दमयंती स्वयंवर - पृष्ठ १८

रघुनाथ पंडित यांच्या काव्यात इतके माधुर्य व इतका रस आहे की, ते आरंभापासून शेवटापर्यंत वाचल्यावाचून मनाची तृप्ति होत नाही व एकदा वाचले म्हणजे पुनः वाचावेसे वाटते.


वसंततिलका

तो वन्हि, तो वरुण, तो यम, इंद्र गा मी । जालो तुला सकळही विदित स्वनामी ॥

बोले महीरमण, "मी नळ चंद्रवंशी । वंदी पदास तुमच्या तुमचाच अंशी ॥१७१॥

दण्डी

'नळा कोठे जातोसि?' अशा बोले । नळे इंद्रास असे बोलिजेले ॥

'भीमभूपे हे लिखित पाठवीले । सैवराला या लागि येयिजेले ॥१७२॥

बोलताहे देवेंद्र नृपवराला । "नैषधा तू आलासि सैवराला ॥

समज आम्ही तुजजवळि याचनेला ॥ असो आलो; मनि धरुनि कामनेला ॥१७३॥

वसंततिलका

जे हे दिशापति विशालयशा तशाला । आशावशाकुल अशांत दशा कशाला? ॥

तू हे नृपा न वद, तूज समीप येतो । आम्ही सखी निज-मुखी अवदान घेतो ॥१७४॥

केला विचार ह्रदयी नळराजयाने । "हा जीवही धनहि देइन निश्चयाने ॥

देवेंद्र हे जरि म्हणेल कदापि भैमी । ते देववेल मज; काय करीन गै मी? ॥१७५॥

दण्डी

म्हणे राजेंद्र तया देवदेवा । "काय आज्ञा जी काय करू सेवा ॥

वीरसेनाचा थोर पुण्य-ठेवा । मज मिळाला हा दर्शनाख्य केवा ॥१७६॥

वसंततिलका

बोले सुराधिप नराधिपतीस "राया, । भैमी जसी मज वरील तसे कराया ॥

बोलावयास तिजसी तिचिया घरा जा । तू बोलका चतुर, केवळ काय राजा? ॥१७७॥

मालिनी

मग हळुच सुरेंद्रा बोलिजे भूपतीने । "मज निज सु-मनाची घतली माळ तीने ॥

ह्रदय तरि तियेच्या सांद्र जाले सुवासे ।

चलित न करवे ते कोणत्याही प्रयासे" ॥१७८॥

दण्डी

पुन्हा बोले देवेंद्र नृपवरा या । "तुला जाले वश ह्रदय तिचे राया ॥

तरिच आलो हे याचना कराया । तुझ्या वाक्ये आम्हांसि ते वराया ॥१७९॥

वसंततिलका

दातव्यही स्ववश आपण जाणताही । पर्याय उत्तर वदेच न देच काही ॥

दाता असा शठ कसा? ठकसा; कदापि । जो याचकावरि कृपा न करीच पापी ॥१८०॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP