अध्याय १३ वा - श्लोक १६ ते १९

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


ततो वत्सानदृष्ट्वैत्य पुलिनेऽपि च वत्सपान् । उभावपि वने कृष्णो विचिकाय समंततः ॥१६॥

ऐकें कुरूद्वहा भूपति । त्यानंतरें जगत्पति । जाणोनि वत्सांची अप्राप्ति । आला पुढतीं पुलिनासी ॥४२॥
तव तेथ न देखेची गडी । वत्से शोधावया तांतडी । गेले असती लवडसवडी । म्हणोनि धुंडी गडियांतें ॥४३॥
वत्सें आणि वत्सपाळ । पाहे दशदिशां गोपाळ । साद घालूनि उताविळ । दिग्मंडळ गाजवी ॥४४॥
गिरिगव्हरें गुहाशिखरें । वनें उपवनें कांतारें । मानवार्भक नाट्यानुसारें । सर्व यदुवीरें धुंडिलीं ॥२४५॥

क्काप्यदृष्ट्ववांऽतर्विपिने वत्सान्पालांश्च विश्ववित् । सर्वं विधिकृतं कृष्णः सहसाऽवजगाम हा ॥१७॥

कोठें कोणेके स्थानीं । गिरिकाननीं वनीं विपिनीं । वत्सें वत्सप न देखोनि । पाहे ज्ञानी विश्वदृक् ॥४६॥
तेचि काळीं अकस्मात् । ब्रह्मयाचें सर्व कृत्य । श्रीकृष्णासि झालें विदित । तत्कार्यार्थ विचारी ॥४७॥

ततः कृष्णो मुदं कर्तुं तन्मातॄणां च कस्य च । उभयायितमात्मानं चक्रे विश्वकृदीश्वरः ॥१८॥

जाणोनि ब्रह्मयाचें कृत्य । त्यानंतरें रमाकांत । दोहीं ठायीं पूर्ववत् । आपण होत तद्रूपें ॥४८॥
जरी वत्सें वत्सपांवांचून । व्रजी येतां मज देखोन । गाईगोपिका आक्रंदोन । दुःखें प्राण सोडिती ॥४९॥
वत्सें वत्सप विधीनें नेले । तेचि मागुतें जरी आणिले । तैं ब्रह्मयातें माझें केलें । कांही न कळे विशेष ॥२५०॥
ब्रह्मा मोहुन मोहातीत । करावा हा मुख्य हेत । व्रजीं न कळावा वृत्तांत । हें द्विविध कृत्य साधावें ॥५१॥
ऐसें विवंचूनि श्रीहरि । कृत्य साधी दोहीं परी । वत्सवत्सपांचे आकारीं । झाला मुरारि जगदात्मा ॥५२॥
योगमायेच्या अवलंबें । जेणें विश्वचि केलें उभें । त्यासि गोगोपींचीं डिंभें । होतां न लभे संकट ॥५३॥
वत्सवत्सपांचिया माता । तोषवावया सहित धाता । वत्सवत्सपांची स्वरूपता । झाला धरिता जगदीश ॥५४॥
वत्सें आणि वत्सपगण । द्विविध आपणाआपण । करिता झाला श्रीभगवान । तें निरूपण अवधारा ॥२५५॥

यावद्वत्सपवत्सकाल्पकवपुर्यावत्करांध्र्‍यादिकं यावद्यष्टिविषाणवेणुदलशिग्यावद्विभूषांवरम् ।
यावच्छीलगुणाभिधाकृतिवयो यावद्विहारादिकं सर्वं विष्णुमयं गिरोंऽगवदजः सर्वस्वरूपो बभौ ॥१९॥

वत्सें जितुकीं जेवढीं जैसीं । यथापूर्व आकृतीसी । लहान थोर रूपें सरिसीं । ते ते तैशीं हरि झाला ॥५६॥
ढवळीं गवळीं पिवळीं काळीं । पुंडीं बांडीं लांडीं बाहाळीं । भोरीं मोरीं कहिरीं पिवळीं । हुलुं सांवळीं भिंगारीं ॥५७॥
मळी कपिली आणि पाताळी । चंद्री नेउरीडीं जाबाळीं । घुलीं गारोळीं काजळी । तान्ही कोंवळी नळनळितें ॥५८॥
डिवरी लाथरी खोडिकरें । चपळें ओढाळें लांभोरें । सौम्यें साबडीं सोयकरें । एकें बुजारीं बावरीं ॥५९॥
कुंटी मेटीकीं पळपटीं । रोडें रुग्णें धाटीं मोटीं । क्रूरें दारुणें दासटीं । एकें वोखटी मरगुळें ॥२६०॥
तल्हाह चाटीं एकलकोंडीं । एकें खेंटिती झाडें धोंडीं । एकें मारिती मुसांडी । एकें उघडी चुकारें ॥६१॥
ऐशा अनेक वत्सव्यक्ति । श्रवण पुच्छें विविधाकृति । पृथक् संज्ञेसारिख्या ज्ञप्ति । झाला श्रीपति सर्वज्ञ ॥६२॥
तैसेचि वत्सपहि वेगळे । मोरे गोरे एक काळे । शुक्ल सलक्ष्म सांवळे । चतुर भोळे हटवादी ॥६३॥
एक पीन पुष्ट स्थूळ । क्रुश रोडके अमांसळ । प्रांशु खुजट मंद चपळ । एक निर्बल अशक्त ॥६४॥
काणे कैरे येकवेकहणे । मंगळे गोरोळे देखणे । आकर्णनयन सुलोचने । विरूपाक्ष एकाक्ष ॥२६५॥
दांतारे बोचरे विकट दशनीं । अस्खलित बोबडे सुभाषणी । मुडे टापरे सुंदर श्रवणीं । कुंदरदनी सुस्वर ॥६६॥
किनट काकस्वरी घोगर । हंसकलापी पीकामधुर । एक घरघर भयंकर । क्रूर विस्वर कर्कश ॥६७॥
बाबारे लंबोष्ट बिंबाधर । अल्पोष्ठ प्रकट रदागार । शब्द बोलतां गळती पाझर । थुंका बाहेर हिसळत ॥६८॥
नाकें बैसलीं पसरलीं । खेबडीं शेंबडीं चेपटलीं । सरळें सुंदरें रूपाथिलीं । लावण्य गरिमा शोभविती ॥६९॥
चुबुक हनुवट्या गंडस्थळें । चिवळें चापटें वर्तुळें । फिकीं मलिन सकोमळें । शुद्ध सोज्वळें झळकती ॥२७०॥
सरळ बाहु सुशोभित । एकाचे वांकुडे खुळे हात । चपळ चातुर्यमंडित । एक धोंगडे धडमोडे ॥७१॥
ऊर बाळोनि उचलला । अत्यंत एकाचा खोल गेला । कपाट उपमा वक्षस्थळा । एकाचिया शोभली ॥७२॥
कुर्‍हे कुबडे पैं कित्येक । एक लावण्य सुंदरवेख । चपळ चौताळ बालक । स्तब्ध एक शनैश्चर ॥७३॥
एक क्षणक्षणा थुंकती । एक उगलेंचि खोकिती । एक अखंड मिटक्या देती । एक दचकती निदसुरे ॥७४॥
एका अभ्यास जे जे गीत । एक गुण गणिती सदोदित । एक अखंड आंग मोडित । एक चाळित करपदा ॥२७५॥
एक वेणुवाद्यकुशळ । एक बोलती बाष्कळ । एक रसिक मनोमवाळ । झाला गोपाळ ते सर्व ॥७६॥
तिळ मुरुम मत्सवांग । वृणें सुरुंवी देवी डाग । जे जे जैसे व्यंग सांग । अवघें श्रीरंग जाहला ॥७७॥
टिरी पोटर्‍या पाटि पोटें । जानु प्रपद तळवे घोटे । तैसी त्यांचिया सारिखें वटें । धरिलीं नाट्यें श्रीकृष्णें ॥७८॥
एका आवडे दूध भाकरी । एका वळवटांचिया खिरी । एका केवळ घारीपुरी । ते मेधा श्रीहरि स्वयें झाला ॥७९॥
खारट तुरट आम्ल तीक्ष्ण । मधुर कषाय तिक्त उष्ण । एका आवडे शिळें अन्न । अंबिल कदन्न ठोंबरा ॥२८०॥
अनेक वृक्षांचिया काठिया । जै या बारीक मोठिया । लांब आंखूड धाकुटिया । एक साधिया रंगिवा ॥८१॥
जैशीं ज्यांचीं पादत्राणें । नवीं सांधिलीं अत्यंत जीर्णें । वेणु वेताट्या विषाणें । नाट्यें कृष्णें तीं धरिलीं ॥८२॥
अंग्या टोप्या फडक्या जाळ्या । लाख्या कुसुंब्या पांढर्‍या काळ्या । जाडि बोंदर्‍या कांवळ्या । होणें सांवळ्या लागलें ॥८३॥
जाळीयांमाजी दळें मोकळीं । क्रमुक खर्जुर नारिकेळी । ऐशा दृढतर छदावळि । स्वये वनमाळी त्या झाला ॥८४॥
विविध रंगाचे कडदोरे । लंगोटिया विविधांबरें । कटीबंधनें विविधाकारें । रूपें श्रीधरें तीं धरिलीं ॥२८५॥
कटिपादकरभूषणें । माळा मुद्रिका श्रवणलेणें । नानाधातुविचित्ररत्नें । वेगळेपणीं हरि झाला ॥८६॥
कोणी कुटिळ कोणी सुशीळ । कोणी सदय स्नेहाळ बहळ । कोणी तान्हाळू भुकाळ । एक जालाळू भिडसरू ॥८७॥
एक तामस क्रूर कर्कश । स्पृहालोलुप राजस । सत्वसंपन्न सुमानस । निस्पृह उदास निर्मोह ॥८८॥
पूर्वनामाचिया स्मृति । नामें झाला तीं श्रीपति । त्या त्या नामीं व्यवहारती । पूर्व स्थिति सकळेंशीं ॥८९॥
दादा बाबा तात्या नाना । काका मामा भाऊ मेहुणा । यथापूर्व सुहृदा जनां । अनेक संज्ञा आळविती ॥२९०॥
षट् सप्ताष्टनव हायनी । दशद्वादशषोडश कोणी । मासें पक्षें न्यूनदिनीं । चक्रपाणि ते झाला ॥९१॥
एक चपळ बाहुतरणीं । एक भीती देखोनि पाणी । एक दश वृक्षारोहणीं । एक धरणी नटकिती ॥९२॥
एक निःशंक वृषभयानीं । एक पळती वृषभ देखोनि । ऐशी विहारचर्याकरणी । तितुकेपणीं हरि झाला ॥९३॥
विष्णुमयचि अखिळजन । हें विसरोनि मुळींचें वचन । ब्रह्मा धरितां सृजनाभिमान । तो करी भंजन जगदात्मा ॥९४॥
प्रसिद्ध बोलिली पुरुषसूक्तिं । वेदपुरुषाची भारती । तयाच्या अर्थाचे अव्यक्तीं । झाला श्रीपति सर्वरूप ॥२९५॥
मूळींचें पद गिरों‍ऽगवत् । एथील भाव हा निश्चित । वेदवाणीचा जैसा अर्थ । तैसा समस्त अज झाला ॥९६॥
दहन पचन तेजाविणें । कोण दुसरें करूं जाणे । कीं तृणादि सर्वांचीं जीवनें उदकाविणें न राखवती ॥९७॥
तंवी विष्णूवांचूनि विश्व होणें । ठाके कोणाचे आंगवणें । वत्सें वत्सप होऊनि कृष्णें । प्रकट करणें स्वजत्व ॥९८॥
एवं वत्स्सें वत्सपाकारीं । विविधाकृति सालंकारीं । वयसा स्वभाव गुणविकारीं । निर्विकारी एकात्मा ॥९९॥

N/A

References : N/A
Last Updated : April 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP