अध्याय १३ वा - श्लोक ५८ ते ६४

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


ततोऽर्वाक्प्रतिलब्धाक्षः कः परेतवदुत्थितः । कृच्छ्रादुन्मील्य वै दृष्टीराचष्टेदं सहाऽऽत्मना ॥५८॥

अविद्येची घालितां बुंथी । विश्वाभिमानात्म जे स्मृति । लाहोनि पूर्ववत जागृति । क्लेशें पातीं उघडलीं ॥६२॥
अर्वाक म्हणिजे ऐलिकदे । स्वरूपापासुनि विषयचाडें । पाठिमोरीं करूनि तोंडें । करणकवाडें उघडलीं ॥६३॥
ऐसा ब्रह्मा प्रतिलब्धाक्ष । ज्ञान लाहुनि परोक्ष । क्रियाचरणीं होऊनि दक्ष । प्रवृत्तिपक्ष अवलंबी ॥६४॥
मृत्यु पावोनि जाला प्रेत । तो जेवीं उठे अकस्मात । पाहे होऊनि विस्मित । करणसंघात लाहूनि ॥६६५॥
आपणासहित चराचर । हें देखिलें जे सविस्तर । दो श्लोकीं तें व्यासकुमार । सांगे विचार विवरूनि ॥६६॥

सपद्येवाभितः पश्यन् दिशोऽपश्यत्पुरः स्थितम् । वृंदावनं जनाजीव्यद्रुमाकीर्ण समाप्रियम् ॥५९॥

उघडुनि अष्टही नेत्रकमळें । भवतें अवलोकी एकेचि काळें । दिशाचक्र देखे पहिलें । आणि आपुलें शरीर ॥६७॥
स्मृतीनें आळंगिली बुद्धि । संकल्प चढला मनाचे खांदीं । चित्त पूर्वानुसंधान साधी । आगमनसिद्धि किमर्थ हे ॥६८॥
पाहों आलों कृष्णमहिमा । तोचि कीं एथ मी हा ब्रह्मा । हंसपृष्ठीमाजीं व्योमा । पावोनि भ्रमा उमजलों ॥६९॥
सर्व जनासी जीवनरूप । ज्या माजी निबिड सत्पादप । ज्यांचेनि कल्पद्रुमाचा लोप । जे परम सकृप सफळित ॥६७०॥
सर्वत्र सुखतम सर्वांप्रति । सर्व ऋतूचीं फळें फळती । सर्वां जंतूंसि विश्रांति । प्रियतम चित्तीं सर्वदा ॥७१॥
विशेष विरिंचि आपुल्या नयनीं । आश्चर्य देखे पूर्विलाहूनि । तेचि परीक्षितीचे श्रवणीं । बादरायणि निवेदी ॥७२॥

यत्र नैसर्गदुर्वैराः सहासन्नृमृगादयः । मित्राणीवाजितावासद्रुतरुट्तर्शकादिकम् ॥६०॥

सर्वत्र सर्वांसि प्रियतम असे । पूर्विलाहोनि विशेष जैसें । वाखाणिजेल ऐका तैसें । स्वस्थ मानसें नावेक ॥७३॥
जातिस्वभाव वैरभाव । सांडूनि प्राणिमात्र सर्व । मित्रापरी क्रीडती जीव । हें अपूर्व कुरुवर्या ॥७४॥
गज केसरी कुरुवाळिती । व्याघ्र धेनूसी चाटिती । मशक मार्जार एकत्र वसती । स्तनें पाजिती परस्परें ॥६७५॥
मंडूक पंडिताचिया श्रेणीं । गजर करिती दीर्घध्वनीं । चक्षुश्रवे त्या कीर्तनीं । आनंदोनि डुल्लती ॥७६॥
पन्नग नकुळें आलिंगनें । देती सप्रेमें चुंबनें । अजा अविकां कंडुयनें । स्नेहाळपणें वृक करिती ॥७७॥
भस्म संरक्षी जेवीं अग्नि । तैसा बुडवूनि ठेविजे जिवनीं । तैं न विझवी त्या लागूनि । हें अपूर्व नयनीं विधि देखे ॥७८॥
मनुष्यासि सर्पादिक । करी केसरी व्याघ्र वृक । स्नेहें वर्तती वृश्चिकादिक । प्रेमपूर्वक परस्परें ॥७९॥
जातिस्वभाव विसरोनि प्राणी । सप्रेम क्रीडती स्नेहाळपणी । हें अपूर्व पाहोनि नयनीं । अंतःकरणी विधि विवरी ॥६८०॥
हें व्हावया कारण काय । ऐसें विवरूनि विरिंचि पाहे । तंव तेथें न देखे समुदाय । शत्रुवर्यषट्कांचा ॥८१॥
द्वेष क्रोध मोह शोक । मद मत्सर लोभ प्रमुख । ईर्षा तर्षोत्कर्षादिक । एकें एक पळाले ॥८२॥
क्रीडाभिमान चौघां शिरीं । चढोनि अक्षादि व्यवहारीं । मारिती मरती निजीवां सारीं । तेवीं षड्वैरी प्राण्यातें ॥८३॥
इहीं रिघोनि शरीरामाजीं । प्राणियासि अनिष्ट काजीं । प्रेरूनि दुःखाच्या साम्राज्यीं । स्वभावगजीं बैसविती ॥८४॥
एथूनि पळाले ते सर्व । हेंचि वाटतें अपूर्व । न कळे कोण्या कारणास्तव । हें लाघव व्रजविपिनीं ॥६८५॥
पुढती विवरूनि निश्चय करी । विभु अवतरला व्रजपुरीं । त्याच्या निवासाची थोरी । तेणें षड्वैरी पळाले ॥८६॥
ज्याच्या निवासवसतिभेणें । षड्वैर्‍यांचें उठणें । म्यांही ज्याचेनि दर्शनें । हें पेखणें अवगमिलें ॥८७॥
त्या विभूचेंही जें विभुत्व । जें कां निर्गुणपरमतत्त्व । श्रुति म्हणती ज्या अमृतत्व । तें परब्रह्म शिशुत्व अवगलें पुन्हा ॥८८॥

तत्रोद्वहत्पशुपवंशशिशुत्वनाट्यं ब्रह्माद्वयं परमनंतमगाधबोधम् ।
वत्सान्सखीनिव पुरा परितो विचिन्वदेकं सपाणिकवलं परमेष्ठ्यचष्ट ॥६१॥

तें ब्रह्म ते वृंदावनीं । पशुपवंशींची अवगणी । शिशुत्वाची संपादणी । ब्रह्मा नयनीं अवलोकी ॥८९॥
नंदगोपाचा नंदन । हातीं पूर्ववत् दध्योदन । वत्सां वत्सपांलागून । हुडकी वन यथापूर्व ॥६९०॥
नाट्य म्हणावें किमर्थ । तरी येथिचा ऐसा अर्थ । स्वरूप लोपवूनि यथार्थ । नटला स्वार्थ संपादी ॥९१॥
यथार्थ काय कोणतें सोंग । श्लोकीं शुक हें बोलिला साङ्ग । त्या त्या पदाए विभाग । परिसा अव्यंग चतुरहो ॥९२॥
अगाध बोध हें वास्तव । तो हुडकी हे नाट्यभाव । अद्वय आणि वत्ससमुदाव । शोधी लाघव हें सोगाचें ॥९३॥
सूर्य आंधारीं चाचपडे । खद्योत दीपादि उजिवडें । वाट हुडकी तेणें पाडें । अगाध बोधा हुडकणें ॥९४॥
अमृत आणि दुखण्या पडलें । सरोगा ओखद पुसों गेलें । औषधीचें हुडकी पालें । त्यांच्या बोलें हें तैसें ॥६९५॥
अगाधबोध वत्सें गिंवसी । हे संपादणी नाट्या ऐशी । येर्‍हवीं ज्ञानस्वरूपासि । कोणेविषीं नेणपणा ॥९६॥
अद्वयासी कैंचें दुसरें । तोही परिमार्गी वांसुरें । निःसंग आला सहपरिवारें । म्हणतां स्वउत्तरें लाजविती ॥९७॥
एक म्हणोनि प्रशंसिलें । तेणें संवगडियां गिंवसिलें । म्हणतां सोंगसें दिसोनि आलें । ब्रह्म एकलें सत्यत्वें ॥९८॥
अनंत ज्यासी म्हणणें घडे । आणि तो हुडकी सर्वांकडे । हें बोलणेंचि असें घडे । बोलतां वेडें लागतसे ॥९९॥
अनंतासि नाहीं अंत । त्याभोंवता कैंचा प्रांत । तो वत्सांवत्सपां हुडकीत । हे अवधी मात नाट्य कीं ॥७००॥
पर म्हणोनि निर्धारिलें । तेंचि शिशुत्व पावलें । हें विडंबन मात्र जालें । न पवे बोलिलें सत्यत्वें ॥१॥
यद्गत्वा न निवर्तंते । तें परम धामा बोलिजेतें । तेंचि शिशुत्व जरी पावतें । तरी गेलें न परते केवीं तेथें ॥२॥
कल्पतरूचि मागे भिक । तैं कल्पनावंता कैंचें सुख । तैसें परची जैं होय बालक । तेथें मीनले साधक न फिरती कां ॥३॥
जें परात्पर मायातीत । तेथें कैंचें गुणाचें कृत्य । त्यासी शिशुत्वादि अवस्था प्राप्त । हें अद्भुत हरिनाट्य ॥४॥
ब्रह्म आणि कवळपाणि । हेही अघटित संपादणी । ब्रह्म भुकेलें म्हणोनि । घे स्वपाणी अन्न ब्रह्म ॥७०५॥
एवं ब्रह्म नित्य निघोट । मायोक पशुपशिशुत्वनाट्य । हें निर्धारूनि चतुर्मुकुट । नमन सोत्कंठ जाहला ॥६॥

दृष्ट्वा त्वरेण निजधोरणतोऽवतीर्य पृथ्व्यां वपुः कनकदंडमिवानिपात्य ।
स्पृष्ट्वा चतुर्मुकुटकोटिभिरंघ्रियुग्मं नत्वा मुदश्रुसुजलैरकृताभिषेकम् ॥६२॥

वास्तव आणि नाट्य कल्प । भगवन्महिमा एवंरूप । देखोनि विरिंचि सकंप । मानी अल्प आपणातें ॥७॥
सार्वभौमातें किंमात्र । देखोनि विकळ मृत्तीचें गात्र । तेवी ब्रह्म शंकापात्र । होऊनि स्वपत्र सांडीलें ॥८॥
नक्षत्र उलंडे गगनींहून । तेंवीं हंसातें सांडून । सवेग पृथ्वीसी देह पतन । करी सुवर्णदंडवत् ॥९॥
जेवीं कनकाचलें विष्णु । पूजिला साष्टांग करूनि नमनु । तेवीं हिरण्यगर्भरूपतनु । हंसावरूनि लोटिली ॥७१०॥
ऐसा मराळ सांडूनि दूरी । सुवर्णदंडाचिये परी । शरीर लोटूनि पृथ्वीवरी । नमी श्रीहरी सद्भावें ॥११॥
चरणयुगुळीं च्यार्‍ही मुकुट । भरूनि अष्टही नेत्रघट । आनंदाश्रुचा जललोट । तेणें पदातिपीठ अभिषेकी ॥१२॥

उत्थायोत्थाय कृष्णस्य चिरस्य पादयोः पतन् । आस्ते महित्वं प्राग्दृष्टं स्मृत्वा स्मृत्वा पुनः पुनः ॥६३॥

चार्‍ही मुकुट श्रीकृष्णचरणीं । पडिला चिरकाळ ठेवूनि । देखिला महिमा आठवूनि । नमी उठोनि पुनः पुनः ॥१३॥
उठोनि उठोनि सहस्रवरी । दंडप्राय प्रणाम करी । भगवन्महिमा परोपरी । स्मरे अंतरीं पुनः पुनः ॥१४॥

शनैरथोत्थाय विमृज्य लोचने मुकुंदमुद्वीक्ष्य विनम्रकंधरः ।
कृतांजलिः प्रश्रयवान् समाहितः सवेपथुर्गद्गदयैलतेलया ॥६४॥

श्रीकृष्णाहूनि आपण थोर । ऐसा होता अहंकार । त्यासि करूनी तिरस्कार । शुद्धाधिकार निवडिला ॥७१५॥
हळूचि उठोनि त्यानंतरें । परिमार्जिलीं नयनद्वारें । उभा राहूनि नम्र शिरें । कांपती गात्रें थरथरां ॥१६॥
चरणोन्मुख नम्र मूर्ध्नी । रक्षूनि सलज्ज ऊर्ध्व नयनीं । दृष्टि घाली मुकुंदवदनीं । संकोचूनि सर्वांगें ॥१७॥
स्वामी देखोनि पतिव्रता । सावरी अवयवां समस्तां । तैसा समाहित विधाता । सबाह्य होता जाहला ॥१८॥
मग जोडूनि अंजलिपुट । प्रेमें दाटलासे कंठ । गद्गदगिरा स्तोत्रपाठ । करूनि वैकुंठ तोषवी ॥१९॥
स्वेद रोमांच पुलक आंगीं । लेइला अष्टभावाची अंगीं । बेंबल पडोनि न राहे उगी । स्तवनप्रसंगीं गिरा वेंठे ॥७२०॥
ते विरिंचिमुखींचें वचन । भगवद्भक्तीचें महिमान । श्रवणमात्रें कैवल्यसदन । श्रोते सज्जन पावती ॥२१॥
ऐसें श्रीमद्भागवत । अठरासहस्रप्रमाणगणित । परमहंसीं रमिजे जेथ । स्कंध त्यांत दशम हा ॥२२॥
शुकपरीक्षितिसंवाद । वत्सहरण कथा विशद । महाराष्ट्रटीका हरिवरद । अभीष्टप्रद सर्वांसी ॥२३॥
आदिगुरु चिदाकाशीं । दत्तात्रेय ब्रह्मांडकोशीं । जनार्दन सूर्यप्रकाशीं । अज्ञाननिशी निरसूनि ॥२४॥
एकनाथ सुदिन झाला । चिदानंदें लोक धाला । स्वानंदसुखाचा सोहळा । गोगम्य केला गोविंदें ॥७२५॥
मग ते गोविंद कृपादृष्टि । विश्वीं वर्षोनि अमृतवृष्टि । त्रिजगा वोपूनि संतुष्टि । दयार्णव पुष्टि पावविला ॥२६॥
तेथील इयें शब्दमुक्तें । कंठश्रवणभूषणें ज्यातें । चार्‍हीमुक्ती वरती त्यातें । जाणोनि अर्थ समर्थ तो ॥२७॥
इतिश्रीमद्भागवतवत्सहरणे विरिंचिविभवदर्शननामत्रयोदशोध्यायः ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥६४॥ टीकाओंव्या ॥७२७॥ एवं संख्या ॥७९१॥ ( तेरावा अध्याय मिळून ओवीसंख्या ॥७६००॥ )

तेरावा अध्याय समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : April 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP