अध्याय १३ वा - श्लोक ४७ ते ५१

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


चतुर्भुजाः शंखचक्रगदाराजीवपाणयः । किरीटिनः कुंडलिनो हारिणॊ वनमालिनः ॥४७॥

घनःशाम चतुर्भुज । शंख चक्र गदा कंज । किरीट कुंडलें दिव्यस्रज । वनमाळादि वैजयंति ॥४८५॥

श्रीवत्सांगददोरत्नकंबुकंकणपाणयः । नूपुरैः कटकैर्भाताः कटिसूत्रांगुलियकैः ॥४८॥

श्रीवत्सचिन्हें वक्षस्थळीं । रत्नागदें बाहुयुगुलीं । रत्नखचित वलयावळि । कंबुप्राय त्रिकोण ॥८६॥
पादभूषणें नुपूरें कटकें । अमूल्य मेखळा अंगुलीयकें । ठाणमाणें सामुद्रिकें । सकौतुकें भ्राजिष्ठ ॥८७॥
ऐसे लावण्यशुणगंभीर । अवघे समान सुंदर । देखोनि भारतीचा वर । काय विचित्र देखतसे ॥८८॥

आंघ्रिमस्तकमापूर्णास्तुलसीनवदामभिः । कोमलैः सर्वगात्रेषु भूरिपुण्यवदर्पितैः ॥४९॥

आपादमस्तक तुळसीमाळा । नवमंजरी सुकोमळा । पुण्यबहळी सर्वां गळां । सुपरिमळा अर्पिल्या ॥८९॥
तिहीं करूनि तेजःपुंज । दिसती अवघेचि अधोक्षज । सस्मित अवलोकनांची वोज । पाहे कंजज तें ऐका ॥४९०॥

चंद्रिकाविशदस्मेरैः सारुणापांगवीक्षितैः । स्वकार्थानामिव रजःसत्त्वाभ्यां स्रष्टृपालकाः ॥५०॥

शरच्चंद्राची कौमुदी । तैशी स्मितभा विलसे रदीं । अरुणापांगें क्षणीं विशदीं । जैसे हरिविधि भ्राजिष्ठ ॥९१॥
अरुणापांग ते राजस । सत्त्वप्रभा श्वेत हास्य । स्वभक्त सृष्टिस्थितीचे ईश । विधिरमेश भासती ॥९२॥
भक्तां भजनेच्छा उत्पत्ति । करूनि विघ्नीं संरक्षिती । उभय कार्यीं उपमीजती । स्मितापांग सीतरक्त ॥९३॥
ब्रह्मा स्वकार्य अपांगपातीं । स्वतहा तत्कार्य ज्याचे स्मितीं । देखोनि तटस्थ ठेला चित्तीं । पाहे पुढतीं आश्चर्य ॥९४॥

आत्मादिस्तंबपर्यंतैर्मूर्तिमद्भिश्चराचरैः । नृत्यगीताद्यनेकार्हैः पृथक्पृथगुपासिताः ॥५१॥

आपणांपासून तृणपर्यंत । ब्रह्मा पाहे आपणासहित । चराचर मूर्तिमंत । उपासीत पृथक्त्वें ॥४९५॥
विरिंचि आणि रुद्रगण । इंद्रेसहित मरुद्गण । आदित्य वसु साध्य संपूर्ण । ग्रह उडुगण सचंद्र ॥९६॥
विश्वेदेव अश्विनी देव । यक्ष किन्नरगण गंधर्व । सिद्ध चारण गुह्यक सर्व । सर्प मानव खेचर ॥९७॥
चारी खाणी पृथक्योनि । लक्ष चौर्‍यायशीं त्रिभुवनीं । तितुके सपर्या घेऊनि । पृथक् होऊनि पूजिती ॥९८॥
व्यंकटेशीं पांडुरंगीं । अनंतशयनीं श्रीरंगीं । पर्वयात्रा भक्तिसुभगीं । सांगोपांगीं ज्यापरी ॥९९॥
पत्रें पुष्पें फळें जळें । अनुलेपन सुपरिमळें । अमृतोपमें अन्नें बहळें । अर्चासोहळे बहुविध ॥५००॥
वाद्य गीत नृत्यलास्य । तानमानादि नव रस । स्तुति स्तोत्र मंत्र घोष । पुष्पवृष्टि करिताती ॥१॥
तेवी एकएक मूर्तीपाशीं । ब्रह्मादि अखिल चराचरेंसी । पूजनीं तत्पर उपचारेंसी । देखोनि मानसीं चाकाटे ॥२॥
ब्रह्मा आपण आपुल्या मूर्ती - । सहित सर्व चराचरव्यक्ति । उपचारेंसी उपासिती । हें देखोनि चित्तीं ठकावला ॥३॥
आपण सृजिलें जें जें समस्त । चराचरात्मक मूर्तिमंत । ते अनेकत्वें उपासीत । मूर्ति अनंत विभूच्या ॥४॥
सृष्टीपूर्वीं अनादि सिद्ध । त्याही मूर्ति देखे विविध । तेणें होऊनि ठेला स्तब्ध । लपनीं शब्द फुटेना ॥५०५॥
एक माझा ब्रह्मांड घट । तें हें अवघेंचि विराट । एथ अनेक ब्रह्मांड घट । अनंत वैकुंठ अर्चिती ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : April 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP