवळ दावी । तो जंव त्यासि मुख ओडवी । कृष्ण त्यांसि वांकुल्या दावी । आणिका भरवी तो कवळ ॥१३॥
शांतिक्षमेचे घेतां कवळ । कृष्णासि धालों म्हणती सकळ । एक म्हणती उताविळ । आम्ही भुकाळ प्रेमाचे ॥१४॥
वत्सप आणि श्रीमुरारि । त्वंपद तत्पद परस्परीं । कवळ गिळूनि एकाकारीं । सुखशेजारीं क्रीडती ॥२१५॥
नाना उपहास नर्मोक्ति । तोषवर्धक बोलताति । कृष्णाकार ऐक्यस्थिति । भेदभ्रांति हरपली ॥१६॥
वत्सपांचा अविद्याकवळ । कृष्णें ग्रासिला तत्काळा । माया कवळा गिळितां बाळ । विघ्नकल्लोळ उदेला ॥१७॥
तया विघ्नांची निवृत्ति । करूनि पुनरपि श्रीपति । वत्सपेंशीं एक पंक्ति । पावती तृप्ति असिपदीं ॥१८॥
ते एथून अपूर्व कथा । परिसें सभाग्य भारता । जिच्या श्रवणें यातायाता - । पासूनि श्रोता दुरावे ॥१९॥

N/A

References : N/A
Last Updated : April 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP