अध्याय १३ वा - श्लोक २० ते २३

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


स्वयमात्माऽऽत्मगोवत्सान्प्रतिवार्याऽऽत्मवत्सपैः । कीडन्नात्मविहारैश्च सर्वात्मा प्राविशद्व्रजम् ॥२०॥

ऐसा सर्वात्मा होत्साता । व्रजीं झाला प्रवेशता । आपणा आपण कैसा नेता । हें तत्त्वतां जरी पुससी ॥३००॥
तरी चाळकस्थानें स्वयें कृष्ण । सूत्रस्थानीं वत्सपगण । काष्ठविकार जे चेष्टमान । तें वत्सें जाण तद्रूपें ॥१॥
चळणवळणीं क्रिया विविध । ते बोलिजे क्रीडा विशद । दृष्टांतरूपें अवघा भेद । द्राष्टांत अभेद आत्मत्वें ॥२॥
विष्णुमयचि जग हें खरें । परंतु भासे त्रिगुणाकारें । म्हणोनि सृजन आविष्कारें । ब्रह्मा भरे अभिमानीं ॥३॥
कर्त्तभोक्तृत्वें विष्णुमय । अंतःकरणचतुष्टय चेष्टा ज्ञानक्रियादि त्रितय । हें सर्व होय रजात्मक ॥४॥
भूतें आणि पंचविषय । भोग्य कार्य जें कां ज्ञेय । लटिकें माजूनि भासे बाह्य । जे भुलविताहे करणज्ञा ॥३०५॥
त्यासी म्हणावें तामस । ऐसा लटिका गुणाभास । विष्णुमयचि जग अशेष । वेदपुरुष बोलिला ॥६॥
व्यापक विष्णु व्याप्य जग । वस्त्राभरणें श्वानादिक । एकात्मक अभिन्न ॥७॥
( व्यापक विष्णु व्याप्य जग । या भेदाचा निरसी डाग । वत्से वत्सप उपचार सांग । स्वयें श्रीरंग होऊनी ॥३०७॥ )
परंतु अवघें अचेतन । याचा कल्पक कर्ता भिन्न । कृष्ण पूर्ण चैतन्यघन । झाला अभिन्न अवघेंची ॥८॥
( जेवि सोन्याचे केले टाक । देव देऊळ अश्वसेवक । वस्त्राभरणें श्वानादिक । एकात्मक अभिन्न ॥३०८॥ )
देवपरिवार उपचार जे जे । ध्यानीं कल्पिती भक्तराजे । सत्यसंकल्पें अधोक्षजें । प्रकट ओजें तें केलें ॥९॥
आपण शरीरें चैतन्यघन । आत्मस्वरूपचि वत्सगण । आत्मवत्सपीं परिवारून । आत्मविहारीं क्रीडती ॥३१०॥

तत्तद्वत्सान्पृथङ्नीत्वा तत्तद्गोष्ठे निवेश्य सः । तत्तदात्माऽभवद्राजंस्तत्तत्सद्म प्रविष्टवान् ॥२१॥

मग वेगळिया गोष्ठाप्रति । तीं तीं वत्सें ने श्रीपति । धरूनि तेचि वत्सप व्यक्ति । करी वस्ति तत्सदनीं ॥११॥
ऐसाचि सर्वां सदनीं हरि । नेऊनि त्या त्या वत्सहारी । होऊनि त्या त्या कुमाराकारीं । पहिल्यापरि वर्ततां ॥१२॥
( मग आत्मरूपावत्सकातें । सर्वात्मकत्वें श्रीअनंतें । प्रवेशविले व्रतपुराते । प्रथक् युथे पूर्ववत् ॥३१२॥ )
मातापितरांसि मोहक । झाला सहस्रधाधिक । तोंचि सविस्तर विवेक । राया श्रीशुक निवेदी ॥१३॥

तन्मतरो वेणुरवत्वरोत्थिता उत्थाप्य दोर्भिः परिरभ्य निर्भरम् ।
स्नेहस्नुतस्तन्यपयःसुधासवं मत्वा परं ब्रह्म सुतानपाययन् ॥२२॥

वत्सें येतां प्रजानिकटीं । वेणुशृंगाच्या बोभाटीं । माता उठती उठाउठी । पहाती दृष्टीं निजकुमारां ॥१४॥
उठोनि धांवती सन्मुख । परब्रह्मचि मानूनि तोक । उचलोनि आलंगिती सम्यक् । प्रेमें श्रीमुख निरीक्षिती ॥३१५॥
कृष्णमायेचें मोहपडळें । गोपी विसरल्या तान्हीं बाळें । चैतन्यवेधें स्नेहबळें । स्तनमंडळें स्नुत झालीं ॥१६॥
मग अमृतापरीस सुस्वाद बहळ । आसवाहूनि जें उन्मादशीळ । ऐसें पयपान निर्मळ । माता स्नेहाळ करविती ॥१७॥
सदैव येणेंचि स्नेहभावें । वत्सें वत्सपां वासुदेवें । होऊनि मोहिलें लाघवें । नोहे ठावें हरिकृत्य ॥१८॥

ततो नृपोन्मर्दनमज्जलेपनालंकाररक्षातिलकाशनादिभिः ।
संलालितः स्वाचरितैः प्रहर्षयन्सायं गतो यामयमेन माधवः ॥२३॥

राया प्रतिदिवसाच्या ठायीं । ऐसा क्रीडतां शेषशायी । परस्परें स्नेहनवाई । वाढली तेही अवधारीं ॥१९॥
भावें भजतीं प्रेमळ भक्त । माता त्याहूनि अनुरक्त । आधींच पुत्रमोहासक्त । वेधी अनंत त्यावरी ॥३२०॥
जे जे काळीं जो जो नियम । तैसा वर्ते पुरुषोत्तम । त्याचा जाणोनि मनोधर्म । करी तें कर्म तत्तोषें ॥२१॥
सुंदर स्वचेष्टा संचारें । वर्तें नित्याच्या चित्तानुसार्रें । व्रज मोहिलें चित्तचोरें । चमत्कारें चापल्यें ॥२२॥
ऐशा सप्रेमभावें जननी । मोहूनि गोंविल्या निजात्मभजनीं । पुत्रभावें नित्यार्चनीं । प्रेमविधानीं वोळगती ॥२३॥
पांच पेरोज पुष्कराज । इंद्रनीळ अतिसुतेज । रुक्ममंडित तेजःपुंज । दिव्याभरणें लेवविती ॥२४॥
परिमळद्रव्यें उद्वर्तनें । अभ्यंगपूर्वक देती स्नानें । दिव्य वस्त्रांचीं परिधानें । अनुलेपनें अमूल्य ॥३२५॥
क्षणक्षणां निंबलोणें दृष्टि । उतरती स्नेहाळपणें । नाना विभूतिरक्षणें । तिलकांजन शांत्यर्थ ॥२६॥
रसाळ स्वादिष्ठ सुस्निग्ध । षड्रस पक्कान्नें बहुविध । अनेक अपूर्व फळांचे स्वाद । पुष्पें सुगंधें अर्पिती ॥२७॥
अक्षवानें निरांजनें । शय्या मंचकीं पहुडवणें । नानापरी हालरुगानें । रंजवणें सुशब्दीं ॥२८॥
प्रातःकाळीं गाऊनि गुण । करिती उपोढ रंजवणें । सर्वोपचारीं सालंकरनें । देती भोजन पूर्ववत् ॥२९॥  
जाळिया भरूनि सदन्नें । लेवविती पादत्राणें । वेणुवेत्रादि विषाणें । क्रीडोपकरणें अर्पिती ॥३३०॥
प्रभाते गोप गोधनें नेती । मागुते वत्स वत्सप पंक्ति । क्रुष्णाकार अवघ्या व्यक्ति । वना जाती कृष्णेंशीं ॥३१॥
वत्सें वत्सप कृष्ण गोळा । होऊनि कानना गेलिया मेळा । गोपी अंतरीं कळवळां । गाती वेल्हाळा सप्रेमें ॥३२॥
माता काढिती अस्तरणें । पुत्रप्रेमें गाती गाणें । तेणें छंदें गृहें झाडणें । संमर्जनें तद्वेधें ॥३३॥
शेण वळितां झाडितां गोठा । पाणिया जातां यमुनाकांठा । न मोडे प्रेमाची उत्कंठा । चालती वाटा तद्वेधें ॥३४॥
दळिती कांडिती रांधिती । वाटिती घाटिती लाटिती । सप्रेम वेधें वेधल्या वृत्ति । वियोग चित्तीं न सोसवे ॥३३५॥
करितां गृहकृत्यें समस्त । वत्सें वत्सप कृष्णेंसहित । वना गेले तो स्मरोनि पथ । चित्तीं अद्भुत अवस्था ॥३६॥
ऐशिया माता सप्रेमराशि । जाणे सप्रेम हृषीकेशी । कळवळूनि निजमानसीं । या महिमेसी संप्राप्त ॥३७॥
चतुर्थ प्रहरींचा प्रेमकाळ । नियम लंघूनि गोपाळ । टाकूनि ये सायंकाळ । उताविळ वत्सेंशीं ॥३८॥
मातृलालन क्रीडाकाळीं । सादर अनुक्रमें वनमाळी । यथासमयीं विचित्र खेळीं । तोष नव्हाळी त्यां ओपी ॥३९॥
माता मोहिल्या ऐशिये परी । वत्सें झालिया श्रीमुरारि । गाई मोहिल्या त्या कुसरी । नृपा अवधारीं शुक वदे ॥३४०॥

N/A

References : N/A
Last Updated : April 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP